उन्हाळ्यात फळबागांचे व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    01-Apr-2021
|

c_1  H x W: 0 x
 
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान वाढून आद्रतेचं प्रमाण घटून हवामान कोरडे राहत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढण्यास मदत होते, त्यामुळे झाडातून पानांच्याद्वारे झपाट्याने पाणी बाहेर पडते. त्यामुळे झाडे वाळण्यास सुरुवात होते. तापमान वाढल्यामुळे पाने करपतात,नवीन पाने येण्यास अडथळा निर्माण होतो ,झाडाची वाढ खुंटते, फळे काळी पडतात यामुळे उत्पादन व गुणवत्ता कमी होते, पाण्याचा जास्त ताण पडला तर नवीन लावलेली फळझाडे दगावण्याची शक्यता असते. अशा फळबागांना उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन तंत्राद्वारे वाचवणे ही महत्त्वाची बाब आहे.
 
ठिबक सिंचन: फळ पिकांना शक्यतो पाणी देताना रात्री व सकाळी दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. फळझाडाच्या मुळाशी पिकांच्या गरजेनुसार ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे या पद्धतीमुळे झाडाच्या मुळाच्या परिसरातील भाग नेहमी ओलसर राहतो. पाण्याची कमतरता असलेल्या भागात ही पद्धत प्रचलित आहे. या पद्धतीत ६०-६५ टक्के पाण्याची बचत होते. शिवाय दर्जेदार व अधिक उत्पादन मिळते तसेच मजूर व खतावरील खर्च कमी होतो. यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीचा वापर करावा व कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा वाचवाव्यात.
 
मटका सिंचन पद्धत: कमी क्षेत्रातील जास्त अंतरावरील फळझाडांच्या लागवडीत मटका सिंचन पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. याकरिता झाडांच्या वाढीनुसार साधारण पाच ते सात लिटर पाणी बसेल एवढी लहान लहान मडकी पहिल्या दोन ते तीन वर्षांकरिता वापरावीत. या पुढील जास्त वयाच्या झाडांकरिता 10 ते 15 लिटरची मडकी निवडावीत. ती शक्‍यतो जादा छिद्र असलेली किंवा आडीत कमी भाजलेली असावीत. म्हणजे ती झिरपत राहतात. प्रत्येक झाडास दोन मडकी बसवावीत. ती बसविताना प्रथमतः मडक्‍याच्या आकाराचा खड्डा खोदून तेथे मडके गळ्याबरोबर जमिनीत पुरावे आणि त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. हे पाणी मडक्‍यावाटे झिरपत राहते. ही पद्धत मोठ्या बागेत वापरता येत नाही. कारण मडके भरण्यासाठी मजुरांचा खर्च वाढत राहतो. ही पद्धत कमी क्षेत्रात फायदेशीर आहे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकण ठेवावे, त्यामुळे मडक्‍यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही.
 
आच्छादनाचा वापर: आच्छादनाचा वापर बाष्पीभवन थांबविणे, जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून ठेवता येतो, जमिनीची धूप कमी करण्यास मदत होते,आच्छादनाच्या वापराने 25 ते 30 मी.मी ओलाव्याची बचत होते व त्यामुळे पिकांचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी वाढते. आणि तणांचा बंदोबस्त करण्यासाठी होतो. बाष्पीभवनावाटे होणाऱ्या ओलाव्याची हानी कमी होऊन पिकास ओलावा निकडीच्या अवस्थेत 35 ते 50 मि.मी अधिक मिळतो. तसेच जमिन भेगाळण्याची तीव्रता कमी होते. आच्छादनाचा वापर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरू शकतो उदा. वाळलेले गवत, उसाचे पाचट, लाकडाचा भुसा, गव्हाचे काड इत्यादी प्रकाराने करता येते. याशिवाय आपण प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तूचा उपयोग करून आच्छादन करू शकतो यामध्ये प्रामुख्याने यु.व्ही. स्टॅबिलाइज्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. यासाठी ८०-१०० मायक्रॉन जाडीची प्लास्टिक फिल्म वापरावी. हे आच्छादन झाडाच्या पूर्ण परीघात हेक्टरी 5 ते 10 टन टाकावे लागते. आच्छादन जितके लवकर टाकता येईल, तेवढे जास्त फायदेशीर ठरते.
बाष्परोधकांचा वापर: उन्हामुळे पानातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. पानावाटे होणारे बाष्पीभवन सुमारे ६० टक्के असते. हे बाष्पीभवन रोखण्यासाठी महिन्यातून दोन वेळा केवोलिनची ८ टक्के (८० ग्राम प्रती लिटर पाणी) या प्रमाणात मार्च, एप्रिल व मे महिन्यात पानावर फवारणी करावी. सूर्यप्रकाश पानावरून परावर्तित होऊन पिकातून बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. यामुळे पाण्याची बचत होऊन उन्हाळ्यात पाण्याचा ताण सहन करण्यात मदत होते.
 
इतर उपाययोजना: पाण्याच्या उपलब्तेनुसार बहार धरावा म्हणजे मृग किंवा हस्त बहराचे नियोजन करावे. जमिनीतील शेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करावे म्हणजे जमिनीची पाणी साठून ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. नवीन लागवड झालेल्या कलमी रोपांना वाऱ्यापासून संवरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा. जमिनीतील कमी ओलाव्यामुळे आणि अती सूर्यप्रकाशामुळे फळझाडांच्या खोडाला इजा होण्याची शक्यता असते म्हणून खोडाला १ टक्का बोर्डो पेस्टचा लेप लावावा.
बी.जी. म्हस्के, सहाय्यक प्राध्यापक (भ्रमणध्वनी -९०९६९६१८०१)
डॉ. एन. एम. मस्के, (प्राचार्य)
एम. जी. एम - नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली,औरंगाबाद.