शोभिवंत मत्स्यपालन : एक व्यवसाय

डिजिटल बळीराजा-2    27-May-2020
|

mase_1  H x W:
 
रंगीत शोभिवंत माशांविषयी जास्तीत जास्त लोकांना निर्माण झालेली आवड त्यामुळे माशांच्या या व्यापारात दरवर्षी 10 टक्के वाढ होत आहे. देशात तसेच देशाबाहेर या व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळेच बेरोजगार युवक तसेच महिला बचत गटांनी हा व्यवसाय करणे फायद्याचे ठरते.
 
शोभिवंत मत्स्यपालन म्हणजेच रंगीत आणि आकर्षक मासे पाळणे. जगातील हा सर्वात जुना व जास्त लोकप्रिय छंद आहे. जागतिक बाजारपेठेत शोभिवंत माशांना प्रचंड मागणी असून या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन आणि रोजगारनिर्मिती होऊ शकते. भारतामध्ये या व्यवसायासाठी योग्य वातावरण, पाणीपुरवठा आणि मन्ाुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आजच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनात माणसाला अनेक ताणतणाव असतात. घरात जर एखादे सुंदर मत्स्यालय असेल, तर दिवसभराच्या कामाचा शीण या माशांकडे पाहिल्यानंतर दूर होतो. हा छंद कमी खर्चात भागविण्यासारखा आहे. शहरांमध्ये झपाट्याने वाढणारी नवी घरे, सदनिका, लोकांकडे असणारा भरपूर पैसा आणि रंगीत माशांविषयी जास्तीत जास्त लोकांना निर्माण झालेली आवड त्यामुळे माशांच्या या व्यापारात दरवर्षी 10 टक्के वाढ होत आहे. देशात तसेच देशाबाहेर या व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळेच बेरोजगार युवक तसेच महिला बचत गटांनी हा व्यवसाय करणे फायद्याचे ठरते. कोकणात सध्या पर्यटनही वाढताना दिसत आहे. कृषी पर्यटनही चांगले आकार घेत आहे. पर्यटक कोकणाला लाभलेल्या समु्रदकिनार्याकडे आकृष्ट होत आहे. 
 
or_1  H x W: 0
 
 
शोभिवंत माशांची पैदास करून त्यांची विक्री करणे तसेच याबरोबर त्यांच्याशी संलग्न इतर व्यवसाय करणेसुद्धा शक्य आहे ते खालीलप्रमाणे ः
 
शोभिवंत माशांची पैदास करून विकणे :
 
शोभिवंत माशांमध्ये विविध प्रकार जाती व रंग आहेत. यांची विभागणी प्रामुख्याने गोड्या पाण्यातील आणि निमखार्या पाण्यातील मासे अशी केली जाते. पण या माशांची पैदास करण्याकरिता मुख्यत: गोड्या पाण्यातील माशांचा विचार केला जातो. प्रजननाच्या पद्धतीनुसार यांचे वर्गीकरण पिले घालणारे मासे आणि अंडी घालणारे मासे या दोन प्रकारांत करतात.
 
अ) पिले घालणारे मासे : या प्रकारच्या माशांमध्ये पिलांची वाढ मादीच्या पोटात पूर्ण होते आणि मादी पिले जन्माला घालते. या प्रकारच्या माशांचे पुनर्उत्पादन करणे सोपे असते. कारण 1) मादी पिले जन्माला घालते. 2) या माशांची जन्माला आलेली पिले आकाराने मोठी असल्यामुळे ती वाढवायला सोपी असतात 3) या प्रकारचे मासे साधारण वर्षभर प्रजनन करीत असल्याने बाजारात माशांचा पुरवठा सातत्यपूर्ण करता येतो. त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. पिले देणार्या माशांमध्ये स्वोर्ड टेल, मोली, प्लॅटी, गप्पी इत्यादी मासे मुख्यत: असतात.
 
ब) अंडी घालणारे मासे : या प्रकारच्या माशांची पैदास करणे तुलनेने थोडे अवघड असते. कारण पहिल्यांदा माशांनी अंडी घालावीत म्हणून विशिष्ट परिस्थिती निर्माण करावी लागते. त्यानंतर माशांनी घातलेल्या अंड्यांची अतिशय काळजीपूर्वक देखभाल करावी लागते. त्यानंतर अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांना विशिष्ट प्रकारचे खाद्य देऊन वाढवावे लागते. बार्ब, गोल्डफिश, लेबिओ, गोरामी, रासबोरा, डॅनिओ, निऑन टेटा, डिस्कस, फायटर फिश, एंजेल इत्यादी मासे अंडी घालणारी मासे आहेत. या प्रकारच्या माशांचे प्रजनन आणि संगोपन करून हा व्यवसाय केला जातो.
 
मत्स्यालय टाकी बांधणी आणि विक्री करणे :
 
घरातील काचेच्या टाकीत शोभिवंत मासे पाळण्याचा छंद लोकप्रिय आहे. घरात मत्स्यालयात पाळलेले मासे असले की घराला सजीवपणा आणि चैतन्य येते. मत्स्यालयातील आकर्षक रंगीबेरंगी मासे पाहून मनाला प्रसन्न आणि सुखद वाटते, मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होते. मत्स्यालयाचा आकार साधारणपणे चौकोनी, षटकोनी, आयताकृती असतो. आयताकृती किंवा त्रिकोणी मत्स्यालये खूपच लोकप्रिय झालेली आढळतात.
 
शोभिवंत माशांकरिता खाद्यनिर्मिती :
 
दर्जेदार प्रथिनेयुक्त खाद्य ही शोभिवंत माशांच्या पालनातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. कारण खाद्यावरच माशांची रोगप्रतिकारक शक्ती, प्रजननशक्ती, रंग इ अवलंबून असतात. माशांच्या खाद्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

plant_1  H x W: 
 
1. जिवंत खाद्य, 2 कृत्रिम खाद्य
 
अ. जिवंत खाद्य : जिवंत खाद्य हे माशांच्या वाढीसाठी सर्वात उपयुक्त खाद्य आहे. जिवंत खाद्यामध्ये प्रामुख्याने मोयना, रोटीफर, ट्यूबीफेक्स, अळया, इन्फोसेरीया, लाल किडे, डासांच्या अळ्या, आर्टीमिया व त्यांची पिले आणि गांडूळ हे माशांना लागणारे उपयुक्त खाद्य आहे. हे जिवंत खाद्य निसर्गातून, पाणी साचलेल्या डबक्यांतून किंवा तलावातून पकडता येते. जिवंत खाद्य हे निसर्गातून बारमाही मिळेल याची खात्री नसते म्हणून त्यांची संवर्धन करण्याची पद्धत आपणास माहिती असणे आवश्यक आहे. जिवंत खाद्य हे फार कमी खर्चात उपलब्ध होणारे खाद्य आहे. 
 
ब. कृत्रिम खाद्य
माशांची गरज लक्षात घेऊन वेगवेगळे घटक वापरून उत्तम दर्जाचे समतोल कृत्रिम खाद्य तयार करता येते. लहान माशांना 40-45 टक्के प्रथिने, 6-10 टक्के चरबी, व 40 टक्के कर्बोदके इतके प्रमाण खाद्यात ठेवणे आवश्यक असते. मोठ्या माशांना 30-35 टक्के प्रथिने, 6-8 टक्के चरबी व 50 टक्के कर्बोदके इतके प्रमाण खाद्यात ठेवणे आवश्यक असते. कृत्रिम खाद्यासाठी भाताचा कोंडा तांदूळ पॉलिश, शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड, माशांची कुटी, अंडी, गव्हाचे पीठ इत्यादी घटक तसेच जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ वापरण्यात येतात. कृत्रिम खाद्य हे माशांनी खाण्याजोगे, पाण्यावर जास्त काळे तरंगणारेे तसेच ते दीर्घकाळ टिकणारे असावे.
 
शोभिवंत वनस्पती संवर्धन व विक्री :
मत्स्यालयात पाणवनस्पतीमुळे मत्स्यालय सुशोभित दिसते, माशांना सुरक्षितता आणि आसरा लाभतो. तसेच माशांची विष्ठा वनस्पती खत म्हणून उपयोगात येते. म्हणून विविध आकाराच्या, रंगांच्या पानांच्या प्रकारांच्या पाणवनस्पती मत्स्यालयामध्ये लावण्यात येतात.
 
मत्स्यालयात लावण्यात येणार्या महत्त्वाच्या व लोकप्रिय पाणवनस्पती म्हणजे कर्बेाम्बा, क्रिप्टोकॉर्न, सिरॅटोफायलम, आयकोर्निया, लुडविगिया (बेबीज टिअर्स) इत्यादी पाणवनस्पती मत्स्यालयात सजावटीसाठी वापरल्या जातात त्यामुळे शोभिवंत पाणवनस्पतीची मागणी वाढत आहे. पाणवनस्पतीचे व्यवस्थापन आणि विक्री हा एक आकर्षक व्यवसाय आहे.
 
मत्स्यालयाचे सजावट साहित्य विक्री :
घरातील मत्स्यालय सुंदर दिसावे म्हणून ते सजविणे गरजेच असते. मत्स्यालयातील सजावट करण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य म्हणजे सोनेरी वाळू, विविधरंगी दगड, गोटे, शंख, खेळणी, एअरेटर्स, कोरलस खेळणी, फिल्टर, वेगवेगळी रंगीत पोस्टर्स, कृत्रिम झाडे इत्यादी याशिवाय पाण्याचे तापमान फार कमी होऊ नये म्हणून हिटर वापरण्यात येतो. या सर्व साहित्यांची विक्री करणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.
 
मत्स्यालयाचे व्यवस्थापन :
मोठ्या शहरांमध्ये या व्यवसायाला चांगला वाव आहे. लोक आपल्या घरामध्ये, हॉटेलमध्ये, रुग्णालयांत, डॉक्टर मंडळी आपल्या दवाखान्यांच्या स्वागत कक्षात शोभिवंत माशांची टाकी ठेवतात, पण त्या माशांची देखभाल करणे, टाकीत स्वच्छता राखणे, पाणी बदलणे इत्यादी व्यवस्थापनीय बाबी सर्वानाच करायला जमतात असे नाही. अशा वेळेला या मत्स्यालयाची देखभाल करणे व व्यवस्थापन सेवा पुरविणे हा एक बिनभांडवली व्यवसाय होऊ शकतो. 
 
वर नमूद केलेले वेगवेगळे व्यवसाय शोभिवंत मत्स्यपालनामध्ये करता येण्यासारखे आहेत. हे सर्व व्यवसाय वेगवेगळे किंवा एकत्रितपणे तसेच कमी भांडवलात करता येण्याजोगे आहेत. तसेच याबाबत एकदा प्रशिक्षण मिळाले की करायला सोपे जातात आणि म्हणूनच बेरोजगार युवक/युवती, महिला बचत गट इत्यादींनी शोभिवंत मत्स्यपालन एक व्यवसाय म्हणून स्वीकारल्यास रोजगाराचे आणि उत्पन्नाचे एक साधन प्राप्त होऊ शकते.
 
 
वैभव येवले, संदेश पाटील आणि डॉ. केतनकुमार चौधरी
मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी