घरच्या घरी सुग्रास म्हणजे जनावरांसाठी खुराक मिश्रण

डिजिटल बळीराजा-2    30-May-2020
|

animal1_1  H x
 
खुराक मिश्रणात विविध खाद्य घटकांतील अन्नघटकांचा विचार करून ते खनिज मिश्रण एकत्र करून पशुखाद्य तयार करणे आवश्यक असते. संतुलित खाद्य मिश्रण तयार करताना अनेक खाद्यघटकांचा विचार करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे संतुलित खुराक मिश्रणाचे फायदे, वापरायचे खाद्यघटक व खुराक मिश्रणे याची सविस्तर माहिती या लेखात वाचण्यास मिळणार आहे.
 
सुग्रास हे नाव 1980-1985च्या दशकात पशुपालकामध्ये रुचकर व पौष्टिक म्हणून प्रसिद्ध होते. सुग्रास हे नाव महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास मंडळाने तयार केलेल्या पशुखाद्याचे ट्रेड नाव होते. ते सर्वांसाठी चांगल्या प्रतीचे पशुखाद्य होते. त्याच्या कांड्याच्या आकारामुळे ग्रामीण भागात ते कांडी पेंड म्हणूनही प्रसिद्ध होते.
 
गायी-म्हशींच्या आहारात खुराक मिश्रण/अंबोन महत्त्वाचे आहे. कारण यात प्रथिने व ऊर्जा याचे प्रमाण अधिक असते. बाजारातून विकत आणलेले खुराक मिश्रण हे महाग पडते. तसेच बाजारातील खाद्यमिश्रण हे प्रयोगशाळेतील तपासणीनुसार जास्त प्रथिनयुक्त, ऊर्जायुक्त, पशुखाद्य असले तरी जनावरांसाठी त्या प्रमाणात उपयुक्त असण्याची खात्री नसते. यामुळे पशुपालक बाजारात मिळणार्‍या खुराक मिश्रणाएवढ्याच खाद्य मूल्याचा खुराक मिश्रण उपलब्ध, दर्जेदार खाद्य घटक वापरून कमी किमतीत बनवू शकतो. 
 
पशुपालन व्यवसायात खाद्यावरचा खर्च 60-60% इतका असतो. यात पशुपालकाचा मुख्य खर्च खुराकावर होतो. या खाद्यावरच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. हा खर्च कमी व दूध उत्पादन वाढवले तर निश्चित नफा जास्त होतो. बहुसंख्य पशुपालक आंबोन अतवा खुराक म्हणून केवळ पेंड किंवा डाळ चुणी किंवा मका/ज्वारी भरडरा याचा वापर करतात. परंतु पेंड, दाळचुणी, एकदल धान्य गहू/मका/ज्वारी धान्य भरडा, गहू/तांदूळ भुसा यांच्यातील उर्जा (पिष्टमय घटक) आणि प्रथिने यांचे प्रमाण असमान असते. त्यामुळे केवळ एक-दोन खाद्यघटक मिसळून दर्जेदार खुराक मिश्रण तयार होत नाही. खुराक मिश्रणात विविध खाद्यघटकांतील अन्नघटकांचा विचार करून ते खनिज मिश्रण एकत्र करून पशुखाद्य तयार करणे आवश्यक असते. संतुलित खाद्यमिश्रण तयार करताना अनेक खाद्यघटकांचा विचार करणे आवश्यक असते. 
 
खाद्यातील कर्बोदके ही शरीराला शक्ति प्रदान करतात, जी दोन प्रकारची असतात. 1) शीघ्र पचनीय व 2) पचनास जड जसे तंतुमय पदार्थ, तंतुमय पदार्थांमुळे जनावरांना त्वरित शक्ति मिळत नाही. पण जनावरांच्या खाद्यात तंतुमय पदार्थ ठराविक प्रमाणात असल्यास त्याचे पचन चांगले होते. ते पचनास जड असल्याने पचनसंस्थेत अधिक काळ वास्तव्याने जनावराचे पोट भरलेले असते. गवत, कडबा, हिरवा चारा यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात, तर गहू, ज्वारी, मका, बाजरी या तृणधान्यांत शीघ्र पचनीय कर्बोदके भरपूर असतात. 
 
स्निग्ध पदार्थ हे कर्बोदकाप्रमाणेच शक्ती/ऊर्जा देतात. तसेच यापासून पशूंना आवश्यक असलेेले आवश्यक स्निग्धाम्ल मिळतात. तेलयुक्त बिया व पेंड यापासून स्निग्धांश उपलब्ध होते.
 
प्रथिने : खुराक मिश्रणात कर्बोदके, स्निग्ध पदार्थांइतकेच अथवा त्यापेक्षा थोडे जास्त प्रथिनांची आवश्यकता असते. द्विदल/डाळवर्गीय धान्य जसे सोयाबीन, हरभरा, तूर, मूग या धान्यांत तसेच डाळ तयार केल्यावर राहिलेली चुनी यात पण प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, जवस, तीळ इत्यादी तेलबियांपासून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंड/ढेप यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
 
खनिज द्रव्य म्हणजे फक्त मीठ नव्हे तर कॅल्शियम, स्फुरद, सोडियम, पोटॅशियम, कोबाल्ट, मॅग्नेशियम, मँगेनीज आदी खनिज द्रव्याबरोबर चुना पावडर, शिंपले पावडर, हाडाचा चुरा याचा वापर करता येतो.
 
अशाप्रकारे निरनिराळे घटक आहारात समतोल प्रमाणात एकत्र करून संतुलित खाद्यात 16-18%पचनीय प्रथिने, 70% एकूण पचनीय पदार्थ आणि 16% पेक्षा कमी तंतुमय पदार्थ असलेला खुराक बनवणे आवश्यक आहे.
 
संतुलित खुराक मिश्रण करण्यासाठी विविध घटकांचा वापर करताना खालील ढोबळ गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
1)जनावरांना सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळण्यासाठी उपलब्ध असलेले विविध खाद्यघटकांपासून खुराक मिश्रण बनवावा. 
2)विविध खाद्यघटक वापरण्याचे कारण म्हणजे एकाच प्रकारच्या खुराकापासून शरीरासाठी आवश्यक सर्व अन्नघटक मिळत नाहीत. एका पदार्थातील अन्नघटकाची उणीव दुसर्‍या पदार्थांतील अन्नघटकातून भरून निघते.
3)काही प्रकारच्या खाद्यान्नाची प्रत व स्वाद ही जनावराच्या आवडीप्रमाणे नसतो. अशावेळी दोनपेक्षा अधिक खाद्यान्नाने मिश्रण तयार करून जनावरांना दिल्यास खाद्यान्नाची प्रत व स्वाद वाढतो, तसेच ते मिश्रण रूचकर झाल्याने जनावरे खुराक मिश्रण आवडीने खातात.
4)खुराक मिश्रणाची किंमत आटोक्यात ठेवण्यास तसेच मिश्रणास स्वादिष्टपणा येण्यास आणि घटक एकत्र मिसळण्यासाठी उसाच्या मळीचा वापर फायदेशीर ठरतो. मळी ही कर्बोदकाचे स्रोत असल्याने त्यापासून उर्जा पण उपलब्ध होते.
5)पशुखाद्य खुराक मिश्रण रुचकर व पाचक असणे हे देखील महत्त्वाचे आहे. त्याकरिता त्यातील घटक दर्जेदार-पौष्टिक असतात.
6)पशु शरीराला लागणारे आवश्यक अन्नघटक यांची गरज वासरे, कालवड, दुभती व भाकड जनावरे गर्भावस्था (उत्पादन क्षमता), कामाचे बैल, वळू इत्यादींमध्ये वेगवेगळी असते. त्याच्या आवश्यकतेनुसार विविध खाद्य घटकांचा वापर करावा.
7)पशुखाद्यासाठी कच्च्या मालाची निवड करताना उत्तम दर्जा, बाजरातील उपलब्धता, न्यूनतम/ कमीत कमी दर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
8)वापरण्यात येणारे खाद्यघटक हे किडी-बुरशी प्रादुर्भावापासून मुक्त असावेत, वापरण्यात येणार्‍या खाद्यान्नांना कुबट वास नसावा.
9)बनवलेले खाद्य मिश्रण हे कोरड्या ठिकाणी साठवावे. ओलसरपणामुळे बुरशी लागण्याची भिती असते.
10)खुराक मिश्रणाचा साठा एक महिन्याच्या कालावधीकरता करावा.
11)जनावरांना खुराक मिश्रण ठराविक वेळेसच द्यावे. सर्वसाधारण त्यामध्ये 8 ते 10 तासांचे अंतर असावे.
12)संतुलित खाद्य मिश्रणात अचानक बदल करू नये. प्रत्येक जनावरांना वेगवेगळे खाद्य मिश्रण त्यांच्या आवश्यकतेनुसार मोजून द्यावे.
13)खुराक मिश्रण जनावरांना दूध काढतेवेळी देणे जास्त फायदेशीर असते.
14)जनावरांना खुराक मिश्रण देण्यापूर्वी किमान 8 ते 10 तास पाण्यात भिजवून ठेवावे. त्यामुळे त्याचा रूचकरपणा तसेच पाचकता वाढते.
 
खुराक मिश्रण/आंबोन खालीलप्रमाणे वेगवेगळे घटक उपलब्धतेनुसार वापरून तयार करता येते. विविध खाद्य घटकासोबत 1-2% खनिज मिश्रण आणि 1% मीठ याचा समावेश करावा.
 
संतुलित खुराक मिश्रणाचे फायदे
 
1)संतुलित खुराक मिश्रणामुळे जनावरांचे शारीरिक पोषण उत्तमरीत्या होते. जनावरांचे आरोग्य चांगले राहून त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
2)वासराची वाढ उत्तम होते व वासरे वयात लवकर येतात.
3)गाभण गायी, म्हशीची वेण्याची प्रक्रिया सुलभ होते. गर्भपात होण्याची भीती नाही, वार लवकर पडते.
4)जनावरांची प्रजोत्पादनक्षमता वाढते.
5)दूध उत्पादन क्षमता वाढते व अधिक फायदा होतो.
6)भाकड काळ कमी होतो.
7)मिथेन वायू प्रदूषण कमी होते.
 
आंबोनमध्ये सर्वसाधारण 25-35% पेंड/ढेप, 25-35% तृणधान्य, 25-40% तृणधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ व 20-30% कडधान्यापासून डाळ बनवल्यावर मिळणारी चुणी याचा वापर करता येतो. खुराक मिश्रणाकरिता वापरावयाचे खाद्यघटक सूत्र खालीलप्रमाणे होत. 
 
1)गव्हाचा कोंडा 40%, भुईमूग/तेलबिया पेंड 20%, सरकी ढेप/पेंड -20%, तर चुनी 20%
2)भरडलेले धान्य, मका, गहू, ज्वारी, बाजरी-30% गहू, ज्वारी, बाजरी यांचा कोंडा-20%, डाळ चुणी (तूर, हरभरा, उडीद, मूग इत्यादी) -15%, तेलविरहित पेंड (सरकी, शेंगदाना, सोयाबीन) -20%, तेलयुक्त पेंड (सोयाबीन-सूर्यफूल)-15%
3)सरकी पेंड-15%, शेंगदाणा/करडी पेंड-15%, मका भरडा-20%, ज्वारी भरडा 10% गहू भुसा/कोंडा-10%, तांदूळ भुसा/कोंडा-10%, डाळ चुनी-10%,उसाची मळी-10% 
4)भरडलेला मका अथवा ज्वारी-10%, गव्हाचा कोंडा-30ते 40%, तांदळाचा कोंडा-10-20%, शेंगदाणा पेंड-15-20%, सरकी पेंड-10-15%
5)सरकी पेंड-20%, करडई/शेंगदाणा पेंड-10%, मका भरडा-10%, गव्हाचा कोंडा-10%, तांदळाचा कोंडा-10%, डाळ चुनी-5%, उसाची मळी-10%
6)ज्वारी भरडा-10%, गव्हाचा कोंडा-15 ते 20%, मका भरडा- 5ते 10%, हरभरा/तूर चुनी - 5 ते 10%, शेंगदाणा पेंड -5 ते 10%, सरकी पेंड-15 ते 20%, सूर्यफूल पेंड-10 ते 15 %, उसाची मळी-5 ते 10%
7)गव्हाचा कोंडा/तांदळाचा कोंडा-25%, डाळ चुणी-25%, शेंगदाणा पेंड -15%, सरकी पेंड-15%, कुळीथ/हुलगा भरडा-10%, मका/ज्वारी भरडा-10%
8)सरकी पेंड-10%, शेंगदाणा पेंड-15%, डाळचुनी-35%, गहू कोंडा-15%, तांदूळ कोंडा-15%
9)डाळ चुणी-35%, गवार-15%, तांदूळ कोंडा-15%, सरकी पेंड-35%
10)जवस पेंड-35%, हरभरा चुणी-40%, गव्हाचा कोंडा-25%
11)सातू /ओट-30%, हरभरा चुणी-40%, शेंगदाणा पेंड-20%, गव्हाचा कोंडा-10%
12)हरभरा चुणी-35%, भरडलेला मका-40%, शेंगदाणा पेंड-20%, हरभरा भुसा ड्ढ 5%
13)हरभरा भुसा-10%, तांदळाचा कोंडा-10%, ज्वार/मका भरडलेली 40%, तीळ पेंड-20%
14) खोबरा पेंड-20%, साबुदाना-30%, शेंगदाणा पेंड-15%, हरभरा चुनी-35%
 
वरील सर्व खाद्यघटक एकत्र केल्यावर मिळणार्‍या खुराक मिश्रणात 15 ते 16% पचनीय प्रथिने व 68 ते 75% एकूण पचनीय घटक असतात.
 
भारतीय कृषी अनुसंधान केंद्राने सुचवलेले काही खुराक मिश्रण खालीलप्रमाणे होत.
1)सरकी पेंड-25%, गव्हाचा कोंडा-20%, मका भरडलेली-55%
2)सरसो/मोहरी पेंड-25%, सरकी-35%, गव्हाचा कोंडा-10%, जव/सातू-30%
3)सरसो/मोहरी पेंड-30%, जव/सातू-50%, ओट-20%
4)शेंगदाणा पेंड-15%, हरभरा/चुणी-40%, भरडलेली मका-40%, हरभरा/भुसा-5%
5)शेंगदाणा पेंड-10%, सरकी पेंड-20%, तांंदळाचा कोंडा-10%, भरडलेला मका-30%, हरभरा/चुणी-30%
वरील खाद्य/खुराक मिश्रण सर्वसाधारण 15-16% पचनीय पदार्थ व 75 % एकण पचनीय घटक असतात. 
 
दोन खाद्यघटक वापरून बनवलेला खुराक मिश्रण
1)मोहरी पेंड-25% व गव्हाचा कोंडा-75%
(या मिश्रणातून 14.5%, पचनीय प्रथिने व 65% एकूण पचनीय घटक मिळतात.)
2)मोहरी पेंड-40%, तांदळाचा कोंडा-60%
3)शेंगदाणा पेंड-20, तांदळाचा कोंडा 80%
(या मिश्रणातून 14.8% पचनीय प्रथिने व 60% एकूण पचनीय घटक मिळतात.)
4)तीळ पेंड-30% व तांदळाचा कोंडा-70%
(या मिश्रणातून 17.1% पचनीय प्रथिने व 70% एकूण पचनीय घटक मिळतात.)
 
तीन खाद्यघटक मिसळून केलेले खुराक मिश्रण
 
1.मोहरी पेंड-40%, जव/सातू-40%, गहू कोंडा-20%
(या मिश्रणातून16% पचनीय प्रथिने व 72% एकूण पचनीय घटक मिळतात.)
2.तीळ पेंड-25%, तांदूळ चुरी-40%, तांदूळ कोंडा-30%
(या मिश्रणातून 16% पचनीय प्रथिने व 72% एकूण पचनीय घटक मिळतात.)
 
चार खाद्य घटक मिसळून केलेले खुराक मिश्रण 
 
1.शेंगदाणा पेंड-20%, गहू कोंडा 30%,सातू/जव 30%, हरभरा/चना-20%
(या मिश्रणातून 16% पचनीय प्रथिने व 72% एकूण पचनीय घटक मिळतात.)
2.शेंगदाणा पेंड-20%, गहू कोंडा-30%, भरडलेला मका-40%, हरभरा-10%
3.(या मिश्रणातून 15.4 % पचनीय प्रथिने व 74% एकूण पचनीय घटक मिळतात.)
 
शेळ्या-मेंढ्यांसाठी खुराक मिश्रण
 
भुईमूग पेंड-25%, गव्हाचा कोंडा-35%, भरडलेली मका/ज्वारी-40%
(या मिश्रणातून 15.4 पचनीय प्रथिने व 74% एकूण पचनीय घटक मिळतात.)
 
वरील सर्व खाद्य मिश्रणात किंमत व उपलब्धता लक्षात घेऊन पेंड, मका, ज्वारी भरडा प्रमाणे 5%नी कमी-जास्त करता येतो. मिश्रणात वापरले जाणार्‍या उसाच्या मळीचे प्रमाण 15% पेक्षा जास्त करू नये. बायपास प्रथिनांची उपलब्धता असल्यास त्याचा वापर खाद्य मिश्रणात करणे फायदेशीर होते.
 
जनावरांना मिठाची गरज असते. मिठामुळे जनावरांच्या शरीरातील पाणी टिकून राहते. तसेच तापमान निश्चित राहते. याकरिता किमान 1% मीठ खुराक मिश्रणात वापरावे. दुभत्या जनावरांना पशुखाद्य देण्याचे प्रमाण त्याच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असते. दुधाळ गायीस 1 ते 1.5 किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी आणि एक किलो खुराक मिश्रण प्रति 2.5 किलो दुग्धोत्पादनासाठी द्यावे म्हणजेच 10 लिटर दूध देणार्‍या गायी/म्हशीस 1 ते 1.5 किलो खुराक शरीर पोषणासाठी व 4 किलो खुराक 10 लिटर दुग्धोत्पादनासाठी असे एकूण 5 किलो खुराक मिश्रण द्यावे.
 
खुराक मिश्रणाचा खर्च कमी करण्यासाठी पशुपालकाकडे उपलब्ध असलेले धान्य, चुनी व इतर खाद्यघटक वापरून आवश्यकतेनुसार काही खाद्यघटक बाजारातून विकत घेऊन खुराक मिश्रणाचा दर कमी करता येईल. यामुळे उत्तम प्रतीचे घरगुती खुराक मिश्रण तयार करता येईल. खाद्य घटक वापरताना त्याच्यातून जनावरांना मिळणारे प्रथिनांचे प्रमाण किती आहे तसेच त्या खाद्य घटकाचा बाजारातील दर या माहितीने उपलब्ध होणार्‍या प्रथिनाचा दर ठरविता येईल. या दरानुसार कमीत कमी खर्चात अधिक प्रथिने कशी उपलब्ध करता येतील हे ठरविता येईल. ज्या खाद्यघटकातून कमीत कमी दराने प्रथिने उपलब्ध होतील ते खाद्यघटक प्राधान्यक्रमाने वापरावेत, असे करताना एकदल, द्विदल, पेंड आदीचे मिश्रणही योग्य प्रमाणात राहील याची काळजी घ्यावी. 
 
पुढील तक्त्यात काही खुराक मिश्रण नमुने तयार करून दिलेले आहेत, त्याच्या बाजारातील प्रचलीत किंमतीनुसार उपलब्ध खाद्य घटक याचा विचार करून कमीत कमी किमतीचे खाद्य घरच्या घरी तयार करावे.
 
तक्ता क्र. 1
 
पशुखाद्य घटकातील उपलब्ध अन्नघटक, त्याचे बाजारभाव व प्रतिकिलो अन्नघटकाची किंमत
 
क्र. खाद्य पदार्थ एकूण प्रथिने एकूण पचनीय पदार्थ बाजारातील किंमत प्रतिकिलो प्रतिकिलो प्रथिनांची किंमत
1 शेंगदाणा पेंड 51.8 78.18 35 67.56
2 सरकी पेंड 22.8 79.56 20 87.71
3 डाळचुनी 18.1 81.3 18 99.44
4 सोयाबीन 41.6 87.8 20 67.3
5 मकाधान्य 10.6 76 14 133.3
6 ज्वारी धान्य 10.5 92.2 14 133.3
7 गहू धान्य 10.5 92.2 14 133.3
8 तांदूळ कोंडा 12.2 64.4 10 81.96
9 गहू कोंडा 15.4 74.9 12 77.92
  
 
(वरील भाव हे बाजारात मिळणार्‍या पशुखाद्य धान्याचे आहेत.)
विविध खाद्य घटक वापरून तयार केलेले खुराक मिश्रण
 
क्र. खाद्य पदार्थ खुराक मिश्रणातील खाद्यान्नातून मिळणारे घटक किंमत रु. प्रमाण किलो प्रथिने% एकूण पचनीय पदार्थ
1 मका भरडलेला 30 3.18 22.8 420
2 गहू कोंडा 25 3.85 18.73 300
3 तूर चुनी 25 4.53 20.31 450
4 शेंगदाणा पेंड 17 8.81 13.42 595
5 मिनरल मिक्श्चर 0.2.00 0 0 100
6 मीठ 1 0 0 1875
 
प्रति क्विंटल
 
क्र. खाद्य पदार्थ खुराक मिश्रणातील खाद्यान्नातून मिळणारे घटक किंमत रु. प्रमाण किलो प्रथिने% एकूण पचनीय पदार्थ
1 ज्वारी भरडा 30 3.15 19.5 420
2 तांदूळ कोंडा 22 2.68 14.16 220
3 सरकी पेंड 20 4.56 15.91 400
4 हरभरा चुनी 20 3.62 16.26 360
5 सोयाबीन 5 2.05 4.1 140
6 मिनरल मिक्श्चर 2 0 0 100
7 मीठ 1 0 0 10
एकूण   100 16.03 69.93 1650
 
प्रति क्विंटल
 
क्र. खाद्य पदार्थ खुराक मिश्रणातील खाद्यान्नातून मिळणारे घटक किंमत रु. प्रमाण किलो प्रथिने% एकूण पचनीय पदार्थ
1 मका 20 कि. 2.1 14.12 280
2 गव्हाचा कोंडा 30 कि. 4.6 22.47 360
3 तांदळाचा कोंडा 17 कि. 2 10.94 170
4 शेंगदाणा पेंड 15 कि. 7.7 11.83 525
5 सरकी पेंड 15 कि. 3.4 11.93 300
6 मिनरल मिक्श्चर 02 कि. 0 0 100
7 मीठ 01 कि. 0 0 10
एकूण   100 कि. 19.8 71.3 1745
 
प्रति क्विंटल
 
प्रा. डॉ. शांती लाहोटी