शेतमाल प्रक्रिया उद्योग – आर्थीक स्थैर्याचा मार्ग

डिजिटल बळीराजा-2    05-May-2021
|

economy _1  H x 
 
वर्षभर शेतात राबून उत्पादन केलेले अन्नधान्य, भाजीपाला व फळे बाजारात ज्यावेळी कवडीमोल दराने विकले जातात त्यावेळी बळीराजाची होणारी मानसिकता ही शब्दात व्यक्त न करता येण्याजोगीच. आपल्याकडे वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळा भाजीपाला, फळे व अन्नधान्य यांचे उत्पादन घेतले जाते. यापैकी भाजीपाला व फळे यासारखा माल नाशवंत असल्याने बळीराजाला तो लगेचच मिळेल त्या किमतीत विकावा लागतो, नाहीतर त्याची नासाडी होते कारण आजही भाजीपाला व फळे यासारखा नाशवंत शेतमाल दीर्घकाळ साठवूण ठेवण्याचा पर्याय कमी प्रमाणात उपलब्ध असून महागडा आहे. असा माल एकाचवेळी बाजारात आल्यामुळे बाजारभाव मिळत नाही व 30-35 ट्टके माल वरील कारणास्तव वाया जातो. यासाठी सर्वसाधारण शेतकरी, महिला बचत गट, स्वयंसहायता गट, शेतकरी गट यांनी अशा नाशवंत मालावर आधारित लघु उद्योग सुरू केले व त्या मालावर प्रक्रिया केली तर अशा मालास जास्त दर मिळवता येईल व आर्थिक स्तर उंचावता येईल. अलीकडच्या काळात शासन स्तरावरून देखील लघुउद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग यांना चालना मिळत असून त्यासाठी विविध संस्थांच्या मदतीने अर्थसहाय्य देखील पुरवले जाते.
 
वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे, आधुनिक खते, कीड व रोगनाशके यांच्या उपलब्धतेमुळे शेतमालाचे उत्पादन वाढत आहे, परंतु नाशवंत शेतमाल एकाच वेळी बाजारपेठेत आल्यास शेतमालास भाव मिळत नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते यामुळे शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टिकोनातून शेती करणे गरजेचे आहे.
 
आजकालच्या धावपळीच्या जगात अनेक नागरिक पॅकेज्ड फुडला पसंती देतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच प्रक्रियायुक्त पदार्थांची आवड आहे. प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये फळांचे गर, विविध फळांपासून तयार केलेले पेय, जाम, जेली, लोणचे, चटण्या, केचप, बोरकुट, आंबापोळी, फणसपोळी, आवळा सुपारी, चिप्स, वाळवलेला भाजीपाला, कांदा, बेदाणा, मसाले इत्यादी अनेक पदार्थांचा सर्रास वापर केला जातो व हे पदार्थ अनेक हौशी लोक चढ्या दराने देखील खरेदी करतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनी नेहमीचे उत्पादन व विक्री या व्यवस्थेतून बाहेर पडून शेतमाल साठवण व त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. याद्वारे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवता येईल. प्रक्रिया केलेला माल दीर्घकाळ साठवता येतो वर्षभर विक्री करून वर्षभर उत्पन्न मिळवता येते यासाठी गरज आहे ती शेतमाल मूल्यवर्धन करण्याची!
 
शेतमाल प्रक्रिया चे फायदे:
 
- बाजारपेठेतील अतिरिक्त आवकमुळे मिळणाऱ्या कमी बाजारभावापासून नुकसान टळते.
- शेतमाल दीर्घकाळ साठवता येतो व कमी आवक असताना विक्री करुन अधिक उत्पन्न मिळवता येते.
- शेतीमालाची मूल्यवृद्धी करता येते.
- वाहतुकीवरील खर्चात बचत होते.
- ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
- प्रक्रियायुक्त पदार्थांचे निर्यातीमुळे देशाला परकीय चलन उपलब्ध होते.
- नाशवंत मालाची नासाडी टाळता येते.
- ग्रामीण भागातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर कमी करता येते.
 
शेतमाल प्रक्रिया उद्योगातील महत्त्वाच्या बाबी:
 
-शेतमाल साठवणूक करताना व प्रक्रिया करताना त्यात धोकादायक बुरशी जिवाणू यांची वाढ होणार नाही याची खबरदारी घ्यावी व पदार्थ शास्त्रीय मानकाप्रमाणे तयार करावेत.
- योग्य साठवण व सक्षम वितरण व्यवस्था निर्माण करावी.
- प्रक्रिया उद्योग ते ग्राहक व शेतापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत शेतीमालाची वाहतूक वातानुकूलित पद्धतीने करण्यासाठी
 
वाहतूक व्यवस्था निर्माण करणे.
 
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
- शेतमाल व प्रक्रियायुक्त पदार्थ हे योग्य वेस्टना मध्येच ठेवावेत.
- विपणन व्यवस्था कार्यक्षम असावी.
- प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकरी बांधवांनी उद्योगासंबंधी योग्य प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन त्यातील सर्व बारकाव्यांचा व तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा.