उन्हाळ्यातील नैसर्गिक थंडपेय

डिजिटल बळीराजा-2    01-Apr-2021
|

g_1  H x W: 0 x
उन्हाळा तीव्र होऊ लागला की, आपल्याला सतत तहान लागते. उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि घसा कोरडा होतो. परिणामी, शरीराकडून पाण्याची मागणी अधिक प्रमाणात होत असते. काहीतरी थंडगार प्यावे असे वाटते. मग ही तहान भागवण्यासाठी शीतपेयं आणि फ्रिजमधल्या थंड पाण्याने तहान भागवण्याचा प्रयत्न केला जातो. पण या थंड पाण्याने तहान तात्पुरत्या स्वरूपात भागत असते. तसंच या शीतपेयांमुळे शरीरातील रुक्षता वाढून अधिकच तहान लागते. यासाठी उन्हाळ्यात या शीतपेयांच्या आहारी न जाता नैसर्गिक पेयं अधिक घ्यावीत.
आंब्याच्या गरापासून सरबत
 
हंगामात ताज्या पिकलेल्या आंब्याचा गर काढून किंवा इतर वेळी हवाबंद केलेल्या कॅन किंवा बाटल्यांमधील गरापासून गरजेप्रमाणे आंब्याचे मधुर सरबत तयार करता येते. हापूस, केसर किंवा लंगडा या जातीच्या गरापासून उत्तम सरबत तयार होते. साधारणपणे आंब्यांच्या गराचा ब्रिक्स १५ - १८ तर आम्लता ०.५ टक्के असते. यावरून सरबताचे सूत्र प्रमाणित करण्यात आले आहे. सरबत करताना त्यामध्ये आंब्याच्या जातीनुसार १५ – २० टक्के गर वापरावा आणि साखर घालून त्याची ब्रिक्स १५ टक्के करावा, तसेच त्यामध्ये ०.२५ टक्के सायट्रीक आम्ल मिसळल्यास सरबतास मधूर अशी आंबटगोड चव प्राप्त होते. साधारणपणे १ किलो केसर किंवा हापूसच्या गरात ८०० ग्रॅम साखर, १० ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ५.५ लिटर पाणी मिसळावे. तसेच आवश्यकतेनुसार त्यामध्ये खाण्याचे नारंगी आणि पिवळा रंग प्रत्येकी २०० मि. ग्रॅ. मिसळावेत.
कैरी पन्हे
 
पूर्ण वाढ झालेली परंतु कच्ची फळे चांगली स्वच्छ धुवून शिजवावीत. ती थंड झाल्यावर त्यांचा गर काढावा. कच्च्या आंब्यांचे पन्हे बनवताना १ किलो पन्हे बनवण्यासाठी २०० ग्रॅम कच्चा आंब्याचा गर व १५० ते १७५ ग्रॅम साखर व ३२५ ते ५५० मिली पाणी मिसळावेत. हे मिश्रण १ मिमी च्या चाळणीतून चालून घ्यावे त्यात प्रती किलो पन्हात १४० मिली ग्रॅम पोटॅशिअम मेटाबाय सल्फाईट हे परिरक्षक मिसळावे. हे पन्हे गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटलयांत भरावे व बाटल्या क्राऊन कॉर्क मशीनने झाकण लावून बंद कराव्यात या बाटल्यांचे कडक पाण्यात (८५ ते १०० अंश सें) पश्चिरीकरण करून त्या बाटल्यात थंड झाल्यावर थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
लिंबू स्क्वॅश
 
लिंबाचा स्क्वॅश हे पेय भारतात फार लोकप्रिय आहेत. स्क्वॅश पिण्यासाठी देताना एक भाग स्क्वॅश व तीन भाग पाणी असे मिसळून देतात. लिंबाचा तयार रस यासाठी वापरता येतो किंवा ताजा रस काढून वापरता येतो. यासाठी लिंबाचे स्वच्छ स्टीलच्या सुरीने दोन भाग करावे व लागडी रस काढायचं यंत्र वापरून रस काढावा किंवा रोलर प्रेसने काढावा. रस काढून झाल्यावरती वस्त्रगाळ करून घ्यावा, त्यामुळे त्यातील बिया व चोथा वेगळा होईल. हा रस स्क्वॅश तयार करण्यासाठी वापरावा. स्क्वॅश तयार करताना त्या साखर, सायट्रिक अॅसिड, सुगंधी द्रव्य, रंग व परिरक्षक द्रव्ये इत्यादी घटक रसात योग्य प्रमाणात मिसळण्यात येतात. साखर ही पाक करून वापरली जाते. स्क्वॅशमध्ये कमीत - कमी २५ टक्के फळांचा रस असणे आवश्यक असते व एकूण विद्राव्य पदार्थ कमीत - कमी ४० टक्के असावे, लिंबूरस, पाक सुगंधी द्रव्य, रंग इत्यादी घटका एकत्र करावे व नंतर त्यात ३५० पीपीएम पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट (के.एम.एस.) टाकावे. तयार झालेला स्क्वॅश हा निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा व त्याला घट्ट बूच लावून हवाबंद करावे.
मोसंबी स्क्वॅश
 
प्रथम मोसंबीचा रस काढून, गाळून घ्यावा. स्क्वॅश बनविताना रस कमीत कमी २५ टक्के, एकूण विद्राव्य घटक ४५ टक्के व आम्लता ०.८ टक्के असणे आवश्‍यक आहे. वरील प्रमाणीकरणानुसार रस एक लिटर, साखर १.६ कि.ग्रॅ. सायट्रिक आम्ल २० ग्रॅम, पाणी १२५० मि.लि., सोडिअम बेंझोएट दोन ग्रॅम या प्रमाणात वापरावे. प्रथम साखर व पाणी एकत्र करून उकळून घ्यावे. हे द्रावण उकळत असताना येणारी मळी काढून घ्यावी. तयार झालेले पाणी व साखरेचे द्रावण थंड करून त्यामध्ये रस एकजीव करून घ्यावा. नंतर दोन ग्लासमध्ये थोडा थोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सायट्रिक आम्ल व दुसऱ्यामध्ये सोडिअम बेंझोएट घेऊन विरघळून घ्यावे व ते स्क्वॅशमध्ये टाकावे. तयार झालेला स्क्वॅश पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घेऊन निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा. स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरतात.
 
आवळा सरबत
 
आवळयाचा रस तयार करण्यासाठी पूर्णपणे पक्व झालेली निरोगी फळे निवडून, स्वच्छ वाहत्या पाण्याने धूवून घ्यावीत. नतंर फळे मलमलच्या कपडयात बांधून उकळत्या पाण्यात आठ ते दहा मिानिटे धरावीत. यालाच “ब्लांचिंग” असे म्हणतात. अशा ब्लांच केलेल्या फळातून हाताच्या सहाय्याने बिया काढून फोडी कराव्यात. फोडीच्या वजानएवढे पाणी टाकून त्या मिक्सरला लावून घ्याव्यात किंवा स्क्रु टाईप ज्युस एक्स्ट्रॅक्टर नावाच्या मशीनमधून काढून एकजीव करुन घ्याव्यात. असा एकजीव झालेला लगदा मलमलच्या कापडात बांधून हाताने दाबून किंवा हायड्रॅालिक बास्केट प्रेस या यंत्राचा वापर करुन रस काढून घ्यावा. अशा प्रकारे काढलेल्या रसापासून उत्तम प्रकारचे सरबत तयार करता येते. यासाठी वरील प्रमाणे काढलेला आवळयाचा रस (१० टक्के), लिंबाचा रस (२ टक्के), आल्याचा रस (१ टक्के), साखर (१३ टक्के) आणि उरलेले पाणी असे घटक वापरले जातात. यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकले तरी चालते. हे मिश्रण चांगले ढवळून, मलमलच्या कापडातून गाळून घेवून, थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा. जास्त काळ साठवूा ठेवायचे झाल्यास तो पाश्चराईझ करुन, त्यामध्ये १०० पीपीएम पोटॅशिअम मेटा बायसल्फेट या परिरक्षकाचा वापर करावा. बाटल्या हवाबंद करुा पाश्चराईझ करुन, थंड झाल्यावर, लेबल लावून, थंड आणि कोरडया जागी साठवून ठेवाव्यात.
डाळिंब सरबत
 
डाळिंबाच्या रसामध्ये १३ टक्के ब्रिक्स व ०.८ टक्के आम्लता गृहित धरून डाळिंब रसाचे सरबत करण्यासाठी १० टक्के डाळिंबाचा रस, १५ टक्के साखर, ०.२९ टक्के सायट्रिक आम्ल या सूत्रानुसार घटक पदार्थांचे प्रमाण खालीलप्रमाणे वापरावे. डाळिंबाचा रस १ लिटर, साख़र १.३५ किलोग्राम, पाणी ७.५ लिटर, १.२ ग्रॅम सायट्रिक आम्ल, तांबडा खाद्य रंग जरूरीप्रमाणे. मोठ्या पातेल्यात साखर व पाणी वजन करून घ्यावे.साख़र पूर्ण विरघळून पाक तयार करावा व तो मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. तयार पाकात डाळिंबाचा रस टाकून तो चमच्याने एकजीव करावा. दोन ग्लासामध्ये थोडे सरबत घेऊन एकामध्ये सायट्रिक अॅसिड व दुस-यात जरूरीप्रमाणे खाद्यरंग टाकून चमच्याने चांगले एकजीव करावे. नंतर दोन्ही पेल्यातील द्रावण सरबतात टाकून एकजीव करावे. २०० मिली आकारमानाच्या बाटल्यात हे सरबत भरावे. बाटल्या थंड होईपर्यंत रेफ्रिजेरेटमध्ये ठेवाव्यात.
कलिंगडाचे सरबत
 
कलिंगडाच्या बारीक कापलेल्या फोडी, साखर, व्हॅनिला रस आणि मिठ फूड प्रोसेस किंवा ब्लेंडरमधून बारीक करून घ्यात. थोडे हलवल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा. पुढे या कलिंगड रसामध्ये आवश्यक तितक्या तीव्रतेपर्यंत क्लब सोडा किंवा सेल्टझर मिसळा.
द्राक्षाचे सरबत
 
या दिवसांत हिरवी व काळी अशी दोन्ही रंगाची द्राक्षे मिळतात. आपल्या आवडीची बिनबियांची द्राक्षे थोडे पाणी घालून मिक्सरमधून एकजीव करावे. नंतर ते गाळून त्यातील रस घ्यावा. जरुरीप्रमाणे पाणी घालावे. द्राक्षांच्या गोडीप्रमाणे थोडी साखर व चवीपुरते मीठ घालावे. द्राक्षे फार गोड असल्यास थोडासा लिंबाचा रस मिसळावा. म्हणजे सरबताची रुची वाढेल. इतर फळांपासूनही याप्रकारे सरबत करता येईल.
उसाचा रस
 
उसाचा ताजा रस हे उन्हाळ्यातील उत्तम पेय. उसाच्या रसात भरपूर फळशर्करा असल्याने तो पौष्टिक आहे. उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते. ऊसाचा रस गोड, थंड आहे. तत्काळ शक्ती देणारा, तरीही कमी कॅलरी असणारा आहे. वजन कमी करू इच्छिणा-यांसाठी हे उत्तम पेय आहे. यामध्ये कॅल्शिअम, क्रोमियम, कोबाल्ट, फॉस्फरस, पोटॅशियम, जिंक, मिनिरल्स, आयरन, व्हिटॅमिन ए, सी, बी, प्रोटीन, अँटीऑक्सीडेंट्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते.

कोकम आगळ
 
पिकलेल्या कोकम फळांच्या साली, गर आणि मीठ यांच्या मिश्रणापासून तयार करण्यात येणाऱ्या रसास कोकम आगळ असे म्हटले जाते किंवा कोकम आगळ म्हणजे परिपक्व कोकमाचा खारविलेला रस होय. कोकम आगळ हे पिकलेल्या कोकम फळांच्या सालीपासून, बियांवरील गरापासून किंवा पूर्ण फळाच्या फोडींपासून १५ ते २० टक्के मीठ वापरून तयार करतात. मिश्रण प्रत्येक दिवशी सकाळ - संध्याकाळ असे दोन वेळा ढवळावे, जेणेकरून मीठ त्या रसात पूर्णपणे विरघळेल. आठवड्याने अशा प्रकारे खारवलेला कोकमाचा रस म्हणजेच कोकम आगळ हे निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत किंवा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये हवाबंद करून ठेवावे. कोकम आगळापासून १-७ या प्रमाणात पाणी मिसळून आणि चवीसाठी साखर आणि जिरे वापरून स्वादिष्ट पेय तयार करता येते.
करवंदाचा रस
 
प्रथमतः पुर्णपणे पक्व झालेली फळे घेऊन त्यातील खराब झालेली फळे काढून टाकावीत. चांगली फळे धुवून त्यातील पाणी निथळून घ्यावे. फळे स्टीलच्या पातेल्यात घेऊन स्वच्छ हाताने चांगली कुस्करून घ्यावीत. हे पातेले मंद गॅस शेगडीवर ठेवून ८ - १० मिनिटे गरम करावे. त्यानंतर पातेले मंद गॅस शेगडीवरून खाली उतरावे व थंड होऊ द्यावे. त्यानंतर स्क्रू टाईप एक्सट्रॅक्टर मशिनमध्ये घालून हा लगदा बारीक करावा. जेणे करून त्यातून रस निघेल. रस काढत असताना बिया चिरडणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. साधारणपणे फळांपासून ५५ ते ५६ टक्के रस मिळतो. रस पातळ फडक्यातून गाळून स्टीलच्या उभट भांड्यांमध्ये ५ ते ६ तास स्थिर ठेवावा. अशा प्रकारे स्थिर ठेवल्यामुळे रसातील साका भांड्याच्या तळाला एकत्र जमा होतो. यावेळी ते भांडे हळूवारपणे तिरके करून वरच्या भागातील निवळलेला रस सरबत तयार करण्यासाठी वापरावा. सरबत तयार करण्यासाठी रस १०%, साखर १५% आणि आम्लता ०.३०% असावी.
 
पपईचे सरबत
 
पपईपासून सरबत बनविण्यासाठी अर्धपक्व पपई, चिमुटभर जिरे, आवश्यकतेनुसार साखर, दोन कप दूध, थोडे मीठ व थोडे केशर या प्रमाणात साहित्य घ्यावे. प्रथम पपई चुलीवर किंवा गरम राखेत करपणार नाही अशी भाजून घ्यावी. नंतर तिची साल काढून गराचे तुकडे करावेत. हे तुकडे चाळणीवर चिरडून गाळून घ्यावेत. त्यामध्ये पाणी, साखर, भाजलेल्या जिर्‍याची पूड, मीठ व केशर टाकून ढवळून घ्यावे. तयार झालेला सरबत थंड झाल्यावर काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवावा.
अननसाचा रस
 
अननसाच्या बारीक कापलेल्या फोडी आणि साखर फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडरमधून बारीक करून घ्यात. थोडे हलवल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा. अननस या फळामध्ये 'क' जीवनसत्त्व, पोटॅशियम, ब्रोमोलिन, कॅरोटिन हे घटक असतात. अननसाच्या रसात ब्रोमोलिन नावाचे तत्व असते जे प्रोटीन डायजेस्ट करण्यात मदत करतात.
चिकू स्क्वॅश
 
चिकूच्या फोडी पल्परमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा. लगदा मलमलच्या कापडाने गाळून त्यातला रस काढून घ्यावा. एफपीओ प्रमाणीकरणानुसार (२५ टक्के रस, ४५ ते ५० टक्के एकूण विद्राव्य घटक व ०.७५ ते १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.चिकू रस (१ किलो), पाणी (१ लिटर), साखर (१ किलो), सायट्रिक आम्ल (४० ग्रॅम) यांचे एकजीव मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गाळून घ्यावे. स्क्वॅश ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावा. पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट ७१० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश किंवा सोडियम बेन्झोएट ६०० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश या प्रमाणात थोड्या स्क्वॅशमध्ये एकजीव करून संपूर्ण स्क्वॅशमध्ये घालावे. गरम स्क्वॅश बाटल्यांमध्ये भरावा. झाकणे बसवावीत. स्क्वॅश थंड व कोरड्या जागेत ठेवावा. स्क्वॅश सहा महिने टिकतो.
बेलाचा पेय (स्क्वॅश)
 
२५o मिली. बेलाचा गर घ्यावा. ४२० ग्रॅम साखर, ३२४ मिली. पाण्यामध्ये टाकून पाक तयार करावा. गरज पडल्यास त्याला मंद आचेवर ठेवून विरघळावे आणि त्यात ५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड टाकावे. पाक गाळून घ्यावा व त्यात वरील २५o मि.लि. बेलाचा गर टाकावा व ४३ अंश ब्रिक्स येईपर्यंत मंद आचेवर ढवळावे. स्कॅश गरम असताना बाटलीत भरावा. पाश्चरायझेशन प्रक्रिया पूर्ण करावी. (८० अंश से.,२ मि.) आणि थंड करावे. बाटल्या भरल्यानंतर निर्जंतुकीकरण करावे.
थंडगार ताक
 
उष्णतेवर मात करणारं ताक उन्हाळ्यात रोज प्यावं असं आहारतज्ज्ञ सुचवतात. ताकाला आयुर्वेदातही फार महत्त्व आहे. ताकाने पौष्टिक कार्य पित्तशमन होते, भूक लागते व उत्तम अन्नपचन होते. उन्हाळ्यात थंडगार, ताजे ताक चवीला थोडे मीठ व मीरपूड घालून भरपूर प्यावे. ताजे दही घुसळून त्यात मीठ, हिंगपूड, जिरेपूड, मिरपूड घालून त्यात बर्फ व आवश्यकतेनुसार पाणी घालून मसाला ताक पिण्यास द्यावे.
शहाळ्याचे पाणी / नारळ पाणी
 
शहाळ्याचे पाणी शरीरात चटकन शोषले जाते. शहाळ्याच्या पाण्यात सर्वांत जास्त पालाश आणि खनिजे असतात. सात महिन्यांच्या शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. अनेक आजारांत शहाळ्याचे पाणी रुग्णाला दिले जाते. विशेषतः हगवण, जुलाब, उलटी व पोटाचे विकार यांत मोठ्या प्रमाणात ते वापरले जाते.

जलजिरा
 
जलजिरा हे क्षुधावर्धक पेय म्हणजेच अ‍ॅपिटायझर आहे. अ‍ॅपिटायझर म्हणजे जिभेला चव आणून जठराग्नी प्रदीप्त करणारे पेय असून, जेवणापूर्वी थंडगार अ‍ॅपिटायझर सव्‍र्ह केल्याने जेवणाचा आस्वाद अधिक छान घेता येतो.
**********