मधुमक्षिकापालन उद्योग एक शेतीस पूरक व्यवसाय

डिजिटल बळीराजा-2    01-Jun-2020
|
 
been_1  H x W:
 
शेतीच्याउत्पादनाची वाढ ही मधमाशांवर अवलंबून असून ही गोष्ट जगात आता सर्वत्र मान्य झालेली आहे. मधमाशा अप्रत्यक्षपणे आपल्या पिकांच्या फुलोर्यातील परागसिंचनाने (पॉलीनेशन) फार महत्वाची मदत करतात.
 
मधमाशांनी कोणत्या पिकांना लाभ होतो, मधमाशापालनाची सुरुवात व त्याची गरज, मधमाशांचे खाद्य व उद्योगासाठी आवश्यक साधन सामुग्री या विषयाची महत्वाची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
 
आपल्या देशातील विविध प्रकारच्या वनस्पतींनी नटलेली जंगले आणि किटकांमधील विविधता, तसेच वनस्पती व किटकामधील परपरागीभवनासाठी व खाद्यासाठी असलेले अतूट नाते आपणास माहिती आहेच.
 
परंतु मानव स्वार्थासाठी जंगले नष्ट करीत असल्याने त्याचा विपरीत परिणाम वनस्पती व किटकांमधील संतुलनावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे, जेव्हा ही बेसुमार जंगलतोड नव्हती तेव्हा भारतात मधमाशांची संख्या विपुल प्रमाणात होती. दुधा-मधाच्या नद्या असलेला देश होता, असे आपल्या देशातील समृद्धीने वर्णन केले जात असे. मधाचा आहारातील उपयोग, ओषधातील उपयोग तसेच मधास पूजेत दिलेले स्थान हे सर्वश्रृत आहे. पूर्वी मधमाशांना मारुन अशास्त्रीय पद्धतीने मध गोळा केला जात असे. त्यामुळे निसर्गातील मधमाशांची संख्या कमी होऊ लागली. स्वार्थासाठी पुढे मधमाशांना झाडाच्या ओडक्यांतून किंवा मडक्यातून पाळावयास सुरुवात झाली. 1930 ते 1940 च्या दरम्यान दक्षिण भारतामध्ये निलगिरी प्रदेशात कर्नाटकातील कुर्ग, महाराष्ट्रात महाबळेश्वर, उत्तरेकडे ज्योतीकोट येथे मधमाशांना लाकडी पेटीतून पाळावयास सुरुवात झाली.
 
मधमाशा व शेती एक अतुट संबंध :-
शेतीच्या उत्पादनाची वाढ ही मधमांशावर फार अवलंबून आहे. ही गोष्ट जगात आता सर्वत्र मान्य झालेली आहे. मधमाशा राष्ट्राच्या अन्नाच्या गरजा भागविण्याला, प्रत्यक्षपणे मधाच्या रुपाने आणि अप्रत्यक्षपणे आपल्या पिकांच्या फुलोर्यातील परागसिंचनाने (पॉलीनेशन) फार महत्त्वाची मदत करतात. चांगली फळे लागावी किंवा दाणा उत्तम धरावा याकरीता जे परागसिंचन व्हावे लागते ते किटकांवर अवलंबून असते. मधमाशाकडून परागसिंचनाची जी कामगीरी होते ती उत्पन्न करीत असलेल्या मधाच्या दहापट किंमतीची असते.
 
परागसिंचन म्हणजे काय?
एका फुलाच्या पूंकेसरामधील परागकण दुसर्या फुलांच्या स्त्रीकेसरावर जाऊन पडणे म्हणजे परागसिंचन. बर्याच वनस्पती अशा परागसिचनाकरीता किटकांवर अवलंबून असतात. एका फुलाच्या स्त्रीकेशराशी त्याच फुलाच्या किंवा त्याच रोपट्याच्या इतर फुलांच्या पुकेसराचे परागसिंचन झाले तर स्वपरागसिंचन होते. उलट, त्याच जातीच्या वेगळ्या रोपट्याच्या फुलांचे पराग जर त्या फुलात आले तर ते परागसिंचन होते. या क्रीयेत बीजधारणा चांगली होते व पीक जास्त मिळते. जवळ जवळ 80 टक्के फळपिके आणि भाजीपिके तशीच पुष्कळशी धान्यपीके फळधारणे करीता परपरागसिंचनांवर अवलंबून असतात. ही क्रीया करणार्या किटकांत मधमाशा या सर्वात जास्त प्रभावी परागसिंचन करणार्या आहेत.
 
मधमाशांनी कोणत्या पिकांना लाभ होतो :-
मधमाशामुळे ज्या पिंना लाभ होतो ती पिके खालीलप्रमाणे आहेत.
1) फळपिके :- सफरचंद, लींबू, संत्री, मोसंबी, पेरु, लीची, कलींगड इ.
2) फळभाज्या :- वांगी, भेंडी, मिरची, काकडी, भोपळा, टोमॅटो, दुधी भोपळा, पडवळ, कारले इ.
3) भाज्यांची बियाणी :- कोबी, कॉलीफ्लावर, मुळा, बीट, कांदा, लसून, राजगिरा व पालक इ.
4) डाळी :- तूर, मूग, उडीद, मटकी इ.
5) तेलबीया :- मोहरी, तिळ, कारळे, अंबाडी, सुर्यफुल इ.
6) इतर पिके :- कापूस, कॉफी इ.
 
आज मितीस जगात सुमारे 5 कोटी मधमाशांच्या वसाहती पाळल्या जात आहेत. अमेरिकेतील 50 लाख वसाहतीपैकी 50 लाख वसाहती केवळ परागीभवनाची सेवा देण्यासाठी वापरतात. या सेवेसाठी मधमाशा पालकांना बागाईतदारांकडून एका वसाहतीसाठी एका महिन्याला 100 ते 150 डॉलर्स भाडे मिळते. या उद्योगात चीन आघाडीवर असून चीनमध्ये सुमारे 1 कोटी वसाहती आहेत. ईस्त्रायलसारखा सरासरी 7 इंच पाऊस पडणार्या वाळवंटी देशात 85 हजार मधमाशांच्या वसाहती असून त्या सर्व केवळ परागसिंचनासाठी वापरल्या जातात.
 
भारतीतय कृषि अनुसंधान परिषद येथील कृषी शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार परागसिंचनासाठी मधमाशांवर अवलंबून असणार्या अशा 12 महत्वाच्या पिकांमध्ये परागसिंचन करण्यासाठी 60 लाख मधमाशांच्या वसाहतीची गरज आहे. प्रत्यक्षात भारतात 12 लाख वसाहती आहेत. महाराष्ट्राची गरज 5 लाख वसाहतीची आहे आणि प्रत्यक्षात महाराष्ट 32 हजार वसाहती आहेत.
 
मधमाशापालन कशासाठी :-
1) मधमाशा मध तयार करतात. मध हे अत्यंत पुष्टीदायक व सत्वयुक्त अन्न आहे.
2) मधमाशापासून मेण मिळते. मेणाचा उपयोग मेणबत्या तयार करणे, सोदर्यप्रसाधने, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये होतो.
3) मधमाशापासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली) व दंशविश (बी व्हेनम) यांना उच्च प्रतीचे औषधी मोल असल्याचे मानले जाते.
4) सर्वात विशेष म्हणजे मधमाशा एका फुलातील पराग दुसर्या फुलांवर नेतात (पोलीनेशन) आणि त्यामुळे शेतीपिके व फळपिके सुधारण्याला आणि वाढण्याला मदत होते.

been_1  H x W:  
 
मधमाशापालनास सुरुवात :-
मधमाशापालन सुरु करण्यासाठी महत्वाची गरज आहे योग्य प्रशिक्षणाची. त्यानंतर मधमाशांच्या नैसर्गिक वसाहती मिळणे यासाठी खेड्यातील लोकांच्या मदतीने किंवा गुराखी यांच्या मदतीने हस्तगत करुन आणता येतात. तसेच मधपाळाकडून वसाहती विकतही घेता येतात. मधमाशापालन सुरु करण्यापूर्वी खालील गोष्टीची आवश्यकता असते.
 
1) मधुबनाच्या एक कि.मी. त्रिज्येत भरपूर पराग व मकरंद देणारी नैसर्गिक किंवा लावलेली झाडे झुडपे, शेती जवळपास असावीत.
2) नैसर्गिक किंवा स्थानिक मधपाळाकडे वसाहती उपलब्ध असाव्यात.
3) मधुपेटी, मधनिष्कासक यंत्र, धुम्रक यासारखी साधने उपलब्ध असावीत.
4) जवळपास स्वच्छ पाण्याचा पुरवठा.
5) तांत्रिक मार्गदर्शनासाठी पुस्तके, प्रशिक्षण संस्था किंवा एखादा बरोबरीचा मधपाळ असावा.
6) धैर्य किंवा सहनशीलता व दीर्घ प्रयत्न.
 
मधमाशांचे खाद्य :-
मधमाशा खाद्यासाठी (मकरंद व पराग) फुलावर पूर्णपणे अवलंबून असतात. फुलातील मकरंद गोळा करुन मधमाशा मध तयार करतात. म्हणूनच यशस्वी मधमाशापालन आणि मधोत्पादनासाठी भरपूर प्रमाणात सपुष्प वनस्पतींची गरज आहे आणि हा फुलोरा जवळजवळ वर्षभर उपलब्ध असणे आवश्यक आहे. दीर्घकाळ फुलारा नसल्यास मधमाशा उपाशी मरण्याची शक्यता असते.
 
अनेक झाडांवर बरीच फुले येत असतात. तथापी त्याची मकरंद व पराग भरपूर प्रमाणात पुरविण्याची क्षमता मात्र बदलत असते. मकरंद व पराग भरपूर प्रमाणात पुरविणार्या फुलोर्याची जास्त प्रमाणात आवश्यकता आहे.
ज्वारी, बाजरी, मका इ. पिकांपासून मधमाशांना पराग मिळतो, परंतु मकरंद मिळत नाही. सुर्यफुल, कारळा, तीळ, कांदा, धणे, मोहरी, तोंडली, घोसाळी, भोपळे इ. फळभाज्या, मुळा, लसूनघास, राजगिरा ह्यासारख्या मोठ्या प्रमाणात फुले असणारी पिके मधमाशांना फार उपयोगी पडतात. अशा पिकांच्या फुलोर्याच्या काळामध्ये एक एकरामधून मधमाशांच्या तीन वसाहतीना खाद्यपुरवठा होऊ शकतो आणि अनुकूल परिस्थितीत प्रत्येक वसाहतीपासून 10 ते 15 किलो मध मिळविता येतो.
 
जांभूळ, हिरडा, चिंच, कडुलिंब, निलगीरी, रिठा, नारळ, गुलमोहर इ. झाडे व शिकेकाई, पागळ, चिमठ, लोखंडी यासारख्या जंगली व उपयुक्त वनस्पती मधमाशांना योग्य खाद्य पुरवितात. परंतु फणस, वड, उंबर अशी काही झाडे मधमाशांना उपयोगी नसतात. त्याचप्रमाणे बागेतील अनेक फुले आकर्षक व शोभिवंत असतात, परंतु मधमाशांना त्यांच्यापासून खाद्य मिळत नाही. गुलाब, डेलीया, झेंडू, शेवती व बोगनवेल अशापैकी आहेत. इतकेच नाही तर फलोद्यानात किटकनाशक द्रव्यांची फवारणी सतत चालू असते. यामुळे मधमाशाचाही संहार होतो. हे मधमाशापालनास धोकादायक ठरते. म्हणून अशा जागी मधमाशांच्या वसाहती ठेवू नये.
 
मधमाशापालन उद्योगासाठी आवश्यक साधनसामुग्री :-
मधमाशापालनामध्ये लाकडी पेटीतून मधमाशांना पाळणे त्यांची नित्यनैमित्तिक तपासणी करणे. त्यांचे निरनिराळ्या ठिकाणी स्थलांतर करणे, मध काढणे, विभाजन करुन नविन वसाहती तयार करणे अशा प्रकारची अनेक कामे मधपाळास करावी लागतात. या सर्व कामासाठी खालील प्रकारची साधनसामग्रीची अत्यंत आवश्यकता असते.
 
1) मधुपेटी : आधुनिक मधमाशापालनात योग्य मधुपेटीची अत्यंत आवश्यकता असते.
2) मधुनिषकासक यंत्र :- मधकोठीतील मधाने भरलेल्या चौकटीतून मध काढण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो.
3) पटाशी (हाईव टूल) :- ही एक इंग्रजी एल आकाराची पोलादी पट्टी असते. हिचा उपयोग वसाहत तपासणीचे वेळी होतो.
4) बुरखा :- मधमाशांच्या वसाहती तपासतांना तोंडावरील नाजूक भाग मधमाशीच्या दंशापासून वाचविण्यासाठी काळ्या मच्छरदाणीच्या कापडाचा बुरखा वापरला जातो.
5) धुम्रक :- ह्या यत्रांचा उपयोग धूर करण्यासाठी, चिंध्या, नारळाची शेडी, काथ्या, इंजिन पुसलेला कापूस वापरला जातो. धुराच्या फवार्यामुळे मधमाशा सभ्रमात पडतात व वसाहतीची देखभाल करणे सोपे होते.
6) सुरी किंवा चाकू :- मधपोळ्यावरील मेणाचा पापुद्रा काढण्यासाठी, मेणपत्रे चिकटविण्यासाठी सुरीचा उपयोग होतो.
7) पाकपात्र :- मधमाशांना साखरेचा पाक देण्याकरीता अॅल्युमिनीयमची पसरट वाट्याचा उपयोग होतो.
8) सुर्यतापी मेण यंत्र :- मधमाशांच्या जुन्या पोकड्यापासून मेण मिळविण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. यामध्ये नैसर्गिकरीतया उपलब्ध असलेल्या सूर्याच्या उष्णतेचा वापर केला जातो.
9) मेणपत्रे :- मधमाशांची वाढ जलद व्हावी व पोकड्या बांधण्यात त्यांचे श्रम वाया जाऊ नयेत म्हणून मधमाशांच्या मेणापासून बनविलेले मेणपत्रे चौकटीत बसवतात. असे मेणपत्रे बसविल्याने वसाहतीची वाढ जलद होते व मधाचे उत्पादनही वाढू शकते.
10) राणीपिंजरा :- मधमाशांची नैसर्गिक वसाहती पकडतेवेळी राणीमाशीला राणी पिंजरामध्ये ठेवण्याकरीता राणीपिंजरांचा उपयोग होतो.
“ शेती - फलोत्पादनवाढीमध्ये मधमाशांचे महत्व”
आजमितीस जगात सुमारे 5 कोटी मधमाशांच्या वसाहती पाळल्या जात आहेत. अमेरीकेमध्ये 50 लाख वसाहती पैकी 50 लाख वसाहती केवळ परागीभवनाची सेवा देण्याकरीता वापरतात. या सेवेसाठी मधमाशापालकांना बागायतदारांकडून एका वसाहतीसाठी एका महिन्याला 100 ते 150 डॉलर (रु.6,000 ते 9,000) भाडे मिळते. या उद्योगात चीन आघाडीवर असून चीमध्ये सुमारे एक कोटी वसाहती आहेत. ईस्त्रायलसारख्या सरासरी 7 इंच पाऊस पडणार्या वाळवंटी देशात 85 हजार मधमाशांच्या वसाहती असून त्या सर्व केवळ परागभवनासाठी वापरल्या जातात.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद येथील कृषि शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार परागभवनासाठी मधमाशांवर अवलंबून असणार्या अशा 12 महत्त्वाच्या पिकांमध्ये परागीभवन करण्यासाठी 60 लाख मधमाशांच्या वसाहतीची गरज आहे. महाराष्ट्राची गरज 5 लाख वसाहतीची आहे आणि प्रत्यक्षात 32 हजार वसाहती आहेत.
 
मधमाशापासून मध मिळतो हे सामान्य जनतेस माहित आहेच. परंतु हजारो वनस्पीतीच्या फुलातील पुकेसर व स्त्रीकेसर यांचे मिलन घडून आणून उत्तम प्रतीची भरपूर बीज/फलनिर्मिती करणे हे महत्वाचे कार्य मधमाशा केली लाखो वर्षे करीत आहेत. वनस्पतीच्या उत्क्रांती प्रक्रीयेत पृथ्वीवर फुलणार्या वनस्पती सुमारे 5 ते 7 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाल्या त्याचबरोबर किटकांच्या उत्क्रांती प्रक्रीयेत गांधीलमाशा किटकापासून मधमाशा उत्क्रांत झाल्या याचे मुख्य कारण म्हणजे फुलणार्या वनस्पती आणि मधमाशांना आपले जीवनचक्रासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. फुलणार्या वनस्पती मधमाशांना त्यांचे खाद्यम्हणजे मकरंद आणि पराग देतात. मधमाशा फुलातील मकरंद पराग गोळा करता-करता सहजपणे एका फुलातील पुकेसर बीज (पराग) त्याच जातीच्या दुसर्या फुलातील स्त्रीबीजावर पोहचवितात. या क्रीयेस परपरागसिंचन म्हणतात. परपराग सिंचनामुळे उत्तम प्रतीच्या भरपूर बीजांची फळाची निर्मिती होते.
 
राज्यातील कृषि हवामानातील विविधतेमुळे राज्यात अनेक प्रकारची फळपिके घेता येणे शक्य आहे. राज्यात सध्या, आंबा, केळी, लींबू वर्गीय फळपिके, काजू, द्राक्ष, डांळींब व चिक्कू या फळविकाखाली मोठे क्षेत्र आहे. तसेच भाजीपाला गळीताची धान्ये इत्यादी खाली देखील मोठे क्षेत्र आहे. फलोद्यान पिकांचे उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिकापालन हा पूरक जोडव्यवसाय होऊ शकतो. मधमाशा फुलातील मधगोळा करता करता अप्रत्यक्षपणे परागीरकणाचे मोठे कार्य करतात. यामुळे जवळ जवळ 30 टक्के पर्यंत उत्पादनात वाढ होते. तसेच मधमाशांपासनू मध, मेण, पराग, राजान्न, मधमाशाविष, यासारखे उत्पादने देखील मिळतात. त्यामुळे मधुमक्षिकापालनाद्वारे दुहेरी फायदा मिळतो.
 
राज्यात महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, केद्रीय मधुमक्षिका संधोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड ही संस्था कार्यरत आहेत. तसेच त्यांचेकडून तांत्रीक मार्गदर्शन व प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रमांतर्गत सन 2010-11 पासून
 
1) शासकीय संधोन संस्थेकरीता मधमाशांच्या वसाहती न्यूक्लियस स्टॉक निर्माण करण्यासाठी रु.10.00 लाखापर्यंत 10 टक्के अनुदान देण्यात येते.
2) बी ब्रीडर्स यांचे मार्फत मधमाशांच्या वसाहती निर्माण करण्यासाठी (2000 वसाहती प्रतीवर्षी) रु.6 लाख इतक्या मर्यादेपर्यंत 50 टक्के अनुदान देण्यात येते.
3) 50 टक्के अनुदानीत दराने जास्तीत जास्त 20 पर्यंत वसाहती खरेदीसाठी मदत मिळते.
4) मधुपेट्या खरेदीसाठी, 20 मधुपेट्याचे मर्यादेपर्यंत 50टक्के अनुदान.
5) मधुयंत्र, मध साठविणेसाठी भांडी इ. करीता रु.14,000/- इतक्या किंमतीच्या 50 टक्के अनुदान.
 
या योजनेमध्ये लाभ घेणार्या शेतकर्यांचे प्रशिक्षण, केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी ग्रोमोद्योग आयोग, पुणे व मधुसंचालनालय खादी ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जि.सातारा येथे आयोजित केले जाते व त्याकरीता येणारा खर्च अनुष्यबळ विकास योजने अंतर्गत प्रत्तत असणार्या तरतूदीमधून करण्यात येतो.
 
अधिक माहितीकरीता प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी व कृषि अधिक्षक / कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
 
मधुमक्षिकापालन प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता खालील पत्यावर संपर्क साधावा.
उपसंचालक, प्रभारी.
केंद्रीय मधुमक्षिका संधोन व प्रशिक्षण संस्था,
खादी ग्रामोद्योग आयोग,
1153, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर
पुणे 411 016 (म.रा.)
दूरध्वनी क्र. 020 - 25655351 / 25675865
मधुमक्षिकापालन प्रशिक्षणाच्या सोयी :- 
उपसंचालक/प्रभारी, केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था,
खादी ग्रामोद्योग आयोग, 1153, गणेशखिंड रोड,
शिवाजीनगर, पुणे - 411 016 (म.रा.)
दूरध्वनी क्र.020-25655351, 020-25675865
सुनिल म. पोकरे
सहाय्यक विकास अधिकारी,
के.म.अ.प्र.स. खा.ग्राआ.
पुणे - 411 016.
मो.क्र.7385289709