उन्हाळ्यामध्ये संकरीत गाई व म्हशींचे व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    04-Mar-2021
|

v_1  H x W: 0 x
 
उन्हाळा सुरू झाला की संकरीत गाईंच्या दूध उत्पादनावर तसेच प्रजनन क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. गाई कमी चारा खातात तसेच पाणीही कमी पितात त्यामुळे दूध उत्पादन कमी होते. तसेच गाईच्या प्रजनन क्रिया म्हणजेच माज व इतर क्रिया मंदावतात; त्यामुळे शेतकरयाचे नुकसान होते. पण जर काटेकोर व्यवस्थापन केले तर हे होणारे नुकसान आपण सहज टाळू शकतो.
 
- गाईंना 24 तास स्वच्छ, थंड व वास न येणार्या पाण्याची व्यवस्था करावी व आठवड्यातून एकदा पाण्याच्या हौदाला आतून पांढरा चुना लावावा, त्यामुळे शेवाळाची वाढ थांबवता येते आणि पाणीही थंड राहण्यास मदत होते.
 
- ओल्या चारयाची व्यवस्था करावी व जास्त प्रमाणात ओल्या चारा गाईंना द्यावा. कोरडा चारा संध्याकाळी जेव्हा वातावरण थंड असते तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये द्यावा.
 
- गाईंना सावलीची व्यवस्था करावी. शक्य असल्यास त्यांना झाडाखाली थंड सावलीत ठेवावे.
 
- गोठ्याच्या छताची उंची जास्त असावी. छतावर पालापाचोळा पसरावा जेणेकरून गोठ्याच्या आतले वातावरण थंड राहील किंवा छताला पांढरा चुना लावावा.
 
- गोठ्यात पंखे, फागर्स बसवावे किंवा ते शक्य नसेल तर गाईंच्या अंगावर शेतात औषध मारायच्या पंपाने 2 - 3 वेळा पाणी मारावे. पाणी मारण्याअगोदर पंप व्यवस्थित स्वच्छ करावा.
 
- जास्त तापमाणामुळे गाई व म्हैशी व्यवस्थित माजाची लक्षण दाखवत नाहीत, त्यामुळे गाई म्हशींवर व्यवस्थित लक्ष ठेवावे. तसेच जास्तीत जास्त गाई म्हशी उन्हाळ्याच्या अगोदरच गाभण कशा राहतील याचा प्रयत्न करावा.
 
- म्हशींचा रंग काळा असल्याने म्हशींना उन्हाचा जास्तच त्रास होतो; त्यामुळे म्हशींवर विशेष लक्ष ठेवावे.
 
- गाईंना खुराक हा सकाळी लवकर व संध्याकाळी द्यावा कारण दुपारी किंवा सकाळी उशीरा खुराक दिल्यावर 3 - 4 तासांनी त्याची पचणक्रिया चालू होते; त्यावेळी गाईंच्या शरीरात उर्जा निर्माण होते व शरीराचे तापमान वाढते.
 
- गोठ्याच्या बाजूला झाडे लावावीत जेणेकरून भविष्यात त्याचा फायदाच होईल.शक्य असल्यास गुळाचे पाणी पाजावे; त्यामुळे गाईंच्या शरीरात थंडावा निर्माण होतो.