स्वच्छ दूध निर्मिती व दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये बायपास फ्याट मिश्रणाचे महत्व ;

डिजिटल बळीराजा-2    09-Mar-2020
|cow milk_1  H x

स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाय आणि बायपास फ्याट म्हणजे काय, त्याची तयारी व देण्याची योग्य वेळ, प्रमाण आणि खाऊ घालण्याच्या पद्धती या संबंधी माहितीचा समावेश या लेखात केला आहे.

आपल्या देशात जास्तकरून गायी , म्हशीचे दूध वापरले जाते. दुधाला पूर्ण अन्न असे म्हटले जाते.दुधाचे मानवी आहारात महत्वाचे स्थान आहे . त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी स्वच्छ दूध मिळणे गरजेचे आहे.
 
स्वच्छ दूध : स्वच्छ दूध म्हणजे असे दूध जे निरोगी जनावरांपासून काढलेले ,दुर्गंधी किंवा कुठल्याही प्रकारची घाण नसलेले आणि सूक्ष्म जंतूचे प्रमाण कमीत कमी असलेले दूध होय.
 
cow milk_1  H x
 
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाय व शेतकर्यांनी घ्यावयाची काळजी : स्वच्छ दूध निर्मितीसाठी तसेच दुग्धव्यवसाय फायदेशीर राहण्यासाठी त्रीसूत्री स्वच्छतेची अत्यंत गरज आहे.त्यामध्ये दूध काढणारी व्यक्ति , दुधाळ जनावरे तसेच सभोवतालचे वातावरण ( गोठा व गोठ्यातील नियोजन) ह्या तीन गोष्टी सदैव स्वच्छ असल्या पाहिजेत.
 
1. दूध काढणारी व्यक्ति : सदैव स्वच्छ असावा. तो स्वतची व कपड्याची स्वच्छता ठेवावी. हाताची नखे कापलेली असावीत. धारा काढतेवेळी धूम्रपान करू नये, तंबाकू खावू नये कारण या व्यसनामुळे दुधास वास लागतो तसेच दूध काढत असतांना दुधाच्या पात्राच्या दिशेने खोकलू किंवा शिंकू नये. ती व्यक्ति निरोगी असावी. त्याला क्षय , खरूजासारखे आजार असू नये तसेच हातावर जखमा असू नये. दूध काढण्यापूर्वी तो आपले हात साबणाने स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावे .
 

cow milk_1  H x
 
2. जनावरांचा गोठा: गोठ्यात जनावरांची गर्दी नसावी . गर्दी असल्यास एका गायीचे शिंग दुसर्या गायीला लागून किंवा दुसर्या गायीने सडावर पाय दिल्यामुळे जखमा होवून कासदाह निर्माण होवू शकतो. कळपातील जनावरांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार असू नये जसे क्षय आजार. असे दूध माणसास पिण्यासाठी हानिकारक असू शकतो. गोठा सदैव स्वच्छ असावा.गोठ्यात हवा खेळती असावी . सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळावे जेणेकरून गोठ्यातील खालची जागा कोरडी राहील तसेच गटारी कोरड्या राहतील. मलमूत्राची ताबडतोब विल्हेवाट लावावी. सदैव गटारी वाहत्या राहतील याची काळजी घ्यावी. शेण साठवण्याची जागा गोठ्यापासून दूर असावे.
 
सहसा बाहेरील व्यक्तींना गोठ्यात प्रवेश टाळावा . गोठ्याच्या प्रवेशावर फूट डिपची सोय करावी म्हणजेच छोटी आयताकृती सीमेंटचे हौद बनवून घ्यावे ज्याची खोली साधारण आपले पाय बुडतील एवढे असावे ज्यामध्ये पोटॅशियम परम्याग्ंनटचे सौम्य द्रावण केलेले पाणी टाकावे जेणेकरून बाहेरून येणारा व्यक्ति जंतूंनाशक द्रावणात पाय बुडवूनच गोठ्यात प्रवेश करेल. माश्यांच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेस्ट कंट्रोल’ मशीनचा वापर करावा तसेच जमिनीवर फीनाईल सारखे औषध सौम्य स्वरुपात पाण्यात मिसळून फवारावे किवा शिंपडावे.
 
3. दुधाची भांडी : दुधाची भांडी स्टेनलेस स्टीलची वापरावी . स्वच्छ करायला सोपे जाते .पात्रांचे तोंड छोटे असावे . दूध काढण्याच्या पूर्वी आणि नंतर भांडी गरम पाण्याने धुवावी. भांडी धुण्यासाठी डिटरजंट पाऊडर वापरल्यास चालेल.भांडी वाळवण्यासाटी उलटी करून ठेवावे. कास व सडे धुण्यासाठी तसेच दुध काढण्यासाठी वेगळे पात्र वापरावे.
 
cow milk_1  H x
 
 
4. दूध काढतेवेळीची काळजी : दूध काढण्यापूर्वी जनावरास खरारा करावा. त्यामुळे अंगावरील सुटे केस निगुण जातील. दुधात पडत नाहीत. रक्तप्रवाह तसेच रक्ताभिसरण क्रिया वाढते, जनावरे हुशार व तरतरीत दिसू लागतात. गोचीड, माश्या, उवा , लिखा व इतर किटाणू पडून जातात त्यामुळे दूध काढतेवेळी गाय बैचेन दिसत’ नाही. दूध काढण्यापूर्वी जनावरे पाण्याने स्वच्छ धुवावे. मुख्यता कास, सडे, शेपटी व मागील भाग धुवावा. त्यामुळे घाण, शेण , माती ,चिखल तसेच केस दुधात पडत नाहीत. दूध काढताना जनावरे शांत व समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मारजोड करू नये.
दूध काढण्यासाठी पूर्ण मूठ पद्धत वापरावी . अंगठा लावून दूध काढण्याची पद्धत चुकीची आहे यामुळे सडास इजा पोचू शकते.दूध काढण्यासाठी मशीनचा वापर करत असाल तर त्यात काहीही दोष नसावा. एकंदरीत दुधात जीवाणूंची संख्या कमी करण्यासाठी चारही सडामधून सुरवातीच्या धारा जमिनीवर सोडावे .दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी .
गाय पान्हावल्यानंतर कमीतकमी 7-8 मिनिटात गाय पिळावी. जास्त दूध देणारी गायीचे दिवसातून तीनदा दूध काढावे.दूध ठराविक वेळेत काढावे. दोन धारा काढण्याच्या वेळेतील अंतर ठराविक असावे. गाय पुर्णपणे पिळावी . कासेमध्ये दूध सोडू नये . विशेषकरून मशीनचे कप काढल्यानंतर हाताने पुर्णपणे दूध काढावे. कासेत दूध शिल्लक राहिल्यास कासदाह / स्तनदाह होण्याची दाट शक्यता असते. या आजारात दूध नासते. दूध पिण्यासाठी योग्य नसते. प्रथम निरोगी जनावरांचे दूध काढावे त्यानंतर आजारी जनावरांचे दूध काढावे.
शक्यतो वासरांना जन्मल्यापासून गायीला पाजवू नये ,दूध पाजवण्यासाटी बॉटलचा वापर करावा जेणेकरून सडास जखमा होणार नाहीत , वासरू काही कारणास्तव मरण पावल्यास गाय दूध देणे चालूच ठेवते व वासराला त्याच्या वजनाप्रमाणे दूध पाजवता येईल.
 
5. कासदाह / स्तनदाह प्रतीबंधात्मक उपाय : गाय आटत आल्यास हळूहळू भाकड करावी. पूर्णपणे दूध बंद झाल्यानंतर प्रत्येक सडात एक याप्रमाणे चारही सडात प्रतीजैवकाची ट्यूब सोडावी. गाय विण्याअगोदर 50-60 दिवसापूर्वी भाकड करावी.
दररोज टीट डिप कप पद्धतीचा वापर कटाक्षाने करावा. दुधाळ जनावरामध्ये कासदाह आजार होऊ नये यासाठी स्वच्छतेसोबत टीट डिप कप पद्धत फारच उपयोगी आहे. या पद्धतीत एक प्लॅस्टिकचा कप व त्याला आयोडीनचे द्रावण असलेले प्लॅस्टिक बॉटल जोडलेले असते . प्रत्येक वेळेस दूध काढल्यानंतर चारही सडे टीट डिप कपमध्ये बुडवून घ्यावीत जेणेकरून सडाच्या उघड्या छिद्रामध्ये आयोडीनचे द्रावण भरले जाईल, परिणामी कसदाह आजारासाठी कारणीभूत जंतूचा सडामधील शिरकाव थांबेल. दररोज प्रत्येक वेळेस दूध काढल्यानंतर जनावरांना अर्धा ते एक तास उभेच ठेवावे यासाठी जनावरांना दूध काढल्यानंतर पेंढ किंवा वैरण द्यावे किंवा चरावयास सोडावे जेणेकरून जनावरे जमिनीवर बसणार नाहीत.
 
6. गायींची सुप्तकासदाह तपासणी : साहजिकच कासदाह झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा कासदाह होवू नये म्हणून पंधरादिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा कॅलिफोर्निया मस्टाटीस टेस्ट करून घ्यावी जेणेकरून गोठ्यात किती जनावरांना सुप्तकासदाह आजार आहे ते कळेल आणि उपचार करण्यास सुरुवात करता येईल. या तपासणीमुळे कासदाहाची बाह्य लक्षणे दाखवत नसतानाही कासदाह होण्याची दाट शक्यता असलेले सद ओळखता येते.
अश्या एक किंवा अनेक बाबींची शेतकर्यांनी काळजी घेतली तर जनावरांना बरेच आजार होण्यापासून रोखू शकता व स्वच्छ दूध निर्मिती करणे सहज शक्य होवू शकेल.

cow milk_1  H x
 
दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये बायपास फ्याट मिश्रणाचे महत्व
आपला भारत देश दुग्धोत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अधिक दूध आणि वेळेवर पैसे मिळण्यासाठी शेतकरी आपल्या गोठ्यात एच.एफ. , जर्सी सारखे संकरीत गायी किंवा सहीवाल, लाल शिंदी सारखे जातिवंत गायी ठेवतात तर काही मुर्रा , जाफ्राबादी सारखे म्हशी पोसतात आणि रोजच्या दुधाची विक्री गावातील सहकारीदूध संघात करतात. अशा सहकारी दूध संघातील दुधाचे गणित हे पुर्णपणे दुधातील स्ंनिग्धाशावरच (फ्याट) अवलंबून असते. जर दुधातील फ्याटचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त मिळत असेल तर शेतकर्याना नक्कीच या दूध व्यवसायात अधिक नफा मिळू शकतो.
गाय आणि म्हशी विल्यानंतर शारीरिकदृष्ट्या बलहीन होतात. वीताना एकतर वासरू शरीराबाहेर टाकण्यासाठी लागणारे प्रयत्न तसेच विल्यानंतर लगेचच चीक (पहिले दूध) व तदनंतर दूध काढल्यामुळे या अशा एक किंवा अनेक कारणामुळे सुरुवातीच्या दिवसामध्ये जनावरामध्ये ऊर्जेची कमतरता आढळून येते. अशा पद्धतीचा बदल हा जास्त दूध देण्यार्या जनावरामध्ये म्हणजे संकरीत गायी ज्यांचे दूध उत्पादन दिवसाकाठी 15 लिटरपेक्षा जास्त तसेच म्हशी ज्यांचे दूध उत्पादन 8 लिटरपेक्षा जास्त आहे अशा जनावरमध्ये जास्त दिसून येतो.
 
अशा पद्धतीने जनावरामध्ये होत असलेल्या बदलाचा दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होवून अशी जनावरे दूध कमी देतात. दुधात स्ंनिग्धाशाचे (फ्याट) प्रमाण कमी मिळते.अशी जनावरे व्यवस्थित माजावर येत नाहीत, वेळेवर फळत नाहीत.अशा अनेक अडचणीमुळे शेतकरी दुग्धव्यवसायात पाहिजे तेवढी प्रगती साधू शकत नाही
 
वरील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकच रामबाण उपाय म्हणजे दुधाळ जनावराना समतोल आहारासोबत बायपास फ्याटचे मिश्रण खावू घालणे हे होय. जनावराना बायपास फ्याटचे मिश्रण खावू घातल्यानंतर दूधवाढी सोबत दुधातील फ्याटचे प्रमाण वाढते.
 
cow milk_1  H x
 
बायपास फ्याटचे मिश्रण म्हणजे काय ?
रवंथ करणार्या प्राण्याच्या पोटाचे चार कप्पे असतात (रुमेण, रेटीक्युलम, ओम्याजम आणि अबोम्याजम ) . जनावरानि खालेल्या चार्याचे जास्तीत जास्त विघटन रुमेणमध्ये होते व काही प्रमाणात इतर कप्प्यामध्ये होते. काही पोषक घटक जसे स्ंनिग्धाशाचे (फ्याट) जे की ऊर्जेचे स्त्रोत आहे याचे रुमेण कप्प्यामध्ये जास्त प्रमाणात विघटन झाल्यामुळे जनावरांच्या शरीराला जसेच्या तशे पाहिजे त्या प्रमाणात ऊर्जा मिळत नाही परिणामी जनावरे कमजोर बनतात.
बायपास फ्याटचेमात्र विघटन रुमेणमध्ये न होता पुढे अबोम्याजम या पोटाच्या कप्प्यामध्ये होते त्या मुळे शरीराला उर्जा जास्त मिळतो परिणामी दूध आणि दुधातील फ्याटचे प्रमाण वाढते.
बायपास फ्याटची तयारी :
 
वनस्पतीजन्य फ्याटी अ‍ॅसिड व कॅल्शियम क्षारापासून (कॅल्शियम ओक्साईड ) रासायनिक प्रक्रिया करुन बायपास फ्याटची तयारी केली जाते.
बायपास फ्याट मिश्रण जनावरांना देण्याचा योग्य वेळ:
दुधाळ जनावरे विल्या पासून पुढील तीन महिन्यापर्यंत ( 0-90 दिवस) बायपास फ्याट मिश्रण दिल्यास दूध वाढीवर चांगला परिणाम दिसून येते. या कालावधीनंतर ( 90- 150 दिवस ) बायपास फ्याट मिश्रण दिल्यास दूध वाढीवर परिणाम थोडासा कमी दिसून येते .
बर्याच शेतकर्याकडे एच. एफ. संकरीत गायी आहेत ज्यांचे दूध उत्पादन जास्त परंतु फ्याटचे प्रमाण दुधात अल्प (3.5 % ) असते यामुळे शेतकर्यांना हवे तसे मिळकत मिळत नाही परंतु संशोधनात असे सिद्ध झाले की या जातीच्या गायीमध्ये बायपास फ्याट दररोज योग्य प्रमाणात दिल्यास ईतर गायींच्या तुलनेत दूधवाढीच्या व दुधातील फ्याटच्या प्रमाणात अधिक वाढ दिसून आलेले आहे.

cow milk_1  H x
 
बायपास फ्याट मिश्रण जनावरांना देण्याचा योग्य प्रमाण :
दुधाळ जनावरांना सुमारे एक किलो दुधामागे दररोज 15 - 20 ग्रॅम बायपास फ्याट मिश्रण द्यावे लागते.जर आपले जनावर दररोज 10 लिटर दूध देत असेल तर 150 - 200 ग्रॅम बायपास फ्याट मिश्रण खायला द्यावे .
 
साधारणता जनावरे विण्याच्या पूर्वी 15 दिवसापासून ते विल्यानंतर पाच महिन्याच्या कालावधीमध्ये बायपास फ्याट मिश्रण खावू घालावे.
 
बायपास फ्याट मिश्रण खावू घालण्याची पद्धत :
 
बायपास फ्याट मिश्रण जनावरांना योग्य प्रमाणात खाद्य / पेंढ मध्ये मिसळून द्यावे. बायपास फ्याट मिश्रणाची लागणारी मात्रा दिवसातून एक वेळेस किंवा दिवसातून दोन वेळेस अर्धे अर्धे या प्रमाणात द्यावे.
बायपास फ्याट मिश्रण खावू घालण्याचे फायदे :
 
1. जनावरांना दररोज बायपास फ्याट मिश्रण खावू घातल्यास त्यांना ऊर्जेची कमतरता भासत नाही.
 
2. दुधाळ जनावरांना दररोज बायपास फ्याट मिश्रण खावू घातल्यास दुग्धोत्पादनात 15-20 % वाढ दिसू शकते, म्हणजेच दहा लिटर दूध देणारी गाय 11.5 ते 12 लिटर पर्यंत दूध देवू शकते.
3. दुधातील फ्याटचे प्रमाण 0.5 ते 1 % वाढू शकते.
 
4. उच्चतम दूध देण्याचा कालावधी ( पीक मिल्क इल्ड ) व एकूणच दूध देण्याचा कालावधी या मध्ये वाढ दिसून येवू शकते.
 
5. . जनावरांचे प्रजोत्पादन नियमित होते जसे की जनावरे वेळेवर माजावर येतात व जनावरातील गाभण राहण्याची प्रक्रिया आणि विण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडते.
 
6. विल्यानंतर दुधाळ जनावरांच्या वजनामध्ये घट होण्याचा क्रम कमी होवू शकते.
 
7. एकंदरीत जनावरांचे स्वास्थ सुधारते.
 
8. हवामानातील बदलाचा दूषपरिणाम अशा जनावरावर कमी दिसून येतो.
 
डॉ. संजयकुमार विठ्ठलराव उद्धरवार ,विषय तज्ञ ( पशूविज्ञान) कृषि विज्ञान केंद्र ( उत्तर गोवा) , डॉ. चेतनकुमार एच. बी. , सायंटिस्ट (पशूविज्ञान) , डॉ. एकनाथ चाकूरकर ,प्रभारी संचालक व प्रिन्सिपल सायंटिस्ट ( पशूविज्ञान) , आय. सी.ए. आर. - सी.सी. ए .आर.आय. जुने गोवे , गोवा 403402.