मुक्त संचार गोठा पद्धत

डिजिटल बळीराजा-2    14-Apr-2021
|

r_1  H x W: 0 x
 
 
बंदिस्त गोठ्याच्या मर्यादा :
दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींबाबत जसे जनावरांचे आजार, त्यांचा माज याविषयी सतर्क राहणे आवश्यक असते. बंदिस्त गोठ्यात दुधाळ जनावरांना थायलेरियासीस, कासदाह, किटोसिस हे मुख्य ३ आजार होतात. बंदिस्त गोठ्यात गोचिडांना लपण्यास भरपूर जागा असते. त्यांच्यामुळे जनावरांना विविध रोग होतात. तसेच बंदिस्त गोठ्यात जनावर जेथे उभे राहते तेथे शेण, मल-मूत्र पडत असल्याने ती जागा कायम ओली राहते. त्यावर काडीकचरा पडलेला असतो. त्यावरच जनावरे बसतात. त्यामुळे कासदाह रोग होतो. गायी-म्हशी मुका माज दाखवितात. बंदिस्त गोठ्यात ही गोष्ट लक्षात येत नाही; मात्र मुक्त संचार गोठा पद्धतीत अशा गाईला ओळखणे सोपे होते. माजाची लक्षणे लगेच ओळखता येतात आणि माज ओळखता येणे हेच तर दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यामागील कारणांपैकी एक गमक आहे. यातून मुक्तता मिळावी म्हणून मुक्त संचार गोठा पद्धत वापरली जाते.
 
मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय
 
१. मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही.
२ . गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.
३. त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.
४. शेण वारंवार काढले जात नाही.
५. गाई एकमेकांना मारत नाहीत.
 
एका गाईला किंवा म्हैशीला मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात मोकळे सोडण्यासाठी कमीत कमी २०० चौ. फूट जागा लागते. एक गुंठा जमीन क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो. गाईला मुक्त सोडण्या पूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे अर्ध्या जाळीयुक्त कंपाउंड करून आत मध्ये गव्हाण व पाण्याच्या हौदाची व्यवस्था करणे आवश्यक असते. गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात. या कालावधीत शेतकऱ्याने सतर्कता बाळगायला हवी. गाई मोकळ्या सोडल्यावर त्या एकमेकींना मारतील या भीतीने शेतकरी मुक्त गोठा पद्धत अवलंब करण्यापासून माघार घेतात. परंतु पहिले दोन दिवस सवय लागल्यावर गाई एकमेकांना मारत नाहीत. जर एखादी गाय इतर गाईंना मारत असेल तर तिला पायकूट घालून आपण प्रतिबंध करू शकतो. गाईच्या तोंडाच्या म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या गुडघ्याच्या थोडेसे वर असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट घालणे होय. अशा प्रकारे आपण जनावरांच्या हालचालीवर प्रतिबंध घालू शकतो.
मुक्त संचार पद्धतीत एका गाईला १५० ते २०० चौ. फूट याप्रमाणे जागा उपलब्ध करून देणे, याशिवाय सावली आणि ऊन, पिण्याचे पाणी, चारा आणि तेथेच दूध काढण्याची सोय उपलब्ध केल्यामुळे त्यांना पाहिजे त्या वेळी त्यांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार चारा खातात, पाणी पितात, हवामानातील बदलानुसार ऊन- सावली घेतात, ्वच्छ जागेत जाऊन बसतात, त्यामुळे त्यांच्या शरीराला शेण लागत नाही, स्वच्छंदाने त्या फिरतात. त्यांच्या इच्छेनुसार निवांत बसून चांगले रवंथ करतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते. त्यांना फिरता येत असल्यामुळे नखे वाढत नाहीत, गोचीड होत नाहीत, आजाराचे प्रमाण कमी होते. मोकळ्या सोडलेल्या गाईंच्या अंगावर एक वेगळी चकाकी येते. त्यांनी दिलेल्या दुधातील जैविक घटकांमध्ये निश्‍चितच बदल होत असतील.
 
मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे :
 
१. स्वच्छतेसाठी कमी वेळ लागतो व मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते.
२. कमी मनुष्यबळ लागते.
३. गोठे बांधण्यावरील खर्च कमी होतो.
४. खाद्य,चारा व पाणी यांचा योग्य उपयोग होतो.
५. जनावरांना व्यायाम मिळाल्याने ते निरोगी राहतात.
६. स्तनदाहाचे प्रमाण कमी होते.
७. जनावरे मुक्तपणे माज दाखवतात.
८. ताण कमी होतो आणि उत्पादनात ५ ते १० टक्के वाढ होते.
९. प्रजननासंबंधी समस्या कमी होतात.
१०. खुरांची योग्य निगा राखल्याने जनावरे लंगडत नाहीत.
११. जनावरांची झपाट्याने वाढ होते व उत्पादन वाढते.