गुळ उद्योगातील धोरण, नियोजन व नवीन तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा-2    01-Jun-2021
|
प्रस्तावना:
 
भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशात गेल्या ४० वर्षात प्रत्येक कुटुंबाची सरासरी शेती मालकी ही २ हेक्‍टर वरून १ हेक्‍टर इतकी झाली आहे, तसेच एका अहवालानुसार ज्या लोकांना १० हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे त्याच लोकांचे शेतीमध्ये दहा वर्षात उत्पन्न दुप्पट झाले आहे. यामुळे शेतीमालावर प्रक्रिया करणे हा छोट्या शेतकर्‍यांसाठी उत्पन्न वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. ऊस हे सगळ्या भारतभर घेतल्या जाणारं नगदी पीक आहे. आपल्याकडे एकूण उपजाऊ जमिनीच्या ३ टक्के क्षेत्रफळ म्हणजेच ४० लाख हेक्टर इतकी जमीन ऊस उत्पादनासाठी वापरली जाते.
 
सद्यस्थितीमध्ये, एकूण उत्पन्नाच्या ७० टक्के ऊस साखर कारखान्यासाठी, २० टक्के ऊस गुळ उत्पादनासाठी व १० टक्के ऊस हा इतर गोष्टींसाठी म्हणजेच बियाण्यासाठी व रसवंतीसाठी वापरला जातो. ऊसावर प्रक्रिया करून गुळ निर्माण करणे हा प्रचलित व परंपरागत उद्योग आहे. मागील पन्नास वर्षाच्या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल की भारतीय लोकांचा दरडोई गुळाचा वापर हा १९७० मध्ये ८.७ वरून २०१४ मध्ये ३.७ कि.ग्रॅ. वर आला आहे (आकृती १) व या उलट साखरेचा वापर हा १२ वरून १९ कि.ग्रॅ. वर गेला आहे. ग्राहकांचे गुळा बद्दलच्या उदासीनतेची बरीच कारणे आहेत, यातील प्रमुख कारणे म्हणजे
 
• गुळाचा वापरण्यायोग्य सुलभ स्वरूपचा (फॉर्म) अभाव म्हणजेच गुळाची ढेप फोडणे, साठवणे, लवकर विरघळणे व प्रमाणात वापरणे याबद्दलच्या अडचणी
• गुळाच्या ढेपेची टिकवण क्षमता
• गुळामध्ये येणारा कचरा व अविद्राव्य पदार्थ
• गुळ बनवण्याच्या पद्धतीमधील अस्वच्छता
• गुळ बनवण्यासाठी आरोग्यास हानिकारक रसायनांचा वापर
 
आज सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक लोक गुळ प्रक्रिया या विषयावर जनजागृती करण्याचे चांगले काम करत असून लोकांना या प्रक्रिया उद्योगाकडे आकर्षित करत आहे. कोणताही उद्योग करायचा म्हटला की त्यामध्ये अनेक आव्हाने व तो करण्यासाठीचे काही निकष असतात. सदर लेखामध्ये आम्ही गुळ उद्योगातील वेगवेगळ्या पैलूंचे पृथक्करण व अंगिकारताना करावयाचा धोरणात्मक विचार मांडले आहेत याच बरोबर नवीन संसाधन कार्यक्षम गुळ प्रक्रिया तंत्रज्ञानाची ओळख करून दिली आहे.
गुळा संदर्भात ग्राहकांचे बदलते निकष
 
मागील काही दशकांमध्ये पोषक अन्ना सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यायांचे (मायक्रोन्यूट्रिएंटचे) मानवाच्या शरीरासाठी महत्व लक्षात आले आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये प्रामुख्याने जीवनसत्व (विटामिन) व खनिजांचा (मिनरल्स) यांचा समावेश होतो. गुळापासून आपल्याला नैसर्गिक रित्या अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. यामुळे जगातील अनेक भागांमध्ये ग्राहक साखरेला आरोग्यदायी पर्याय म्हणून गुळाकडे आकर्षित होत आहेत.
 
भारतामधील ग्राहक हा गुळचा वापर केवळ सणासुदीच्या गोड पदार्थां पुरता मर्यादित न ठेवता, त्याचा रोजच्या खाद्यपदार्थात जसे चहा, कॉफी, दूध, सरबत तसेच नेहमी बनवण्यात येणारे गोड पदार्थ म्हणजेच खीर, शिरा इत्यादी मध्ये साखरेला पर्याय म्हणून आजमावत आहे. यासाठी गुळ हा दैनंदिन पदार्थात वापरता येईल अशा सुलभ स्वरूपात ग्राहकाला मिळायला हवा उदाहरणार्थ जर गुळ हा चहा, कॉफी किंवा इतर पेयांमध्ये वापरायचा असेल तर तो प्रमाणात टाकता आला पाहिजे (चमचा वापरून), तो सहज विरघळला पाहिजे व त्यामध्ये कोणतेही अविद्राव्य पदार्थ नसले पाहिजेत, तसेच त्याच्या वापरामुळे पेयाच्या चवीमध्ये बदल न झाला पाहिजे.
 
ग्राहकांच्या या गरजेमुळे मागील काही वर्षात गुळ पावडर व गुळ कणी यांना शहरी भागातून चांगली मागणी आली आहे. रव्याच्या (ढेपेच्या) तुलनेत ग्राहक हा गुळ पावडरला चांगला दर देण्यास तयार आहे असे किरकोळ बाजारातील किमतीवरून निदर्शनास येते.
 
बाजारात गुळ घेताना सर्वसाधारणपणे ग्राहकांचे तीन प्रकार दिसतात अ) किंमतीला महत्त्व देणारा ग्राहक ब) आरोग्याला महत्त्व देणारा ग्राहक क) किंमत व आरोग्य याचा समन्वय साधणारा ग्राहक.
 
किंमतीला महत्त्व देणारा ग्राहक हा गुळाच्या किंमतीची तुलना साखरेशी करतो. आरोग्याला महत्त्व देणारा ग्राहक हा आरोग्याबाबत जागरूक असतो. आपण काय खातो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो या बद्दल तो नेहमीच चांगले पर्याय शोधत असतो. असा ग्राहक हा गुळाची किंमत न पाहता त्याचा दर्जा व गुणवत्ता याला महत्त्व देतो. किंमत व आरोग्य याचा समन्वय साधणारा ग्राहकवर्ग हा चोखंदळ असुन त्यांची कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त मूल्यवर्धित पदार्थ मिळवल्याबद्दल ओढ असते. अशा ग्राहकाच्या मनात चांगल्या गुळाला किती जास्त किंमत द्यायची याची ढोबळ संकल्पना असते.
 
कोणताही एखादी वस्तू घेताना ग्राहक आपल्याला मिळणारे फायदे व त्यासाठी मोजावी लागणारी किंमत याची आकडेमोड मनात करत असतो. गुळाचे दृश्य व अदृश्य स्वरूपातले मूल्यवर्धन व फायदे वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तसेच त्यांना मूल्यमापन करण्यासाठी मुद्दे व दिशा दिली पाहिजे.
 
गुऱ्हाळाची संरचना व त्यांचे प्रकार:
 
ऊसाचा रस आटवून कोणतेही अपकेंद्री बल (सेंट्रिफ्यूगल फोर्स) न वापरता मिळणारा घनरूप पदार्थ म्हणजे गुळ होय, यालाच दुसरे जगमान्य शास्त्रीय नाव म्हणजे नॉन-सेंट्रीफ्यूज-शुगर (NCS). गुळ प्रकल्पामध्ये रसाचे बाष्पीभवन करण्यासाठी तीन प्रकारे उष्णता द्यायचे प्रकार (आकृती २) सध्या प्रचलित आहेत अ) थेट जाळापासून उष्णता ब) वाफ तयार करून त्यापासून उष्णता क) थर्मल ऑइल वापरून त्यापासून उष्णता
 
थेट जाळापासून उष्णता देण्याची परंपरागत गुळ बनवायची पद्धत आहे, यामध्ये कढाई व जाळाला बंदिस्त करण्यासाठी भट्टी किंवा फर्नेस यांचा समावेश होतो. या प्रकारामध्ये उसाच्या वाळलेल्या चोथरीचे भट्टीमध्ये ज्वलन करून कढईतील रसाला खालच्या बाजूने थेट उष्णता देण्यात येते. या प्रकारांमध्ये एक कढई किंवा अनेक कढई (दोन, तीन किंवा चार) अशी संरचना वापरण्यात येते. एक कढई गुळ प्रकल्प संरचनेत साधारणपणे ८००-१२०० लिटर रस उकळण्यासाठी घेण्यात येतो. अनेक कढई गुळ प्रकल्प संरचनेत साधारणपणे ३५०-६०० लिटर रस प्रती कढई उकळण्यासाठी घेण्यात येतो. थेट जाळापासून उष्णता देणाऱ्या प्रकल्पाची क्षमता ही साधारणपणे ५-१५ टन ऊस गाळप प्रतिदिन असते. अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये गुळ बनवण्यासाठी अनुभवी व समर्पित भावनेने काम करणाऱ्या गुळव्या व जळव्या यांची गरज असते.
 
वाफेच्या उष्णतेने रसाचे बाष्पीभवन करण्याच्या प्रकल्पात कढाई, बॉयलर व बॉयलरसाठी लागणारी सामग्री जसे की पंप, ब्लोवर, सेफ्टी व्हाल इत्यादींचा समावेश होतो. या प्रकल्पामध्ये बॉयलरद्वारे पाणी गरम करून वाफेची निर्मिती करण्यात येते. हि वाफ उष्णता प्रतिबंधक पाईपांचा वापर करून रसाच्या कढाईपर्यंत नेण्यात येते. या तंत्रज्ञानात कढाईच्या बाहेरील बाजूस वाफेवर गरम करण्यासाठी जॅकेट लावलेले असते. अशा प्रकल्पांची क्षमता ३०-५०० टन ऊस गाळप प्रतिदिन इतकी असू शकते. कमी वाफेमध्ये रसाचे बाष्पीभवन होण्यासाठी बंदिस्त रस उकळायचे भांडे (मल्टिपल इफेक्ट ईव्हॉपरेटर) याचा वापर करतात. बर्‍याच अंशी अशा प्रकल्पाची संरचना एखाद्या छोट्या साखर कारखान्या सारखी असते व यामध्ये साखर कारखान्यातील काही अभियांत्रिकी संकल्पना वापरण्यात येतात. अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये बॉयलर चालवण्यासाठी सर्टिफाइड बॉयलर ऑपरेटरची तसेच गुळव्याची आवश्यकता असते, याच बरोबर अशा प्रकल्पांमध्ये वाफ तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या क्षारमुक्त पाण्याची आवश्यकता असते.
 
थर्मल ऑइल वर चालणाऱ्या प्रकल्पामध्ये जॅकेट असलेली कढाई, थर्मल ऑइल हिटर व थर्मल ऑइल फिरवण्यासाठी लागणारा पंप ही मुख्य सामग्री असते. थर्मल ऑइलचे हिटर मधून बाहेर पडणारे तापमान नियंत्रित करून कढईत जाणारी उष्णता नियंत्रित करण्यात येते. अशा प्रकल्पांची क्षमता २०-१०० टन ऊस गाळप प्रतिदिन इतकी असू शकते. अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये थर्मल ऑइल हिटर चालवण्यासाठी अनुभवी ऑपरेटरची तसेच गुळव्याची आवश्यकता असते, याच बरोबर अशा प्रकल्पांमध्ये दर २-४ वर्षांनी थर्मल ऑइलची स्वच्छता व बदली करावी लागते.
 
गुळ उद्योग कोणी करावा ?
 
उद्योग कोणीही सुरू करू शकतो, पण एक यशस्वी उद्योग करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. उद्योग म्हणजे एक वसा आहे व हा वसा समर्थपणे पेलण्यासाठी व्यवसायिक बारकावे समजून घेण्याची नितांत गरज आहे. केवळ आपल्याकडे जमीन आहे किंवा ऊसाचे क्षेत्र आहे, गुंतवणुकीसाठी पैसा आहे, मुलाला काही उद्योग काढून द्यायचे आहे म्हणून गुळ उद्योग सुरू करू नये. कितीही चांगले तंत्रज्ञान घेतले तरी उद्योगाची सफलता ही तुमच्या चिकाटी, जिद्द, समजून घेण्याची वृत्ती व व्यवसायिक प्रामाणिकपणा यावर अवलंबून असते. दुर्दैवाने हे आपल्या शिक्षण पद्धतीत शिकवले जात नाही तर हे आपल्याला जीवनाच्या शाळेत शिकावे व आत्मसात करावे लागते.
 
दुरून सगळेच डोंगर साजरे दिसतात पण जवळ गेल्यावर त्यातील अडचणी व आव्हाने कळतात, एक मुत्सद्दी गिर्यारोहक प्राप्त परिस्थितीमध्ये डोंगर चढण्याच्या आव्हानांना सामोरे जाऊन अडचणींवर मात करतो. असेच गुळ उद्योगाचे आहे, ज्यांना गुळ उद्योगातील प्राप्त परिस्थितीमध्ये सकारात्मक दृष्टीने काम करत मार्ग काढायची तयारी असेल त्यांनीच यामध्ये उतरावे. अन्यथा आपण बरेच गुळ उद्योग बंद पडलेले किंवा आजारी असलेले ऐकत असतो.
 
किती क्षमतेचा गुळ उद्योग करावा? उद्योगाचे धोरण आणि गुळ उद्योगाची क्षमता यांचा समन्वय:
 
किती क्षमतेचा गुळ उद्योग करावा या प्रश्नाचे उत्तर हे तुमच्या उद्योगाच्या धोरणात लपलेली आहे. तुम्ही तुमचा उद्योगांमध्ये विपणन किंवा ग्राहक केंद्रित धोरण अथवा उत्पादन केंद्रित धोरण (आकृती ३) वापरतात यावर अवलंबुन असते.
 
विपणन (मार्केटिंग) किंवा ग्राहक केंद्रित धोरण राबवणारा उद्योग हा त्याचा नफा ग्राहकांना मूल्यवर्धित उत्पादने देऊन वाढवतो. अशा प्रकारच्या ग्राहक केंद्रित धोरणात दृश्य स्वरुपाची वैशिष्ट्ये म्हणजेच गुळाची गुणवत्ता, त्याचा दर्जा, चव, टिकवणक्षमता व त्याचे स्वरूप (ढेप किंवा रवे, कणी, पावडर) याला महत्त्व आहे. याच बरोबर ग्राहकांना अपेक्षित असलेल्या अदृश्य स्वरूपाच्या बाबी म्हणजे स्वच्छ उत्पादन प्रक्रिया व रसायन मुक्त उत्पादन त्याचा अवलंब केला जातो. ग्राहक केंद्रित उद्योगांचा ब्रँड (उत्पादनाची ओळख) तयार करण्यावर भर असतो. तसेच आपली विश्वासार्हता ग्राहकांवर ब्रँडच्या माध्यमातून ठसवली जाते.
 
उत्पादन केंद्रित धोरण राबवणारा उद्योग हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून उत्पादनाचा खर्च कमी करून नफा वाढवण्याचे धोरण राबवते. उत्पादन केंद्रित कंपनी ही घाऊख बाजारात (होलसेल मार्केट) अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचा पक्का माल (गुळ) तयार करण्यावर भर देते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कच्चामाल (ऊस) स्वस्त दरात मिळवणे व कमी कामगारांवर प्रकल्प चालवणे या दोन गोष्टींवर कंपनीचा भर असतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्यामुळे बरेचदा पक्का माल हा घाऊक बाजारात विकण्याशिवाय पर्याय नसतो. घाऊक बाजारात माल विकताना ब्रँडची गरज भासत नाही.
 
ग्राहक केंद्रित कंपनी ही छोट्या प्रमाणावर ग्राहकांना पूरक असे गुळ उत्पादन करते व ३-५ वर्षांमध्ये बाजाराच्या मागणीनुसार उत्पादन क्षमता वाढवते. या कंपनीचा उच्च प्रतीचा गूळ तयार करण्यावर भर असतो. ही कंपनी उच्च प्रतिचा गुळ बनवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व योग्य ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी लागणारे मार्केटिंग यावर खर्च करते.
 
उत्पादन केंद्रित असलेली कंपनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमतेचा प्रकल्प लावते व त्यांची गुळ चांगला दराने विकण्याची क्षमता ३-५ वर्षात तयार करते. या कंपन्यांचा मुख्य उद्देश हा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त गूळ तयार करण्याचा असतो. उत्पादन केंद्रित कंपनीचा मुख्य खर्च हा स्वस्तात ऊस खरेदी करणे तसेच उत्पादन वाढवण्यासाठी व कामगार खर्च कमी करण्यासाठी अभियांत्रिकी प्रणाली लावणे यावर असतो.
 
जर तुम्ही नवीन उद्योग सुरू करणार असाल व हा तुमचा पहिलाच उद्योग असेल तर तुम्ही ग्राहक केंद्रित कंपनी सुरू करून थोड्या प्रमाणात उत्पादन केले पाहिजे. उद्योगातील चढ-उतार शिकले पाहिजेत. छोट्या प्रमाणावर सुरू केल्यामुळे तुम्हाला पेलणारी व संभाव्य परिणामांची पूर्ण जागरूकता ठेवून उद्योगांमध्ये जोखीम घेता येते. उद्योजकाला बरेचदा उद्योगत नुकसान सहन करून काही गोष्टी शिकाव्या लागतात. उद्योगात येणारे नुकसान ह्याकडे उद्योजकांनी आपण शिकण्यासाठी केलेला खर्च या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. लक्षात ठेवा 'रोम हे एका दिवसात बांधले नव्हते'. एक यशस्वी उद्योग उभारण्यासाठी तुम्हाला समर्पक भावनेने प्रयत्न करणे व तत्परतेने सुधारणा करून त्या अंगिकारणे या धोरणांचा वापर करावा लागतो. उद्योगाच्या वाटचालीत तुम्ही विश्वासू व सकारात्मक लोकांशी संगत व व्यवहार केला पाहिजे.
 
तुम्ही जर प्रस्थापित गूळ उद्योजक असाल किंवा तुम्ही अनेक उद्योग करून गुळ उद्योग करणार असाल तर तुमच्या व्यवसायिक धोरणाच्या अनुभवानुसार तुम्ही ग्राहक केंद्रित किंवा उत्पादन केंद्रित यापैकी कोणत्याही धोरणाची निवड करू शकता.
परंपरागत गुळ उद्योगातील काही प्रमुख बाबी:
 
गुळ बनवण्याच्या शास्त्राचे अभियांत्रिकी दृष्टीने अन्न प्रक्रिया उद्योग किंवा फूड प्रोसेसिंग प्लांट या विभागात वर्गीकरण होते. कोणत्याही फुड प्रोसेसिंग प्लांट मध्ये कच्या मालाची नियमितता व गुणवत्ता, प्रक्रियेची स्वच्छता, प्रक्रियेसाठी वापरले तंत्रज्ञान, पक्क्या मालाची टिकवण क्षमता व गुणवत्ता या बाबी महत्त्वाच्या असतात. गुळ उद्योगात याचा विचार केला असता कच्च्या मालाच्या निवडीचे निकष, गुर्‍हाळ घरांची स्वच्छतेला पूरक मांडणी, गुळ प्रक्रियेत वापरल्या जाणार्‍या पदार्थांचा प्रमाणात वापर व प्रक्रिया कार्यान्वित असताना घेतलेले वेगवेगळे निर्णय हे महत्त्वाचे ठरतात.
 
गुळ उद्योग हा शेतीपूरक प्रक्रिया उद्योग असल्यामुळे साधारणपणे असे उद्योग हे शेती किंवा ग्रामीण भागात लावले जातात. परंपरागत गुळ उद्योगत आपल्याला कुशल व अकुशल कामगारांची गरज असते. आज वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या शहरांच्या जवळ असलेल्या ग्रामीण भागात स्थानिक कामगार सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. गुळ उद्योगात कुशल कामगारां मध्ये गुळव्या (गुळ बनवणारा) व काही प्रमाणात जळव्या (इंधन टाकून जाळ नियंत्रित करणारा) या दोघांचा समावेश होतो. गुळव्या हा आपल्या अनुभवाच्या जोरावर एखाद्या पारंगत स्वयंपाक्या यासारखा गुळ बनवत असतो. जळव्या हा त्याच्या आदेशानुसार जाळावर नियंत्रण करून गुळ बनवायच्या प्रक्रियेत त्याला मदत करत असतो. गुळ बनवणे हे अनुभवसिद्ध काम आहे त्यामुळे चांगला गुळव्या मिळण्याची व तो टिकवून ठेवण्याची मोठी अडचण असते. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या कौशल्यावर अवलंबून असलेला उद्योग हा कधीही अडचणीत येऊ शकतो. परंपरागत गुळ उद्योगांमध्ये अनेक अवजड व जोखमीची कामे असतात यामुळे स्थानिक कामगार यांना पसंती देत नाहीत.
 
कढईत उसाचा रस हा आटून घट्ट होताना वेगवेगळ्या बदलांना सामोरे जात असतो. हे बदल होताना उष्णतेचे नियंत्रण व कढईला सर्व बाजूंनी समप्रमाणात उष्णता देणे महत्त्वाचे असते. बर्‍याचदा अनियंत्रित उष्णतेने घट्ट होणार्‍या रसाचा रंग चॉकलेटी / काळसर होतो. हा चॉकलेटी / काळसर रंगाचा घट्ट रस (पाका) हा सल्फरचे संयुग असलेले हायड्रोस (सोडियम हायड्रोसल्फाइड) व पोपडी (फॉर्मअलडीहाइड सलफोऑग्झिलेट) अशा विरंजकाचा (ब्लिचिंग एजंटचा) वापर करून स्वच्छ (रंगहिन) करतात. अनियंत्रित स्वरूपात सल्फरचा संयुगाचा वापर आरोग्यास हानिकारक असतो. पाक रंगहिन केल्यानंतर गुळाला सोनेरी-पिवळा रंग येण्यासाठी बरेचदा कत्रिम रंगांचा वापर करतात.
 
गुळ उद्योगातील संसाधन कार्यक्षम गुळ प्रक्रिया तंत्रज्ञान:
 
संसाधन कार्यक्षम गुळ प्रक्रिया प्रकल्पात गुर्‍हाळातील कढईला थेट उष्णता देणार्‍या संरचनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे (आकृती ४). या तंत्रज्ञानात वापरल्या जाणार्‍या कढाई व भट्टी यांची निर्मिती कारखान्यात यांत्रिकी अभियांत्रिकीच्या निकषावर केली जाते व गुर्‍हाळाच्या जागेवर प्रकल्प जोडला जातो. कार्यक्षम गूळ प्रक्रिया प्रकल्प हा २००० चौरस फुटामध्ये बसतो. या प्रकल्पामध्ये आपण ५००-६०० किलो गुळाची निर्मिती २०-२४ तासात करू शकतो, या प्रकल्पाची ऊस गाळप क्षमता ही ५-६ टन प्रतिदिन इतकी आहे.
 
या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने गुर्‍हाळाच्या भट्टीची संरचना ज्वलन कार्यक्षमतेला पूरक अशी असून त्यामध्ये भट्टीचे आकारमान व क्षेत्रफळ यांचा योग्य तो समन्वय उष्णता अभियांत्रिकीच्या निकषांवर केला आहे. उष्णतेचे जास्तीत जास्त वहन कढयांनकडे व्हावे यासाठी व ज्वलनासाठी योग्य प्रमाणात हवा (ऑक्सीजन) मिळण्यासाठी नाविन्यपूर्ण चिमणीचा वापर केला आहे. कामगारांचे कष्ट व जोखमीची कामे कमी करण्यासाठी कढाई ही कमरेच्या उंचीवर बसवली असून त्याभोवती चालण्यासाठी सुलभ आशी रचना केली आहे. भट्टीच्या सुलभ संरचनेमुळे स्वच्छता ठेवणे सोपे झाले आहे.
 
या प्रकल्पात संगणकीय कंट्रोलद्वारे भट्टीतिल जाळाचे व कढाईतिल रसाचे तापमान मोजून योग्य ते चालवण्याचे निर्देश देण्याचे व नियंत्रण करण्याचे तंत्रज्ञान अवलंबिले आहे. यामध्ये प्रामुख्याने गुळ बनवण्याचा पॉईंट, इंधन टाकण्याचे प्रमाण कमी जास्त करणे, रसाचा सामू (पीएच) नियंत्रित करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. यामुळे कामगारांना माफक प्रशिक्षणाद्वारे केमिकलचा वापर न करता बर्‍याच अंशी एकाच प्रतिचा गुळ बनवता येतो.
 
कार्यक्षम गुळ प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये वाफ्यात रसाच्या चाचणीला घोटून वेगवेगळ्या स्वरूपाचा गुळ म्हणजेच गुळाचे रवे, वड्या, कणी, पावडर इत्यादी गोष्टी सहजपणे बनवता येतात. या तंत्रज्ञानामध्ये तयार झालेली कणी व पावडर ही सुकवण्यासाठी ड्राईंग रूममध्ये (सुकवण्याची खोलीमध्ये) ठेवली जाते. ड्राईंग रूममध्ये लागणारी गरम हवा तयार करण्यासाठी कार्यक्षम गुळ प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या चिमणीतून जाणारी टाकाऊ उष्णता (वेस्ट हिट) वापरली जाते.
 
संसाधन कार्यक्षम गुळ प्रक्रिया उद्योगाचे मुख्य फायदे:
 
• औद्योगिक शिस्त- प्रमाणबद्ध व विज्ञानाच्या आधारे गूळ प्रक्रिया नियोजन
• कुशल कामगारांना पासून मुक्ती- अल्पशा प्रशिक्षणानंतर कोणताही कामगार गुळ बनवू शकतो
• जागेचा सचोटीने वापर- प्रकल्प हा कमी जागेत बसतो व त्याची संरचना ही स्वच्छता ठेवण्यास पूरक
• गुंतवणुकीला चांगला परतावा- प्रकल्पामधून तयार होणारा गुळ व गुळ पावडर ही रसायनमुक्त, चांगल्या प्रतीची व बर्‍याच अंशी एकसारखी यामुळे चांगला बाजार भाव व मागणी
• प्रकल्पाचा मालक असल्याचा अभिमान- पेटंट केलेले तंत्रज्ञान, केमिकल विरहित प्रक्रिया, संगणकाचा नियंत्रणासाठी वापर व स्वच्छता पूरक संरचना
 
उद्योग म्हणून गुर्‍हाळाचा विचार
 
कोणताही उद्योग हा ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन करत असतो. आपण तयार केलेला गूळ हा ग्राहकांच्या अपेक्षांना पात्र ठरला पाहिजे जेणेकरून गुळाचा वापर फक्त सणसमारंभापूरता न राहता त्याला वर्षभर मागणी असेल. सुदैवाने आज लोक साखरेला पर्याय शोधत आहेत व गुळ त्यांना यासाठी उत्तम पर्याय दिसतो. एकंदरीत काय तर ग्राहक केंद्रित गुळ उद्योग सुरू करण्याची इच्छा असणार्‍या उद्योजकांना संसाधन कार्यक्षम गुळ प्रक्रिया तंत्रज्ञान म्हणजे एक वरदान आहे.
डॉ. प्रा. विशाल सरदेशपांडे
लेखक हे ग्रामीण हेतू औद्योगिक विकल्प केंद्र सितारा आय. आय. टी. मुंबई येथे अनुबंध सह प्राध्यापक आहेत. ते ग्रामीण उद्योग धंदे व त्यांचे सबलीकरण हा विषय शिकवतात व त्यामध्ये संशोधन करतात
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप नंबर 878846 0766 / [email protected]

img1_1  H x W: