कापूस रोग व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    01-Jun-2021
|

कापूस रोग व्यवस्थापन_1&nb 
 
कपाशीवर दहिया रोग, जीवाणू करपा, अल्टरनेरिया लिफ स्पॉट, अॅन्थ्रॅकनोज व मर हे प्रमुख रोग असून कापूस पिकाचे या रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होते. रोगांचे व्यवस्थापन करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रोगांची लक्षणे, प्रसार, हवामानातील घटकांची अनुकूलता आणि रोग व्यवस्थापनचे उपाय या गोष्टींची माहिती असणे गरजेचे असते.
 
मुळकुज
 
रोगकारक बुरशी : हा रोग रायझोक्टोनिया स्पेसीज, स्केरोशियम रोल्फसाय या बुरशीमुळे होतो.
 
रोगाची लक्षणे: झाडे एकाएकी पिवळी पडून कोमेजतात, पाने वाळून गळतात, मुळे कुजतात. साल सहजपणे निघून येते. मुळाचा व खोडाचा भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ सालीच्या आतील भागात दिसून येते. खोड व बुंधा सडल्यामुळे रोगट झाडे सहजपणे उपटली जातात. कुजलेल्या सालीवर वर्तुळाकार तांबड्या रंगाच्या मोहरीच्या आकाराच्या स्केरोशिया तयार होतात.
 
रोगास अनुकूल परिस्थिती: उच्च आद्रता आणि उच्च तापमान ह्या रोगकारक बुरशींना भावते.
रोग व्यवस्थापन :
• उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमीन तापू द्यावी.
• पेरणी योग्य चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी.
• पेरणीपूर्वी बियाण्यास फ्लुक्सापायरोक्साड एफएस १.५ मिली किंवा टेट्राकोनॅझोल (११.६ एसएल) २ मिली किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
• रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कार्बेन्डाझिम (५०% डब्लूपी) १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून द्रावणाची रोगट रोपाच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.
जीवाणू करपा
 
रोगकारक जीवाणू : हा रोग झॅन्थोमोनास ऑक्सेनोपोडीस पॅथोव्हर मालव्हेसीरम या जीवाणूमुळे होतो.
रोगाची लक्षणे: या जीवाणू रोगामुळे कपाशीच्या पाने, पानांच्या शिरा, देठ व बोंडावर वेगवेगळे लक्षणे आढळून येतात. सुरुवातीस पानांच्या खालच्या बाजूने कोनात्मक पाणी शोषल्यासारखे तेलकट तांबड्या काळपट रंगाचे ठिपके दिसतात. पानाच्या मुख्य व उपशिरांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन पानाच्या शिरा काळपट किंवा तांबड्या रंगाच्या दिसतात. फांद्यांवर काळपट रंगाचे ठिपके पडून फांद्या काळपट पडतात. काहीवेळा बोंडावर तेलकट, काळपट ठिपके आढळतात.
रोगास अनुकूल परिस्थिती: ऊबदार हवामान (दिवसाचे तापमान ३२ ते ३८ अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान किमान १६ ते २० अंश सेल्सिअस) व उच्च आर्द्रता ८० टक्केच्या पुढे असल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. अधूनमधून पाऊस पडणे व थोडे उष्णतामान रोगाच्या वाढीस अनुकूल असते.
 
रोग व्यवस्थापन :
• नत्रयुक्त खतांचा वापर शिफारशीप्रमाणे करावा.
• उशीरा पेरणी टाळा.
• कापाशीची लागवड वाण आधारित शिफारशीत अंतरावर किंवा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करावी.
• रोगट अवशेष नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.
• हंगामाच्या व्यतिरिक्त कपाशीचे झाडे आणि तण काढून टाका.
• पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम कार्बोक्सिन (३७.५ टक्के) + थायरम (३७.५ टक्के) डीएस (मिश्र घटक) ची बीजप्रक्रिया करावी.
• रोगाची लक्षणे दिसल्यास कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड ५० % डब्ल्यूपी २५ ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
अल्टरनेरिया लिफ स्पॉट
रोगकारक बुरशी : हा रोग अल्टरनेरिया स्पेसीज बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे: पानांवर फिकट गुलाबी हिरव्या ते पिवळ्या रंगाच्या ठिपक्यांपासून सुरवात होते. कालांतराने हे ठिपके राखाडी ते तपकिरी रंगाचे होतात. प्रत्येक ठिपक्यांच्या मध्यवर्ती घाव असतात ज्याभोवती एकाग्र रिंग असतात. या डागांभोवती ठळक जांभळे वलय असते. रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे ठिपक्याच्या जागी छिद्रे पडतात. वेळीच काळाजी घेतली गेली नाही तर रोगाचा प्रादुर्भाव वाढून पाने गळून पडतात.
रोगास अनुकूल परिस्थिती: जास्त आर्द्रता, अधून मधून पडणारा पाऊस आणि मध्यम तापमान हे रोगाच्या विकासास अनुकूल आहे. पिकाचा ताण (जास्त बोंडांचा भार किंवा अकाली संवेदना).
 
रोग व्यवस्थापन :
• रोगट अवशेष नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.
• जमिनीची योग्य सुपिकता ठेवावी, विशेषत: पोटॅशियममुळे रोगाची तीव्रता कमी होऊ शकते.
• पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम कार्बोक्सिन (३७.५ %) + थायरम (३७.५ %) डीएस (मिश्र घटक) ची बीजप्रक्रिया करावी.
• रोगाची लक्षणे आढळून येताच प्रोपिनेब (७०% डब्ल्यूपी) २५ ग्रॅम किंवा प्रॉपीकोनॅझोल (२५% ईसी) १० मिली किंवा पायरॅक्लोस्ट्रोबिन (२०% डब्लूजी) १० ग्रॅम किंवा अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२% + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० ग्रॅम किंवा फ्लुक्सापायरोक्साड + पायराक्लोस्ट्रॉबिन १० ग्रॅम किंवा मेटीराम ५५% + पायरॅक्लोस्ट्रोबिन ५% डब्लूजी २० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दहिया रोग
रोगकारक बुरशी : हा रोग रामूलेरिया एरिओला या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे: जुन्या पानांवर खालील बाजूस बारीक, त्रिकोणी, आयाताकृती, असे हलक्या पांढ-या रगांचे ठिपके दिसतात. ठिपक्यांची पांढुरकी राखाडी पावडरीसारखी वाढ दिसते. हे ठिपके आकाराने वाढत जाऊन अनेक वेळेस पुर्ण पान व्यापतात. पानांवर दही सांडल्या सारखे दिसुन येते. त्यामुळे यास दहिया असेही म्हणतात. शक्यतो पानाच्या खालच्या पृष्ठभागावर बुरशी वाढते. तसेच रोगाच्या प्रादुर्भावा वाढल्यास पाने, फुले व बोंड गळ होते.
रोगास अनुकूल परिस्थिती: सप्टेंबर ते जानेवारी महिन्यांत आढळून येणारे कमी तापमान (२० ते ३० अंश सेल्शियस), रात्री उच्च दमटपणा (८० टक्के किंवा जास्त) आणि अधुनमधुन पडणारा ईशान्य मान्सून पाऊस रोग वाढीस अनुकूल आहे.
 
रोग व्यवस्थापन :
• नत्रयुक्त खतांच्या मात्रा माती परिक्षणानुसार योग्य प्रमाणात द्यावी.
• पीकांचे रोगट अवशेष नष्ट करावेत.
• पिकांची फेरपालट केल्याने पुढच्या हंगामात रोगाचे बीजाणू (इनोकुलम) कमी होण्यास मदत होईल.
• कापाशीची लागवड वाण आधारित शिफारशीत अंतरावर किंवा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करावी.
• हंगामाच्या व्यतिरिक्त दिसणारे कपाशीचे झाडे काढून टाका.
• रोगाचा लक्षणे दिसताच अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल ४४.३ % एस.सी. १० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
कवडी (अॅन्थ्रॅकनोज)
रोगकारक बुरशी : हा रोग रामूलेरिया एरिओला या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : पानावर व खोडावर लालसर गोलाकार ठिपके तयार होतात. रोगट रोपटे सुकून मरते. मोठ्या खोडावर भेगा पडून साला निघते. कपाशीच्या बोंडावर गोलाकार, खोलगट, लालसर करड्या रंगाचे ठिपके दिसतात कालांतराने ठिपके काळे होतात. अशी बोंडे अर्धवट उमलतात. कापूस घट्ट चिकटून कवडीसारख्या गुठळीत रूपांतरित होतो. ठिपक्यांचे प्रमाण वाढून आकार वाढल्याने कापूस पिवळा होतो.
रोगास अनुकूल परिस्थिती: रोगास दमट व किंचित उष्ण वातावरण पोषक ठरते.
 
रोग व्यवस्थापन :
• पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी.
• शेतातील पिकांचे रोगट अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
• रोगाची लक्षणे दिसल्यास कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड (५०% डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
मर रोग
रोगकारक बुरशी : हा रोग फ्युजेरीयम या बुरशीमुळे होतो.
रोगाची लक्षणे : झाडाची पाने पिवळे पडून कोमेजतात व झाड वाळते. रोगट रोगग्रस्त झाडाचे खोड व मूळे उभे चिरल्यास आतील भागात काळसर तपकिरी रंगाची रेषा आढळते.
रोग व्यवस्थापन :
• पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी.
• पीक फेरपालट करावे.
• उन्हाळात खोल नांगरणी करून जमीन कडक उन्हात तापू द्यावी.