शेळीपालन - कमी खर्चातील व्यवसाय

डिजिटल बळीराजा-2    02-Jun-2020
|


GOAT_1  H x W:
 
शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास कमी खर्चात व कालावधीत योग्य नफा कसा मिळेल या संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे.
 
सध्याची परिस्थिती बघितली तर बेरोजगारी हा अत्यंत गंभीर प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहतो. उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळाली नाही म्हणून तरुण बेरोजगार होऊन बसले आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा या बरोजगार तरुणांना प्रेरणा देऊन यांचे मत पैसा मिळविता येणार्‍या स्रोताकडे वळविणे महत्त्वाचे आहे. आपल्या सभोवताल पैसा मिळविण्याच्या येणारे भरपूर स्रोत उपलब्ध आहेत. अशा स्रोतापैकी आपल्याला पटेल आणि स्वत:च्या क्षमतेनुसार त्यांची निवड करावी. अशाच स्रोतापैकी कमी पैसा लावून उभा करता येणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन हा एक आहे. पूर्वी या व्यवसायाला नकारात्मकदृष्टीने बघितले जायचे परंतु आता तसे नाही. आता तर हा व्यवसाय कित्येक लोकांच्या जगण्याची दिशा होऊन बसलेला आहे. आताची परिस्थिती लक्षात घेतली तर ग्रामीण भागातील लोकांच्या विकासात शेळीपालनाची भूमिका महत्त्वाची दिसते. मुख्यत्वेकरून भूमिहिन, अल्पभूधारक आणि लहान शेतकरी. म्हणूनच शेळीपालनाला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असे म्हटल्या जातो. शेळीला गरिबाची गाय म्हणतात. कमी खर्चात योग्य व्यवस्थापनात हा व्यवसाय योग्य नफा मिळवून देतो. खर्च केलेल्या पैसांची परतफेड कमी कालावधीत अधिक मिळते. ज्यांना खरोखरच व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींनी हा व्यवसाय योग्य पद्धतीने करावा. बेरोजगारीचा न्यूनगंड न बाळगता काम करीत राहणे योग्यच. असे म्हटले जाते इच्छा तेथे मार्ग. 
 
शेळीपालनाचे फायदे : 
1. शेळी ही गरिबाची गाय म्हणून ओळखली जाते. कारण गाई-म्हशींच्या तुलनेत शेळीस कमी जागा, कमी खाद्य व कमी पाणी लागते. 
2. अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो. 
3. संगोपन करण्यास सोपे असते. लहान मुले, स्त्री, म्हातारी व्यक्तीसुद्धा संगोपन करू शकते. 
4. शेळ्या काटक असून कोणत्याही हवामानाशी जुळवून घेतात. त्यामुळे रोगराईचे प्रमाण फारच कमी असते. 
5. शेळ्या निकृष्ट प्रतीच्या चार्‍याचे मासांत किंवा दुधात रूपांतर करतात. शेळ्यांना झाडाझुडपांचा पाला ओरबडून खाणे आवडते. शेळ्या बाकूळ, गुंज, सुबाभूळ, पिंपळ, बेल, बोर, कडुलिंब इत्यादी झाडाझुडपांचा पाला खातात. तसेच बरशीम चवळी, लुसर्ण, वाटाणा, हरभरा अशी नत्रयुक्त वेरण, तसेच गवत, मका, ज्वारी, कडबा, मोट यांची लागवड केल्यास बराचसा खाद्य प्रश्न सुटतो. गाईच्या तुलनेत शेळीला एक पंचमाश चारा लागतो. 
6. टाकाऊ अन्न, भाजीपाल्यातील टाकाऊ भाग, मुळा, गाजर, कोबी यांचा पाला इत्यादी शेळ्यांच्या खाद्यासाठी वापरता येतो. 
7. शेळीचे दूध पचनास हलके व पौष्टिक असते. म्हशी व गाईच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधात स्निग्ध पदार्थ जास्त असतात. शेळीच्या दुधाचा आयुर्वेदिक म्हणून उपयोग करतात. 
8. शेळीच्या दोन वेतांतील अंतर कमी असून शेळ्या दोन वर्षात तीनदा वितात व एकावेळी 2 ते 3 करडे देतात. तसेच 5 ते 8 महिन्यांत नर पिल्ले विक्रीसाठी तयार होतात. तर मादी पिल्ले एक वर्षाच्या आत माजावर येतात. 
9. आपल्या देशात गोमांस खाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे. मागणी भरपूर असल्यामुळे शेळ्या कितीही पाळल्या तरी बाजारपेठ भरपूर आहे. 
10. पैशाची आवश्यकता पडल्यास त्वरित काही शेळ्या विकृण पैसा उभा केला जाऊ शकतो. 
11. पसमीना, अंगोरा, गड्डी जातीच्या शेळ्यांपासून लोकर मिळते. त्यापासून घोंगड्या शाली इत्यादी वस्तू तयार करता येतात. 
12. शेळ्यांच्या शिंगापासून व खुरांपासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात. 
13. शेळ्यांच्या कातडीला सतत बाजारपेठ उपलब्ध असते. शेळ्यांच्या बॅग, चप्पल व इतर वस्तूंचा विक्री व्यवसाय केला जातो. 
14. शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो, आम्ल उदा. लायसिन, मिथिओनीन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मासांत अधिक असते. 
15. इतर प्राण्यांच्या तुलनेत शेळ्यांचे प्रजनन उत्तम असते. कारण शेळीमध्ये माजावर न येणे, माजातील अनियमितपणा किंवा गाभण न राहणे या गोष्टी फारच कमी प्रमाणात आढळतात. 
16. शेळीचा गाभण काळ 150 दिवस असतो. व्याल्यानंतर पुन्हा 21 दिवसांत शेळी परत माजावर येते. 
17. शेळीपासून शेतीसाठी मौल्यवान लेंडीखतही मिळते. 
18. या व्यवसायात गुंतवणूक केलेले भांडवल हमखास नफ्यासहीत आपल्याला परत मिळते. 
 
शेळीपालनाला सुरुवात करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाची मुद्दे : 
1. शेळ्यांची निवड
2. कमीत कमी दोन शेळ्यांची योजना तयार करणे. 
3. खरेदी करण्यापूर्वी किती नर आणि मादी खरेदी करायचे हे ठरविणे. 
4. वयानुसार शेळ्यांची निवड करणे. 
5. शेळ्यांच्या जातींची निवड करणे. 
6. किती पैसा खर्च करायचा याची योजना तयार करणे. 
 
शेळीपालनाबाबत उपयुक्त सूचना : 
1. पर्यावरणाला अनुसरून जातींची निवड करावी. 
2. ओळखीच्या संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून शेळ्या खरेदी कराव्यात. 
3. शेळ्यांच्या कळपात दरवर्षी 15 ते 20 टक्के नवीन मादींची वाढ करावी. तसेच म्हातार्‍या आणि भाकड शेळ्या काढून टाकाव्यात. 
4. एका कळपात 150 पेक्षा जास्त शेळ्या नसाव्यात. 
5. उन्हाळ्यामध्ये शेळ्यांचा कळप सकाळी आणि उन्हं कमी असेल त्यावेळेस चारण्याकरिता सोडावे. 
6. पाण्याच्या स्रोताजवळ शेळ्यांना चरण्याकरिता सोडावे. 
7. शेळ्यांना वाळलेला व ओला चारा द्यावा. 
8. शेळ्यांच्या वयोमानानुसार आहार द्यावा. 
9. फक्त पावसाळ्यात चांगल्या निवार्‍याची गरज आहे. प्रत्येकी 8 चौरस फूट जागा लागते. पिण्याच्या पाण्याचा हौद / टब, लांब गव्हाण व चार्‍यांकरिता सोय करावी. 
10. शेळ्यांना मोकळ्या जागेत ठेवावे. 
11. महिन्यातून 1 वेळा शेळ्यांना धुवावे. 
12. स्वच्छतेसाठी चुन्याचा उपयोग करावा. 
13. खाद्यामध्ये मिठाचा उपयोग करावा. 
14. शेळ्यांचे वाढलेले शिंगे काढावेत. 
15. चारा पिके किंवा गवत यांची लागवड करावी. 
16. खनिज मिश्रणांचा खाद्यात उपयोग करावा. 
17. कळपात 20 ते 25 शेळ्यामागे एक नर ठेवावा. 
18. आपट्याचा पाला शेळ्याकरिता उत्तम पोषक आहे. म्हणून आपट्याचा पाला खाऊ घालावा. 
19. बरसीम गवत शेळ्यांना खाद्य म्हणून द्यावा. 
20. लागवड केलेल्या चारा पिकातील तण व्यवस्थापन करावे. 
21. शेळीपालनासाठी गोठ्यांचे चांगले व्यवस्थापन करावे. 
22. जर शेळीपालकाकडे खाद्य उपलब्ध नसेल तर खाद्याची वेगळी सोय उपलब्ध करून ठेवावी. 
23. वितण्याच्या काळामध्ये लाकडाचा भुसा, वाळलेले गवत गादी म्हणून उपयोग करावा. 
24. गाबण शेळ्या 3 ते 4 दिवसांत विततील अशा शेळ्या चरण्यासाठी दूरवर सोडू नये. 
25. वेगवेगळ्या वयांच्या शेळ्यांचा गटानुसार वेगवेगळे कळप तयार करून त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करावे. 
26. जन्म झालेल्या करड्यांचा कापडाने स्वच्छ करावे. 
27. करड्यांना 3 महिने आईचे दूध पाजावे. 2 महिने वयाच्या करड्यांना एन्टोरोटॉक्सेमिया रोगाची लस टोचावी. 
28. बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी औषध टाकलेल्या द्रावणात बुडवावे. 
29. टीआरपी, बुळकांडी, एन्टोरोटेक्सेमिया, तोंडखुरी, पासखुरी, सीसीपीपी या रोगांच्या लसी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ठराविक वेळी टोचाव्यात. गर्भकाळात टोचू नये. 
30. दिवसभरात किमान एकवेळा तरी शेळ्यांचे निरीक्षण करावे. 
31. शेळ्याबाबत नोंदी ठेवाव्यात. व्याल्याची तारीख, फळण्याची तारीख, मृत्युच्या नोंदी इत्यादी असणे आवश्यक आहे. 
 
शेळ्यांच्या जाती : भारतात शेळीच्या प्रमुख 25 जाती आढळतात. 
 
अ. देशी जाती : 
1. हिमालयातील थंड हवामानाच्या प्रदेशात असणार्‍या शेळ्या म्हणजे काश्मिरी, पश्मिना, गड्डी. 
2. उत्तम पश्चिम भारतामध्ये असणार्‍या शेळ्यांच्या जाती म्हणजे जमनापरी, बारबेरी, बीटल. 
3. मध्य भारतामध्ये असणार्‍या शेळ्यांच्या जाती मारवारी, महिसाना, झलवाडी, काठेवाडी. 
4. दक्षिण भारतामध्ये असणार्‍या शेळ्यांच्या जाती सुरमी, उस्मानाबादी, संगमनेरी, मलबारी. 
5. दापोली येथील कृषिविद्यापीठाने कोकणासाठी कोकण कन्याळ ही जात विकसित केली आहे. 
 
ब. विदेशी जाती : 
अल्पाईन, अ‍ॅग्लोन्युबियन, सानेन, टोगेनबर्ग, अंगोरा, बोअर. 
 
शेळ्यांच्या विशिष्ट पचनसंस्थेमुळे त्यांना चारा मुख्यत: तीन प्रकारात लागते. 
1. हिरवा चारा, 2. वाळलेला चारा, 3. पशुखाद्य व पुरक खाद्य (क्षार जीवनसत्त्वे) शेेळ्यांना पूर्णपणे हिरवा चारा देऊन चालत नाही. रोज प्रत्येकी किमान एक किलो वाळलेली वैरण देणे आवश्यक असते. तसेच हिरव्या चार्‍याचे प्रमाण प्रत्येकी 4 ते 7 किलो असावे. याशिवाय पशुखाद्याचे प्रमाण वयोगटानुसार आहार द्यावा. 
 
शेळ्यांच्या वयोमानानुसार आहार : 
वर्ग काळ प्रमाण (ग्रॅम./ डोक/दिवस) 
1. नुकतेच जन्मलेले 3 महिन्यापर्यंत आईचे दूध 
2. एक वर्षाचं 4-12 महिने 200 
3. फळाव मादी 20 दिवस (अगोदर) 250 
4. गाभण शेळी शेवटचे 30 दिवस 300 
5. दुधाळ शेळी पहिले 60 दिवस 300 
6. पैदासी बोकड फळविण्याच्या काळात 350 
 
शेळीपालनांकरिता कुंपण : 
1. शेळीपालनाकरिता मातीचे / सिमेंट किंवा तारेचे कुंपण तयार करीत असताना भिंतीला किंवा तारात मोठी जागा सोडू नये. कारण कुंपणातील शेळ्या त्यात डोके घालून फाशी लागण्याची शक्यता असते. 
2. कुंपणातील विषारी झाडे, झुडपे तसेच तीव्र वासाचे वनस्पती काढून टाकावे. 
3. कुंपणातील शेळ्यांना थंडी आणि पाऊस यापासून संरक्षणासाठी कुंपणाच्या एका बाजूला गोठा किंवा छत उभारावे. 
 
शेळ्यांना होणारी विषबाधा : 
उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र चारा टंचाईच्या दिवसांत शेतीपिकातील टाकाऊ पदार्थ उदा. तुरीचे, मुगाचे कुटार, भुईमुगांचा पाला, भाजीपाल्यातील टाकाऊ पदार्थ, कडबाकूट्टी, ऊसाचे पाचट, विविध झाडाझुडपांचा पाला व काटेरी इ. झुडपांच्या फांद्या, बाभळीच्या शेंगा शेळ्या आवडीने खातात. औषधे फवारलेल्या पिकात किंवा धुर्‍यावर शेळ्या चारल्यास विषबाधा होते. विषारी वनस्पतीच्या सेवनामुळे देखील विषबाधा होते. हिवराच्या शेंगा खाल्ल्यामुळे, बेशरम इ. झाडाची पाने, फुले खाण्यामुळे, उकिरड्यावर टाकलेले शिळे अन्न खाल्यामुळे विषबाधा होते. त्यावर त्वरित उपचार न केल्यास शेळी दगावते. खाण्यामध्ये शेतातील वाळवत घातलेल्या किंवा घरासमोरील अंगणात अधाशीपणे भरपूर धान्य खाण्यामुळे शेळ्यांचे पोट फुगते व वेळेवर उपचार न झाल्यास शेळी दगावते. उकीड्यावर शेळ्या पॉलिथिनच्या पिशवीसह खाद्य खातात. तेव्हा पोटात पॉलिथिनची पिशवी उडकते, अपचन होते व शेवटी वेळेवर उपचार न झाल्यास मरते. क्वचित प्रसंगी घशामध्ये काही वस्तू खातांना अडकतात. शेळी ऊसकते, भरपूर लाळ गळते. 
 
उपाय :
1. मोकाट पद्धतीने शेळ्या चारणे बंद करावे. 
2. शेळ्यांना गोठ्यातच ठेवावे. 
3. योग्य प्रमाणात चारा, वैरण व पशुखाद्य, पाण्याची सोय गोठ्यात केल्यास विषबाधा टळेल. 
शेळ्यामध्ये विविध प्रकारच्या आजारामुळे मरतूक होऊन आर्थिक हानी टाळण्यासाठी खालील मुद्द्दयांवर लक्ष केंद्रित करावे. 
1. पैदाशीसाठी शेळ्या खरेदी करताना आठवडी बाजारातून निरोगी शेळ्या खरेदी कराव्यात. 
2. पशुवैद्यामार्फत कळपातील शेळ्यांची चाचणी करून ब्रुसेल्लोसिस, जोन्स या शेळ्यापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. 
3. शेळ्यांच्या गोठ्याची स्वच्छता ठेवावी. दरमहा जंतुनाशक औषधे फवारावी. 
4. खाद्य पाण्याची व्यवस्था नीट करावी. खाद्य, पाण्याची उपकरणे, गव्हाणी आठवड्याला स्वच्छ करून घ्यावीत. त्यांना चुना लावून घ्यावा. 
5. शेळ्यांच्या प्रमुख आजारावरील रोगप्रतिबंधक लस पशुवैद्यकाकडून टोचून घ्यावी. 
6. पावसाळ्यात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतप्रतिबंधक औषधी कळपातील सर्व शेळ्यांना पाजून घ्यावी. 
7. शेळ्या आजारी पडल्यास खाजगी उपचार न करता पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार वेळच्यावेळी करून घ्यावा. 
 
शेळींचे प्रजोत्पादन चक्र : 
1. शेळी 8 वर्ष वयापर्यंत कळपात ठेवावी. नंतर तीची उत्पादन क्षमता कमी होते. म्हणून ती विकून टाकावी किंवा मासांकरिता वापरावी. नर तीन वर्षांपर्यंत कळपात ठेवावा व नंतर काढून टाकावा. 
2. शेळीचा निर्विजीकरण केलेला नर कळपात शेळ्यांचा माज ओळखण्यासाठी वापरावा. 
3. शेळी व्याल्यानंतर लगेच 60 ते 70 दिवसांत शेळी पुन्हा फळविता येते. दोन वर्षांत तीन वेळा विते. 
4. उन्हाळ्यातील उष्णतेचा नर आणि मादी यांच्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होतो. विशेषत: गर्भधारणेनंतरच्या 25 दिवसात माद्यांना उपाय जास्त होतो. त्याकरिता त्या काळात गाभण माद्यांकडे विशेष लक्ष देवून त्यांना फक्त सकाळच्या किंवा सायंकाळच्या थंड वेळी चारावे आणि त्यांचे उष्णतेपासून संरक्षण करावे. 
5. बोकडाचे वीर्य आता - 196 अंश ते शून्याखालच्या तापमानावर वर्षानुवर्ष गोठवून ठेवण्याची सोय उपलब्ध इ. खाली आहे. या पद्धतीमुळे ज्या जातीचे आणि जितके वीर्य हवे असेल ते या देशातून किंवा परदेशातून उपलब्ध होऊ शकते. कृत्रिमरेतना करिता अशा गोठविलेल्या वीर्याचा उपयोग होतो व त्यायोगे धडधाकट प्रजा उत्पन्न करता येते. 
 
- प्रथम माजावर येण्याचे वय 8 ते 10 महिने 
- माज चक्रातील अंतर 19 ते 21 दिवस 
- माज टिकून राहण्याचा काळ 24 ते 36 तास 
- फळविण्याची योग्य वेळ, माजावर आल्यानंतर दुसरा दिवस 
- सरासरी गाभण काळ 150 दिवस 
- विल्यानंतर पुन्हा माजावर येण्यास लागणारा काळ 21 ते 30 दिवस 
- विल्यानंतर पुन्हा फळविण्याचा योग्य काळ 60 दिवसानंतर 
- दोन वेतातील अंतर 240 दिवस (8 महिने) 
 
आत्महत्येचा विचार काढून, मनाशी बांधा गाठ, 
पैसा मिळेल हमखास, धरा शेळीपालनाची वाट॥ 
 
 
सेवक ढेंगे, शिवशंकर वानोळे, स्वप्नी होळकर,
अतुल मुराई व सूरज घोलपे
आचार्य पदवी विद्यार्थी
कृषि विस्तार शिक्षण विभाग
डॉ. बा. सा. को. कृ. वि., दापोली - 415712,
जि- रत्नागिरी, महाराष्ट्र
9764914214, 9421806927