करवंदापासून प्रक्रियायुक्त पदार्थनिर्मिती

डिजिटल बळीराजा-2    30-May-2020
|
 
cranberries_1  
 
करवंदाच्या फळामध्ये औषधी गुणधर्म व आहाराच्या दृष्टीने जीवनसत्व ड घटक विपुल प्रमाणात असल्याने या दुर्लक्षित असलेल्या फळास अनन्य साधारण महत्व असून त्यापासून तयार केलेल्या पदार्थांना स्थानिक तसेच इतर बाजारपेठेत चांगली मागणी आहे. यासाठी कच्च्या फळांपासून विविध पदार्थ कसे करावे या विषयी सखोल माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
करवंद हे अतिशय काटक व सदाहरित असणारे झुडूप असून ते डोंगराच्या माथ्यावर, जंगलामद्ये नैसर्गिकरित्या वाढते. इतर कोणत्याही कोरडवाहू फळझाडांच्या तुलनेत हे झाड अत्यंत काटक असून हलक्या व मुरमाड जमिनीमद्ये अतिशय कमी पाण्यावर येते. हे झाड 2 ते3 मीटर उंचीपर्यंत वाढते. झाडास उन्हाळ्यात पांढर्‍या रंगाची, छोटी सुगंधी फुले लागतात. मे महिन्यामध्ये फळे पिकण्यास सुरुवात होते. पिकलेली फळे गर्द काळ्या रंगाची असतात. झाडाच्या फांद्यावर फळे घोसामध्ये लागतात. सर्व साधारणपणे एका घोसामध्ये 10-12 फळे लागतात. करवंद या फळाचे उगमस्थान भारत देश आहे. भारतातल्या कोरडवाहू प्रदेशामध्ये सर्वत्र करवंदाच्या जाळ्या दिसून येतात.
 
करवंदाचे महत्त्व व उपयोग
 
करवंदाच्या फळांचा हंगाम मे पासून सुरू होऊन तो जून अखेरपर्यंत चालतो. ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये या फळाला चांगली मागणी असते. करवंदाच्या पिकलेल्या तसेच कच्च्या फळामध्ये आहारमूल्यांचे घटक विपूल प्रमाणात असतात. पिकलेल्या करवंदाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्न घटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे दिसून येते.
पाणी - 81-82 (%), लोह 0.39(%), खनिजे 0.39 (%), कर्बोदके 2.9 (%), फॉस्फरस 0.38(%), कॅल्शियम 0.38 (%), शर्करा 18.20 (%), प्रथिने 2.3 (%), स्फुरद 2.3 (%), मेद 2.30 (%), जीवनसत्व क 200 मि.ली. ग्रॅम.
करवंदाची फळे चवीला आंबट-गोड असतात. इतर फळांच्या तुलनेने या फळामद्ये लोहाचे प्रमाण अतिशय जास्त असल्याने ही फळे रक्तातील तांबड्या पेशी वाढवण्यासाठी अत्यंत उपयोग समजली जातात. अनेमिया या रोगावर ही फळे अत्यंत उपयुक्त असतात. 
 
  • करवंदाच्या कच्च्या तसेच पिकलेल्या फळामध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने ंही फळे स्कर्व्ही या रोगावर अत्यंत गुणकारी आहेत. तसेच ही फळे पित्त दोषावरही उपयुक्त असतात. 
  • या फळामध्ये कॅन्सर या रोगाविषयी गुणधर्म आहेत तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोगी असतात. 
  • फळाच्या रसाचा उपयोग आतड्यातील जंत बाहेर पडण्यासाठी करतात. करवंद हे फळ रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणकारी असल्याचे आढळून आले आहे.
  • करवंदाच्या मुळांचा उपयोग माश्यांना दूर ठेवण्यासाठी करतात. तसेच मूत्राशयाच्या रोगांवर गुणकारी आहे. 
  • करवंदाच्या पानांची पावडर विविध तापावर उपयोगी असते. तसेच पंजाबमध्ये पानाचा उपयोग उलट्यांवर करतात.
  • करवंदाच्या झाडाच्या सालीचा उपयोग विविध त्वचारोगावर करतात. या झाडाच्या फांद्यांना भरपूर काटे असल्याने त्यांचा उपयोग सजीव कुंपणासाठी प्रभावीपणे केला जातो. 
  • करवंदाच्या फळांतील पांढर्‍या चिकाचा उपयोग च्युईंगगम तयार करण्यासाठी होतो. 
करवंदाच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन : 
 
भारतातील कोरडवाहू प्रदेशात सर्वत्र वाढणारे हे फळ आफ्रिका, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ इत्यादी देशातसुद्धा आढळून येतात.
करवंदाची झाडे जंगलामध्ये नैसर्गिकरित्या वाढताना दिसून येतात. 
उत्तर प्रदेशात वाराणसी या जिल्ह्यात या फळाची लागवड व्यापारी तत्वावर केलेली दिसून येते.
महाराष्ट्रामध्ये या फळाची लागवड स्वतंत्ररित्या कोठेही केलेली दिसून येत नाही. म्हणून लागवड व उत्पादन या विषयी माहिती उपलब्ध नाही.
परंतु महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे व कोकणातील जिल्ह्यांमध्ये करवंदांची झाडे जंगलांमध्ये नैसर्गिकरित्या वाढलेली आढळून येतात. म्हणून महाराष्ट्राच्या कोरडवाहू प्रदेशात या दुर्लक्षित फळाची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने व्यापारी तत्त्वावर केल्यास उत्पादन चांगले मिळू शकते. 
करवंदाची लागवड बियांपासून केल्यास तिसर्‍या-चौथ्या वर्षापासून फळे लागण्यास सुरुवात होते. फळ पिकण्यास सर्वसाधारणपणे फळधारणा झाल्यापासून 100-110 दिवस लागतात.
एका झाडापासून फळाचे सरासरी 3-5 किलो फळे मिळतात. व फळांचे तीन-चार तोडे होतात. 
 
करवंदाच्या प्रक्रियेसाठी संधी
 
करवंदाच्या फळामध्ये औषधी गुणधर्म व आहाराच्या दृष्टीने उपयुक्त असलेले अन्नघटक उदा. खनिजे, जीवनसत्व इ. घटक विपुल प्रमाणात असल्याने या दुर्लक्षित असलेल्या फळास अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
 
तयार केलेल्या पदार्थांना स्थानिक तसेच दूरच्या बाजारपेठेत चांगली मागणी असते. असे पदार्थ तयार केल्याने वर्षावलंबी असलेले करवंदाच्या फळाचा आस्वाद वर्षभर घेता येतो. तसेच वाया जाणारी फळे उत्तम प्रकारे वापरली जाऊ शकतात. अशा प्रक्रिया उद्योगातून रोजगारनिर्मिती होऊ शकेल. यासाठी तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना मात्र निश्चित बाजारपेठ मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. 
 
अ)कच्च्या फळांपासून विविध पदार्थ
 
1.पेये - सरबत 
कच्च्या फळांपासून सरबत तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्यापासून रस काढून घेतला पाहिजे. यासाठी पूर्ण वाढ झालेली फळे निवडून स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवून घ्यावीत. त्यानंतर एक किलो फळामध्ये 1 लिटर पाणी टाकून त्यांना भेगा पडेपर्यंत शिजवावीत. थंड झाल्यावर तो लगदा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. मोठ्या प्रमाणावर रस काढण्यासाठी हायड्रोलिक बास्केट फ्रेस या यंत्राचा वापर करावा. 
हा काढलेला रस विविध पेये तयार करण्यासाठी वापरतात. 
 
सरबत तयार करण्यासाठी वरील पद्धतीने काढलेले 1 किलो रस घेऊन त्यामध्ये 400-500 ग्रॅम साखर व 1200 मिली पाणी टाकून हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. हा रस मुळातच आंबट असल्याने यात सायट्रिक आम्ल टाकण्याची गरज भासत नाही. चवीसाठी थोडेसे मीठ व जिर्‍याची पावडर टाकून चांगले ढवळावे व थंड झाल्यावर याचा आस्वाद घ्यावा. जर हे सर्व जास्त काळ साठवून ठेवायचे झाल्यास ते 70 अंश तापमानास पंधरा-वीस मिनिटे गरम करावे व गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावे व बाटल्या क्रोकीन मशीनच्या सहाय्याने हवाबंद कराव्यात. हे मिश्रण बाटल्यांमध्ये भरण्यापूर्वी 100 पीपीएम सोडियम बेन्झॉइट हे परिरक्षक वापरावे. थंड झाल्यावर लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. 
 
2.स्क्वॅश
स्क्वॅश तयार करण्यासाठी वरील पद्धतीने काढलेला 1 किलो रसामध्ये 900-1000 ग्रॅम साखर, 600 मिलि पाणी व 7 ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकून हे मिश्रण ढवळून मलमलच्या कापडातून गाळून थोडा वेळ गरम करून त्यामध्ये 610 मिली ग्रॅम प्रति किलो सोडियम बेन्झॉईट हे परिरक्षक घालून मिश्रण चांगले ढवळून मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. गरम असतानाच हे मिश्रण निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावे व बाटल्या हवाबंद कराव्यात. या बाटल्यांना लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. वापरताना स्क्वॅशमध्ये 1 :3 पाणी मिसळून चवीनुसार मीठ व जिर्‍याची पावडर टाकून थंड झाल्यावर याचा आस्वाद घ्यावा.
 
3.जॅम : 
कच्च्या फळापासून जॅम तयार करण्यासाठी फळे पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यावीत. नंतर त्याचे तुकडे करून त्यामध्ये 1:1 पाणी मिसळून व चांगले शिजवून घ्यावेत. मधून मधून तुकडे पळीने दाबून घ्यावीत. 
 
कच्च्या फळापासून जॅम तयार करण्यासाठी फळे पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यावीत. नंतर त्याचे तुकडे करून त्यामध्ये 1:1 पाणी मिसळून व चांगले शिजवून घ्यावेत. मधून मधून तुकडे पळीने दाबून घ्यावेत. हे मिश्रण थंड झाल्यावर एक पदरी मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. या गरमिश्रित एक किलो गरास एक किलो साखर घालावी. या रसामध्ये सायट्रिक आम्ल टाकण्याची गरज भासत नाही कारण हे फळ मुळातच आंबट असते. साखर विरघळल्यानंतर हे मिश्रण गरम करण्यासाठी ठेवावे. या मिश्रणाचा ब्रिक्स 69 अंश आल्यावर किंवा हे मिश्रण तुकड्यात पडू लागल्यावर निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यामध्ये भरावे. थंड झाल्यावर मेणाचा एक सें.मी. जाडीचा थर द्यावा किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉईल लावून बंद कराव्यात. या बाटल्यांना लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
 
4.चटणी :
कच्च्या करवंदापासून उत्तम प्रकारची स्वादिष्ट अशी गोड चटणी तयार करता येते. गोड चटणी व जॅम तयार करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच असते. गोड चटणीमध्ये साखरेऐवजी मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. चटणी तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे घटकांचे प्रमाण वापरले जाते. रसमिश्रित फळांचा गर - 1 किलो, साखर-1 किलो, मीठ-50 ग्रॅम, मिरची पावडर -15 ग्रॅम, वेलदोडे -30 ग्रॅम, दालचिनी-30 ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा -60 ग्रॅम, बारीक चिरलेला लसूण ड्ढ 15 ग्रॅम, बारीक चिरलेले आले-15 ग्रॅम, व्हिेनेगर-80 ते 90 मिली इत्यादी.
 
यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे काढलेल्या गरात साखर आणि मीठ मिसळून मिश्रण उकळण्यास ठेवावे. त्यानंतर कांदा, लसूण व आले हे एका फडक्यात बांधावे व दुसर्‍या फडक्यात राहिलेले मसाले बांधून व दोन्ही पुरचुंड्या उकळत ठेवलेल्या मिश्रणात सोडून द्याव्यात व ते मिश्रण सतत ढवळत राहावे. या पुरचुंह्या मधून मधून पळीने दाबाव्यात म्हणजे मसाल्याचा अर्क मिश्रणात उतरण्यास मदत होईल. हे मिश्रण जॅमप्रमाणे घट्ट झाल्यावर मसाल्याची पुरचुंडी चांगली पिळून घ्यावी. नंतर मिश्रणात व्हिेनेगर टाकून ते थोडा वेळ उकळू द्यावे. चटणी बाटलीत भरण्याअगोदर त्यामध्ये 250 पीपीएम एवढे सोडियम बेन्झॉइॅट मिसळावे. चटणी गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये किंवा पॉलिथीनच्या स्टँडींग पाऊचमध्ये भरावी. बाटल्याच्या तोंडावर 1 सेंमी वितळलेल्या मेणाचा थर द्यावा किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉईलने बाटल्या हवाबंद कराव्यात. स्टँडींग पाऊच या सिलरच्या सहाय्याने हवाबंद कराव्यात. नंतर थंड करून, लेबल लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. 
 
5.लोणचे
कच्च्या करवंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे तयार करता येते. हे लोणचे अतिशय रुचकर व स्वादिष्ट लागते. लोणचे तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या घटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असावे. फळे 1.5 किलो, तापवून घेतलेले मीठ - 250 ग्रॅम. मेथी-20 ग्रॅम. हळद पूड 30 ग्रॅम, हिंग पूड - 50 ग्रॅम, लाल मिरची पावडर - 48 ग्रॅम, मोहरी पावडर -100 ग्रॅम, गरम करून थंड केलेले गोडे तेल -400 ग्रॅम इत्यादी. 
 
प्रथम ताजी कच्ची करवंदे निरोगी चांगली फळे निवडून घ्यावीत. फळांचे देठ काढून घ्यावेत व फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. फळांना निम्मे मीठ व निम्मी हळद लावून स्टीलच्या पातेल्यात 2 ते 3 तास ठेवून द्यावीत. यावेळी बर्‍याच अंशी फळातून पाणी निचरून जाण्यास मदत होते. निम्मे गोडेतेल घेऊन त्यात मेथी, हळद, हिंग, मोहरी यांची फोडणी द्यावी व या फोडणीमध्ये पाणी निचरून गेलेली करवंदाची फळे टाकावीत व चांगले पळने हालवून घ्यावे. लोणच्यामध्ये 250 पीपीएम एवढे सोडियम बेन्झोईट मिसळून लोणचे रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावे. नंतर शिल्लक राहिलेले उकळून थंड केलेले गोडे तेल ओतावे. गोडे तेलाची पातळी लोणच्याच्या वर राहील याची काळजी घ्यावी. बाटल्यांना झाकण लावून, लेबल करून आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. अशा पद्धतीने तयार केलेले करवंदाचे लोणचे वर्षभर टिकते व त्याचा आस्वाद आपल्याला वर्षभर घेता येतो.
 
6.जेली
जेली तयार करण्यासाठी पूर्ण वाढलेली फळे स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवून घ्यावीत. नंतर त्याचे तुकडे करून घ्यावेत व तुकडे बुडतील एवढे पाणी टाकून अर्धा तास गरम करावे. थंड झाल्यावर हे मिश्रण एक पदरी मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. हा रस फ्रिजमध्ये उभट भांड्यात 24 तास ठेवून सायफनिंग पद्धतीने रस वेगळा करावा. रसाची पेक्टिन परीक्षा घेऊन रसामध्ये साखर टाकावी. सर्वसाधारणपणे 800-900 ग्रॅम साखर टाकून मिश्रण ढवळून साखर विरघळून घ्यावी. नंतर हे मिश्रण गरम करण्यास ठेवावे. हे मिश्रण तुकड्यात पडू लागले किंवा गोळीबंद पाकाची परीक्षा घेऊन रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावी. गरम करताना मिश्रणावर येणारी मळी काढून टाकावी. थंड झाल्यावर वितळलेल्या मेणाचा एक सेंमी जाडीचा थर द्यावा किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉइल लावावे. नंतर बाटल्यांना झाकण लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
 
ब) पिकलेल्या करवंदाचे पदार्थ
 
पेये
 
1.नेक्टर /आर.टी.एस.
चांगली पिकलेली फळे निवडून ती दोन-तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. यानंतर फळे हाताने कुस्करून घेऊन एक पदरी मलमलच्या कापडातून दाबून रस काढावा. मोठ्या प्रमाणावर करावयाचे झाल्यास पल्पर नावाच्या यंत्राचा वापर करावा. पल्परमधून काढल्यानंतर हे मिश्रण हायड्रालिक बास्केट प्रेसच्या सहाय्याने रस काढून घ्यावा. हा काढलेला रस पेये तयार करण्यासाठी वापरावा. 
नेक्टर किंवा आर. टी. एस. तयार करण्यासाठी वरीलप्रमाणे काढलेला रस 15-20 टक्के, साखर 13-15 टक्के, सायट्रिक आम्ल 0.30-0.50 टक्के व उरलेले पाणी हे घटक वापरावेत. हे घटक एकत्र मिसळून चांगले ढवळून घ्यावे. नंतर हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे व चवीसाठी थोडेसे मीठ व जीरा पावडर टाकून थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा. जर हे सरबत जास्त काळ साठवून ठेवायचे झाल्यास ते पाश्चराईज्ड करून 100 पीपीएम एवढे सोडियम बेन्झोइट वापरून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावे व बाटल्या हवाबंद करून पाश्चराईज्ड कराव्यात. नंतर बाटल्या थंड झाल्यावर लेबल लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. 
2.स्क्वॅश
वरील पद्धतीने काढलेल्या रसामध्ये पुढील घटक वापरून उत्तम प्रकारचा स्क्वॅश तयार करता येतो. रस 25 टक्के, साखर 45 टक्के, आम्लता 1.5 टक्के व उरलेले पाणी हे घटक एकत्र करून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे व मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. यामध्ये 610 पीपीएम एवढे सोडियम बेन्झोएट हे परिरक्षक वापरावे. ते योग्य पद्धतीने मिसळून स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या स्क्वॅश बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या हवाबंद कराव्यात. नंतर त्यांना लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. वापरताना यामध्ये 1:3 या प्रमाणात थंड पाणी मिसळून चवीसाठी थोडेसे मीठ व जीरा पावडर वापरून चांगले मिसळून थंड झाल्यावर आस्वाद घ्यावा.
3.सिरप
यासाठी वरीलप्रमाणे काढलेल्या 1 किलो रसामध्ये 1 किलो साखर व 8 ते 10 ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकून, चांगले ढवळून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरावे. सिरप बाटल्यात भरण्यापूर्वी त्यामध्ये 610 पीपीएम एवढे सोडियम बेन्झोएट वापरावे. सिरपचा वापर करतेवेळी 1:4 किंवा 1:5 या प्रमाणात पाणी मिसळून थंड झाल्यावर आस्वाद घ्यावा. 
पदार्थ
 
1.करवंदाची चेरी
गुलाबी रंगाच्या करवंदापासून उत्तम प्रकारची चेरी तयार करता येते. यासाठी नरेंद्र देव कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींचा वापर करावा. ही चेरी आइस्क्रीमवर शोभा वाढवण्यासाठी सर्रासपणे वापरले जाते. त्यामुळे चेरीला स्थानिक बाजारपेठेत तसेच दूरच्या बाजारपेठेत चांगली मागणी असते.
 
चेरी तयार करण्यासाठी प्रथम करवंदाची निरोगी फळे निवडून घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत व त्यांना चाकून चिरा पाडून त्यातील बी काढून घ्यावी. नंतर ही फळे 0.40 टक्के एवढ्या तीव्रतेच्या सोडियम हायड्रॉक्साईडच्या उकळत्या द्रावणात फडक्यात बांधून 2-3 मिनिटे धरावीत. नंतर ती फळे पाण्याने धुवून अर्धा तास चांगल्या पाण्यात बुडवून ठेवावीत. यामुळे फळांचा रंग निघून जातो. अशी रंगहीन झालेली फळे पाण्यातून काढून तांबड्या खाद्य रंगांच्या द्रावणात रात्रभर भिजत ठेवावीत. यामुळे फळांना गर्द तांबडा रंग प्राप्त होतो. अशी गर्द तांबड्या रंगाची फळे पहिल्या दिवशी 50 टक्के तीव्रतेच्या पाकात 24 तास बुडवून ठेवावीत. दुसर्‍या दिवशी पाकातून फळे काढून, पाकात साखर टाकून पाकाची तीव्रता 60 टक्के करावी व त्यामध्ये फळे टाकून ती 24 तास ठेवावीत. तिसर्‍या दिवशी फळे पाकातून काढून, पाकात साखर टाकून पाकाची तीव्रता 68 ते 69 टक्के करावी व त्यामध्ये फळे टाकून ती 24 तास ठेवून द्यावीत. नंतरचे सलग तीन दिवस फळे 68 टक्केच्या पाकामध्ये ठेवावीत. नंतर पूर्णपणे पाकवलेली फळे पाकातून काढून पाक नितळून घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत व दोन दिवस सावलीत फॅनखाली वाळवून घ्यावीत. अशा प्रकारे तयार झालेली चेरी वजन करून, पॉलिथीनच्या पिशवीमध्ये भरून, पिशव्या हवाबंद करून, लेबल लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावी.
 
2.जॅम
पिकलेल्या करवंदापासून उत्कृष्ट प्रतीचा जॅम तयार करता येतो. वरीलप्रमाणे काढलेल्या गरामध्ये 750 ते 800 ग्रॅम साखर व 3 ते 5 ग्रॅम सायट्रिक आम्ल प्रति किलो रस या प्रमाणात टाकून वर उल्लेख केल्याप्रमाणे जॅम तयार करावा. 
 
डॉ. विष्णू कुं. गरंडे आणि प्रा. रविंद्र दा. पवार
उद्यानविद्या विभाग, कृषिविद्यामहाविद्यालय, कोल्हापूर