मिरची पिकावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    03-Feb-2021
|

cd_1  H x W: 0
 
मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाचे कमी प्रतीचे उत्पादन येण्यामागे किडींचा प्रादुर्भाव होणे व योग्य वेळी किडींचे नियंत्रण न करणे हे प्रमुख कारण आहे. या पिकावर येणाऱ्या किडीमुळे ३४ ते ७५ टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे फार गरजेचे आहे.
 फळ पोखरणारी अळी :
हि अळी तपकिरी हिरवट रंगाची असुन शरीराच्या दोन्ही बाजुने गडद पटटा असतो आणि शरीरावर तुरळक केस असतात. सुरवातीच्या अवस्थेमध्ये अळी हि पाने व फुले व रोपाच्या शेंड्यावर उपजीविका करते नंतर ती फळांना अनियमित आकाराची मोठी छिद्रे पाडुन आतील भाग खाते.
 फुलकिडे :
हे किडे अतिशय छोटे, निमुळते व नाजूक असतात, रंगाने फिक्कट पिवळे किंवा करडया रंगाचे असुन त्याची लांबी 1 मि.मि. पेक्षा कमी असते. ही किड पंख विरहित अळया व पंख असले तरी अळीसारखी अशा दोन्ही अवस्थेत आढळते. त्यांच्या पंखाना मध्ये शीर असते व ती लांब केसांनी व्यापलेली असते.
पानाच्या वरचा पापुद्रा खरडता येईल अशी या किडीच्या तोंडातील मुखांगाची रचना असते व त्यांच्या साहयाने ही कीड पानातील रस शोषुन घेते, ही कीड पानाच्या खालच्या किंवा वरच्या बाजुला सुध्दा असते. आकार द्रोणासारखा दिसतो. पाने वरच्या बाजुला मुरडली जातात. हया किडीचा उपद्रव पीक लहान असतांनाच सुरु होतो व ते मोठे होईपर्यंत राहतो, मोठया प्रमाणावर कीड पडल्यावर पाने व झाडाची शेंडे चुरडतात. त्यावरुन या किडीस चुरडा मुरडा हे नाव आहे. अशा झाडाची वाढ खुंटते. अशा झाडाला मिरच्या फार कमी लागतात.
 मावा :
मावा ही किड अत्यंत महत्वाची आहे कारण ती पानाच्या मागच्या बाजुस कळया व फुलावर तसेच झाडाच्या कोवळया भागावर असून झाडाच्या पेशीतील रस अखंडपणे शोषण करते. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी दिसतात. तसेच ही किड शरीराबाहेर मधासारखा चिकट पदार्थ सोडते. हया चिकट पदार्थावर काळसर बुरशीची वाढ होते व त्यामुळे पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते व परिणामत: झाडाची वाढ खुंटते व पिकाच्या उत्पन्नात घट येते.
 पांढरी माशी :
या किडीची पिल्ले तसेच प्रौढ माशी पानातील रस शोषण करतात. त्यामुळे झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात व उत्पन्नात फार घट येते. या माशीमुळे विषाणु व्हायरस रोगाचा प्रसार होतो.

 कोळी :
अष्टपदी अत्यंत सुक्ष्म प्राणी आहेत. कोळी चापट, वर्तुळाकार, लाल किंवा पिवळसर असतो. पानावर ते सैरावैरा धावत असतात. हयांची लांबी 1 मि.मि. असते. हि किड पानाच्या मागच्या बाजुस राहून पेशीतील रस शोषण करतात व त्यामुळे पाने चुरडु लागतात. प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडकल्या जातात. झाडाच्या खालच्या बाजूची पाने आकाराने मोठी गर्द हिरवी, राठ पण कोकडलेली असतात. सर्व साधारणपणे पानाचे देठ लांबलेले आढळते. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते. फुले मोठया प्रमाणावर गळून पडतात. फळांचा आकार लहान व विद्रुप होतो व उत्पन्नात भारी घट होते.
 एकात्मिक व्यवस्थापन
• पुसा ज्वाला किंवा फुले ज्योती या कीड सहनशील वानाची लागवड करावी.
• पिकाची फेरपालट करावी फक्त मिरचीवर मिरचीचे पीक घेणे टाळावे.
• मिरचीच्या रोपावर हलकेसे पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
• मिरची पिकासोबत ४:१ या प्रमाणात चवळी,कोथिंबीर किंवा उडीद यांचे आंतरपीक घ्यावे.
• झेंडू या सापळा पिकाची ४५ दिवसाची रोपे १०० झाडे प्रति एकरी लावावीत.
• निंबोळी पेंड दोनदा (रोप लावतेवेळी व एक महिन्यानंतर ) १०० किलो प्रति एकरी विभागून द्यावी.
• पांढ­या माशीसाठी पिवळे चिकट सापळे 10/हे. लावावेत.
• क्रायसोपाच्या अळया 2 प्रति झाड रस शोषण करणा­या किडीसाठी सोडावे.
• फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी 50,000 प्रती हेक्टरी शेतामध्ये सोडावेत.
• ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
• फळ पोखरणाऱ्या अळीच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये एचएनपीव्ही २५० एल ई प्रति ५०० लिटर पाण्यातून सायंकाळी फवारणी करावी.
• फळे पोखरणा­या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4 ग्रॅम किंवा लॅमडा साहॅलोथ्रीन ५ ईसी ६ मि. ली. किंवा फ्ल्युबेंडामाईड 39.35 एस सी 2 मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
• मिरचीवरील फुलकिडे मावा, पांढरी माशी या रसशोषण करणा­या किडींच्या व्यवस्थापनाकरीता फिप्रोनील 5 टक्के 20 मि.ली किंवा स्पीनोसॅड ४५ एसएल ३.२ मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
• कोळीच्या नियंत्रणाकरीता स्पायरोफेसीफेन 22.9 एससी 8 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मिरची हे पीक विविध कीडींना फार संवेदनशील असल्यामूळे अगदी रोपवाटीकेपासून ते रोपलागवडीच्या नंतर शेवटच्या तोडणीपर्यंत निरनिराळया टप्प्यात काळजी घेणे आवश्यक आहे.