नाचणीचे आहारातील महत्त्व आणि मूल्यवर्धित उत्पादने

डिजिटल बळीराजा-2    30-May-2020
|
 
nachni_1  H x W
 
नाचणी धान्यामध्ये असणार्या सत्त्वयुक्त अन्नघटकांचा विचार करता मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या पद्धतीचा सखोल माहितीचा समावेश या लेखात केला आहे.
 
आहाराच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणीमध्ये असणार्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास तत्सम तृणधान्य न संबोधता सत्वयुक्त धान्य संबोधले जाते. सध्या प्रचलित असणारी महत्त्वाची तृणधान्ये म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, भात, मका सर्वसामान्य माणसाच्या आहारात वापरली जातात. नाचणी धान्यामध्ये चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज शर्करा हळूहळू रक्तप्रवाहात मिसळली जाते. नियमित नाचणी सेवन करणार्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्यावरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येते.
 
सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आहारातील अनियमिततेमुळे माणसांना निरनिराळ्या आजाराने ग्रासले आहे. त्यामध्ये मधुमेहाचा वरचा नंबर लागतो. मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने नाचणीयुक्त आहाराला फार महत्त्वाचे स्थान आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सन 2005 मध्ये भारताचे 57 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रासलेलेल आहेत. महुमेहामुळे हृदयविकाराचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्याचप्रमाणे डोळ्यांतील मोतीबिंदू मधुमेही रुग्णांमध्ये अधिक दिसून येतो. नाचणी धान्यामध्ये असणार्या सत्त्वयुक्त अन्नघटकांचा विचार करता नाचणीचे पीठ तयार करून त्यापासून चपाती, रोटी, आंबील, शेवया, पापड अशा असंख्य स्वरूपाची मूल्यवर्धित उत्पादने भाजून, उकडून, वाफवून किंवा अंबवून केली असता अत्यंत सत्त्वयुक्त होतात. नाचणीचे विविध पदार्थ बनविण्याचे कौशल्य मिळवून सातत्याने त्याचे सेवन केल्यास प्रकृती उत्तम राहते. त्याचबरोबर विक्रीयोग्य पदार्थ बनवून त्याची विक्री केल्यास आर्थिक मदतही होते.
 
या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणार्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढत्या वयाची मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात. नाचणीचे हे पीक दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे हे पीक आहे. नाचणीचे बी मुठीने जमिनीवर फेकून लागवण करतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नागलीचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो आणि विशेष म्हणजे कष्टकरी वर्गात तो अधिक होतो. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी मदतच होते.
 
आपण अन्नघटकांचा विचार करताना राखेचा किंवा कार्बनचा विचार करत नाही. वास्तविक हाच घटक पित्तशामक असतो. आपल्याकडे पिकणारी परदेशी ओटस या दोन्हीमध्ये हे प्रमाण 3 टक्के असते. म्हणूनच पित्तशमनासाठी आपण आंबिल घेतो. मेंदूला चेतना देणारे काही घटक आहेत. उदा. विशिष्ट फॉस्फेटस ही केळी आणि नाचणी यात भरपूर असतात. म्हणूनच केळाचे दह्यामध्ये केलेले शिकरण आणि नाचणीची भाकरी ही लहान मुलांच्या (वाढीच्या वयात) वाढीसाठी अनुपम ब्रेन टॉनिक आहे.
 
नाचणीचे आरोग्यदायी फायदे :
 
1) नाचणीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 7 ते 10 टक्के असते. नाचणी हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे. यात तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण मुबलक असल्याने बद्धकोष्ठता होत नाही, तसेच धाग्यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी नाचणी फायदेशीर आहे.
2) स्निग्ध पदार्थ व कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असल्याने हृदयरोग्यांसाठी उपयुक्त आहे. शीतल असल्याने शरीरातील उष्णता कमी होते. यामध्ये नैसर्गिक लोह असते. त्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ऍनिमिया’ आजार टाळण्यासाठी नाचणीचे पदार्थ आहारात आवश्यक आहेत.
3) नाचणी पचण्यास हलकी असल्याने आजारातून उठलेल्यांना नाचणीची पेज, आंबिल, भाकरी आरोग्यदायी ठरते. नाचणी ही काटकपणा आणते. यामुळे खेळाडूंच्या आहारात नाचणी असलीच पाहिजे.
4) नाचणीचे साजूक तुपातले लाडू, नाचणी शिरा, नाचणीची पेज हे खेळाडूंसाठी चांगले पौष्टिक पदार्थ आहेत. पित्ताचे विकार, अजीर्ण, अल्सर, ग्लुटेन अॅलर्जी, पचनसंस्थेची शस्त्रक्रिया झालेल्यांना नाचणी पथ्यकारक आहे. नाचणीला मोड आणल्यानंतर वाळवून नंतर त्याचे पीठ केल्यास त्याचे पोषणमूल्य वाढते.
5) नाचणीला मोड आणल्यानंतर त्यातील लोहाचा बाधक ठरणारा घटक (टॅनिन) कमी होतो व लोहाचे शोषण शरीरामध्ये जास्त होऊ शकते. नाचणीत इतर धान्यांच्या तुलनेत मुबलक कॅल्शिअम असल्याने हाडे व स्नायू बळकट होतात. त्यामुळे याचे प्रक्रियायुक्त पदार्थ लहान मुले, अशक्त व आजारी व्यक्ती, गर्भवती माता यांसाठी उपयुक्त असतात.
6) नाचणीत विविध प्रकारची शरीरोपयोगी अमिनो आम्ले उपलब्ध असतात. ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल नाचणीमध्ये अधिक प्रमाणात असल्याने भूक कमी करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे.
7) वॅलीन हे आम्ल चयापचयासाठी उपयुक्त आहे. शरीराची झीज भरून काढते, मानसिक थकवा कमी करते. मिथीऑनीन हे आम्ल केसाचे व त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. लेसिथीन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.
 
नाचणीतील प्रमुख पोषकद्रव्यांचे प्रमाण :
1. ऊर्जा (कॅलरी) : 336
2. कर्बोदके (ग्रॅम-72)
3. प्रथिने (ग्रॅम)- 7.7
4. स्निग्ध पदार्थ (ग्रॅम) : 1.3
5. तंतुमय पदार्थ (फायबर) (ग्रॅम)- 3.6
6. कॅल्शिअम (मि.ग्रॅ.)- 344
7. फॉस्फरस (मि.ग्रॅ.)- 283
8. लोह (मि.ग्रॅ.)- 3.9
 
नागलीचे पीठ कसे तयार करावे :
 
नाचणीचे पीठ खाली दिलेल्या 2 प्रकारे केले जाते.
 
प्रकार पहिला : ड्राय रोस्ट :
नाचणी चाळून नीट निवडावी. अतिशय मंद गॅसवर जाड बेसचे पातेले ठेऊन त्यात ती भाजावी. सतत फिरवत राहावे लागते. गॅस बारीकच असला पाहिजे. खमंग भाजू नये. भाजलेली नाचणी दळून त्याचे पीठ करावे.
प्रकार दुसरा : सन ड्राय : 
गॅसवर नाचणी न भाजता, उन्हात ठेवावी. गॅसवर काही प्रमाणात पौष्टिकता कमी होते. त्यामुळे जर तुमच्या घरात सूर्यप्रकाश भरपूर येत असेल तर उन्हात हलकी भाजावी आणि दळावी. नाचणी पटकन दळली जात नाही. बराच वेळ मिक्सर चालवावा लागतो किंवा बाहेरून दळून आणावी. नाचणीचे पीठ आणि नाचणीचे सत्त्व या भिन्न गोष्टी आहेत. 
नागलीपासून बनवले जाणारे पदार्थ :
1. नाचणी आंबील :
साहित्य : नाचणीचे पीठ 1 वाटी, ताजे ताक 2 वाटी, लसून 5 पाकळ्या, चवीपुरते मीठ.
कृती : नाचणीचे पीठ रात्री दोन वाट्या पाण्यात भिजत घालावे. सकाळी पातेल्यात 4 वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात मीठ घालावे आणि भिजलेले नाचणीचे पीठ हळूहळू वैरावे. चमच्याने एकसारखे हलवावे व चांगली ऊकळी येऊ द्यावी. आंबील थंड झाल्यावर त्यात लसूण ठेचून टाकावा आणि ताक घालावे. आवडत असल्यास कोथिंबीर व कांदा चिरून टाकावा.
 
2. नाचणीचे पापड :
साहित्य : 500 ग्रॅम नाचणीचे पीठ, 17 ग्रॅम मीठ, 15 ग्रॅम पापडखार, 5 ग्रॅम मिरची, 3 ग्रॅम तीळ, 2 ग्रॅम जिरे.
कृती : नाचणी रात्री धुवून त्याची पुरचंडी बांधून ठेवावी, दुसर्या दिवशी पुरचुंडी सोडून नाचणी चांगली सावतील सुकल्यावर दळावी. नंतर ते पीठ वस्त्रगाळ करून घ्यावे. जेवढे पेले पीठे असेल तेवढे पेले गॅसवर उकळत ठेवावे. पाण्यामध्ये वरील सर्व मसाला घालावा. पाण्याला उकळी आल्यावर नाचणीचे पीठ त्यात थोडे थोडे टाकावे आणि पिठाची उकड करावी. तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे. त्यानंतर प्लॅस्टिक कागद खालीवर घालून पोळपाटावर छोटे छोटे पापड लाटावे आणि नंतर सावतील वाळवावेत. पापड ऐवजी लाटीला चिरल्यास नाचणी चिप्स तयार होतील. चिप्स छोटे असल्याने वाहतुकीस आणि तळण्यास सोपे जातात आणि पॅकिंगही सहजपणे चांगले करता येते.
 
3. नाचणीचे सांडगे :
साहित्य : अर्ध किलो नाचणी, हिंग, तीळ, मीठ चवीनुसार.
कृती : नाचणी एक दिवस पाण्यात भिजत घालावी. नंतर ती वाटून तिचे सत्त्व काढावे. जितके सत्त्व असेल तितकेच पाणी गॅसवर ठेवावे. त्यात हिंग, मीठ, तीळ घालावे. उकळी आल्यावर त्यात वरील सत्व एका हाताने ओतावे आणि दुसर्या हाताने ढवळावे, गुठळी होऊ देऊ नये. चांगले शिजल्यावर प्लॅस्टिक कागदावर सांडगे घालावे आणि चांगले वाळवून भरून ठेवावे.
 
4. नाचणी चकली :
साहित्य : 2 वाटी नाचणीचे पीठ, आर्धी वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, पाव वाटी ज्वारीचे पीठ, पाव वाटी बेसन पीठ, मीठ व तिखट चवी पुरते, 1 टी स्पून तेलाचे मोहन, तळण्यासाठी 2 वाटी तेल, ओवा आणि तीळ प्रत्येकी 1 टी स्पून.
कृती : सर्व पिठे हाताला कोमट लागतील इतपत भाजून घ्यावीत. 1 टी स्पून तेलाचे मोहन घालणे. ओवा, तीळ घालून सर्व कोमट पाण्यात मळून नेहमीसारख्या चकल्या कराव्यात.
 
5. नाचणी माल्ट किंवा नाचणी सत्त्व : 
नाचणी धान्य साफ करून जवळपास 24 तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर ते पाण्यातून काढून पातळ सुती कपड्यात त्याला मोड येण्यासाठी बांधून ठेवावेत. मोड साधारणपणे 1 सें. मी. लांबीचे आल्यानंतर धान्य सुकवण्यासाठी ताटामध्ये उन्हात चांगले वाळवून घ्यावे. धान्य पूर्ण सुकल्यानंतर हाताने रगडून मोड धान्यापासून वेगळे करावेत. नाचणी धान्य कढईत मंद आचेवर 5 ते 10 मिनिटे गरम करून घ्यावेत. नंतर या धान्याचे पीठ करून घ्यावे. पीठ चांगले चाळून घ्यावे. हेच पीठ बाजारात नाचणी सत्व म्हणून विकले जाते. या नाचणी सत्त्वाचाच बहुउपयोगी पिठामध्ये वापर करून हलवा, बिस्कीट, बर्फी तसेच गोड लापशी बनवता येते.
 
6. नाचणी शेवया :
साहित्य : नाचणी पीठ 500 ग्रॅम + गव्हाचे पीठ 400 ग्रॅम, भाजलेले सोयाबीन पीठ 100 ग्रॅम, चवीपुरते मीठ.
कृती : वरीलप्रमाणे सर्व पिठे एकत्र करून घ्यावीत. त्यामध्ये पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे आणि शेवया मशिनमधून शेवया तयार करून उन्हात वाळवाव्यात. ही शेवया बनविण्याची कृती एवढ्यासाठी सांगितली की आता लोक फार आहाराची काळजी घेतात. त्यात मधुमेही आणि हृदयरोगी रुग्णासाठी या शेव्यांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. त्यामध्ये प्रथिने, फॅट, कार्बोहाड्रेटस कॅल्शियम, लोह आणि कॅलरी (एनर्जी) यांचे प्रमाण संतुलीत राखण्यास मदत होते. या शेवयांचा वापर करून शेवयाची खीर, पुलाव, उपमा, इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, कटलेट असे अनेक पदार्थ तयार करता येतात.

pith_1  H x W:
 
7. बहुउपयोगी पीठ: 
बहुउपायोगी पीठ बनविण्यासाठी कोणत्याही धान्याचे माल्ट किंवा सत्व वापरता येते. यामध्ये शेंगदाणे भाजून त्याची सालपट काढून बारीक पीठ तयार करावे. तसेच काळे सोयाबीन भाजून त्याचे तयार केलेले पीठ तसेच गव्हाचे सत्वाचे पीठ वापरता येते. या बहुउपयोगी पिठाचा वापर करून लहान मुलांचा शिशु आहार बनविला जातो.
 
शिशुआहार : 
आईचे दूध लहान बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहेच परंतु सहा महिन्यांनंतर बाळाची वाढ होते आणि त्याची भूकही वाढते. त्यामुळे त्याचे फक्त आईच्या दुधावर पोट भरत नाही. अशावेळी प्रत्येक आई बाळास तांदळाची पेज, डाळींचे सूप देत असते. परंतु यामुळे बाळाचे पूर्ण पोषण होत नाही. यासाठी बाळाच्या आहारात बहुपयोगी पिठाचा वापर करून गोड लापशी करता येते.
 
साहित्य : नाचणी सत्त्व पीठ एक वाटी, भाजलेले काळे सोयाबीनचे सत्त्वपीठ मोठा दीड चमचा, गहू सत्वपीठ मोठा दीड चमचा असे बहुउपयोग पीठ + साखर + गरम पाणी 120 मि.ली.
कृती : एका भांड्यामध्ये साधारणत: एक पेलाभर (120 मि.ली.) गरम पाणी घ्यावे. त्यामध्ये 50 ग्रॅम बहुउपयोगी आटा घालावा आणि त्यात 20 ग्रॅम साखर घालावी. अशी ही गोड लापशी लहान बाळासाठी तयार होते. ही लापशी बनवण्यासाठी गव्हाचे सत्त्व आणि काळ्या सोयाबीन पिठाचे सत्त्व वापरल्यामुळे त्यामधून आमायलेज एन्झाईम चांगले मिळते, ज्यामुळे स्टार्चवर प्रक्रिया करून त्यापासून माल्टोज म्हणजेच डेक्स्ट्रीजनमध्ये परावर्तित होते. त्यामुळे लापशी पातळ होते आणि बाळ ते सहजपणे गिळू शकते. ही गोड लापशी बाजारात मिळणार्या तयार बेबी फूडपेक्षा स्वस्त आणि पौष्टिक असते.
 
8. नाचणी केक :
साहित्य : नाचणी पीठ 200 ग्रॅम, साखर 100 ग्रॅम, लोणी 200 ग्रॅम, अंडी 4, पाणी, थोडे काजू.
कृती - वरील साहित्य वापरून नेहमीच्या केक तयार करण्याच्या पद्धतीने बेकिंग ओव्हनचा वापर करून नाचणीपासून केक तयार करता येईल. तयार केक नाचणीच्या नैसर्गिक चॉकलेटी रंगामुळे आकर्षक दिसतो.

cookies_1  H x  
 
9. नाचणीची बिस्किटे:
10-20 टक्के नाचणी पीठ मैद्यात मिसळून त्यापासून बेकिंग ओव्हनमध्ये बिस्किटे तयार करता येतात. नाचणी टाकल्यामुळे बिस्किटांच्या चवीला व रंगाला काहीही फरक न पडता उलट त्यांचा रंग आकर्षक होतो. सध्या बाजारात नाचणीची बिस्किटे मिळतात. ती नेहमीच्या प्रकारच्या बिस्किटांना चांगला पर्याय आहेत.

dosa_2  H x W:  
 
10. नाचणी बेसन डोसे :
साहित्य : नाचणीचे पीठ 2 वाट्या, बेसन 1 वाटी, आलं-लसूण-मिरची पेस्ट, हळद, कोथिंबीर (बारीक चिरून), 2 टोमॅटो (प्युरी करून), मीठ व तेल. 
कृती : तेल वगळून बाकी सगळे साहित्य पाणी घालून एकत्र करावे. डोशाच्या पिठाएवढे पातळ करावे. नॉनस्टिक पॅनवर थोडे तेल टाकून डोसे बनवावेत. चटणी किंवा सॉसबरोबर डोसे खावेत.

dosa_1  H x W:  
 
11. नाचणीचा डोसा-उत्तपा :
साहित्य : उडदाची डाळ अर्धी वाटी, नाचणी पीठ दीड वाटी, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, मेथी दाणे एक चमचा, एक कांदा (बारीक चिरून), कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एक चिरलेले टोमॅटो. 
कृती : डाळ आणि मेथी दाणे रात्री भिजत घालावेत. दुसर्या दिवशी दोन्हींमधील पाणी काढून मिक्सरमधून वाटून घ्यावे. डाळ आणि वाटलेली सर्व पिठं, तांदूळ, नाचणी आणि उडदाची वाटलेली डाळ मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे रात्री पीठ भिजवून ठेवावे. सकाळी मीठ, कांदा, कोथिंबीर घालून डोसा किंवा उत्तप्पा करावेत. कांदा, कोथिंबीर न घालता प्लेन डोसे नॉनस्टिक तव्यावर करावेत.
 
12. नाचणीचा ढोकळा :
साहित्य : नाचणी पीठ 1 वाटी, आंबट ताक पाव वाटी, पाणी पाव वाटी, आलं, लसूण व मिरची पेस्ट प्रत्येकी 1 चमचा, तेल 2 चमचा, चवीप्रमाणे मीठ.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून भांड्याला तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं वाफवावे. ढोकळ्यावरून हिंग-मोहरीची फोडणी देऊन खोबरं, कोथिंबिरीने सजवावा.
13. नाचणीचा उपमा :
साहित्य : नाचणी 1 वाटी, मेथी 1 टीस्पून, मोडाचे मूग 1 टेबलस्पून, गाजर-टोमॅटो प्रत्येकी 1 टेबलस्पून, 2 बारीक चिरून मिरच्या, हिंग, मोहरी, आलं-लसूण पेस्ट, तेल, जिरे, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबूरस.
कृती : नाचणीला भिजवून मोड आणून वाफवावे. थोड्या तेलात मोहरी, जिरे घालून फोडणी घालावी. यात मिरच्या, कढीपत्ता घालावा. आलं-लसूण पेस्ट घालावी. गाजर किसून, टोमॅटो चिरून, मूग, मेथ्या सर्व घालून पाच मिनिटे शिजवावे. दोन-तीन वाफा आल्या की नाचणी घालावी. मीठ व लिंबूरस घालून ढवळून परत दोन मिनिटे गॅसवर ठेवावे. गरम-गरम उपम्यावर कोथिंबीर व शेव घालून खायला द्यावे.
 
14. नाचणी वडा :
साहित्य : नाचणी पीठ दीड कप, कढीपत्ता अर्धा कप, 2-3 मिरच्या, चवीपुरते मीठ, 1 कांदा.
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून पाण्यासोबत मिसळून त्याची कणीक तयार करावी. कणकेचे बारीक गोळे थापून ते तेलात तळावेत. हे नाचणी वडे केचपसोबत खावेत.
 
15. नाचणीचे आप्पे :
साहित्य : नाचणी धुवून जाडसर रव्याप्रमाणे दळावी. हे पीठ एक वाटी, बारीक रवा एक चमचा, गूळ (किसून) अर्धी वाटी, वेलची पूड एक चमचा, काजू तुकडे अर्धा वाटी, चिमूटभर खायचा सोडा, नारळाचं घट्ट दूध एक वाटी.
कृती : सर्व साहित्य मिसळून भिजवावं. आप्पे पात्र बाजारात मिळेल. या आप्पेपात्रात प्रत्येक वाटीत एक एक चमचा तूप घालून त्यात दोन चमचे पिठाचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून पाच मिनिटांनी कडेने पीठ सुटू लागेल. मग सुरीने सोडवून घ्यावं. उलटून जरा दोन मिनिटं भाजून काढावेत. हे खुसखुशीत आप्पे न्याहारीला उत्तम.
 
16. नाचणी सत्वाची लापशी:
नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात अ’ जीवनसत्त्व आणि लोह असते. लापशी प्यायल्याने शरीराला आलेली मरगळ निघून जाते. लापशी लहान मुलांसाठी तर खूपच उत्तम आहे.
कृती- एकदम सहज सोपी आहे. ताकामध्ये दोन चमचे नाचणी सत्त्व आणि चवीपुरते मीठ मिसळून उकळी येईपर्यंत किंवा ताक गाढे होईपर्यंत उकळावे. गरमच खाल्लेले छान लागते.
 
17. नाचणीची खीर:
साहित्य : एक वाटी नाचणीचे पीठ, साजूक तूप, कोमट पाणी किंवा दूध, साखर किंवा गूळ, मीठ.
कृती : प्रथम थोडे तूप घेऊन नाचणीचे पीठ भाजून घ्यावे. त्यात कोमट पाणी किंवा दूध पातळ खिरीसारखे होईल असे मिश्रण करावे. नंतर त्यात आपल्याला किती गोड हवे या प्रमाणात साखर किंवा गूळ घालावा. चवीपुरते मीठ टाकावे. मधे-मधे चमच्याने हलवावे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
 
एक उकळी आल्यानंतर बंद करावे. वरून हवे असल्यास दोन चमचे साजूक तूप टाकून 10 मिनिटांनंतर पिण्यास द्यावे. अशी ही नाचणीची खीर बनविण्यास सोपी, लवकर तयार होणारी, आरोग्यदायक व उत्साह आणणारी आहे. थंड असल्यामुळे पित्त प्रकृतीच्या माणसांनी घेतल्यास जळजळ, दाह हे लक्षण कमी होते. सहा महिन्यांपुढील लहान मुलांना दिल्यास त्यामध्ये असलेल्या प्रोटिन, कॅल्शिअम या घटकांचा बालकांच्या वाढीस फायदा होतो.
 
18. मेथी नाचणी सूप :
साहित्य : एक टेबलस्पून नाचणीचे पीठ, एक कप बारीक चिरलेली मेथी, थोडा बारीक किसलेला लसूण, प्रत्येकी एक टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट किंवा बदामपूड आणि तूप, 2-3 कप पाणी, एक टीस्पून ओवा, चवीपुरते मीठ, मिरेपूड, सजावटीसाठी किसलेले खोबरे.
कृती : सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करावी. एका भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात लसणाची फोडणी करून ओवा, थोडे मीठ आणि मेथी टाकावी. मेथी थोडी हलवा आणि दोन-तीन मिनिटे शिजू द्यावी. नंतर त्यात उरलेले पाणी, थोडे मीठ, मिरेपूड, शेंगदाण्याचा कूट किंवा बदामपूड घाला. सूप गार झाले की थोडे घट्ट होते, त्यामुळे पाणी जरा जास्तच घालावे. पाणी चांगले उकळले की त्यात नाचणीची पेस्ट टाकून थोड्या-थोड्या वेळाने हलवत राहावी. चार-पाच मिनिटे सूप चांगले शिजू द्यावे. गरमागरम सूप वाटीमध्ये काढून त्यावर खोबरे टाकून खायला द्यावे.
 
19. नाचणीची कढी :
साहित्य : गोड आंबट ताक एक वाटी, नाचणीचे पीठ 3 ते 4 चमचे, साजूक तूप अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, चिमूटभर हिंग, हिरवी मिरची, धने-जिरे पावडर एक चमचा, मीठ आणि कोथिंबीर.
कृती : तूप गरम करून त्यात जिरे व बारीक केलेली हिरवी मिरची टाका. दोन मिनिटांनंतर नाचणीचे पीठ टाकून त्यात ताक टाका. मिश्रण पुन्हा पुन्हा ढवळत राहा. नंतर त्यामध्ये हिंग, धने-जिरे पावडर टाका. चवीपुरते मीठ टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, मिश्रण चमच्याने हलवत राहा. एक उकळी आल्यानंतर नागलीची कढी भाताबरोबर/खिचडीसोबत खाण्यास तयार होते.
असे हे नाचणीचे आहारातील महत्त्व आणि वेगवेगळे मूल्यवर्धित उत्पादने.
 
 डॉ. गणेश बाळासाहेब शेंडगे 
प्राध्यापक (कृषीविद्या विभाग)
कृषी महाविद्यालय, बारामती.डॉ. राधिका अशोक भोंगळे 
प्राध्यापक (कृषीविस्तार विभाग)
कृषी महाविद्यालय, बारामती. श्री. संतोष सुभाष शेंडे
कृषीविस्तार विभाग
कृषी महाविद्यालय, परभणी.