द्राक्ष लागवड -एक उद्योग

डिजिटल बळीराजा-2    07-Mar-2020
|

grape_1  H x W:
 
 
‘द्राक्ष लागवड’ या विषयाच्या संदर्भातील सखोल अभ्यास न करता द्राक्षपिकातून चांगला पैसा मिळतो म्हणून एकदम 5 एकर-10 एकर द्राक्षबाग लावणारे अनेक शेतकरी असतात. चुकीच्या अपेक्षा धरून आंधळेपणाने द्राक्षबागांच्या लागवडी केल्या तर बहुधा मोठ्या पश्चात्तापाची पाळी येते.
 
चुकीच्या जमिनीत, चुकीच्या वेळी, चुकीच्या मार्गदर्शनासाठी, स्वत: द्राक्ष लागवडीचे शास्त्र समजून न घेता घातलेली बाग सुरुवातीपासूनच अडचणीत सापडते. 
 
1.द्राक्ष लागवड- एक उद्योग
 
परदेशामध्ये द्राक्षलागवड ही मद्यनिर्मितीसाठी मुख्यत: केली जाते. त्यानंतर बेदाणे निर्मिती करण्यासाठीही द्राक्षलागवड होत असते. परदेशातील अनेक देशात लाखो एकर क्षेत्र या द्राक्ष उत्पादनात गुंतलेले असते. काही द्राक्षबागाईतदारांच्या द्राक्षबागा दहा हजार क्षेत्रात विस्तारलेल्या असतात. म्हणून परदेशात द्राक्ष लागवड हा एक मोठा उद्योग बनलेला आहे. द्राक्षबागेमुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो. द्राक्षलागवड हा एक उद्योग आहे असे सुरुवातीपासून समजून घेतले पाहिजे. कोणताही उद्योग हा जागतिक आर्थिक घडामोडींचा घटक बनलेला असतो आणि त्यात अनेकांचे भवितव्य गुंतलेले असते. तसेच स्पर्धेच्या या जगात या क्षेत्रात होणारे नवनवे बदल डोळ्यात तेल घालून अभ्यासावे लागतात व ते वेळीच स्वीकारावे लागतात. 
 
धंदा किंवा व्यवसाय या गोष्टी उद्योग या संकल्पनेपेक्षा फार भिन्न आहेत. घातलेले भांडवल या नाही त्या मार्गाने परत मिळवणे म्हणजे धंदा होतो. द्राक्षबाग लावून निघेल तसा माल काढून कसा तरी विकून पैसा मिळवणे म्हणजे त्याला धंदा म्हणतात. द्राक्षबागांची लागवड करून निघेल तसा माल काढून कसातरी विकून पैसा मिळवणे म्हणजे तो धंदा झाला. व्यवसायामध्ये घातलेल्या भांडवलापासून नेमका फायदा सातत्याने काही वर्षे कसा येत राहील एवढेच पाहिले जाते. नवीन तंत्रविद्येचा पाठपुरावा करणे, ती आत्मसात करणे याकडे दुर्लक्ष होते. या कारणाने तंत्रात एकदम बदल झाले की परंपरागत व्यवसाय 2 ते 3 वर्षात बंद पडतात. उद्योगामध्ये मात्र चालू उत्पादनावर, बाजारावर व अपेक्षित भावी बदलावर अतिशय बारकाईने नजर ठेवावी लागते. महाराष्ट्रातील प्रयोगशील द्राक्ष बागाईतदारांनी आपल्या प्रयोग बळावर उभी केलेली द्राक्षक्रांती ही जगातील द्राक्षउत्पादन तंत्रात अग्रेसर ठरली आहे. नवीन द्राक्षबागाईतदारांनी हा वारसा सुरुवातीलाच समजून घेतला पाहिजे. फक्त धंदा म्हणून द्राक्षबाग केली तर या स्पर्धेत टिकाव लागणार नाही. 
 
जमीन, हवामान इत्यादी
 
द्राक्षबाग यशस्वी होण्यास कोणतेही हवामान अगर कोणतीही जमीन चालत नाही. वर्षभर उष्ण व कोरडे हवामान असेल व जमीन हलकी, मुरमाड व निचर्‍याची असेल तर जोमदार द्राक्षबाग उभी करता येते. अशा हवामानात द्राक्षवेलीला रोगराई कमी येत असल्याने उत्पादनपण दर्जेदार येते. महाराष्ट्रात असे क्षेत्र फारच थोड्या जिल्ह्यांत आहे. हवामान कोरडे असेल तर जमिनी भारी, काळ्या खोल असतात-त्यामुळे त्या ओल लवकर सोडत नाहीत. उलट जमिनी मुरमाड व निचर्‍याच्या असल्या तरी त्या विभागात द्राक्षवेलीच्या नवीन वाढीच्या वेळी पावसाळी हवामान असते. पावसाळी हवामानात द्राक्षाची कोवळी वाढ लवकर रोगाला बळी पडते. आणि सर्व उत्पन्न हातातून जाते. तर काही ठिकाणी जमिनी चुनखडीयुक्त असतात, तर काही ठिकाणी जमनी क्षारयुक्त झालेल्या असतात. यातील बहुतेक दोषवर योग्य त्या कार्यपद्धतीने मात करता येते. असे महाराष्ट्रातील बहाद्दर द्राक्षबागाईतदारांनी दाखवून दिलेले आहे. पण हे शिक्षण घेण्यासाठी आपण गट करून अशा द्राक्षबागांना सतत भेटी दिल्या पाहिजेत. 
 
चुकीच्या समजुती!
 
आपल्याकडे भरपूर खते, भरपूर पाणी, भरपूर मशागत म्हणजे भरपूर कृषी उत्पादन अशी अगदी चुकीची समजूत आज सर्वत्र आढळून येते. द्राक्षपिकाला अशा प्रकारची खत पाण्याची लयलूट हानिकारक ठरते. अशा बहुतेक द्राक्षबाग वर्षानुवर्षं चांगले पीक देत नाहीत व बर्‍याचवेळा वांझ फुटून येतात. नवीन द्राक्षबाग लावणार्‍यांनी आपल्या या जुन्या सवयी अभ्यासपूर्वक सोडल्या पाहिजेत.
 
दर्जेदार द्राक्षबाग
 
द्राक्षबागेत भरपूर घड आले की, भरपूर वजन मिळणार असे समजून अनेक द्राक्षबागाईतदार सर्व घड तसेच वेलीवर ठेवतात. असे घड खताचे जादा डोस देऊन वाढविता येतील अशी समजूत असते. अशा घडांची विरळणी करून अगदी आवश्यक तेवढाच माल वेलीवर राखावा लागतो. हे धाडस नव्या द्राक्षबागाईतदाराला बहुधा करवत नाही. मग आलेला सर्व माल बारीक मण्यांचा माणचट बनतो. मार्केटमद्ये अशी द्राक्षे अगदी कवडीमोलाने जातात. 
 
मनाचे प्रयोग
 
द्राक्ष लागवड तंत्रात आलीकडे झपाट्याने क्रांती होत चालली आहे. यामुळे अनेक संजीवकांचा उचित वापर केव्हा, कसा आणि का? करावा याचे शास्त्र विकसित झालेले आहे व त्यात नित्य नवी भर पडत आहे. पण या नवीन तंत्राचा नेमका तपशील न समजून घेता, अर्धवट ऐकीव माहितीवर मनाला येईल तशी संजीवके वापरण्याचे वेड अनेक सुशिक्षित द्राक्षबागाईदारात आढळून येते. अशा चुकीच्या वेड्या समजुतीची आपल्या बागेवर अत्याचार झालेले आहेत, हे द्राक्ष सिझनला भोगाव्या लागणार्‍या दुष्परिणामानंतर लक्षात येते पण तोपर्यंत वेल शक्तीहीन बनलेले असतात.
 
मनुष्यबळ
 
द्राक्षशेतीत यशस्वी होण्यास बरेच मनुष्यबळ अनेक कामासाठी आवश्यक असते. एक एकर द्राक्षबागेत वर्षाला किमान 1600 मानवी दिवस एवढ्या श्रमाची आवश्यकता असते. अद्याप या बाबतीत ग्रामीण विचारसरणीत मजुरांना योग्य प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नाही. माणसे राखण्याची, हाताळण्याची व आपल्या यशामध्ये त्यांनापण यशाचा वाटा देत सहभागी करणे ही चालू काळाची गरज महत्त्वाची ठरते. अशा डोळस जुळणी अभावी ऐनवेळी श्रमशक्तीअभावी कामे झाली नाहीत, तर वर्षाच्या उत्पन्नाला द्राक्षबागाईतदार मुकला जातो.
 
द्राक्षाची नवीन लागवड करणार्‍यांनी द्राक्ष लागवड हा जागतिक व राष्ट्रपातळीवरील मोठा प्रगत उद्योग आहे. हे जाणून द्राक्षलागणीची जबाबदारीपूर्वक आखणी केली पाहिजे. 
 
द्राक्षबागेची उभारणी
 
बहुतेक बागाईतदारांना ऊस, तंबाखू, कापूस अशा नगदी पिकात दरवर्षी किमान ठराविक उत्पादन घेण्याची सवय असते. द्राक्षलागवडीत या उत्पादनाच्या जवळपास जरा अधिक उत्पादन मिळाले, की अनेक द्राक्षबागाईतदार कमी पाण्यावर चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून त्या माफक यशावर संतुष्ट असतात. परंतु द्राक्ष लागवडीचा खर्च भरून निव्वळ उत्पादन मिळवायचे असेल तर दरवर्षीएकरी किमान 10 टन गुणवत्तेची द्राक्षे यावीच लागतात. द्राक्षबागेवर अगदी सुरुवातीपासून अनेक अंगांनी सतत खर्च चालू असतो. याबाबत वेळीच व्यवस्था केली नाही आणि काटेकोर हिशोब ठेवला नाही, तर मिळणारे सर्वउत्पादन हे बँक व्याज-हप्ते, खते, औषधे खर्च, मजुरी व दरवर्षी किमान उत्पादन घेण्यात आलेले अपयश यामुळे आलेली तूट भरून काढण्यातच खर्च होते.
 
मांडवाचा खर्च 
 
द्राक्षलागवड यशस्वी होण्यसाठी जंगलीची रोपे लावून 4 महिन्यात त्या रोपांची नवी जोमदार वाढ सुरू झाली की मांडव उभारणी करावी लागते. यासाठी एकेकाळी एकरी एक हजार रुपयांपर्यंत पण बँकेकडून मिळत नसत. मात्र आपल्या द्राक्षउत्पादन तंत्रातील यशस्वी प्रयोगाच्या बळावर महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतीसाठी आता ही पत एकरी अडीच लाख रुपयांपर्यंत मिळते. पण बँकेकडून कागदपत्रे पुरे होऊनही कर्जाची रक्कम फार उशीरा हाती येते. नवीन द्राक्षबागेचे डोळे भरून ती द्राक्षबाग 3 फूट उंचीची होण्यापूर्वी मांडव उभा करणे आवश्यक आहे. तसा मांडव तयार नसेल तर त्यानंतर तीन महिन्यात संपूर्ण बाग नीट वळण न देता आल्याने अडचणीत सापडते. त्या द्राक्षबागेला पहिल्या वर्षी पूर्ण पीक मिळण्याची शक्यता राहत नाही व पुढील वर्षांमध्ये अशी दर्व द्राक्षबाग एकसारखी सुधारता येत नाही.
 
सुरुवातीचे खर्च
 
नवीन द्राक्षबाग लावताना चर काढावी लागते. हे चर भरण्यास जमिनीच्या प्रकाशाप्रमाणे दोन ट्रक उत्तम कुजलेले शेणखत व सुमारे एक टन सुपर फॉस्फेट घालावे लागते. कारण सुपर फॉस्फेट हे बशा बैलासारखे असते. जमीन भारी असेल किंवा चुनखडीची असेल तर चर भरताना तेथील माती बाहेर टाकावी लागते. व शेणखताएवढ्या गाड्या मुरूम, माती किंवा माळाची माती असावी. बागेत योग्य चर किंवा खड्डे काढणे व ती चर प्रमाणशीर भरून घेणे गरजेचे आहे. जानेवारीत मकरसंक्रांतच्या वेळी जमीन नांगरणे, खुरटणे, धसे वेचणे इ. कामांची आखणी करणे आवश्यक असते. या हुंड्यांना ठिबक करावे.
 
देणी
 
द्राक्ष उत्पादनासाठी बँकेकडून मिळणार्‍या कर्जाचे हप्ते, त्यांचे व्याज, त्यांच्या परतफेडीचे प्रकार याबाबत कर्ज घेतानाच आपण काही व्यवस्था केली पाहिजे. पहिल्या वर्षाच्या उत्पादनात द्राक्षबागेवर केलेला खर्च परत मिळू शकतो. त्याचबरोबर पुढील वर्षाच्या एप्रिल व ऑक्टोबर छाटणीला खते, औषधे, मंजुरी या गोष्टींचा खर्च भागू शकतो. परंतु याबाबतचे काटेकोर जमाखर्च वेळोवेळी मांडून तपासले पाहिजेत.
 
संजीवकांचा खर्च
 
नवीन तंत्राच्या व्यापारी प्रचाराच्या आहारी जाऊन व कधी कधी खोट्या प्रतिष्ठेसाठी नको त्या खोट्या खर्चाला आपण प्रवृत्त होतो. अशीच परिस्थिती अलीकडे द्राक्षासाठी बाजारात प्रचारात आणलेल्या संजीवकाबाबत होते. 6 बी.ए., युरॅसिल, सायकोसिल, आय. बी.ए. इथरेल, इथेपॉन यासारखी अनेक संजीवके फार काटेकोरपणे व विचारपूर्वक नेमक्या अवस्थेतच वापरावयाची असतात. कोणतेही संजीवक चुकीच्या पद्धतीने वापरणे बागेला हानिकारक असते. द्राक्षबागेसाठी खते हा एक मोठ्या खर्चाचा भाग आहे. द्राक्षबागांच्या लावणीनंतर 2 ते 3 वर्षांनी बाहेरून अगदीच अल्प खते पुरवून उत्तम उत्पादन घेता येते. हे परदेशातील व महाराष्ट्रातील अनेक द्राक्षबागाईतदारांनी दाखवून दिले आहे.
 
औषधे व मजूरी यावरील खर्च
 
द्राक्षबागांना आपल्याकडील पावसाळी व कोरड्या हिवाळी हवामानात काही ठराविक रोग ठराविक काळात येण्याची शक्यता असते. याबाबत योग्य अभ्यास असेल तर वेळीच अगदी मर्यादित औषधे विचारपूर्वक वापरून यावरचा बराच खर्च कमी करता येतो. 
 
द्राक्षलागवडीसाठी मजुराकडून वेळच्या वेळी करून घ्यावयाची अनेक कामे असतात. मजुराकडून आंधळेपणाने काम करून घेण्याचे आपण टाळले पाहिजे. मग मजुरीवरील खर्च हा आता अनेक अंगाने वाचवता येण्यासारखा आहे.
 
नैसर्गिक पिके
 
महाराष्ट्रात द्राक्षं तयार होण्याच्या सुमारास व काडी तयार होण्याच्या वेळी काही पट्ट्यात गारपीटीचा धोका असतो. तसेच आकस्मित वादळी पावसात फुलोर्‍यातील द्राक्षबागेतील घड कुजतात. 
तयार झालेला द्राक्षमाल कोणत्या व्यवस्थेने पोहोचविणार याचे पण पूर्ण नियोजन हवे. अशा रीतीने योग्य आर्थिक आराखडा आखून नंतरच द्राक्षबाग उभी करण्याचा निर्णय घ्यावा. 
द्राक्षगुरू प्रा. वसंत शि. माळी