शेततळ्यामधील मत्स्यशेती

डिजिटल बळीराजा-2    27-May-2020
|
 
baliraja_2  H x
 
शेततळ्याचा वापर मत्स्यशेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरला असून शेतकरी बांधवांना शेततळ्यामध्ये मत्स्यशेती करून अर्थिक नफा मिळवता येणे शक्य झाले आहे.
 
महाराष्ट्र राज्यात अनेक भागांमध्ये शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे पाऊस अवेळी पडत असल्यामुळे शेतीचे नियोजन करणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीसाठी शेततळे असणे गरजेचे झाले आहे. शेतीकरिता आणि फलोत्पादनाकरिता सिंचनाची सोय म्हणून शेततळ्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. या शेततळ्यांचा वापर पाण्याच्या साठवणुकीकरिता केला जातो. ज्या ठिकाणी जमिनीमधून पाणी झिरपते, त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे अस्तरीकरण करून पाणी जास्त कालावधीसाठी साठवून ठेवता येते. अशा शेततळ्यांचा वापर मत्स्यशेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरला असून शेतकरी बांधवांना शेततळ्यामध्ये मत्स्यशेती करून आर्थिक नफा मिळवता येणे शक्य आहे. मत्स्यशेती करताना शेतळ्यामधील वापरण्यात आलेली खते व माश्यांच्या विष्ठेद्वारे पाण्यामध्ये नत्र, फॉस्फेट, पोटॅश इ.सारख्या पोषक द्रव्यांच्या प्रमाणात वाढ होते व हे खतयुक्त पाणी शेती किंवा फलोत्पादनाकरिता वापरल्यास शेतीची उत्पादकता वाढण्यास मदतीचे ठरते. असा दुहेरी फायदा शेततळ्यातील मत्स्यशेतीमुळे होतो. शेततळ्यामध्ये मत्स्यशेती शास्त्रीय पद्धतीने व योग्य व्यवस्थापनाद्वारे करणे गरजेचे आहे.
 
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून वेगवेगळ्या आकाराचे शेततळे जसे 24 मी. ग 24 मी. ग 3 मी., 30 मी. ग 30 मी. ग 3 मी., 44 मी. ग 44 मी. ग 5 मी., 60 मी. ग 60 मी. ग 6 मी. या आकारांमध्ये बांधण्यात येतात. शेततळ्यामधून पाणी झिरपत असल्यास प्लॅस्टिकचे अस्तरीकरण वापरावे अन्यथा विनाप्लॅस्टकचे अस्तरीकरणाच्या शेततळ्यामध्ये मत्स्यशेती करता येते. विनाप्लॅस्टिकच्या अस्तरीकरणाच्या शेततळ्यामध्ये पाण्याची उत्पादकता चांगली होते व तुलनेने मत्स्योत्पादन जास्त मिळते. शेततळ्यामधील मत्स्यशेतीची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

baliraja_1  H x 
 
माशांच्या उपयुक्त जाती :
शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यासाठी भारतीय प्रमुख कार्प जातीच्या माशांची निवड करणे योग्य ठरते. भारतीय प्रमुख कार्प जातीमध्ये कटला, रोहू, मृगल किंवा सायप्रिनस या माशांंचा समावेश होतो. तसेच शेततळ्यामध्ये पंगाशियस व गिफ्ट तिलापिया या माशांचेही संवर्धन स्वतंत्ररीत्या केले जाते.
 
शेततळ्याची पूर्वतयारी :
शेततळ्यामध्ये मत्स्यबीज संचयन करण्यापूर्वी किमान 7 ते 8 दिवस अगोदर माशांचे नैसर्गिक खाद्य म्हणजेच प्लवंग तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेततळ्यामध्ये सुरुवातीला शेणखत 400 कि.ग्रा., सुपर फॉस्फेट 50 कि.ग्रा., युरिया 20 कि.ग्रा. इतक्या प्रमाणात टाकावे. खतांची मात्रा दिल्यानंतर शेततळ्यामधील पाण्याला फिकट हिरवा रंग येतो. अशाप्रकारे शेततळ्याची पूर्वतयारी झाली की, मत्स्यबीज सोडतात.
 
मत्स्यबीज साठवणूक : 
साधारणपणे 30 मी. ग 30 मी. ग 3 मी. या आकाराच्या शेततळ्यामध्ये 1000 ते 1500 बोटुकली सोडता येतात. शेततळ्यामध्ये अवरोधीत मत्स्यबोटुकली ;ैजनदजमक थ्पदहमतसपदहेद्ध टाकणे फायद्याचे ठरते. मत्स्यबीज शेततळ्यात साठवणुकीपूर्वी पाण्याच्या विविध घटकांसाठी त्याला अनुकुलीत करावे. यासाठी प्रथम मत्स्यबीज असलेली बंद पिशवी शेततळ्याच्या पाण्यामध्ये साधारणत: 15 ते 30 मिनिटे पाण्यावर तरंगत ठेवावी. त्यानंतर मत्स्यबीजाच्या पिशवीचे तोंड उघडून त्यामध्ये शेततळ्यातील पाणी थोडे थोडे मिसळावे. यामुळे मत्स्यबीजांच्या पिशवीतील पाण्याचे घटक शेततळ्याच्या पाण्याच्या घटकासोबत एकरूप होते. पिशवी शेततळ्याच्या पाण्यात बुडवून वाकडी करावी. म्हणजे मत्स्यबीज हळूहळू शेततळ्यामध्ये सोडावेत. शक्यतो शेततळ्यामध्ये मत्स्यबीज थंड वेळेत सकाळी किंवा सायंकाळी सोडावे.
खत व खाद्य व्यवस्थापन : 
संपूर्ण संवर्धन कालावधीमध्ये शेततळ्यामध्ये माशांचे नैसर्गिक खाद्य योग्य प्रमाणात राहण्यासाठी शेणखत टप्प्याटप्प्यामध्ये टाकावे. तसेच शेततळ्यातील मत्स्यउत्पादन वाढण्यासाठी नैसर्गिक खाद्याच्या जोडीला योग्य प्रमाणात पूरक खाद्य देणे आवश्यक आहे. माशांना पूरक खाद्य म्हणून भाताचा कोंडा व शेंगदाणा पेंड (70 रु 30) यांचा वापर केला जातो. सुरुवातीच्या कालावधीमध्ये माशांना जास्त प्रमाणात खाद्य दिले जावे. कालांतराने त्याप्रमाणे खाद्याचे प्रमाण कमी केले जाते. संवर्धन कालावधीत मत्स्यबीज साठवणीनंतर सुरुवातीचे 2 महिने पूरक खाद्याचे प्रमाण माशांच्या वजनाच्या 5 टक्के असावे. पुढील 2 ते 4 महिने पूरक खाद्याचे प्रमाण माशांच्या वजनाच्या 3 टक्के असावे. 4 महिन्यांनंतर पूरक खाद्याचे प्रमाण माशांच्या वजनाच्या 2 टक्के असावे. याशिवाय विविध कंपन्यांनी तयार केलेले माशांचे खाद्य वापरता येतात.
पाण्याचे व्यवस्थापन :
शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन किफायतशीर होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता व पाण्याचा वापर यांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास तलावाची उत्पादकता वाढते. यामुळे माशांची वाढ जलद होण्यास मदत होते. पाण्याचे व्यवस्थापन म्हणजेच पाण्याचा सामू, विद्राव्य प्राणवायू, तापमान, पारदर्शकता इ. घटकांचे योग्य प्रमाण ठेवावे.
शेततळ्यातील पाणी फळबागांसाठी किंवा इतर पिकांसाठी वापरता येते. हे पाणी खतयुक्त असल्यामुळे इतर पिकांकरिता उपयोगी ठरते. शेततळ्यातील पाणी शेतीकरिता उपसताना तळ्यामध्ये माशांना पुरेशा प्रमाणात पाणी राहील याची काळजी घ्यावी. तसेच जितके पाणी शेततळ्यातून उपसा केलेले आहे. तितकेच पाणी पुन्हा शेततळ्यात भरावे. यामुळे शेततळ्यातील पाण्याची गुणवत्ता संपूर्ण संवर्धन काळात योग्य प्रमाणात राहते.
 
आरोग्य व्यवस्थापन :
संवर्धन काळामध्ये माशांचे आरोग्य टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी माशांना उत्तम प्रतिचे खाद्य नियमितपणे दिले पाहीजे. तसेच माशांची तपासणी ठराविक कालावधीमध्ये करावे. माशांना कोणतीही रोगराई आढळल्यास त्वरित योग्य उपचार तज्ज्ञांच्या मदतीने करावेत.

baliraja_1  H x 
 
मत्स्योत्पादन : 
शेततळ्यातील 10 ते 12 महिन्यांच्या संवर्धन कालावधीत मासे साधारणत: 750 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत वाढतात. माशांची वाढ ही मत्स्यबीजांचा आकार व दर्जा, पूरक खाद्य, पाण्याचे व्यवस्थापन व शेततशळयाचा आकार इत्यादींवर अवलंबून असते. अंदाजे 30 मी. ग 30 मी. ग 3 मी. या शेततळ्यामध्ये अंदाजे 900 किलो माशांचे उत्पादन होऊ शकते. त्यामधून रु. 50,000/- निव्वळ नफा मिळू शकतो. तसेच एक एकर आकाराच्या शेततळ्यातून कमीत कमी दीड ते दोन लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. त्याचप्रमाणे मत्स्य शेततळ्यामध्ये पंगाशियस किंवा गिफ्ट तिलापिया या माशांचे संवर्धन केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळतो.
 
सद्यस्थितीत शेतकरी बांधवांना शेती करताना कमी पाऊस, कमी बाजारभाव अशा संकटावर मात करण्यासाठी शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन केल्यास त्यांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पादन मिळू शकते.
डॉ. अजय कुलकर्णी
सहायक प्राध्यापक,
मत्स्यविज्ञान महाविद्यालय, उदगीर
जि. लातूर