शेतकर्‍यांना उतार वयात आर्थिक सुरक्षा देणारी "प्रधानमंत्री किसान मानधन योजना"

डिजिटल बळीराजा-2    22-Mar-2021
|
शेतकर्‍यांना उतार वयात आर्थिक सुरक्षा देणारी
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
विनयकुमार आवटे,
उपायुक्त कृषी गणना ,पुणे-५
 
-------------------------------------------------------------------------------
 
वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसाय खूप अनिश्चित स्वरूपाचा झाला आहे . यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण बिघडते. शेतकर्‍यांना उतार वयात म्हणजे साठी नंतर शेतात काम करण्याची क्षमता कमी होते . अश्या उतार वयात त्यांना निश्चित उत्पन्नाची हमी हवी असते . जेणेकरून ते स्वाभिमानाने आणि चांगले जीवन जगू शकतात . केंद्र शासनाने लघु आणि सिमांतिक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक संरक्षण व सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना योजना सन २०१९ मध्ये सुरू केली आहे . या योजनेत भाग घेणार्‍या पात्र शेतकर्‍यांना वय वर्ष ६० नंतर मासिक रुपये ३००० /- पेन्शन मिळणार आहे.
 
या योजनेची ठळक वैशिष्टे व लाभार्थी पात्रता निकष :-
 
• या योजनेत दिनांक ०१-०८-२०१९ रोजी २ हेक्टर पर्यंत वहिती खाली क्षेत्र असलेले १८ ते ४० वयोगटातील शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत .
• त्यांच्या नावावर जमीन असलेबाबत ७/१२ व ८ अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
• या योजनेअंतर्गत वय वर्ष ६० नंतर मासिक रुपये ३००० पेन्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे.
• शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस रुपये १५००/- प्रति महिना कुटुंब निर्वाह निधी म्हणून दिला जाणार आहे.
• यामध्ये योजनेत भाग घेताना लाभार्थीच्या वयानुसार विमा हप्ता हा रुपये ५५/- ते रु. २००/- प्रतिमहिना दरम्यान आहे. सदर हप्ता त्यांनी त्यांच्या ६० वयापर्यंत भरायचा आहे.
• यात लाभ घेण्यासाठी लाभार्थी कडे आधार कार्ड आणि त्याचे बँक खाते सेवा तपशील असणे आवश्यक आहे.
या योजनेत भाग घेण्यासाठी अपात्र व्यक्ति पुढीलप्रमाणे .
• राष्ट्रीय पेन्शन योजना, कामगार राज्य विमा महामंडळ योजना, कामगार व रोजगार मंत्रालयाच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि प्रधानमंत्री व्यापारी मानधन योजना यात भाग घेतलेल्या व्यक्ति
• सर्व संस्थात्मक भूधारक
• सर्व संवैधानिक पदे धारण करणारे आजी व माजी पदाधिकारी
• आजी व माजी मंत्री , राज्यमंत्री, आजी व माजी लोकसभा , राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य
• आजी व माजी महापौर
• आजी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
• सध्या सेवेत असलेले व सेवानिवृत्त सर्व केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी / कर्मचारी
• यात केंद्र व राज्य शासन अंगीकृत व्यवसाय, ऑटोनॉमस इंस्टिट्यूशन्सचे सर्व अधिकारी (यात वर्ग ४ चे कर्मचारी वगळून)
• सर्व आयकर (इन्कम टॅक्स) भरणाऱ्या व्यक्ती आणि डॉक्टर, अभियंता, वकील , सनदी लेखापाल, आर्किटेक अशा व्यावसायिक सुविधा पुरविणार्‍या व्यक्ति ह्या अपात्र असतील.
 
इतर ठळक वैशिष्ट्ये
 
• यात लाभधारक शेतकऱ्याचा पेन्शन घेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस ५० % म्हणजेच रुपये १५००/- प्रति महिना कुटुंब निर्वाह निधी मिळेल.
• यात पात्र असलेल्या लाभार्थी यास पेन्शन विमा हप्ता सुरू असताना कायमस्वरूपी विकलांगता प्राप्त झाल्यास, त्याची पत्नी या योजनेत विमा हप्ता भरून सहभाग पुढे चालू ठेवू शकते किंवा लाभार्थ्याने भरलेला विमा हप्ता व त्यावरील जमा झालेले व्याज त्यांना परत मिळू शकते.
• लाभार्थ्याने योजनेत सहभाग घेतल्यानंतर १० वर्षाच्या आत योजनेतील सहभाग काढून घेतल्यास त्याने भरलेला विमा हप्ता व बचत खात्यानुसार देय व्याज त्यास मिळेल.
• जर पात्र लाभार्थ्यांना सहभाग घेतल्यानंतर १० वर्षाच्या कालावधीनंतर व ६० वर्ष पूर्ण होण्याच्या आधी सहभाग काढून घेतल्यास त्यास त्याने जमा केलेला विमाहप्ता व त्यावर मिळालेले प्रत्यक्ष पेन्शन फंडकडून जमा झालेले व्याज किंवा बचत खात्यावरील व्याजदर याप्रमाणे मिळणारे व्याज यापैकी जी रक्कम जास्त असेल ती रक्कम त्यात मिळेल.
• जर पात्र लाभार्थ्यांना नियमित विमाहप्ता भरत असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी सदर विमा हप्ता पुढे नियमित भरून योजनेतील सहभाग चालू ठेवू शकते किंवा तिला लाभार्थ्याने भरलेला विमा हप्ता व त्यावरील निर्वाह निधी नुसार जमा झालेले व्याज किंवा बचत खात्यावरील व्याज दरानुसार मिळणारे व्याज यापैकी जास्त रक्कम असेल ती मिळेल.
• पेन्शन घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचा किंवा त्याच्या पती किंवा पत्नी चा मृत्यू झाल्यानंतर जी रक्कम असेल प्रति निर्वाह निधी मध्ये जमा होईल.
 
या योजनेत भाग घेतानाचे वयानुसार लाभार्थ्याने भरावयाचा मासिक हप्ता

मासिक हप्ता_1   
 
वरीलप्रमाणे असलेल्या मासिक हप्त्याइतकी रक्कम केंद्र शासन सदर लाभार्थ्याच्या खाती भरणार आहे .
 
यात आर्थिक परताव्याच्या दृष्टीने विचार केल्यास योजनेत भाग घेताना ४० वर्ष वय असलेल्या लाभार्थीस भरावी लागणारी रक्कम आणि मिळणारा परतावा पुढीलप्रमाणे असेल .
 
• रु.२०० /- प्रती महिना नुसार वर्षभरात भरणारा हप्ता रक्कम – रु. २४०० /-
• वयाचे ६० वर्षा पर्यन्त होणारी हप्त्याची एकूण रक्कम – रु. ४८,०००/-
• ६० वया नंतर दरमहा मिळणारी पेन्शन - रु.३००० /-म्हणजे एका वर्षात मिळणारी रक्कम रु. ३६,०००/-
• लाभार्थीने ७० वयापर्यंत लाभ घेतला तर १० वर्षात त्याला मिळणारी रक्कम रु. ३.६० लाख .
• जर लाभार्थीने ८० वयापर्यंत लाभ घेतला तर २० वर्षात त्याला मिळणारी रक्कम रु. ७.२० लाख
 
ही योजना शेतकर्‍यांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या संरक्षित करण्याचे दृष्टीकोणातून खूप चांगली आहे . यात भाग घेण्यासाठी शेतकरी www.pmkisan.gov.in वर ऑनलाइन अर्ज करून भाग घेऊ शकतो . किंवा कॉमन सर्विस सेंटर , आपले सरकार यांचे मदतीने भाग घेऊ शकतो .