दुग्धप्रक्रिया उद्योग : रोजगारनिर्मितीची संधी

डिजिटल बळीराजा-2    07-May-2020
|
 
mik product_1  

हवामान बदलाचा शेती उत्पादनावरील परिणाम लक्षात घेऊन दुग्धव्यवसायाचे पारंपरिक दृष्टिकोन बदलले आणि हा मुख्य शेतीपूरक व्यवसाय बनला व दुग्धव्यवसायाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले.
 
भारत एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आजही भारतातील जवळजवळ ५२ टक्के लोकसंख्या कृषी व कृषीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. अनादी काळापासून शेतीचे कामे करण्यासाठी पशुसंवर्धन करून त्याचा शेतीसाठी उपयोग करण्यात आला. शिवाय त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा मानवी आहारात वापर करण्यात आला. परंतु दुधाळ जनावरांचे संगोपन फक्त घरगुती वापराकरिता दूध आणि शेतीच्या कामाकरिता लागणारे बैल मिळावेत हाच मुख्य हेतू होता. आता मात्र हवामान बदलाचा शेती उत्पादनावरील परिणाम लक्षात घेऊन दुग्धव्यवसायाचे पारंपरिक दृष्टिकोन बदलले आणि हा मुख्य शेतीपूरक व्यवसाय बनला व दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या संकल्पनेतील दुग्ध महापूर योजनेनंतर खऱ्या अर्थाने श्वेतक्रांती झाली व आपला देश दुग्धउत्पादनात स्वयंपूर्ण झाला. 
 
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या २०व्या पशुगणनेनुसार भारतात ५३५.७८ दशलक्ष पशुधन असून, एकूण पशुधनात ४.६ टक्के वाढ झाली. यात एकूण दुधाळ गायी आणि म्हशींच्या संख्येत ६ टक्के वाढ झाली असून, त्यांची संख्या १२५.३४ दशलक्ष आहे. भारताचे सध्याचे दुग्धउत्पादन १७६.३५ दशलक्ष टन जे की जगाच्या २१.७ टक्के असून आपला देश दुग्धउत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर २०२१-२२ पङ्र्मंत २५४.५ दशलक्ष टन दूध उत्पादन करण्याचा सरकारचा ध्यास आहे. दूध हे लवकर नासणारे नैसर्गिक पदार्थ आहे. भारतात दुधाची मुबलक उपलब्धता लक्षात घेऊन त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केले तर त्याला बाजारभाव जास्त मिळू शकेल. त्यामुळे तरुणांना या उद्योगामध्ये प्रचंड वाव आहे. यात निर्मित झालेल्या दुधावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे नवनवीन पदार्थ तयार करता येतात. अशा दुग्धपदार्थांना प्रचंड मागणी आहे, तसेच दूध उत्पादन करून फक्त दूधच विकण्यापेक्षा प्रक्रिया करून मूल्यवर्धन केलेल्या पदार्थाचे आर्थिक मूल्यही बाजार विक्रीमध्ये कित्येक पटीने वाढते. त्यामुळे दुग्धप्रक्रिया उद्योगाकडे तरुणांनी लक्ष देण्याची गरज आहे. हा एक स्वतंत्र उद्योग होऊ शकतो. उपलब्ध कच्च्या मालानुसार (दुग्ध किंवा इतर) याचे स्वरूप लघू किंवा मोठे असू शकते.
दुग्धप्रक्रिया म्हणजे उपलब्ध दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती करणे. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनविले जातात. यामध्ये दही, खवा, पनीर, पेढा, श्रीखंड, लस्सी, क्रीम असे अनेक पदार्थ बनवता येतील. प्रक्रियेच्या पद्धतीनुसार त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.
 
तक्ता १. दुग्धपदार्थाचे वर्गीकरण
 
 अ.क्र.  प्रकार   पदार्थ
 1  दूध आटवून तयार केलेले  खवा, पेढा, बासुंदी, खीर, रबडी
 2  दूध आंबवून तयार केलेले  दही, लस्सी, चक्का, श्रीखंड, आम्रखंड, श्रीखंडवडी
 3  दूध साकळवून तयार केलेले  छन्ना, पनीर, रसगुल्ला, रसमलाई
 4  दुधापासून गोठवून तयार केलेले  आइस्क्रीम, कुल्फी
 5  जास्त धृतांस असलेले  लोणी, तूप
 
दुग्ध हे पूर्णांन्न म्हणून ओळखले जाते. सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी दुधाचे आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आहार तज्ज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीने दर दिवशी २८० ग्रॅम दूध आहारात घेतले पाहिजे. दुधापासून तयार केलेल्या पदार्थांत दुधातील पोषक घटक उतरतात. म्हणून दुग्धपदार्थपण रोजच्या आहारात असायला हवे. याचे महत्तव सर्वत्र ज्ञात आहे. शहरी घरगुती भागात अन्नावरील एकूण खर्चापैकी १६ टक्के खर्च हा दूध आणि दुग्धपदार्थावर होतो. अशा दुग्धपदार्थाला देशात व विदेशांत प्रचंड मागणी आहे. जगात सरासरी ७० टक्के दुधावर प्रक्रिया केली जाते परंतु त्या तुलनेत भारतात मात्र १२ ते १५ टक्केच दुग्धप्रक्रिया केली जाते. या सर्व गोष्टींचे महत्त्व लक्षात घेऊन दुग्धप्रक्रिया उद्योगाकडे एक रोजगाराची संधी म्हणून पाहायला हवे.
 
दुग्धप्रक्रिया उद्योगास आवश्यक बाबी...
 • पहिल्यांदा या उद्योगासंबंधी प्राथमिक अभ्यास महत्त्वाचा आहे.
 • मागणीचे सर्वेक्षण करणे
 • मागणीनुसार गुणवत्तापूर्ण पदार्थ तयार करणे
 • योग्य प्रकारे पॅकिंग करणे
 • विक्रीचे नियोजन करणे
 • छोट्या मोठ्या ऑर्डर्स स्वीकारून विक्री करणे
 • दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीचे सर्वेक्षण 
 
सर्वांगाने विचार केल्यास अनेक हॉटेल, ढाबे, केटरर्स या सर्वांना पनीर, खवा, तूप, दही, चक्का इ. रोजची मागणी असतेच. गाव, शहर, निमशहर यानुसार पदार्थांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. लग्नाच्या जेवणात गुलाबजाम, मिठाईसाठी खवा, चक्का, पनीर इ. आवश्यक असतो. थोडक्यात, बाजारपेठेत मागणी आहे. ही मागणी आपण शोधली पाहिजे. 
 
मागणीनुसार गुणवत्तापूर्ण पदार्थ
 
भारतीय पारंपरिक दुग्धपदार्थ उदा. दही, चक्का श्रीखंड, छन्ना, रसगुल्ला, रसमलाई, पनीर याशिवाय नवनवीन पदार्थ उदा. सुगंधी दुध, व्हे qड्रक, चिज असे अनेक पदार्थ गुणवत्ता राखून तयार केले पाहिजेत.
 
योग्य प्रकारे पॅकिंग 
 
विविध दुग्धपदार्थांसाठी पॅकेqजग मटेरिअल निवडताना मूळ पदार्थ व पॅकेqजग मटेरिअलची गुणवत्ता विचारात घ्यावी. अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकची घनता, ताणशक्ती, ऑक्सिजनच्या प्रवेश क्षमता तपासून खात्री पटवून घ्यावी. सध्या बाजारात सहज उपलब्ध होणारे पीव्हीसी किंवा पॉलिप्रॉपिलीनचे प्लॅस्टिकचे डबे बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड, रसगुल्ला इ. साठी वापरता येतील. मिठाई ठेवण्यासाठी कागदापासूनची वेष्टने व प्लॅस्टिकचे वेगवेगळे प्रकार लॅमिनेट करून वापरता येतील. पनीर, मिठाईसाठी व्हॅक्यूम पॅकिंग वापरले जाते. नवीन तंत्रज्ञानामध्ये मॉडीफाइड अ‍ॅटमॉसफिअर पॅकेqजग ऑक्सिजन एॅबसॉर्बर तंत्र उपलब्ध झाले आहे.
 
विक्रीचे नियोजन 
 
विविध प्रदर्शनांतून बचत गटांच्या माध्यमातून स्टॉल्स लावल्यास मोठ्या प्रमाणात जाहिरात होऊन मागणी वाढते. लग्नसमारंभाची मागणी लक्षात घेऊन तेथील जेवण केटरर्सशी संपर्क ठेवून आपल्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढविता येईल. अशाप्रकारे मागणी वाढत गेल्यास आजूबाजूच्या शहरांतील शॉqपग मॉल्स, सुपर शॉपी, दुकाने इ. ठिकाणी योग्य पद्धतीने पॅक केलेले दुग्धपदार्थ विक्रीसाठी ठेवता येतील.
यंत्रसामग्रीची गरज
विविध पदार्थांसाठी वेगवेगळ्या क्षमतेचे यंत्रे उपलब्ध आहेत. सुरुवातीस एक किंवा दोन पदार्थांसाठी लागणारी यंत्रे खरेदी करून, गरजेनुसार इतर पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे विकत घ्यावीत. यामध्ये खवा मेकिंग मशिन, पनीर प्रेस मशिन दुधातील साय वेगळी करण्यासाठी क्रीम सेपरेटर इत्यादी यंत्रे उपलब्ध आहेत. 
 
ब्रँडिंग करणे 
 
स्वच्छ, शुद्ध, योग्य मूल्यवर्धित आणि पॅकेqजग केलेले दुग्धपदार्थ तयार करून ग्रहकांमध्ये विश्वास निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या उत्पादनाचा ब्रँड विकसित करण्यासाठी मदत होईल.
 
इतर नावीन्यपूर्ण दुग्धपदार्थ
 
बदलत्या जीवनशैलीमुळे पौष्टिक, शुद्ध, नैसर्गिक रंग आणि रसायनविरहित पदार्थांकडे लोकांचा कल वाढतोय. यासाठी स्थानिक उपलब्धतेनुसार दुग्धपदार्थांत फळांचा वापर, कमी फॅटचे दुग्धपदार्थ, कमी कॅलरीजचे पदार्थ, तंतुमय पदार्थांचा वापर करून मूल्यवर्धन करता येईल. दुग्धपदार्थ तयार करत असताना मिळणारे उपपदार्थ जसे स्किम मिल्क जे साय काढल्यानंतर मिळते, निवळी जे पनीर, छाना तयार करताना मिळते, ताक इत्यादीवर छोटीशी प्रक्रिया करता येते. या प्रक्रियेच्या पद्धती अत्यंत सोप्या व सहज करता येतात. 
 
दुग्धप्रक्रिया उद्योग सुरू करण्याआधी किंवा करत असताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा या उद्योगासंबंधी प्राथमिक अभ्यास महत्त्वाचा आहे. दुग्धप्रक्रिया उद्योगासंबंधी शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत त्या पुढीलप्रमाणे. 
 1. सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हैसूर
 2. राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना
 3. एसएमसी दुग्धशास्त्र महाविद्यालय, आनंद, गुजरात
 4. डेअरी टेक्नॉलाजी संस्था, हैदराबाद
 5. संजय गांधी दुग्धशास्त्र महाविद्यालय, पटना, बिहार
 6. दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, त्रिचूर, केरळ
 7. दुग्धशास्त्र महाविद्यालय, वरूड पुसद, महाराष्ट्र
 8. दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर, लातूर
 9. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
 10. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
 11. पशुवैद्यकीय व पशुशास्त्र महाविद्यालय, परभणी
 12. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
 
 
लेखक :
सचिन प्रेमदास रामटेके : मो. क्र. ९५४५८७२२१२
आचार्य पदवीचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, म.फु.कृ.वि. , राहुरी. 
डॉ. धीरज एच. कंखरे : मो. क्र. ९४०५७९४६६८
सहयोगी प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, म.फु.कृ.वि., राहुरी.
डॉ. राहूल जे. देसले- मो. क्र. ९४२३१६६१९२
सहयोगी प्राध्यापक, पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, म.फु.कृ.वि. , राहूरी.
लेखकांचा पत्र व्यवहाराचा पत्ता
सचिन प्रेमदास रामटेके, 
रूम नं. बी.-७१, वसंत मुलांचे वसतिगृह, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापिठ, राहूरी.- 413722
मो. क्र. 9545872212