सुपर नेपियर गवत- एक पोषक चारा

डिजिटल बळीराजा-2    03-Feb-2021
|

vg_1  H x W: 0
 
सद्या सुशिक्षित वर्गही दुग्धव्यवसाय, शेळीपालन या व्यवसायाकडे वळत आहे. दुग्धव्यवसाय/ शेळीपालनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. दुग्धव्यवसाय, शेळीपालन किफायतशीर होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच चारा उत्पादन व व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग आहे. जनावरांसाठी चारा उत्पादनामध्ये दिवसेंदिवस बदल होवून पोषक चारापिके उत्पादन व पशुआहारात त्याचा वापर यास अधिक महत्व येत आहे. त्याकरिता सद्याचा पोषक चारा कोणता याबाबी आपणास माहित असणं गरजेचं आहे. पोषक चा-यामध्ये एकदलीय वर्गातील सुपर नेपियर गवत, डीएचएन-6, बी. एच.एन-10 इ.
चा-याच्या पोषक जाती आहेत त्याच बरोबर द्विदल चारापिकामध्ये मेथीघास, दशरथ, शेवरी, बरशीम इ. पोषक चा-याच्या जाती विकसित आहेत. आज आपण या लेखामध्ये सुपर नेपियर गवत लागवड, उत्पादन याबददल माहिती घेणार आहोत.
लागवडीसाठी असलेल्या जमीनीच्या प्रतीनुसार चारा उत्पादन कमी/जास्त मिळू शकते.
पूर्वमशागत:-
सुपर नेपियर गवत लागवडीसाठी एक खोलवर नांगरट आणि 2 ते 3 वेळा वखरणी करून जमीन तयार करावी.
लागवड पध्दती:- सुपर नेपियर गवताची कांडी 4 फूट x 2 फूट अंतरावर लागवड केल्यास चारा उत्पादन मुबलक मिळते. 4 फुटांची सरी केल्यामुळे आंतरमशागत करणे सोईस्कर होते. तसेच चारापिकास पाणी व्यवस्थित देता येते. चार फुटांची सरी व सरीच्या बाजूला दोन फुटावर एक डोळा या पध्दतीने लागवड करणे उपयुक्त ठरते.
लागणारी ठोंबे:-
• एक डोळा पध्दतीने रोपे तयार करून रोपांची लागवड करता येते किंवा कांडया तयार करून उभ्या पध्दतीने किंवा आडव्या पध्दतीने लागवड करता येते.
• 4 फुट x 2 फुट अंतरावर लागवड केल्यास एका गुंठयाला जवळजवळ 136 ठोंबे /डोळे लागतात म्हणजेच एकरी 5440 (5500) ठोंबे लागतात. म्हणजेच हेक्टरी जवळजवळ 13000 ठोंबे लागतात. यामध्ये दोन डोळयांची कांडी करून लागवड केल्यास उगवणीचे प्रमाण वाढलेले दिसते.
• उभी कांडी पध्दतीने लागवड करताना डोळयांची दिशा वरच्या दिशेने राहील याची काळजी घ्यावी.
• लागवडीसाठी साधारणपणे 3 महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील 2/3 भागाचा वापर करावा. दोन डोळयांची कांडी उभ्या पध्दतीने लागवड करताना एक डोळा जमिनीत व एक डोळा वरती राहील अशा पध्दतीने लागवड करावी.
खते:-
जमीन तयार करताना 5 ते 10 टन शेणखत / कंपोस्ट खत मातीत पूर्णपणे मिसळून जमिन तयार
करावी. लागवड केल्यानंतर 14:14:14 चे 5 पोती हेक्टरी याप्रमाणे खत मात्रा द्यावी.
नंतर प्रत्येक कापणीनंतर युरियाचा एकरी एक बॅगप्रमाणे डोस द्यावा.
आंतरमशागत:-
सुरूवातीला गवताची पूर्णपणे वाढ होईपर्यंत एखादी/ दुसरी खुरपणी करावी लागते. मात्र नंतर शक्यतो या गवताच्या वाढीमुळे दुसरे तण जोमाने वाढत नाही तसेच गरजेनुसार आंतरमशागत करणे फायदेशीर ठरते.
पाणी व्यवस्थापन:-
• उन्हाळयात लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरूवातीस दोन व त्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यानंतर प्रत्येक 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
• पावसाळयामध्ये गरज असल्यास दर 12 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे तसेच थंडीच्या काळात 10 ते 12 दिवसांनी पाणी दिल्यास पुरेसे ठरते.
 
कापणी:-
पहिली कापणी अडीच ते तीन महिन्यांनी करता येते परंतु पुढील कापण्या 50 ते 70 दिवसाच्या दरम्यान केल्यास सकस, रसाळ, पोषणतत्वयुक्त, पचनास हलका चारा उपलब्ध होतो. कापणी शक्यतो जमिनीलगत करावी.
• कापणी उशीरा केल्यास रस, प्रथिनांचे प्रमाण कमी होवून चा-यातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढते त्यामुळे चारा चवदार राहत नाही. असा चारा जनावर आवडीने खात नाहीत व चारा पचनास जड असतो. त्याबरोबर एकदा की तंतुमय पदार्थांचे चा-यातील प्रमाण वाढले की पुढील कापण्या वेळेवर मिळत नाही चारापिकाची वाढ खुंटते, चारा उत्पादन कमी मिळते.
 
• सुपर नेपीयर गवताची वैशिष्टये:-
1. मुबलक फुटवे, पाने हिरवीगार, रसाळ, गोड रस, पानांची संख्या जास्त
2. जोमाने वाढ
3. एक वर्षाला 4 ते 5 कापण्या
4. प्रथिने 14 ते 18% पर्यंत
5. मुरघास बनवण्यासाठीही उपयुक्त
6. 5 वर्षापर्यंत चारा उत्पादन देणारी जात
7. जास्त प्रथिनामुळे खुराकात बचत होते.
8. कापण्यासाठी मऊ व जनावरांना खाण्यासाठी रूचकर
डॉ. प्रफुल्लकुमार वसंतराव पाटील (8329735314)
पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर