कृत्रीम रेतन करण्यापूर्वी व केल्यानंतर घ्यावयाची काळजी

डिजिटल बळीराजा-2    19-Feb-2021
|

d_1  H x W: 0 x
 
   कृत्रीम रेतन हे एक खूप स्वस्त तंत्रज्ञान आहे. यामुळे उत्कृष्ठ दर्जाच्या वळू पासून मिळालेल्या, उत्तम गुणवताअसलेल्या वीर्याचा वापर अथवा प्रसार होण्यास मदत होते. या तंत्रज्ञानाच्या अधिक वापरामुळे दूध व मांस उत्पादन वाढण्यास, जनावराच्या नैसर्गिक मिलनातून संक्रमीत होणारे रोग कमी करण्यास मदत होते. गाई व म्हशींमध्ये कृत्रिम रेतन हे मादी जनावर माजावर आल्यावर बारा तासावर केले जाते. पण माजावर आलेली जनावरे लक्षणांवरून ओळखता येणे आणि त्याची तेवढीच काळजी घेणे खुप गरजेचे आहे.
      - माजावर आलेल्या जनावराला खुप दूर चालवू नये.
      - सोय असेल तर पशुपालकाच्या घरीच कृत्रिम रेतन पशुवैद्यकाकडून करून घ्यावे.
      - कृत्रीम रेतन हे केंद्रावर गोठवून सुरक्षीत ठेवलेल्या वीर्यानेच करून घ्यावी, कारण उच्च प्रतीच्या वळूंचे/ रेडयांचे वीर्य या          पध्दतीने सुरक्षीतपणे नळकांडीमध्ये ठेवलेले असते.
      - वीर्यगोळा केल्यानंतर वीर्याची तपासणी करणे आवश्यक असते व त्याचप्रमाणे वळूमध्ये कोणत्याही संक्रमीत रोगाचा          प्रादुर्भाव नाही का ते तपासले जाते.
      - वीर्यामध्ये गतीशिल शुक्राणूंची संख्या पर्याप्त (5-10 दशलक्ष) असावी.
      - कृत्रीम रेतन करण्याआधी मादी जनावराचे मायांग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
      - रेतनापूर्वी गोठलेल्या वीर्याला तरल करण्यासाठी 37 डिग्री सेल्सीयस तापमान असलेल्या पाण्यामध्ये 30 सेकंद ठेवावे.
      - पशुवैद्यकाकडून कृत्रीम रेतन करून झाल्यावर जनावरांना थंड आणि स्वच्छ जागेवर बांधावे.
      - कृत्रीम रेतन केलेल्या तारखेची नोंद करून ठेवावी. जेणेकरून गर्भधारणा तपासणी वेळीच करता येते.
      - मायांगामधून असामान्य स्त्राव होत असल्यास वेळीच पशुचिकीत्सकाचा सल्ला घ्यावा.
      - कृत्रीम रेतन केल्यावर 21 व्या व 42 व्या दिवशी दिवसातून 2 वेळा मादी माजावर आली आहे का याची पाहणी करावी.
      - रेतनाच्या 60 दिवसानंतर जनावरांचे पशुचिकित्सकाकडून गर्भधारणा आली आहे का हे तपासून घ्यावे. गायीमध्ये 7 व          म्हशीमध्ये 8 महिने गाभणकाळ पूर्ण झालेल्या जनावराचे दुध काढणे बंद करावे.
      - जनावर माजावर आल्यावर योग्य वेळेवरच रेतन करून घ्यावे कारण माजाच्या मध्य अवस्थेमध्ये गर्भधारणा होण्याचा दर          जास्त असतो.
      - जर पशु सायंकाळी माजावर आले तर दुस-या दिवशी सकाळी आणि माजाची लक्षण सकाळी निदर्शनास आली तर          सायंकाळी रेतन करून घ्यावे.
      - सामान्यत: गाई व म्हशी या 24 तास माजावर असतात परंतु या कालावधीपेक्षा जास्त काळ पशु माजावर राहात असेल तर          12 तासाच्या अंतराने दोन वेळेस कृत्रीम रेतन करावे.
 
         कृत्रीम रेतनाचे फायदे-
 
      - पशुपालकांना वळूंच्या शोधात भटकावे लागत नाही.
      - एका चांगल्या वळूच्या वीर्याद्वारे एकापेक्षा अधिक मादीची गर्भधारणा केली जाऊ शकते.
      - कृत्रीम रेतनाद्वारे एका वळूपासून एका वर्षात 10000 ते 20000 मादी पशुंना गर्भधारणा केली जाऊ शकते. पण त्याविपरीत          नैसर्गीक गर्भधारणेमुळे एका वळूपासून फक्त 50-100 मादी मध्ये जनावर नैसर्गीक रेतन केले जाऊ शकते.
      - आर्थिकदृष्टया सुध्दा कृत्रीम रेतन फायद्याचे आणि सोयिस्कर आहे.
      - पशु प्रजातीच्या सुधारणेसाठी हे एक उपयुक्त तंत्रदान आहे.
      - पशुपालकाला मादी पशुच्या गर्भधारणेसाठी अतिरीक्त वळू ठेवण्याचे कष्ट व खर्च लागत नाही.
      - कृत्रीम रेतनाच्या वेळेस प्रजनेनींद्रीयांचे परिक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे गर्भाशयातील समस्यांचे वेळीच निरीक्षण करून          वाढणारा भाकडकाळ टाळला जातो.
      - उत्कृष्ठ वळूच्या मृत्युनंतरही त्याचे वीर्य उपयोगात आणले जाऊ शकते.
      - चांगल्या प्रतिच्या वळूंचे वीर्य दूर अंतरावर सहज पोहचवले जाऊ शकते. प्रत्यक ठिकाणी वळू ठेवण्याची गरज भासत नाही.
      - विविध प्रकारच्या जननेद्रीयासंबंधीत रोगांचा प्रसार होण्यास आळा बसतो.
      - उत्कृष्ठ प्रतिच्या वळूचे वीर्य वापरून पशुंची उत्पादकता वाढवता येते.
      - वेळ आणि पैशाची बचत होते.
      - पशुपालकांच्या दारातच ही सुविधा पार पाडली जाऊ शकते.