मोहरी मोहीम - 2025

डिजिटल बळीराजा-2    05-May-2021
|
प्रेस रिलीज

>> भारताच्या तेलबिया क्रांतीचे नेतृत्व करण्यास मोहरी सज्ज.
>> भारतातील सर्वात जास्त लागवड होणाऱी तेलबी बनण्याच्या मार्गावर मोहरी.
>> एसईएच्या मोहरी मोहिमेमध्ये (मिशन मस्टर्ड) सहभागी होणार सरकार.
 
मुंबई, 28 एप्रिल 2021 : गेल्या शतकात ‘हरीत’ व ‘श्वेत’ क्रांतीचा अनुभव घेतल्यानंतर, भारत आता कृषी क्षेत्रातील ‘पीत’ क्रांतीला सामोरा जाण्यास तयार आहे. ही क्रांती तेलबियांच्या उत्पादनात होणार आहे. मोहरी या तेलबीच्या नेतृत्वात ही क्रांती होईल. देशात सर्वात जास्त लागवड होणाऱी तेलबी म्हणून मोहरी आता राज्य करील. ‘सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एसईए) या संघटनेद्वारा आयोजित एका वेबिनारमध्ये खाद्यतेल उद्योगातील दिग्गज व्यक्ती आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांनी केलेल्या चर्चेचा हा निष्कर्ष होता.
 
“घरगुती तेलबियांचे उत्पादन वाढवून खाद्य तेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी एसईए जाणीवपूर्वक कार्य करीत आहे. याच उद्देशाने ‘एसईए’ने मोहरीसाठीची मोहीम सुरू केली असून, त्याद्वारे मोहरीचे उत्पादन 2025 या वर्षीपर्यंत 2 कोटी टनांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. शेतीतील सुधारीत पद्धती, योग्य तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे आणि इतर सामग्रीद्वारे हे साध्य करता येईल,” अशी माहिती ‘एसईए’चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी दिली.
या कार्यक्रमात अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे म्हणाले, की मोहरीची व्यावसायिक व्यवहार्यता आणि आरोग्यासाठीची उपयुक्तता या गुणधर्मांमुळे, भारतातील तेलबियांचे एकूण उत्पादन वाढविण्याची मोठी क्षमता मोहरीमध्ये आहे.
 
“मोहरीवर सर्वात जास्त, म्हणजे 31 हजार रुपये प्रति हेक्टर, इतका परतावा मिळतो. त्या तुलनेत गव्हावर प्रति हेक्टर 26 हजार आणि तांदळावर 22 हजार इतका परतावा मिळतो. मोहरीच्या किंमतींत सध्या वाढ झालेली असल्याने, तिच्यातून मिळणाऱ्या परताव्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे,” असे पांडे म्हणाले. सोयाबीनच्या लागवडीचा खर्च वाढल्याने त्याच्या परताव्यात घट झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी मोहरीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविल्यानंतर त्यांना मोबदला वेळीच मिळावा, याकरीता तेलबिया उद्योगाने मोहरीच्या तेलाची पर्याप्त मागणी सुनिश्चित केली पाहिजे.
 
कृषी मंत्रालयातील संयुक्त सचिव शुभा ठाकूर या तेलबिया मोहिमेच्या प्रमुख आहेत. त्यांनी सांगितले, की मोहरीच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यास सरकारही उत्सुक आहे. मोहरीची मोहीम सरकारने आधीच सुरू केली आहे. त्या पुढे म्हणाल्या, “मोहरीबरोबरच भूईमुगासारख्या अन्य तेलबियांचीही लागवड वाढावी, यावर सरकार लक्ष केंद्रित करत असून आंतरपीकांना उत्तेजन देण्याबरोबरच, पूर्व भारतातील भातपिकाखालील क्षेत्र या तेलबियांसाठी वापरात यावे, असे सरकारचे प्रयत्न आहेत.”
राजस्थानमध्ये सॉलिडारिदाड या संस्थेसह ‘एसईए’ने संयुक्तपणे विकसीत केलेल्या मोहरीच्या मॉडेल शेतांमध्ये, 2019 पासून उत्पादनात 49 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शेतीच्या उत्तम पद्धती, उत्तम बियाणे, तंत्रज्ञानाचा वापर यांचा हा परिणाम आहे. भारतात तेलबियांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मोहरी हे प्राधान्याचे पीक ठरत आहे. ‘ओमेगा-3’ आणि ‘मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस्’ व ‘पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स’ यांचे प्रमाण जास्त असल्याने मोहरीमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक गुणधर्म आहेत. त्यामुळेच, कोविडनंतरच्या काळात मोहरीच्या तेलाला अनेक नागरीक प्राधान्य देऊ लागले आहेत.
“मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण खूप जास्त, म्हणजे 40 टक्के इतके आहे. त्या तुलनेत सोयाबीनमध्ये ते 18 टक्के इतकेच असते. मोहरीमध्ये 36 टक्के प्रथिने आहेत. हवामानानुसार स्मार्टपणे जगणारे हे पीक आहे. त्याला फारच कमी पाण्याची आवश्यकता असते. भारताच्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 80 टक्के लोक स्वयंपाकात मोहरीचे तेल वापरतात,” अशी माहिती अदानी विल्मर लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अंगुशु मल्लिक यांनी दिली.
  
“ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या चालू विपणन वर्षात भारतामध्ये मोहरीचे उत्पादन 85 ते 90 लाख टन इतके विक्रमी स्वरुपात होणार आहे. मोहरीच्या विक्रमी उच्च दरांमुळे येत्या काही वर्षांत शेतकऱ्यांना मोहरीच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळेल. त्यामुळे पुढील पाच वर्षांत देशाला दोन कोटी टनांचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल. त्यातूनच, मोहरी ही आगामी काळातील भारतातील सर्वाधिक लागवड होणारी तेलबी ठरणार आहे,” असे ‘एसईए रेप-मस्टर्ड प्रमोशन कौन्सिल’चे अध्यक्ष विजय दाता यांनी म्हटले.
 
मोहरीच्या किंमतींच्या धोरणाविषयी या परिषदेत सखोल चर्चा होऊन कार्यक्रमाची इतिश्री झाली. या चर्चेचे सूत्रसंचालन ‘सीएनबीसी’च्या कमोडिटी विभागाच्या संपादिका मनीषा गुप्ता यांनी केले. मोहरीच्या सध्याच्या वाढत्या किंमतींबद्दल भाष्य करताना प्रख्यात विश्लेषक दोराब मिस्त्री म्हणाले, की अमेरिकेत ज्यो बायडन हे सत्तेवर आल्यानंतर आता ‘ग्रीन बायो डिझेल’ वापरण्यासंबंधी आदेश निघण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगानेच सध्या भाव वाढलेले आहेत. बाजारातील तेजीच्या सर्व घटकांचे मूल्य सध्या पणाला लागले असून मोहरीच्या किंमती उच्च पातळीवर आहेत. आता यापुढे या किंमती आणखी वर जाण्याला मर्यादा आहेत; सबब व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना सावधानता बाळगावी, यावर या परिषदेत एकमत झाले.