प्रक्रियेद्वारे अंजीर फळाचे मूल्यवर्धन

डिजिटल बळीराजा-2    28-May-2020
|

anjir_1  H x W:
 
अंजीर फळामध्ये आहारमूल्याबरोबरच औषधी गुणधर्मही चांगले असल्याने त्यापासून तयार केलेल्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. ज्यावेळी बाजारात फळांची आवक जास्त होते त्यावेळी त्यांचे दर कोसळतात, अशावेळी त्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास, होणारे शेतकर्यांचे नुकसान काही प्रमाणात कमी करता येईल.
 
अंजीर फळामध्ये आहारमूल्याबरोबरच औषधी गुणधर्मही चांगले असल्याने त्यापासून तयार केलेल्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. ज्यावेळी बाजारात फळांची आवक जास्त होते त्यावेळी त्यांचे दर कोसळतात, अशावेळी त्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास, होणारे शेतकर्यांचे नुकसान काही प्रमाणात कमी करता येईल. या फळापासून आपणास सुकविलेले अंजीर, जॅम, अंजीर पोळी, कॅन्डी, हवाबंद डब्यातील अंजीर, (कॅानिंग), बर्फी, इत्यादी विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात, परंतु काही ठरावीक पदार्थांना बाजारात चांगली मागणी असते. उदा. सुकविलेले अंजीर, पोळी, जॅम, इत्यादी. बाजारात जे सुके अंजीर मिळतात ते अफगाणिस्तानमधून आयात केलेले सुके अंजीर असतात.
 
अंजीरापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ :

suke anjir_1  H 
 
1. अंजीरापासून सुके अंजीर :
 
सुके अंजीर तयार करण्यासाठी प्रथम चांगली निरोगी फळे निवडावीत. ज्यांचा टीएसएस 17 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान असावा. निवडलेली फळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. फळे फडक्यात बांधून 1 टक्के केएमच्या उकळत्या पाण्याच्या द्रावणात अर्धा तास धरावीत. नंतर ती थंड करून त्यांना प्रतिकिलो 2 ग्रॅम याप्रमाणे गंधकाची धुरी दोन तास द्यावी. धुरी दिल्यानंतर फळांना पिवळसर रंंग येतो व साठवण्याच्या काळात बुरशीची लागण होत नाही. यानंतर फळे ट्रेमध्ये पातळ पसरून ड्रायरमध्ये 55 ते 60 अंश सेंं. तापमानास दोन दिवस ठेवावीत. फळातील पाण्याचे प्रमाण 16 टक्क्यांच्या दरम्यान आल्यास ती सुकली आहेत असे समजावे. ड्रायरमधून काढून थंड करून किचन प्रेसच्या साहाय्याने चपटी करून वजन करुन पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून, पिशव्या हवाबंद करून, लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. सर्वसाधारणपणे 1 किलो अंजीरापासून 200-250 ग्रॅम सुकलेले अंजीर मिळतात.

poli anjir_1  H 
2. अंजीराची पोळी :
 
ज्याप्रमाणे फणसापासून किंवा आंब्यापासून पोळी तयार करता येते त्याचप्रकारे आपणास अंजीरापासून सुद्धा उत्तम प्रकारची पोळी तयार करता येते. यासाठी पिकलेली निरोगी चांगली फळे निवडून घ्यावीत. फळे पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यांचे देठ काढून ते मिक्सरला लावून गर एकजीव करून घ्यावा. या गरामध्ये एक किलोचा 100 ते 150 ग्रॅम साखर व 5 ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकून, विरघळून घेऊन, 80-90 अंश सें. तापमानास 10-15 मिनिटे गरम करावे व ताटामध्ये/ट्रेमध्ये पातळ थरात पसरून द्यावे व वाळविण्यास ठेवावे. असे एकावर एक थर देऊन थराची जाडी 1 सेंमी करावी. वाळविल्यानंतर वजन करून, पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून, हवाबंद करून, लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

barki anjir_1   
 
3. अंजीर बर्फी :
 
गायीच्या किंवा म्हशीच्या दुधामध्ये अंजीराचा गर वापरून आपणास उत्तम प्रकारची बर्फी तयार करता येते. या बर्फीला बाजारात चांगली मागणी असते. बर्फी तयार करण्यासाठी प्रथम गाईचे किंवा म्हशीची प्रमाणित केलेले स्वच्छ दूध घ्यावे. हे दूध मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे दूध कढईमध्ये घेऊन गरम करण्यास ठेवावे. गरम करताना दूध कढईला लागून करपनार नाही याची काळजी घ्यावी. दूध घट्ट होऊ लागले म्हणजे तापमान कमी करावे. घट्ट होऊ लागलेले दूध कढईच्या बाजू सोडून मध्यभागी गोळा होऊ लागले म्हणजे खवा तयार झाला आहे असे समजावे. खव्याचे वजन करून त्याच्या वजनाच्या 5 ते 10 टक्के अंजीराच्या फळांचे तुकडे व 30 टक्के साखर मिसळावी. नंतर हे मिश्रण गरम करावे व पळीने/उलथण्याने ढवळत राहावे. हे मिश्रण कढईच्या बाजू सोडून मध्यभागी जमा होऊ लागले म्हणजे गरम करणे थांबवावे. हे गरम मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये 1.5 सेमी जाडीचा थरात पसरावे. हे ट्रेज 10-12 तास थंड करावेत. नंतर बर्फीचे चौकोनी किंवा आयताकृती तुकडे पाडावेत. हे तुकडे बटर पेपरमध्ये गुंडाळावेत. अशा तर्हेने केलेली बर्फी एक आठवड्यापयर्ंंत चांगली राहते.
 
अशा तर्हेने आपणास अंजीरापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास शेतकर्यांना चांगला भाव मिळेल व असे उद्योग खेडोपाडी उभारल्यास त्यातून रोजगारनिर्मिती होऊ शकेल. यासाठी प्रक्रियायुक्त पदाथार्ंंच विक्रीकडे लक्ष दिले पाहिजे.
 
 
डॉ. विष्णू गरंडे
प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग
कृषी महाविद्यालय, कोल्हापूर