कवठ

डिजिटल बळीराजा-2    28-May-2020
|

kavath_1  H x W
 
कवठ फार थोड्या प्रमाणात खाण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे भक्कम बाजारपेठ मिळत नाही. जर या फळापासून नानाविध पदार्थ तयार केल्यास चांगला बाजारभाव वाढून आर्थिक उत्पन्नही वाढू शकते.
 
कवठ हे मुख्यतः रुटेसी या प्रवर्गातील फळ असून याचे शास्त्रीय नाव फेरोनिया एलिफंट असे आहे. या फळाचे मूळ स्त्रोत भारत देश असून, आजमितीला हे फळ बांगलादेश, थायलंड आणि इतर दक्षिणपूर्व आशियामध्ये घेतले जाते. कवठाच्या झाडाची उंची 6-10 मीटर असून हे फळ गोल ते अंडाकृती या आकारातील आहे. 5-12 सेंमी रुंद व टणक असते. या झाडाची वाढ कोरडवाहू क्षेत्रामध्ये व कमी पाण्याच्या उपलब्धतेमध्येसुद्धा होते. या फळाची साल कठीण असून, फळाचा रंग करडा असतो व आत मृदू गर आणि लांबट बिया असतात. कवठ चवीला आंबट-गोड आणि तुरट असतं. कवठ फार थोड्या प्रमाणात खाण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे भक्कम बाजारपेठ मिळत नाही. जर या फळापासून नानाविध पदार्थ तयार केल्यास चांगले आर्थिक उत्पन्नही मिळू शकते. यापासून प्रामुख्याने चटणी, जाम, जेली, सरबत असे पदार्थ बनवले जातात.
 
कवठाचे गुणधर्म :
 
पिकलेले कवठ हे बिटा क्यारोटिनचा उत्तम स्त्रोत आहे. याशिवाय जीवनसत्त्व ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ ही यात आहे. 
या फळाच्या सेवनाने पित्तशमन होण्यास मदत होते.
कवठसेवनाने कंठाची शुद्धी होते. त्यामुळे आवाज चांगला होतो.
अन्नपचन होण्यास मदत होते.
दमा, क्षयरोग, रक्तविकार, उलटी, वातदोष, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी आदी विकारांवर हितकारी असते.
उष्ण, पित्त, वात या तिन्ही दोषांचं संतुलन राखते.
त्वचा व केसांच्या वाढीसाठीसुद्धा हे उपयुक्त आहे.
याच्या झाडापासून मिळणारं लाकूड हे मजबूत आणि टिकाऊ असल्याने घरबांधणीसाठी आणि शेतीची अवजारे करण्यासाठी उपयोग केला जातो.
 
कवठापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ : 
 
1. जाम : कावठापासून जाम तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठे घ्यावीत व ती सुरीने फोडून गर काढून घ्यावा. एका पातेल्यामध्ये थोडे पाणी मिसळून गराचा लगदा करून तो चाळणीत घेऊन त्याचा गर पातेल्यात काढून घ्यावा. तयार गर जाम करण्यासाठी वापरावा.
प्रमाण : कवठाचा गर (1 किलो), साखर (1 किलो), सायट्रिक आम्ल (2 ग्राम प्रतिकिलो).
 
कृती :
 • पातेल्यामध्ये गर आणि साखर सम प्रमाणात घ्यावे.
 • मिश्रणाला मंद आचेवर 15 मिनिटे ठेवावे. मधूनमधून पळीच्या साहाय्याने मिश्रण हलवून घ्यावे.
 • सायट्रिक आम्ल थोड्या मिश्रणात पूर्ण विरघळून परत ते मिश्रणात टाकून एकजीव करावे.
 • गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा ब्रिक्स रीफ्राक्टोमीटरने मोजावा. 65 डिग्रीच्या पुढे ब्रिक्स येईपर्यंत जाम शिजवावा. 
 • तयार झालेला जाम ठेवण्यासाठी निर्जंतुक केलेल्या बाटल्यांचा वापर करावा.
2. जेली : कावठापासून जाम तयार करण्यासाठी अर्धवट पिकलेली मोठ्या आकाराची कवठे घ्यावीत व ती सुरीने फोडून गर काढून घ्यावा. एका पातेल्यामध्ये थोडे पाणी मिसळून गराचा लगदा करून तो चाळणीत घेऊन त्याचा गर पातेल्यात काढून घ्यावा. 
 
प्रमाण : कवठाचा रस (1 किलो), साखर (1 किलो), सायट्रिक आम्ल (2 ग्राम प्रतिकिलो).
 
कृती :
 • कवठाच्या गराएवढेच सम प्रमाणात पाणी घेऊन त्यात सायट्रिक आम्ल टाकावे. 
 • हे मिश्रण मंद आचेवर 20 ते 25 मिनिटे ठेवून पळीने मधूनमधून हलवावे.
 • पातेले खाली घेऊन मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर यातील रस मलमलच्या कापडाने गळून घ्यावे. उरलेला लगदा परत एकदा शिजवून त्यातील रस काढावा.
 • रस 1 दिवस उभट भांड्यात ठेवावा. जेणेकरून तळातील साका वेगळा करता यावा.
 • मिश्रणात सम प्रमाणात साखर टाकून पळीने विघ्ळून घ्यावी. पातेले मंद आचेवर ठेवावे.
 • जेली तयार होताना मिश्रणावरील पांढरा फेस काढून टाकावा. शेवटी जेलीचा ब्रिक्स रीफ्राक्टोमीटरने मोजावा. 68 डिग्रीच्या पुढे जेलीचा ब्रिक्स असावा. 
 • तयार झालेली जेली ठेवण्यासाठी निर्जंतुक केलेल्या बाटल्यांचा वापर करावा.

catni_1  H x W:
3. कवठाची चटणी : कवठाचा गर (1 वाटी), गूळ (1 वाटी), मिरची पावडर (चवीप्रमाणे), जिरे (1 चमचा), मीठ गरजेनुसार
 
कृती :
 
 • कावठापासून चटणी तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठे घ्यावीत व ती सुरीने फोडून गर काढून घ्यावा. 
 • कवठाच्या गराच्या सम प्रमाणात साखर घ्यावी.
 • जिरे थोडेसे भाजून बारीक करावे. नंतर सर्व पदार्थ जसे कवठाचा गर, गूऴ, जिरे, मिरची पावडर, मीठ सर्व एकत्र करावे.
 • दिलेले सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये घ्यावे. सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर चटणी वाटा. चटणी तोंडी लावण्याचे पदार्थ म्हणून वापरता येते. कवठाची चटणी ही चवीला आंबट-गोड अशी लागते. 
 
प्रा. रामेश्वर जाजू , प्रा. दीपाली लोहिया 
(9405451019)