गुलाबाचे चिरोटे

डिजिटल बळीराजा-2    12-Jan-2021
|

bg_1  H x W: 0

प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 
मैदा - ३ वाट्या,
मीठ - अर्धा चमचा,
बेकिंग पावडर - अर्धा चमचा,
पातळ तूप - पाव वाटी,
लाल रंग - १ टीस्पून ,
भिजवण्यासाठी दूध
साठ्याचं साहित्य -
कॉर्न फ्लोअर - २ टेबल स्पून,
तूप - अर्धी वाटी
क्रमवार पाककृती: 
१. मैदा, मीठ, बेकिंग पावडर, तुपाचे मोहन एकत्र करावे. त्यात थोडा लाल रंग घालून थंड दुधाने भिजवून १ तास झाकून ठेवा.
२. तूप फेसून त्यात कॉर्न फ्लोअर घालून साठा तयार करावा.
३. पिठाच्या ८ अगदी पातळ पोळ्या लाटून घ्या.
४. एका पोळीवर साठा पसरुन त्याची गुंडाळी करा. दुसर्‍या पोळीवर साठा पसरा. त्याच्या कडेला पहिली गुंडाळी ठेवून दुसर्‍या पोळीची गुंडाळी करा.
५. अशा ८ पोळ्यांच्या ४ गुंडाळ्या करुन घ्या. ओल्या कापडाखाली झाकून थेवा.
६. आता त्याचे साधारण १ इंच जाडीचे तुकडे कापून घ्या. कापलेली बाजू वर करुन चिरोटा लाटून घ्या.
७. कढईत तूप तापले की त्यात एकेक चिरोटा घाला. कढीत टाकल्याबरोबर जरा खाली दाबा. डाव्या हाताने टोकदार चाकू किंवा विणायच्या सुईने दाबून दुसर्‍या हाताने चिरोटा फिरवत तूप उडवा, तूप उडवतांना एकेक पापुद्रा छानपैकी फुलून येतो आणि चिरोटा गुलाबासारखा दिसतो.
८. असे सगळे चिरोटे तळून झाले की ताटात पसरुन ठेवा आणि साखरेचा घट्ट पाक करुन प्रत्येक चिरोट्यावर एक टेबल स्पून छान गोल फिरवून टाका आणि पाक गरम असतांनाच त्यावर पिस्त्याचे काप घाला म्हणजे ते चिकटतील.
वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात साधारण ६० चिरोटे होतात.
अधिक टिपा: 
१. चिरोट्याच्या पोळ्या अगदी पातळ लाटाव्या म्हणजे पापुद्रे छान फुलतात.
२. एकेक चिरोटा तळावा लगतो त्यामुळे वेळखाऊ काम आहे पण झाल्यावर इतका सुरेख दिसतो आणि अतिशय खुसखुशीत, चविष्ट लागतो त्यामुळे मेहेनत सार्थकी लागते 
३. साधारण प्रसन्न मूड असला की हे चिरोटे करायला घ्यावे कारण मूड चांगला असला की गुलाब चांगले फुलतात