परोपजीवी तण - अमरवेलाचे नियंत्रण व व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    19-Feb-2021
|

क्ष,_1  H x W:
     
       शेतकरी मित्रानो तण खाई धन या वाक्यप्रचाराप्रमाणे न मरणारी म्हणून ‘अमरवेल ‘ या तणाचा प्रादुर्भाव द्विदल वर्गीय पिके जसे सोयाबीन , तूर, मूग, उडीद इत्यादी सारख्या पिकांत वर्षोगणती दिसून येतो व मोठ्या प्रमाणात नुकसान आढळून येते .कोरडवाहू तूर व मूग पिकाला या तणाने विळखा घातल्याने शेतकरी चिंतातूर होतात . म्हणूनच या लेखात आपण अमरवेल परोपजीवी तणाची ओळख व नियंत्रण पाहणार आहोत .
      अमरवेल हे कंदमुळे वर्गातील वार्षिक वर्ण हीन, पिवळसर रंगाची गुंडाळणारी वनस्पती आहे . जगभरात या वनस्पतीच्या सुमारे २०१ प्रजाती आहेत . समशितोष्ण व उबदार हवामानाच्या प्रदेशात या ताणाचा प्रसार झाला आहे .या परोपजीवी तणाचे मुळस्थान उत्तर अमेरिका आहे. हे तण संपूर्ण परोपजीवी असून जगण्यासाठी योग्य अश्या यजमान झाडावर अवलंबून असते . ते ठरावीक वनस्पतीवर , कुंपानावर , झाडावर व इतर विशिष्ट तणावर आढळते. हि परोपजीवी वनस्पती विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या ताणाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत असून प्रामुख्याने मिरची, मुग , उडीद , जवस तसेच कांदा या पिकावर सुद्धा या परोपजीवी वनस्पतीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे .
      दरवर्षी सोयाबीन पिकाखालील लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत असून सोयाबीन पिकामध्ये उगवणाऱ्या विविध प्रकारच्या तणांचे व्यावस्थापन करण्यासाठी बहुतांश शेतकरी बांधव बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध तणनाशकांचा वापर करूनच तणांचा बंदोबस्त करीत आहेत. रासायनिक पद्धधतीने तणांचा बंदोबस्त करण्यात यश मिळत असले तरी मागील २ ते ३ वर्षापासून ‘अमरवेल ‘ या परोपजीवी ताणाचा प्रादुर्भा व द्विदल वर्गीय पिकावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमरवेल हा प्रामुख्याने द्विदल पिकांवर वाढणारा वेल असून यामध्ये मूग, उडीद , सोयाबीन व तूर या पिकांचा समावेश होतो . अमरवेल परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकासोबातच व्दिदल ताणावर सुद्धा आपले जीवनचक्र पूर्ण करते . बाल्यावस्थेत असतांना हा वेल गुंडाळी करून तो दुसऱ्या वनस्पतीच्या खोड तसेच पानावरही चिकटतो व जमिनीपासून विलग होतो. मात्र त्यानंतरही त्यावरील सुक्ष्म दातासारख्या असण्यार्या होस्टऊरियाच्या सहाय्याने दुसऱ्या झाडातील अन्नाद्रवे शोषून घेतो . त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटत जाते व परिणामतः उत्पादनात मोठी घट येते . चीन या देशात अमरवेलाला अतिशय उपद्रवी तण असे संबोधले जाते . भारतात देखील अमरवेलीचा प्रादुर्भावआढळून येत आहे.
      अमरवेलीचे बी २० वर्षाहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते . त्यामुळे बिजोत्पादन अवस्थेत त्याचा बंदोबस्त करणे कठीण जाते . त्याला उगवणीसाठी लागणारे अनुरूप वातावरण म्हणजेच १५ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान मिळताच त्याची उगवण होते. अमरवेलीचे बी १.० ते १.५ सेमी आकाराचे असते . हा वेल पूर्णतः मूळरहित असून पिवळसर , नारंगी हा पानरहित दोऱ्या सारखा दिसतो व मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून २.५ ते ५ .० सेमी दूर असल्येल्या द्विदल वनस्पतीच्या झाडावर चिकटतो . परंतु भोवताल द्विदल वनस्पती नसेल तर त्याचे रोपटे ३ ते ५ दिवसात मरते . एक अमरवेल दिवसाकाठी जवळ – जवळ ७ सेमी पर्यन वाढून जवळपास ३ चौ . मी. क्षेत्र व्यापतो . साधारणतः ६० व्या दिवसापासून या वेलाला बी धरणे सुरु होते .
      अमरवेलामुळे पिकाचे १०० टक्के पर्यन सुद्धा नुकसान होऊ शकते . विविध पिकांमध्ये जसे टमाटर पिकात ५० ते ७५ टक्के , गाजर पिकांमध्ये ७० ते ९० टक्के उत्पादनात घट आढळून आली आहे.

व्यवस्थापन : -
 
   अमरवेल या परोपजीवी ताणाचे नियंत्रण करण्यासठी जगात अजूनपर्यंत हमखास उपाय योजना उपलब्ध नसल्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे हे एक जिकरीचे काम आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करावयाचे झाल्यास एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक तण व्यवस्थापना द्वारे त्याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते .यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना व निवारणात्मक उपायामध्ये जैविक उपाय तसेच रासायनिक पद्धतीने नियंत्रण या सर्व बाबींचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
 
प्रतिबंधात्मक उपाय : -
       ज्या शेतात अमरवेलीचा प्रादुर्भाव आहे त्या शेतामध्ये ट्रक्टर , अवजारे ,औत व जनावरे दुसऱ्या शेतात वावरतांना बियांचा अथवा तणांचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी पुढील वर्षी तृणवर्गीय पिके उदा. ज्वारी , मका , बाजरी या पिकांची लागवड करावी . शेताच्या बांधावरील , रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतावरील अमरवेल नष्ट करावा . अमरवेल असलेले शेणखत शेतात वापरू नये , तण विरहीत बियाणे पेरणीसाठी वापरावे. शेतात किंवा पिकांमध्ये नियमित सर्वेक्षण करून अमरवेल आढळल्यास ( बियांवर येण्यापूर्वी ) ताबडतोब हाताने काढावा व वाळून नष्ट करावा . कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जीवंत राहत असल्यामुळे पुन्हा याचा प्रसार पिकात होण्याचा धोका कायम राहतो. ही बाब अवश्य लक्षात ठेवावी . कोणत्याही परिस्थितीत अमरवेलाचे बी शेतात पडणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी .
 
निवारणात्मक उपाय :-
 
१. जैवीक नियंत्रण :-
 
   अमरवेलाचे जैविक पद्धतीनेव्यस्थापन करावयाचे झाल्यास त्याचा विविध प्रजाती वरती निरनिरळ्या प्रकारच्या बुरशीचा वापर केला जातो . परंतु बुरशीद्वारे नियंत्रण आपल्या देशात प्रचलित नाही . चीन मध्ये कोलोट्रोटिकम ग्लुस्पोरिओडीस नावाच्या बुरशीचा सोयबीन पिकातील अमरवेलीच्या चायनेन्सीस व ओस्टोलिस या दोन प्रजातींच्या नियंत्रण करिता वापर केला जातो .
 
२ . रासायनिक नियंत्रण :-
 
   तणनाशकाद्वारे अमरवेलाचे व्यवस्थापन करावयाचे झाल्यास पीक पेरणी करावयाच्या २ ते ३ दिवासागोदर आणि जमिनीत ओलावा असतांना सोयाबीन , तूर , उडीद , मूग या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक वापरायचे झाल्यास पेंडीमिथेलीन ३० टक्के ई. सी . ३ .३ लिटर प्रति हे. ६०० ते ७०० लिटर पाण्यामध्ये पिकाची पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी फवारणीद्वारे वापरावे . अमरवेलाचे यशस्वीपणे व्यवस्थापण करण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त भागातील किंवा गावातील सर्व शेतकरी बांधवांनी सामूहिकरीत्या पुढाकार घेऊन वरील सर्व उपाय योजना अंमलात आणाव्यात तसेच अमरवेलाचा बंदोबस्त करण्यासाठी सामाजिक स्तरावरून जनजागृती करणे ही काळाची गरज आहे .