जनावरांमधील रोगप्रसार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी

डिजिटल बळीराजा-2    26-Jan-2021
|

df_1  H x W: 0
आपल्या मराठी भाषेत म्हण आहे की,आजारावर ईलाज करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. याच उक्तीप्रमाणे पशुपालकाने आपल्या पशुधनाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आजार झाल्यावर खर्च करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये याकडेच जास्तीत जास्त लक्ष दिल्यास पशुपालकाचा खर्चही वाचेल आणि पशूचे आरोग्यही व्यवस्थित राहील.
पण तरीही पशुकळपात एखादे जनावर आजारी/ रोगी असेल तर त्याची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करणे खूप गरजेचे आहे. त्या रोगी जनावराला निरोगी जनावरांपासून बाजूला ठेवून आपण बाकीच्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. त्याने आपल्या उत्पन्नावरही परिणाम होणार नाही.
 
जनावरांमधील रोगप्रसार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी:
 गोठयात रोज सकाळ संध्याकाळ साफसफाई करावी.
 
 गोठयातील माशा, कीटक यांच्यावर नियंत्रण ठेवावे.
 
 गोठयात माश्या होऊ नये याकडे लक्ष दयावे कारण जखमी जनावराच्या शरीरावर माश्या बसल्यावर जखम वाढते व जनावराला त्रास होतो.
 
 गोठ्याच्या भिंतीला ३ ते ६ महिन्यांनी चुन्याची सफेदी द्यावी जेणेकरून कृमीचा नायनाट होईल.
 
 रोगी जनावरांची व्यवस्था ही निरोगी जनावरांपासून वेगळी करावी.
 
 गोठयातील पाण्याची टाकी २-४ दिवसातून स्वच्छ करावी त्यात शेवाळ येणार नाही याची काळजी घ्यावी. टाकीलाही चुन्याची भुकटी लावावी. 
 
 गोठ्याच्या सभोवताली साठलेल्या पाण्याचा वेळीच निचरा करावा. साठलेल्या पाण्यात डास होणार नाही याची काळजी घ्यावी.
 
 रोगी जनावरांची खाद्याची वेगळी व्यवस्था करावी. पशुवैद्यकीय डॉक्टरांकडूनच खाद्याच नियोजन करून घ्यावं.
 
 रोगी जनावरांचे मलमूत्र दूर नेऊन पुरून टाकावे. जनावरांच्या खाली असलेला कडबा, गवत आदी. यांचीही व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
 
 मृत जनावरांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी त्यांच्या नाकातोंडात व गुदद्वारात निर्जतुक द्रवाचे बोळे घालून दूर नेऊन पुरावे त्याचा संसर्ग निरोगी जनावरांना होणार नाही याची काळजी घ्यावी.
 
 जर संसर्ग झाला असल्याची शंका आल्यास निरोगी जनावरांना वेगळे करावे.
 
 जर एखादया रोगाची लागण झाली त्या जनावरांची काळजी घेणारे व्यक्ती, वापरण्यात येणारी उपकरणे ही वेगवेगळी असावीत. त्यांचा निरोगी जनावरांशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
 
 संसर्ग झालेल्या जनावरांसाठी वापरलेली उपकरणे योग्यरीत्या स्वच्छ व निर्जतुक करावीत जेणेकरून त्याच्या वापराने दुसऱ्या जनावरांना संसर्ग होणार नाही.
 
 एखादया रोगाची लागण झालेली जनावरे कळपातून वेगळी करून त्यांच्यावर जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तत्काळ उपचार करावेत.
सहाणे प्रणिता प्रतापराव
फोन नं.-८६००३०१३२९