वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    04-Jan-2021
|

महाराष्ट्रात तीनही हंगामात वांगी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. वांगी हे प्रमुख भाजीपाला पिक असुन त्याला वर्षभर मागणी असते. वांगी या पिकाला उगवणीपासून ते काढणीपर्यंत अनेक किडींना सामोरे जावे लागते. ज्यामुळे उत्पादनात घट होते. या पिकावर प्रामुख्याने शेंडा व फळे पोखरणारी अळी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी व लाल कोळी या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. यापैकी शेंडा व फळे पोखरणारी अळी ही एक आर्थिकदृष्ट्या महत्वाची कीड असून त्यामुळे जवळजवळ ५० ते ७० टक्के नुकसान होते.

वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणारी अळी
 
हि किड अंडी, अळी, कोष, व प्रौढ अशा चार अवस्थांमधून आपले जीवन पूर्ण करते. त्यापैकी अळी अवस्था आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असते. या किडीची अळी छोटी व फिक्कट गुलाबी रंगाची असते. पतंग मध्यम आकाराचा असुन पुढील पंख पांढरट व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात.

नुकसानीचा प्रकार :-
 

bgj_1  H x W: 0 
या किडीचा प्रादुर्भाव रोप लावल्यानंतर काही आठवड्यानंतर दिसून येतो. अळी प्रथमता कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात. फळे आल्यानंतर ही अळी सुरुवातीला छिद्र करून फळांत प्रवेश करते व त्यामध्ये उपजिविका करते. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ६०-७० % नुकसान होते.
 
एकात्मिक किड व्यवस्थापन :-
या किडीच्या नियंत्रणासाठी अनेक प्रकारच्या रासायनिक किटकनाशकांचा बेसुमार वापर केला जातो. किटकनाशकांच्या या अवाजवी वापरामुळे किडींमध्ये वाढलेली प्रतिकारक्षमता, दुय्यम किडींचा उद्रेक, पिकांवर किटकनाशकांचे अवशेष (अंश) राहणे, मित्र किडींचा ऱ्हास आणि प्रदुषणासारखे गंभीर प्रश्न भेडसावत आहेत. मानवी आरोग्यावर या किटकनाशकांच्या घातक अंश्यामुळे आरोग्याचे धोके निर्माण झाले आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी भाजीपाला पिकामध्ये रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी होणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून रासायनिक किटकनाशकांचा वापर न करता इतर पद्धतीचा वापर करून किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करणे सोपे जाते. यामध्ये रासायनिक किटकनाशके केवळ पर्यायी मार्ग नसतातच व गरज भासल्यास प्रमाणात वापरावे.
१. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी व किडींच्या विविध अवस्थांचा नायनाट करावा.
२. पिकांची योग्य प्रकारे फेरपालट करावी, एकाच शेतामध्ये वर्षानुवर्षे वांग्याचे पिक घेऊ नये व जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पुढच्या वर्षी वांग्याचे पिक घेणे टाळावे.
३. मागील पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
४. वांग्याची लागवड करताना सुधारित व शिफारस केलेल्या वाणांचा वापर करावा. या पिकाला गरजेनुसार खतमात्रा द्यावी व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
५. प्रादुर्भावग्रस्त झाडाचे शेंडे व फळे तोडून अळ्यांसहीत त्यांचा नायनाट करावा.
६. वाणांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे.
७. प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत.
८. वांगी पिकामध्ये पाच कामगंध सापळे (फेरोमोन ट्रँप) पिकाच्य वर एक फूट उंचीवर लावावेत. म्हणजे शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेची कल्पना येईल.
९. पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा निंबोळी तेल (अँझाडिराक्टीन) २.५ मि.लि. प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
१०. मित्रकिटकांचा वापर करून जैविक कीड नियंत्रणाला प्रोत्साहन द्यावे, ट्रायकोग्रामा व ब्रेकाँन या परोपजीवी किटकांच्या अंड्याचे प्रसारण करावे.
११. वरील उपाययोजना केल्यावरही जर शेंडा व फळे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढून आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास खाली दिलेल्या कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
१२. आर्थिक नुकसान संकेत पातळी : सरासरी ५ टक्के फळांचे नुकसान.
 

bgjt_1  H x W:  

टीप: वरील प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असुन, आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.