क्षारपड जमिनीतील गोड्या पाण्यातील व्हाईट लेग -(लिटोपिनीयस वन्नामी) कोळंबी संवर्धन

डिजिटल बळीराजा-2    01-Jun-2020
|

chemmeen_1  H x
 
क्षारपड जागेचा पारंपारिक शेती न करता मत्स्यपालन उत्पन्नाच्या विविधतेसाठी उपयोग करणारी संधी उपलब्ध असून कोळंबीचे संवर्धन, व्यवस्थापन व उत्पादन कसे करावे या विषयाची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे.
 
शेतीसाठी क्षारपड जमिनींच्या उपयोगाची उपयुक्ततेच्या बाबत भरपूर प्रयत्न केले आहेत. परंतु पारंपरिक पिकांची क्षारयुक्त पाण्यात योग्य वाढ होत नाही. तर दुसर्या बाजूला समुद्रीय प्रजातींचा क्षारपड पाण्यात संवंर्धन करण्याचे विविध प्रयोग केले जात आहेत. यानुसार क्षारपड जागेचा पारंपरिक शेती न करता मत्स्यपालन उत्पन्नाच्या विविधतेसाठी उपयोग करण्याची संधी उपलब्ध आहे. काही देशात कोळंबी व सागरी माशांचे कमी क्षारता असलेल्या पाण्यात संवर्धन केले जाते.
 
लिटोनिनीयस वन्नामी जातीच्या कोळंबीचे उगमस्थान मुख्यता मेक्सिको आणि अमेरिका या देशांच्या समुद्रात आहे. या कोळंबीला व्हाईट लेग कोळंबी म्हणून बाजारात ओळखली जाते. या कोळंबीची 5 पीपीटीपेक्षा कमी क्षारता असलेल्या पाण्यातसुद्धा चांगली वाढ होते. त्यामुळे या कोळंबीचे क्षारपड जमिनीतील गोड्यापाण्यात संवर्धन करणे फायदेशीर ठरू शकते.
लि. वन्नामी ही कोळंबी जलद 20-25 ग्रॅम पर्यंत जलद वाढते. ही कोळंबी संवंर्धन करण्यास अतिशय सोपी असून यांची साठवणूक घनता 150 प्रती वर्ग मी. पर्यंत करू शकतो. ही कोळंबी 0.5 ते 45 पीपीटी क्षारतेच्या पाण्यातसुद्धा व्यवस्थित वाढवली जाऊ शकते. तसेच ही कोळंबी अगदी 15 डि.सें. पाण्याच्या तापमानातही व्यवस्थित जगते. कृत्रिम बीजोत्पादन सोपे असल्यामुळे व ही कोळंबी परिपक्व होण्याचा कालावधी कमी असल्यामुळे या कोळंबीमध्ये निवड पद्धतीने बिजोत्पादन करणे सोपे आहे. या कोळंबीच्या मांसाचे प्रमाण 66.68%) जास्त असल्यामुळे देशात व विदेशात मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
 
लि. वन्नामी कोळंबीचे संवर्धन व व्यवस्थापन
 
1. तलाव सुकविणे व चुन्ना मारणे
एकदा संवर्धन केल्यानंतर तलावात गाळ राहिला तर पुढील संवंर्धनात कोळंबीला रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कारण या गाळात कुजलेला मैला, जिवाणू, विषाणू तसेच अन्य रोग्यांचे डी. एन.ए. असू शकतात. त्यामुळे कुजलेला गाळ काढणे गरजेचे असते. तसेच या करिता तलाव उन्हामध्ये भेगा पडेपर्यंत सुकविणे आवश्यक असते. तसेच तलावात सामुचे योग्य प्रमाण राखण्याकरिता व कुजलेला गाळ नष्ट करण्याकरिता 100 पीपीएम या प्रमाणात चुना मारणे आवश्यक असते.
2. पाण्याचे व्यवस्थापन
पाण्यामध्ये व्हाईट स्पॉट विषाणू सात दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असा अहवाल संशोधन मासिकात आहे. त्यामुळे खाडीतील किंवा समुद्रातील पाणी थेट तलावात घेतल्यास पाण्यातून रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी पाणी घेतेवेळी 60 मायक्रॉनची जाळी बसवावी. परंतु पाणी थेट तलावात न घेता ते पाणी साठवणूक तलावात घेऊन त्याला 30 पीपीएम प्रमाण ब्लिचिंग पावडर वापरून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. हे पाणी सात दिवस जुने झाल्यावर संवर्धन तलावात घ्यावे.
3. खतांची मात्रा देणे
कोळंबीचे उत्पादन वाढवण्याकरता तलावात वनस्पती व प्राणीजन्य प्लवंग निर्मिती होणे आवश्यक आहे. या प्लवंगाची तलावात वाढ होण्यासाठी योग्य प्रमाणात सेंद्रिय व असेंद्रिय खतांची मात्रा देणे आवश्यक आहे. सेंद्रिय व असेंद्रिय खतांची मात्राही मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रिय कार्बन इ. प्रमाणावर अवलंबून असते.
4. बीज साठवणूक
मान्यताप्राप्त बीजोत्पादन केंद्रातून रोगमुक्त बीज (पीएल 15-20) खरेदी करावे. बीज तलावात साठवणूक करण्यापूर्वी बीजाचे तलावातील पाण्यातील वातावरणाशी एकरूप करून घेणे आवश्यक असते. आणलेला बीजाच्या पाण्याचे तापमान, क्षारता व सामु तलावाचं पाण्याएवढं करण्यासाठी तलावातील पाणी हळूहळू मिश्रण करून बीजाचे तलावातील वातावरणाशी एकरूप करावे.
 
5. खाद्य व्यवस्थापन
कोळंबी संवर्धनाचे यश कोळंबीच्या खाद्य व्यवस्थापनावर अवलंबून असते. कारण कोळंबी संवर्धनामध्ये एकूण खर्चापैकी 50% पेक्षा खर्च खाद्यावर होतो. या कोळंबीला 20-35% प्रथिनेचे खाद्य आवश्यक असतो. 1 ग्रॅम ते 15 ग्रॅम वजनाच्या कोळंबीला खाद्य देण्याचे प्रमाण 6.6 ते 16% असून 15 ग्रॅमपेक्षा वजनाच्या कोळंबीला खाद्याचे प्रमाण 2% पर्यंत कमी करावे. खाद्य दिवसातून 2 ते 6 वेळा द्यावे. खाद्याचे प्रमाण दिवसा कमी ठेवून संध्याकाळी व रात्रीच्या वेळी जास्त असावे. कोळंबीला दिलेला खाद्य सेवन केले किंवा नाही याची तपासणी तलावात चेक ट्रे ठेवून करावी आणि चेक ट्रेमध्ये खाद्यवा 1% खाद्य टाकावे. चेक ट्रे मधील निरीक्षणावरून खाद्याचे प्रमाण कमी-जास्त करावे. खाद्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने केल्यास खाद्य रूपांतर गुणांक प्रमाण 1.1 ते 1.4 राखणे शक्य होते.
 
6. सवर्धनादरम्यान पाण्याचे व्यवस्थापन
कोळंबी संवर्धनाच्या यशाकरीता पाण्याचा दर्जा राखणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचे दररोज परीक्षण करणे आवश्यक आहे. पाण्याचा दर्जा म्हणजे पाण्याचे तापमान, क्षारता, सामु व गढुळताचे दररोज परीक्षण करणे. संवर्धनादरम्यान पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण 4 पीपीएमपेक्षा जास्त राखावे व त्याकरिता एअरटर्सचा वापर करावा. 1 एचपी प्रती 300 किलो कोळंबी या प्रमाणात एअरटर्सचा वापर करावा.
 
7. आरोग्य व्यवस्थापन
दर आठवड्यातून कोळंबीची वाढ व आरोग्य तपासणीकरता निरीक्षण करणे आवश्यक आहे. साधारणपणे ली. वन्नमी 30 दिवसांनंतर 0.2 ग्रॅम प्रती दिवस वाढ होते. आठवड्यातून साधारणत: 1.5 ते 2.0 ग्रॅम वाढ साठवणुकीच्या प्रमाणानुसार होते.
 
8. काढणी व काढणीपश्चात काळजी
ली. वन्नामी ही कोळंबी तलावातील पाण्याच्या थरात पोहत असल्यामुळे या कोळंबीची काढणी जास्तीत जास्त फेक जाळे किंवा ओढ जाळे वापरून करावी. नंतर शिल्लक राहिलेली कोळंबी तलाव रिकामा करून पकडावी. कोळंबी काढणी जास्तीत जास्त सहा तासांमध्ये करावी. टायगर कोळंबीपेक्षा वन्नामी कोळंबी लवकर खराब होत असल्यामुळे बर्फाचा वापर करावा व तसेच काढणीपूर्वी बर्फाची तयारी करावी.
9. उत्पादन
भारतीय वातावरणाचा विचार केल्यास या कोळंबीचे उत्पादन प्रती हेक्टर 5 ते 10 टन होऊ शकते. 50 नग प्रती वर्ग मीटर या प्रमाणात साठवणूक केली तर 20 ग्रॅम पर्यंत 100-120 दिवसांत वाढ होते. जगवणुकीचे प्रमाण 70% गृहीत धरल्यास साधारणत: उत्पादन 7 टन होऊ शकतेे. उत्पादन खर्च रु. 250 -300 प्रति किलो येतो. तर विक्री दर रु. 350-400 आहे.
गोड्या पाण्यातील क्षारपड जमिनीत ली. वन्नामी कोळंबी संवर्धन तलाव मान्यता करण्याकरता नियम
 
अ)नोंदणी
1)गोड्या पाण्यातील (0.5 पीपीटी क्षारतापेक्षा जास्त पाण्यात) ली. वन्नामी कोळंबी संवर्धन करण्याकरता अर्ज करणारे शेतकरी जर कोस्टल अॅक्वाकल्चर ऑथोरिटीच्या कार्यकक्षाबाहेरील असल्यास त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु कोस्टल अॅक्वाकल्चर ऑथोरिटीच्या कक्षेतील शेतकर्यांनी कोस्टल अॅक्वाकल्चर ऑथोरिटी यांच्याकडे नोंदणी करावी.
2)नोंदणी करतेवेळी जमिनीचे क्षेत्रफळ, पाण्याखालील क्षेत्रफळ, पाण्याचे स्रोत आणि मालकीबाबत आवश्यक माहिती देणे गरजेचे आहे.
3)मान्यतेसाठी राज्य सरकार जिल्हास्तरीय समिती स्थापन करते.
4)नोंदणी मान्यतेबाबतचा योग्य कालावधी राज्य सरकार ठरवते, परंतु हा कालावधी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आतील असतो.
 
ब. तलावाची तपासणी
1.तलावाची तपासणी करण्याकरिता जिल्हास्तरीय समिती निरीक्षण समिती स्थापन करते. ही समिती तलावावरील ली. वन्नामी संवर्धनाकरीता योग्य सुविधाबाबत निरीक्षण करून याबाबत जिल्हास्तरीय समितीकडे शिफारस करते.
 
क. कोळंबी साठवणूक क्षमता आणि नोंद वही ठेवणे.
1.60 नग प्रती वर्गमीटर याच्यापेक्षा जास्त साठवणूक घनता ठेवू नये.
2.कोळंबी संवर्धकाने बीज विकत घेताना बीजोत्पादन केंद्राचे नाव पत्ता, नोंदणी क्रमांक इ. बाबींची नोंद ठेवावी. तसेच संवर्धन कालावधीत साठवणूक संख्या, पाणी दर्जा घटक आणि दररोज खाद्य प्रमाण इ. बाबींची नोंद ठेवणे आवश्यक आहे.
3.कोळंबी संवर्धकाने कोळंबीचे एकूण उत्पन्न, विक्री इ. बाबतचा अहवाल योग्य त्या प्रपत्रात राज्य मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडे वेळोवेळी सादर करावा.
4.प्रतिबंधीत औषधे व प्रतिजैविके यांचा वापर करू नये.
 
प्रतिबंधित औषधे व प्रतिजैविके यादी
 
1. Chloramphenicol 
2. Nitrofurans including : Furalatadone, Furazolidone, Furylfuramide, 
Nifuratel,Nifuroxime, Nifurprazine, Nitrofurantoinm Nitrofurazone
3. Neomycin
4. Nalidixic acid 
5. Sulphamethoxazole
6. Aristolochia spp and preparations thereof 
7. Cholroform
8. Chlorpromazine
9. Colchicine
10. Dapsone 
11. Dimetridazol
12. Metronidazole
13. Ronidazole
14. Ipronidazole
15. Other nitroimidazoles
16. Clenbuterol
17. Diethylstilbestrol (DES)
18. Sulfonamide drugs (except approved Sulfadimethoxine, 
Sulfabromomethazine and Sulfaethoxypyridazine)
19. Fluroquinolones
20. Glycopeptides
 
ड. जैवसुरक्षा
1.सर्व तलावावर जैव-सुरक्षा सुविधा ठेवणे गरजेचे असून यामध्ये पक्ष्यांना भीतीदायक असे बुजगावणे, प्रत्येक तलाव वेगवेगळे उपकरणे ठेवणे. खेकडा कुंपण इ. सुविधा उपलब्ध करणे. जर तलाव बाहेरील पाण्याच्या स्रोताला (नदी, कॅनल, तलाव इ.) जोडलेल्या नसल्यास पाणी निर्जंतुकीकरणाकरता जलाशयाची आवश्यकता नसते. 
2.जर तलाव बाहेरील पाण्याचा स्रोताला (नदी, कॅनल, तलाव इ.) जोडलेल्या असल्यास सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तलाव क्षेत्रावर बांधणे आवश्यक आहे. पर्यावरणात सोडलेले पाणी हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा समितीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच पाण्याचा दर्जा असावा.
3.संवर्धन कालावधीत जर कोणताही रोग किंवा घटना घडल्यास जिल्हा मत्स्य व्यवसाय विकासक अधिकार्याला तातडीने कळवावे. कोळंबीची काढणी फक्त जाळीद्वारेच करावी. तसेच तलावातील पाणी सोडण्यापूर्वी क्लोरिनेटेड आणि डिक्लोरिनेटेड करूनच सोडावे.
4.ली. वन्नामी कोळंबी संवर्धन मान्यता असलेल्या तलावात ली. वन्नामी सोबत दुसर्या कोणत्याही कवचधारी जातीचे संवर्धन करू नये.
5.कोस्टल अॅक्वाकल्चर ऑथोरिटी मान्यताप्राप्त बीजोत्पादन केंद्रातूनच चाचणी व प्रमाणित बीज घ्यावे.
6.तलाव जर पाण्याच्या स्रोताला जोडलेला नसल्यास, तलावात साचलेला सेंद्रिय कचरा काढावा व सुरक्षित विल्हेवाट लावावी.
 
इ. कायदे व पर्यावरणाविषयी
राज्य सरकार प्रशासनाने खालील राज्य व केंद्राच्या नियमांचे पालनाबाबत खात्रीशीर राहावे. 
1.कृषि जमिनीबदल 
2.पाणथळ जागेतील बदल
3.भूजल वापर
4.जमीन भाडेतत्व धोरण 
5.पर्यावरण नियमन
6.अन्न सुरक्षा
7.जैव विविधता
 
गोड्या पाण्यातील क्षारपड जमिनीत ली. वन्नामी कोळंबीचे शाश्वत संवर्धन करण्याकरिता सल्ला
1.शून्य पीपीटी क्षारता असलेल्या पाण्यात या कोळंबीचे संवर्धन फायदेशीर नाही. योग्य वाढ न होणे. जगवणुकीचे कमी प्रमाण आणि कोळंबीचा दर्जा नसणे इ. कारणे आहेत.
2.या कोळंबीची कमी घनतेमध्ये साठवणूक करून आवर्ती खर्च कमी करून कोळंबीचे शाश्वत उत्पन्न घेता येईल.
3.पोस्ट लार्व्हाचे बीजोत्पादक केंद्रातच आपल्याकडील क्षारतेच्या प्रमाणानुसार सावकाशपणे अनुकुलन करून घ्यावे.
4.15 दिवसाच्या पेक्षा कमी वयाचे बीज कमी क्षारता सहन करण्याची क्षमता नसल्यामुळे 15 दिवस वयापेक्षा जास्त दिवसाचे (झङ15 रपव रर्लेींश)वापरावे.
5.क्षारपड जमिनीतील सागरी कोळंबी संवर्धन करतेवेळी, पाण्यातील आयनिक घटक म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची वारंवार मूल्यांकन करावे व आवश्यकता असल्यास योग्य मात्रा द्यावी.
 
सोडीयम पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम क्लोराइड सल्फेट
(Na) (K) (Mg) (Ca) (So4-S) 
35 पीपीटी क्षारता 10500 380 1350 400 19000 2700
खारे पाणी प्रमाण 
गुणाकार घटक 304.5 10.7 39.1 11.6 551 78.3
 
उदा. 4 पीपीटी क्षारता पाण्यातील उर चे योग्य प्रमाणासाठी (4•×11.6) 46.4 पीपीएम कॅल्शियम घालावे. तसेच व्यावसायिक उत्पादनातील खनिजे वापरण्याचे प्रमाण खालील सूत्राने काढावे.
मात्रा ( ) = विशिष्ट खनिजाचे आवश्यक प्रमाण
त्या विशिष्ट खनिजाचे मिठातील टक्के * 100
 
उदा. 10% मॅग्नेशियम प्रमाण असलेले मॅग्नेशियम सल्फेटचार वार करून 25 मॅग्नेशियमचे आवश्यक मात्रा काढणे
मात्रा = 25
10 टक्के *100
6.गरज असल्यास योग्य असे खनिजयुक्त खाद्याची मात्रा दिल्यास जगवणुकीचे प्रमाण वाढते व कोळंबीची वाढ चांगली होते.
7.संवर्धन योग्य वातावरणाशी निगडीत गरज असल्यास योग्य प्रजैविकांचा वापर करावा.
 
नरेंद्र चोगले, सचिन साटम, आसिफ पागरकर
आणि संतोष मेतर
सहाय्यक संशोधन अधिकारी
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र,
झाडगाव, रत्नागिरी 415612