कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी व वापरण्याच्या पद्धती

डिजिटल बळीराजा-2    12-Jan-2021
|
   गेल्या काही वर्षात रासायनिक कीटक नाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम मानवी आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. दुसऱ्या बाजूला किडींची प्रतिकार शक्तीही वाढली आहे. मित्रकीटक, परागीभवन करणाऱ्या मधमाशा या कीटकांची संख्या सुद्धा कमी होत आहे. कीटक नाशकांच्या बेसुमार वापरामुळे अल्प प्रमाणात नुकसान करणाऱ्या किडी रौद्र रूप धारण करत आहेत. शेतमाल परदेशात निर्यात करताना कीडनाशकांचे अंश सापडल्यामुळे मागील दोन तीन वर्षांपासून भारतातील शेतमाल नाकारला जात आहे. यामुळे कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी आणि वापर करणे खूप गरजेचे आहे.
   कीड व रोग नियंत्रणामध्ये शेतकरी बंधू सध्या रासायनिक कीटकनाशके किंवा बुरशीनाशके यांचा वापर जास्त करताना आढळत आहेत. अशी कीटकनाशके किंवा बुरशीनाशके खरेदी करताना किंवा त्याचा उपयोग करताना काही गोष्टी तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. सदरच्या लेखामध्ये आपण कीटकनाशके आणि बुरशीनाशके खरेदी करताना आणि वापरताना घ्यावयाची काळजी याची माहिती आपण घेणार आहोत.
 
• कीटकनाशके आणि बुरशीनाशके खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करावीत.
 
• औषधांची खरेदी गरजेनुसार करावी. जास्त औषधांचा साठा करून ठेऊ नये.
 
• औषधाच्या डब्यावर किंवा पुड्यावर बॅच नं., रजि. नं., उत्पादन तिथी व वैधता कालावधी यांचा उल्लेख आहे का नाही, हे योग्यरीत्या तपासून घ्यावे.
 
• औषधांचे सीलबंद डबे किंवा पुढे खरेदी करावे, कारण सीलबंद नसल्यास भेसळ होण्याची शक्यता असते.
 
कीटकनाशके आणि रोगनाशक औषधे हाताळताना घ्यावयाची काळजी :
 
पीक संरक्षण करताना वापरली जाणारी बहुतेक कीडनाशके जर काळजीपूर्वक हाताळली नाहीत तर माणसांना तसेच पाळीव प्राण्यांनाही अपायकारक ठरू शकतात. म्हणून कीडनाशके हाताळताना खालीलप्रमाणे त्याची काळजी घेतल्यास ते सुरक्षितपणे वापरता येतील.
 
• कीडनाशकाचा डबा, बाटली इत्यादींवरील लेबल वाचून दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
 
• कीडनाशक साठवून ठेवलेल्या पात्रास लेबल करावे.
 
• कीडनाशक थंड, कोरड्या व सुरक्षित जागी कुलूप लावून लहान मुलांपासून दूर राहतील अशा ठिकाणी ठेवावीत.
 
• धान्य किंवा औषधजवळ कीडनाशके ठेवू नयेत.
 
• कीडनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी इ. दुसऱ्या वापरासाठी उपयोग न करता त्यांचा नाश करावा.
 
• धोकादायक कीडनाशके वापरताना संरक्षक कपडे घालावीत.
 
• कीडनाशक पिशव्या फाडून न काढता सुरीने हळुवार कापून उघडाव्यात.
 
• अतिविषारी कीडनाशकांचे द्रावण तयार करताना खोलगट भांडे वापरावे, जेणेकरून द्रावण ढवळताना अंगावर शिंतोडे उडणार नाही. तसेच भुकटी व दाणेदार कीडनाशके लांब दांडीच्या लाकडी चमच्याने काढावीत.
 
• फवारणी / धुरळणी यंत्रात कीडनाशके भरल्यानंतर त्याचप्रमाणे फवारणी/ धुरळणी पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
 
• कीडनाशके मारताना काहीही खाऊ नये अथवा पिऊ नये. त्याचप्रमाणे तंबाखू अथवा बिडी ओढू नये किंवा हात साबणाने स्वच्य धुवूनच या क्रिया कराव्यात.
 
• फवारणी / धुरळणी यंत्रे द्रावण तयार करताना वापरलेली भांडी इत्यादी साहित्य नदी, ओढे किंवा विहिरीत धुवू नयेत, धुताना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीवर टाकावे अथवा गाडावे.
 
• फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी ते तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. 
 
• कीडनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासांपेक्षा जास्त वेळ करू नये. त्याचप्रमाणे उपाशीपोटी कीडनाशके फवारू नयेत.
 
• काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीत डॉक्टरांकडून स्वतःला तपासून घ्यावे.
 
• कीडनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास कमीत कमी २ आठवडे देऊ नये.
 
• फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी. त्यावेळी शेतात मधमाशा नसतात.
 
• दाट पिकांमध्ये फवारणी करताना एकेरी नोझलचा वापर करावा. 
 
• उष्ण व दमट वातावरणात फवारणी करू नये. अशा वातावरणात विषबाधा होण्याची शक्यता असते.
 
• फवारणी नेहमी वाऱ्याच्या दिशेने करावी. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये.
 
• औषधांची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त घेऊ नये.
 
• फवारणीसाठी वापरलेल्या पाण्याचा सामू (PH) हा सात किंवा त्यापेक्षा कमी असावा.
 
• पूर्ण माहिती असल्याशिवाय कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र मिक्स करू नयेत.
 
• हातापायावर काही जखम झाली असेल तर फवारणी करू नये. त्यामधून शरीरात विष जाऊन विषबाधा होऊ शकते.
 
प्रथमोपचारासाठी घ्यावयाची काळजी :
• कीडनाशकांची विषबाधा झाल्यास तात्काळ डॉक्टरांना बोलवावे.
 
• कीडनाशक पोटात गेले असल्यास : पोटातील विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यास भाग पाडावे. त्यासाठी १५ ग्रॅम मीठ ग्लासभर पाण्यातून पिण्यास द्यावे. उलटीद्वारे येणारे पाणी स्वच्य येईपर्यंत ही कृती करावी.
 
• जर रोग्याला सारख्या उलट्या होत असतील तर वरील उपचार करू नयेत. परंतु त्यास जास्त प्रमाणात कोमट पाणी पिण्यास द्यावे.
 
• रोगी जर बेशुद्धावस्थेत असेल त्याचप्रमाणे रोग्याने पेट्रोलजन्य पदार्थ उदा. रॉकेल, गॅसोलीन इ. किंवा दाहक अमल किंवा कॉस्टिक अल्कलीसारखे स्नायू जलद झिजवणारे पदार्थ गिळले असल्यास तोंडात व घशात जळजळते. अशावेळी त्याला उलट्या करण्यास प्रवृत्त करू नये. 
 
श्वसनाद्वारे विषबाधा : रोग्याला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत न्यावे, कपडे सैल करावेत. श्वासोच्छ्वास नियमित होत नसल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. छातीवर अतिरिक्त भार देऊ नये. रोग्यास बडबड करू देऊ नये व तो जास्तीत जास्त शांत राहील याची काळजी घ्यावी. रोगी अतिशय अस्वस्थ असल्यास त्यास अंधाऱ्या व शांत खोलीत ठेवावे.
 
त्वचेवर कीडनाशक पडल्यास: पाण्याने त्वचा धुवून काढावी, कपडे काढताना त्वचेवर पाण्याची धार सोडावी. त्वचा साबण आणि पाण्याने पूर्णपणे धुवून काढावी. विषबाधा कमी होण्यासाठी त्वरित पाण्याने धुणे हे जास्त महत्वाचे आहे.
 
कीडनाशक डोळ्यात गेल्यास: डोळ्याच्या पापण्या उघड्या ठेवाव्यात. ताबडतोब पाण्याचा प्रवाह डोळ्यात सोडून डोळे धुवावेत. सतत डोळे धूत राहावेत.
 
• जीवितहानी टाळण्यासाठी / रोगी दगावू नये म्हणून: रोग्यास ब्लॅंकेटमध्ये गुंडाळावे. अंथरुणावर झोपवताना पोटऱ्याखाली उशा ठेऊन पाय उंचावर ठेवावेत.
 
विषबाधेची लक्षणे :

cttvcd_1  H x W
cttvcdbgh_1  H  
 
• कीटकनाशकांच्या विषबाधेची काही लक्षणे त्वरित दिसून येतात तर काही संसर्गाच्या काही तासानंतर उद्भवतात. काहींचा प्रभाव अनेक वर्ष आढळत नाही उदा. कर्करोग.

• काही कीटकनाशकांची लक्षणे फवारणी संपली कि कमी होतात तर काहींना वेळ लागतो. नियमितपणे कीटकनाशकांशी संपर्क असलेले लोक दीर्घकालीन आरोग्यावरील परिणामांबद्दल चिंताग्रस्त आहेत. 
 
• गर्भवती किंवा बाळाला स्तनपान देणाऱ्या स्त्रीयांनी कीटकनाशकांच्या सोबत काम करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण काही कीटकनाशके गर्भ (गर्भावस्थेच्या बाळाला) किंवा स्तनपान करणाऱ्या शिशुला हानिकारक ठरू शकतात.
 
• प्रमाणित कीटकनाशक वापरणारे किंवा कीटकनाशकांसोबत काम करणाऱ्या लोकांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. तपासणीवेळी डॉक्टरांना तुम्ही ज्या कीटकनाशकांसोबत काम करत आहात त्याबद्दल कल्पना द्यावी.
कीटकनाशकांच्या विषारीपणानुसार डब्यावरील खुणा व चिन्हे :
डब्यावर ठळक असेल अशा दर्शनी भागावर हिऱ्याच्या आकाराचा चौकोन असला पाहिजे. हा चौकोन दोन त्रिकोणात विभागून कीटकनाशकांच्या विषारीपणानुसार वरच्या त्रिकोणात चिन्ह आणि एक शब्द आणि खालचा त्रिकोण रंगीत (लाल, पिवळा, हिरवा, निळा) असावा.
 
वर्गवारी १-अति विषारी :
वरच्या त्रिकोणात गुणिले चिन्हासारखे हाडाचे चिन्ह व त्यामध्ये मानवाच्या कवटीचीत्र आणि POISON. खालच्या त्रिकोणाचा रंग लाल असतो.
 
वर्गवारी २- जास्त विषारी :
वरच्या त्रिकोणात फक्त POISON लिहिलेले तर खालच्या त्रिकोणाचा रंग पिवळा असतो.
 
वर्गवारी ३- मध्यम विषारी :
वरच्या त्रिकोणात DANGER लिहिलेले असते तर खालच्या त्रिकोणाचा रंग निळा असतो.

वर्गवारी ४ - कमी विषारी :
वरच्या त्रिकोणात CAUTION लिहिलेले तर खालच्या त्रिकोणाचा रंग हिरवा असतो.
रसायनाची LD 50 (लिथल डोस 50) मात्रा:
ढोबळमानाने, जे रसायन एका विशिष्ट् मात्रेत १ किलो वजन असणाऱ्या परीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्याच्या शरीरात तोंडावाटे दिल्यानंतर त्यातील अर्धे प्राणी मृत होतात, ती मात्रा म्हणजे त्या रसायनाची LD 50 पातळी. हे सर्वसाधारणपने मिलिग्रॅम/ किलो प्राण्याचे वजन असे दाखविले जाते. अशा परीक्षणासाठी प्रयोगशाळेतील प्राणी उंदीर, गिनिपिगस, ससे इ. वापरले जातात. जर १ किलो वजन असणारे प्राणी घेऊन त्यांच्या समूहास 'क्ष ' हे रसायन ५० मिग्रॅ इतके तोंडावाटे दिले (५० मिलिग्रॅम/ किलो) आणि त्या समूहातील अर्धे प्राणी मृत झाले तर त्या रसायनाची oral (तोंड) LD 50 पातळी हि मिलिग्रॅम/ किलो इतकी ठरवली जाते.
एका विशिष्ट मात्रेत पद्धतीने क्ष हे रसायन त्वचेमार्फत प्राण्यांच्या शरीरात गेल्याने त्या समूहातील निम्मे प्राणी मृत होतील, ती मात्रा म्हणजे त्या रसायनाची Dermal (त्वचा) LD 50 पातळी होय.
LD 50 पातळीवरून रसायनाची अतिविषारी (लाल त्रिकोण), विषारी (पिवळा त्रिकोण), हानिकारक (निळा त्रिकोण) आणि दक्षता घ्यावी (हिरवा त्रिकोण) असे चार वर्ग केले जातात. हि पातळी त्वचा आणि तोंड या मार्गांसाठी वेगवेगळी आहे हे लक्षात घ्या.
 
ती वर्गवारी आणि LD 50 पातळीचे निकष पुढील प्रमाणे:

cttvcdbghf_1  H
cttvcdbghff_1