“ दुधातील स्निग्धांश वाढीसाठी महत्वाच्या गोष्टी ”

डिजिटल बळीराजा-2    26-Jan-2021
|

fh_1  H x W: 0
आजमितीस दुधाचा दर हा त्यामध्ये असणा-या स्निग्धांश व स्निग्धविरहित घनपदार्थाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. ज्या दुधात स्निग्धांशचे प्रमाण जास्त त्या दुधास बाजारामध्ये चांगला भाव मिळतो. तसेच दुधापासून बनणा-या दुग्धजन्य पदार्थाचा उतारा देखील चांगला मिळतो. म्हशीच्या दुधास व त्यापासून बनलेल्या दुग्धजन्य पदार्थास चांगला दर मिळतो. याचमुळे आपल्याकडे असणा-या दुधाळ जनावराच्या दुधात स्निग्धांशचे प्रमाण कसे वाढवावे व त्यासाठी काय करावे लागेल याबद्धल आपण या लेखात सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.
दुधातील स्निग्धांशचे प्रमाण वाढवण्यासाठी लक्षात ठेवावयाचे मुद्दे :-
१. दुधाळ जनावराचे आरोग्य :-

दुधाळ जनावर हे निरोगी असावयास हवे. जनावरास जर आजार असेल तर त्याचा परिणाम हा दुधातील स्निग्धांश व स्निग्धविरहित घनपदार्थावर होत असतो. म्हणूनच रोगीट जनावराच्या दूध उत्पादनात घट ही येते. दुधाळ जनावरास जर कासेचा दाह ( मस्टायटिस ) झालेला असेल तर त्यांच्या दूध उत्पादनात घट ही मोठ्या प्रामाणावर होते या दुधाळ जनावराच्या आजाराबादधल माहिती असणे महत्वाचे आहे. मस्टायटीस या रोगाच्या निदानासाठी दूध काढल्यानंतर कासेची सडे ही निर्जंतुक पाण्याच्या द्रावणाने धुवून घ्यावीत. त्यामुळे भाविष्यात होणारे आर्थिक नुकसान टळण्यास मदत होते. याच कारणासाठी जनावराच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
२. दुभत्या जनावराचे खादय / आहार :-
दुभत्या जनावरास खाद्य / आहार हा संतुलित असावयास पाहिजे. जेणेकरून जनावराच्या शरीर पोषणासाठी आवश्यक लागणारे अन्नघटक त्या संतुलित खाद्यामधून मिळतील. शरीराच्या पोषणासाठी हिरवा व कोरडा चारा देणे गरजेचे आहे. हिरवा चारा दिल्यास दुधाचे उत्पादन वाढते पण स्निग्धांशवर त्याचा परिणाम जाणवत नाही. कोरडा किंवा वाळलेला चारा दिल्यास दुधातील स्निग्धांशचे प्रमाण वाढण्यास मदत होते. कोरड्या चार्‍यामध्ये दुधातील स्निग्धांश तयार होण्यासाठी आवश्यक असणारे घटक भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणूनच दुधाळ जनावरास कोरडा किंवा वाळलेला हा दिवसाला ३ - ४ किलो या प्रमाणात देण्यास हरकत नाही. खाद्यामध्ये पेंडिचा वापर केल्यास देखील दुधामधील स्निग्धांशचे प्रमाण वाढते. पण आपल्या पशुपालकास ही महागडी खादय खरेदी करण्यास परवडणारे नाही म्हणून ग्रामीण स्तरावर जे काही घटक उपलब्ध होतील त्यापासून चांगल्या प्रकारचे खाद्य हे पशुपालकास बनवता आले पाहिजे व ते जनावरास दिले पाहिजे.
३. जनावराची अनूवंशीकता :-
दुभत्या जनावराची निवड करत असताना त्यांच्या अनूवांशिकतेला अत्यंत महत्व दिले पाहिजे. कारण नैसर्गिक नियमानुसारच चांगल्या अनूवंशीकता असलेल्या जोडप्यापासून ( नर व मादी ) चांगल्या प्रकारचे अपत्य जन्मास येते. तसाच नियम देखील येथे चालतो. चांगली आनुवंशिकता असलेल्या जनावरापासून ( ज्यांच्या दुधात स्निग्धांशचे प्रमाण जास्त आहे.) कालवडीच्या / वगारीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेले निपजते. या साठी पैदाशिकरिता चांगल्या वळूची निवड करणे गरजेचे आहे. यामुळे दुधात स्निग्धांशचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
४. जनावराचे व्यवस्थापण :-
जनावराच्या व्यवस्थापणामध्ये दूध काढण्याच्या पद्धतीला व वेळेला विशेष महत्व दिले पाहिजे. दूध हे पूर्णमूठ पद्धतीने काढावयास हवे. तर दुध काढण्याच्या वेळेतील कालावधीला महत्व दिले पाहिजे. दूध काढण्याच्या कालावधीत जर जास्त अंतर असेल तर मिळणारे दुधाचे उत्पादन हे जास्त असतेच पण स्निग्धांशचे प्रमाण कमी लागते. कालावधी कमी असेल तर उत्पादन हे कमी मिळते पण स्निग्धांश हे जास्त लागते. म्हणूनच दिवसातून दोन वेळेसच दूध हे काढले पाहिजे, त्यामध्ये अंतर हे जास्त असेल तर मिळालेल्या दुधात स्निग्धांशचे प्रमाण जास्त असते.
साधारणपणे ज्या हंगामामध्ये ( पावसाळा व हिवाळा ) हिरवा चारा भरपूर/ मुबलक प्रमाणात जनावरास खावयास असतो तेथील दुधाचे उत्पादन हे जास्त असते. व स्निग्धांशचे प्रमाण कमी येते. उन्हाळ्यात हिरव्या चार्‍याची चणचण असते तिथे मिळणारे दूध हे कमी असते. व स्निग्धांशचे प्रमाण जास्त आढळून येते.
दुधाळ जनावराचे दूध काढताना वासराला गाईच्यापुढे द्यावे म्हणजे गाय पान्हा सोडेल. सामान्यपणे जनावराचे दूध काढताना वासराला पहिले व शेवटी दूध पाजले जाते. तर हे चुकीचे आहे. पहिल्या वेळी वासरास दूध पाजा, त्यामध्ये स्निग्धांशचे प्रमाण १ % पेक्षा कमी असते, व शेवटी पाजू नका कारण स्निग्धांशची घनता ही कमी असल्यामुळे ते दुधाच्या वरच्या बाजूस तरंगताना आपल्याला आढळते. शेवटी काढलेल्या दुधात स्निग्धांशचे प्रमाण भरपूर असते. म्हणून शेवटी काढलेले दूध हे दुधाच्या भांड्यात घ्यावे.
वरील माहितीच्या आधारे आपण दुभत्या जनावराच्या दुधात स्निग्धांशचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करावयास हवे ही माहिती मिळण्यास मदत होते.
प्रा. के.एल. जगताप
विषय विषेशज्ञ ( पशू संवर्धन व दुग्धशास्त्र)