गाई-म्हशीचे चीक : फायदे व दुष्परिणाम

डिजिटल बळीराजा-2    27-Mar-2021
|
“चीक” म्हणजे गाई-म्हशी विल्यानंतर पहिल्या तीन ते पाच दिवसात कासेतून येणारा पोषक समृध्द स्त्राव. चीक हा वासरांसाठी संजीवणी असते कारण यातुन वासराना त्यांच्या आयुष्यासाठी प्रथम रोग प्रतिकार शक्ती मिळत असते. चीक हा फक्त वासरांसाठी नव्हे तर माणसासाठी सुध्दा फायदेशीर आहे पण त्याचा योग्य मात्रेत वापर न केल्यास त्याचे दुष्परीणाम होऊ शकतात.
 

 k_1  H x W: 0  
 
 
चीका मधील पौष्टिक घटक :-
 
चीक हा नवजात वासरांसाठी सपूर्ण आहार असतो. त्यात अनेक प्रकारचे जैविक दृष्टया सक्रिय असे घटक असतात. तसेच चीका मध्ये पौष्टिक घटक हे सामान्य दुधाच्या तुलनेत जास्त प्रमाणात असतात.
 
• सामान्य दुधा पेक्षा प्रथिने चार ते पाच पटीने जास्त असतात.
 
• उर्जा दिड पटीने जास्त असते.
 
• खनिजे ही सामान्य दुधा पेक्षा जास्त असतात, त्यातल्यात्यात कॅल्शियम दुप्पट तर फॉस्फरस दिड पटीने जास्त असते.
 
• जिवनसत्व ‘अ’ १० पट, जिवनसत्व ‘ई’ ६ पट, तर जिवनसत्व ‘डी’ दुप्पट प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त ‘सी’ आणि ‘बी’ जीवनसत्व ही चागल्या प्रमाणात असतात.
 
• रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक म्हणजेच ईम्युनोग्लोबूलिन (विशेषत: ‘जि’ आणि ‘ए’) शंभर पटीने जास्त असतात.
 
• तसेच दुधातील सामान्य घटक लॅक्टोज (साखर) योग्य प्रमाणात असते.
 
विल्यानंतर दिवसेदिवस जसेजसे चीक दुधात बदलायला सुरू होतो तसतसे वरील दिलेल्या घटकाचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि शेवटी गाई-म्हशीच्या शारीरिक गुणधर्मा नुसार सामान्य दुधाइतके होउन जाते.

वासरांसाठी पहिला चीक अत्त्यंत महत्वाचं:-
 
वासरू जन्मल्या नंतर साधारणत: उभे राहून चीक पिण्याचा प्रयत्न करतात. वासराला पहिला चीक जन्मल्या नंतर दोन तासाच्या आत पाजविणे अत्यंत गरजेचे असते. कारण या काळात चीकातील संरक्षकतत्वे लवकर आणि जास्तीत जास्त शोषली जातात.काही वासरं जन्मत: कमजोर असल्यामुळे स्वत:हून चीक पिऊ शकत नाही तर त्यांना चीक हा काढून लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या निप्पल-बॉटलचा वापर करून पाजवावा किंवा चीक पिण्यासाठी मदत करावी.सुरूवातीच्या तीन ते पाच दिवस चीक हा वासराच्या वजनाच्या दहा टक्के (१०%) इतकाच पाजवावा व तसेच त्या चीकाचे विभाजन ३ ते ४ भागात करावे व वासरांना पाजवावे.
 
वासराला चीक पाजन्याचे फायदे:-
 
• वासरू जन्मण्याच्या पूर्वी गाय-म्हैशीच्या गर्भाशयात असताना त्याच्या आईकडुनच पोषण तत्व घेत असते. जन्मल्यानंतर चीक हे सुरूवातीच्या काळात एकमेव पौष्टीक आहार आहे. जे नवजात वासराला जास्त प्रमाणात उर्जा व रोग प्रतिकार शक्ती देते.
 
• वासराना होण्या-या न्युमोनिया, अतिसार किंवा हगवण इत्यादी घातक रोगाच्या विरूध्द रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता चीक हा अत्यंत महत्वाचा आहे.
 
• पोटात पचनासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या जिवाणूंची संख्या वाढवुन पचनक्रिया सक्रिय होते.
 
• चीक न पिलेल्या किंवा चीक कमी प्रमाणात पिलेल्या वासरापेक्षा योग्य प्रमाणात चीक पिलेल्या वासरात चांगली वाढ दिसून येते व वजन हे जलद वाढते.
 
अतिरिक्त असलेल्या चीकाचे संरक्षण :-
 
चांगल्या दुधाळ जातीच्या गाई–म्हशीत चीकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे वासराला चीक पुरेसा पाजवून काही प्रमाणात ची‍क शिल्ल्क राहतो. असे शिल्लक राहिलेले चीक वाया न करता त्याचे योग्य प्रकारे संरक्षण करता येतात.चीक हे कमी तापमानावर रेफ्रिजरेटर (फ्रिज) मध्ये साठवून ठेवता येतो व गरजेनूसार बाहेरकाढून अर्धा ते एक तास ठेवून पुन्हा वापराता येतो. अशाप्रकारे चीकाच्या पौष्टीक घटकात ही कमी प्रमाणातच बदल होतो आणि चीक पून्हा वापरायला चांगलाच असतो.
 
चीक पाजवण्या बदद्लचे गैरसमज :-
 
• गाई-म्हशी विल्यानंतर चे पहिल्या चीकाचे सेवन वासरात किंवा माणसात हाणीकारकअसते.
 
• विलेल्या जनावरांचे झार / वार बाहेर पडल्यानंतरच वासराला चीक पाजावेअन्यथा दुष्परिणामकारक ठरते.
 
• चीक अतिरिक्त प्रमाणात असल्यामुळे दुसऱ्या गाई-म्हशीला जेवढे जास्त चीक पाजता येईल तेवढे जास्त पाजवावे.
 
• चीक पाजल्यामुळे वासराचे पोट खराब होतात आणि हगवण लागते.
 
विषबाधा :-
 
वरील नमुद केल्याप्रमाणे पशुपालकातील गैरसमजुतीमुळे विलेल्या जनावरांना किंवा अतिरिक्त चीकाचे प्रमाण असल्यामुळे, गाई-म्हशीला जास्त प्रमाणात चीक पाजल्यामुळे विषबाधा होते. साधारणत: गाई-म्हशीच्या पोटात प्रथिनांच्या पचनामुळे अमोनिया वायू तयार होत असतो. परंतू चिकाच्या अति सेवनामूळे व त्यातील जास्त प्रथिनांमूळे अमोनिया वायूची पोटात मोठया प्रमाणात वाढ होते.अमोनिया मेंदूच्या कार्यासाठी हानीकारक आहे म्हणून अशा जनावरांच्या मेंदूवर परिणाम होऊन झटके यायला सुरूवात होते आणि शेवटच्या टप्यात जास्त प्रमाणात झटके येऊन जनावर दगावण्याची शक्यताअसते.चिक हा लहान वासरांसाठी अमृत आहे. परंतु मोठया जनावरांसाठी ते विषआहे. म्हणून जास्तीचा चीक गायी-म्हशी, शेळया यांना पाजवू नये.
 
विषबाधेचे लक्षणे :-
 
• चारा खाणे कमी होणे किंवा बंद होणे.
 
• अल्कली धर्मीयअपचण होऊन पोट गच्च होणे.
 
• रवंथ न करणे.
 
• अल्कली धर्मीय अपचण.
 
• पोटात दूखत असल्यामुळे पोटाला पाय मारून घेणे
 
• शेण कमी प्रमाणात व पातळ टाकणे.
 
• झटके येणे इत्यादी.
 
म्हणून गाई किंवा म्हशीना चीक पाजवू नये आणि पाजवल्यानंतर अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरीत पशुवैद्यकाशी संपर्क साधावा. घरगुती उपचार म्हणून अशा जनावराना खायचा सोडा पाजु नये.