बंदीस्त शेळीपालन

डिजिटल बळीराजा-2    28-May-2020
|

mendhi_1  H x W
 
 
या लेखात बंदीस्त शेळीपालनसाठी महत्वाच्या बाबी, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्याची कारणे या संबंधीची माहिती सादर केली आहे.
 
आपल्या देशात शेळीपालन व्यवसाय हा पारंपारिक पद्धतीने शेळ्यांना बाहेर चरायला सोडून केला जात असे. परंतु सध्या नष्ट झालेली चराऊ कुरणे, झाडांची कमी झालेली संख्या, चरण्यासाठी कमी असलेली जागेची उपलब्धता लक्षात घेता तसेच करडांची वजनवाढ याबाबींचा अभ्यास केल्यास बंदिस्त शेळीपालन करणे अनिवार्य झाले आहे. बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यांना आवडणारा पौष्टिक चारा गरजेनुसार पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शेळ्यांना करडांची संख्या वाढविण्यासाठी तसेच करडांच्या जलद वाढीसाठी संतुलित पशुखाद्य दिले जाते.

mendhi_1  H x W 
 
बंदिस्त शेळीपालन किफायतशीर असण्याची कारणे पुढीलप्रमाणे -
 
1. चार्याच्या शोधासाठी दिवसभर फिरण्यासाठी लागणार्या ऊर्जेची बचत होऊन ती शरीर व वजनवाढीसाठी उपयोगात येते.
2. दिवसभर फिरून चारा न खाता दिवसभरात गरजेएवढा चारा व खाद्य दिवसातून केवळ दोन वेळा खाऊन रवंथ करण्यामुळे चार्याचे मांसात व दूधात रुपांतर करण्याचे प्रमाण वाढते.
3. शेळ्यांना चराऊ कुरणात, डोंगर उतारावर, डोंगरमाथ्यावर, शेतामध्ये चारण्यामुळे बराच चारा शेळ्यांच्या पायामुळे, लेंड्या व मूत्रामुळे वाया जातो तसेच शेळ्या सतत एकाच ठिकाणी चरण्यामुळे कुरणावर उत्तम प्रकारे चार्याची वाढ होत नाही त्यामुळे चारा उत्पादन घटते. याउलट बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा वाया न जाता चार्याचा सुयोग्य वापर होतो तसेच कुरणातील चारा उत्पादन वाढते. कुरणाचा विनाश टाळता येतो.
4. प्रजननावर नियंत्रण राहून नको असलेले प्रजनन टाळता येते. प्रजननासंबंधीत समस्या लक्षात येऊन वेळीच औषधोपचार करता येतात.
5. बंदिस्त शेळीपालन पद्धतीमुळे शेळ्यांच्या लेंड्या जमा करून त्यांचा उत्तम प्रकारचे खत म्हणून जास्त प्रमाणात वापर होतो.
6. शेळ्यांतील परजिवींचा प्रादुर्भाव कमी होण्यास व नियंत्रण होण्यास मदत होते.
7. शेळ्यावर सतत लक्ष राहून शेळ्यांचे व्यवस्थापन सहजसोपे होते.
8. शेळीपालनातील सर्व दैनंदिन नोंदी ठेवण्यास बंदिस्त शेळीपालनामुळे मदत होते.
9. जंगली प्राण्यांपासून तसेच हिंस्त्र पशुपासून शेळी व करडांचे संरक्षण होते.
10. रोगप्रादुर्भावास आळा बसतो.
11. मजुराची आवश्यकता केवळ सकाळी व सायंकाळी चारा टाकण्यासाठी तसेच शेेडच्या स्वच्छतेसाठी असल्यामुळे दिवसभर मजुराची गरज नसते. यामुळे या मजुराकडून इतर शेतीचे काम करून घेता येईल. यामुळे मजुरावरील खर्चात कपात करता येईल. याउलट शेळ्यांना बाहेर दिवसभर चारण्यासाठी एका माणसांची दिवसभर गरज असते तसेच गोठ्याच्या साफसफाईसाठी वेगळा वेळ द्यावा लागतो.
12. शेळ्या/करडांचे वय व उत्पादकता यानुसार शेळ्या/करडांना वेगवेगळा आहार देणे बंदिस्त शेळीपालनामध्ये शक्य होते. त्यामुळे वेळ व चारा यामध्ये बचत होते.
 
बंदिस्त शेळीपालनामध्ये खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.
 
1. शेळ्यांना शेडमध्ये पुरेशी जागा उपलब्ध करुन द्यावी.
2. शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी पुरेसा वेळ द्यावा. त्याकरिता शेळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व अनुभव यांस खूप महत्त्व आहे.
3. वेळोवेळी तज्ञ पशुवैद्यकांचा सल्ला व मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
4. मुबलक व विविध चारापिके उत्पादनासाठी स्वत:ची पुरेशी जमीन व पाणीपुरवठा असणे गरजेचे आहे.
5. गोठ्यामध्ये काम करणारा माणूस अनुभवी व कार्यकुशल असावा.
6. बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्या चरायला जात नसल्यामुळे त्यांची पोषणतत्वांची गरज ही विविध चारापिकांच्या पुरवठ्यांनी पूर्ण करावी लागते. त्याकरिता शेळ्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. शेळ्यांना लसूणघास, बरशीम, दशरथ गवत यांसारख्या द्विदल चारापिकांच्या व मका सिओ04, कडवळ यासारख्या एकदलीय चारापिकांच्या व पुरवठ्याची गरज असते व त्याबरोबरच सुबाभूळ, हादगा, शेवरी, लुती, पांगरा, अंजन यासारख्या झाडपाल्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. या चार्याबरोबरच गरजेनुसार संतुलित पशुखाद्याचा वापरही करणे अत्यंत गरजेचे आहे.
7. बंदिस्त शेळ्यांना क्षार पुरवठा खूप महत्त्वाचा असतो कारण शेळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे श्वार असतात. त्यासाठी दररोज शेळ्यांना श्वारमिश्रण द्यावे किंवा श्वारयुक्त विटा चाटण्यासाठी गोठ्यात अडकवाव्यात.
8. बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यांना दिवसभर 24 तास पुरेसे स्वच्छ पाणी पिध्यासाठी उपलब्ध करून द्यावे. पाण्याच्या कमी उपलब्धतेचा ही शेळ्या व करडांवर अनिष्ट परिणाम होतो.
9. बर्याच संशोधनावरून उस्मानाबादी शेळीचे बंदिस्त पद्धतीने संगोपन फायदेशीर आहे असे सिद्ध झाले आहे. मुक्त शेळ्याच्या तुलनेत बंदिस्त शेळीपालनामध्ये वजनवाढ जास्त मिळते तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून इतर रक्तपेशींचे प्रमाण सुयोग्य राहण्यास मदत होते.
 
डॉ. प्रफुल्लकुमार वसंतराव पाटील आणि डॉ. सौ. मत्स्यगंधा पाटील
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उद्गीर