ऊसासाठी सूक्ष्मसिंचनाव्दारे पाणी व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    17-Mar-2020
|sugarcane_1  H
 
उसाला पाणी केव्हा द्यावे? उसाला पाणी किती द्यावे? आणि उसाला पाणी कसे द्यावे? या संबंधी माहितीचा समावेश या लेखात केला आहे
शेतीसाठी पाण्याचे कार्यक्षम नियोजन ही यशस्वी पीक उत्पादनाची गुरुकिल्ली आहे. राज्यात शेतीसाठी जेवढे पाणी उपपब्ध आहे, त्यापैकी जवळ-जवळ 60 टक्के पाणी फक्त उस या एकाच पिकासाठी वापरले जाते. उस हे मुळातच जास्त कालावधीचे बागायती पीक आहे. त्यामुळे इतर पिकाच्या तुलणेत उस पिकाची पाणीची गरज अधिक असली तरी उसास जेवढे पाणी जास्त तेवढे उसाचे उत्पादन अधिक हा गैरसमज उस बागायतदार शेतकर्‍यांच्या मनामध्ये घर करुन बसला आहे. कोणत्याही पिकाची पाण्याची गरज ही पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, पिकाचे वाण तसेच हंगाम यावर अवलंबून असते. पण गैरसमजामुळे शेतकरी उस शेतीला पिकाच्या गरजेपेक्षा 2 ते 3 पटीने जादा पाण्याचा वापर करतात असे दिसून येते.
 
उस शेतीसाठी पाण्याच्या अशा अनिर्बंध वापरामुळे जमिनी पानथळ व क्षारयुक्त बनत चालल्या आहेत. महाराष्ट्रात उसाच्या घटत्या उत्पादकतेमागे अनेक कारणांपैकी पिकासाठी पाण्याचा वारेमाप वापर किंवा दोन पाण्याच्या पाळयातील जास्त अंतर, हे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर अनिष्ठ परिणाम होवून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होतांना दिसत आहे. म्हणून राज्यात उसाची हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी शास्त्रीय पध्दतीने पाण्याचे नियोजन होणे अत्यंंत गरजेचे आहे.
 
उसाला पाणी केव्हा द्यावे?
 
उस पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने त्याच्या गरजेप्रमाणे पाणी देणे महत्वाचे आहे. उस उगवण आणि फुटवा फुटणे हा काळ 3-4 महिन्यांचा कालावधी असून या सुरुवातीच्या काळात ऊसाला पाणी कमी लागते. याउलट उन्हाळयात उसाची जोमदार वाढ चालू होते, अशावेळी पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने ऊसाला पाणी उशीरा व कमी मिळते. 
 
ऊसासाठी पाण्याचे दोन पाळीतील अंतर हे जमिनीची पाणी धारण क्षमता, पिक वाढीची अवस्था व लागवडीचा हंगाम या बाबींवर अवलंबून असते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील संशोधनावरुन ऊस पिकासाठी हिवाळ्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) 18 ते 20 दिवसांनी, उन्हाळयात (मार्च ते जून) 8 ते 10 दिवसांनी आणि पावसाळयात (जुलै ते ऑक्टोंबर) 12 ते 15 दिवसांनी पाणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 
 
उसाला पाणी किती द्यावे?
 
महाराष्ट्रात ऊसाची लागवड वेगवेगळ्या हंगामात म्हणजेच आडसाली, पुर्वहंगामी व सुरु हंगामात केली जाते. तसेच ऊसाचा खोडवा ठेवला जातो. ऊसाच्या वाढीचा कालावधी आणि हंगाम वेगवेगळा असल्यामुळे पाण्याची गरज देखील वेगवेगळी असते. आडसाली उसाचा वाढीचा कालावधी सर्वात जास्त व त्याखालोखाल पूर्वहंगामी व सुरु आणि सर्वात कमी कालावधी खोडवा पिकाचा असतो. त्यामुळे आडसाली ऊसास जास्त पाणी लागते, तसेच खोडवा पिकास कमी पाणी लागते.
पाडेगाव येथे यासंबंधी प्रयोग घेण्यात आले असून हंगामानुसार पाण्याची गरज खालील प्रमाणे आहे.
 
 अ.नं   हंगाम एकूण पाणी (सें.मी.)  एकूण पाणी पाळ्या
 1.  आडसाली 340 ते 350  38 ते 42
 2.   पूर्व हंगामी 300 ते 325  32 ते 34
 3.  सुरु 250 ते 275   28 ते 30
खोडवा 225 ते 250
 26 ते 28

 
 
ऊस वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाचे पाणी:
 
 अ.नं ऊस वाढीची    अवस्था  कालावधी     (महिने)
 


  एका पाळीस द्यावयाचे पाणी (हे.सें.मी)  
 1  उगवण  सुरु  पुर्वहंगामी  आडसाली  
 2  फुटवा  1.5 ते 2 2   1.5 ते  1.5 ते 2  6
 3  पुर्व वाढ  2 ते 4     2 ते 4 2   ते 4  8 ते 10
 4  जोमदार वाढ  6 ते 10   6 ते 12   6 ते 14   10 ते 12
 5  पक्वता
 
10 ते 12 

 12 ते 14   14 ते 16   7 ते 8
 
उस उगवण अवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात वरंबा बुडेपर्यंत पाणी देउ नये. यावेळी ऊसाला जास्त पाणी दिल्यास नत्रयुक्त खते वाया जातात. कमी पाण्यामुळे जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो. मुळाची वाढ व कार्यक्षमता योग्य राहते.
उसाला पाणी कसे द्यावे?
 
ऊसाला लागणारे पाणी योग्य पध्दतीने देता येण्यासाठी ऊसाची रान बांधणी चांगली करावी. जमिनीचा प्रकार, तिचा उतार यांचा विचार करुन सरी वरंब्याची लांबी ठरवावी. जमीन जास्त उताराची असल्यास सर्व भागावर पाणी सारखे बसण्यासाठी सरीची लांबी कमी ठेवावी. त्याचप्रमाणे सरी नेहमी उताराला आडव्या दिशेने तयार करावी. भारी जमिनीवर लांब सरी वापरणे चांगले. ज्याप्रमाणे उसाची वाढ होत जाते त्याप्रमाणे पाण्याची गरज वाढते. म्हणून ऊसाच्या लागणी पासूनच कट भरभरून पाणी देण्याची गरज नाही. लागणी पासून उस बांधणी पर्यंत पाणी कमी लागते. 
 
ठिबक सिंचन पध्द्त
 
ठिबक सिंचनासाठी उसाची लागवड पध्दत
 
1)75-150 सें.मी. जोड ओळ पध्दत
 
या पध्दतीत सलग 75 सें.मी. अंतरावर सर्‍या पाडाव्यात व दर दोन सर्‍यात उसाची लागण करुन तिसरी सरी मोकळी सोडावी. यात प्रत्येक जोडओळीसाठी एक उपनळी वापरावी म्हणजे दोन उपनळयातील अंतर 225 सें.मी. राहील. ही पध्दत हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये वापरावी.
 
2) 90-180 सें.मी. जोड ओळ पध्दत 
 
या पध्दतीत सलग 90 सें.मी. अंतरावर सर्‍या पाडाव्यात व दर दोन सर्‍यात उसाची लागण करुन तिसरी सरी मोकळी सोडावी. यात प्रत्येक जोडओळीसाठी एक उपनळी वापरावी म्हणजे दोन उपनळयातील अंतर 270 सें.मी. राहील. मध्यम ते भारी जमिनीमध्ये ही पध्दत वापरावी.
 
3) चार ओळ लागवड पध्दत 
 
या पध्दतीत सलग 90 सें.मी. अंतरावर सर्‍या पाडाव्यात व दर चार सर्‍यात उसाची लागण करुन पाचवी सरी मोकळी सोडावी. चार ओळीतील पहील्या दोन ओळीसाठी एक व दुसर्‍या दोन ओळीसाठी एक अशा दोन स्वतंत्र उपनळया वापराव्यात. यात पहिल्या दोन उपनळयात 180 सें.मी. व नंतरच्या दोन उपनळयात 270 सें.मी.अंतर राहते. 
 
4)5 फुट सलग लागवड पध्दत 
 
ऊसाच्या यांत्रीकी तोडणीच्या दृष्टीने वरील पध्दती कांहीशा अडचणीच्या ठरतात. त्यामुळे कांहीशेतकरी 5 फुट अंतरावर सलग सर्‍या काढून त्यामध्ये ऊसाची लागण करतात. या पध्दतीमध्ये प्रतेक सरीसाठी स्वतंत्र उपनळी वापरावी लागते. यामुळे उपनळ्यांची संख्या वाढते आणि ठिबक सिंचनावरील खर्चामध्ये अंदाजे 20 ते 25 टक्के वाढ होते. मध्यम ते भारी जमिनीमध्ये ही पध्दत वापरावी.
 
ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन:
 
ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन करताना प्रथम ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज समजून घ्यावी लागेल.त्यासाठी खालील बाबी विचारात घ्याव्यात.
 
1. बाष्पिभवन वेग:- पिकाची पाण्याची गरज ही स्थानिक बाष्पीभवनाच्या वेगाशी निगडीत असते.  
 
2) बाष्पीभवन पात्र गुणांक:- बाष्पीभवनाचा प्रत्यक्ष वेग काढण्यासाठी बाष्पीभवन पात्रातून होणा-या बाष्पीभवन वेगास बाष्पीभवन पात्र गुणांकाने गुणणे आवश्यक असते. हा गुणांक वेगवेगळा असतो. आपल्या विभागासाठी 0.7 इतका धरावा.
 
3) पीक वाढ गुणांक:- सुरु ऊस पिकासाठी पुढीलप्रमाणे पीक गुणांक वापरावेत. 
 
 अ.नं   पिकाचा कालावधी  पीक गुणांक
 1  0 ते 2 महिने  0.6
 2  3 ते 4 महिने   0.85
 3   5 ते 6 महिने  1.0
 4  7 ते 9 महिने  1.15
 5  10 ते 11 महिने  0.85
 6  12 महिन्याचे पुढे  0.65
 
4) भिजणारे क्षेत्रफळ:- उसासाठी फक्त 70 टक्के क्षेत्र भिजवावे म्हणून उसासाठी ओलीत क्षेत्र गुणांक 0.7 इतका धरावा.
 
ऊस पिकासाठी लागणारे पाणी
 
शेतकर्‍यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ठिबक सिंचन संच दररोज किती तास चालवावा ? यासाठी ऊस पिकाची दररोजची पाण्याची गरज पुढील सुत्राचा वापर करुन काढावी.
दोन उपनळयातील अंतर (मी) द दोन ड्रीपर मधील अंतर (मी) द बाष्पीभवन वेग (मी.मी.) द बाष्पीभवन पात्र गुणांक (0.7) द पीकवाढ गुणांक द ओलीत क्षेत्र गुणांक (0.7)
 
पिकास लागणारे पाणी = -----------------------------------------------------
(लिटर/दिवस) समानता गुणांक (0.9)
 
वरील सुत्राचा वापर करुन ऊस पिकाची दररोजची पाण्याची गरज काढल्यानंतर दररोज ठिबक संच किती वेळ चालवावा यासाठी खालील सुत्राचा वापर करावा.
पिकास द्यावयाचे पाणी (लिटर)
 
ठिबक सिंचन संच (तास) =---------------------------------------------------
चालविण्याची वेळ एका ड्रिपरमधून येणारे सरासरी पाणी (लि./तास) 
 
उसाची पाण्याची गरज व ठिबक संच चालवण्याचा कालावधी-
 
 
अ.नं.   महिने  बाष्पीभवन .वेग (मी.मी.)
सरासरी पिक वाढ
 
गुणांक पिकास पाण्याची गरज (लिटर/दिवस)

सिंचन संच दररोज चालविण्याचा कालावधी (4 लीटरचा ड्रीपर)

 
 

     
   तास मिनीटे 
   जानेवारी  4.07   0.6  2.24   0  34
  2 फेब्रुवारी     5.49  0.65  3.27   0  49
 3   मार्च    7.33  0.9   6.06   1   31
 4   एप्रील    8.7  0.9  7.213   1  48
  5  मे    9.24  1.1  9.33  2   20
  6 जुन      5.62  1.1   5.68  1  25
  7  जुलै   4.1  1.15  4.33   1   5
  8  ऑगस्ट     3.77  1.15  3.98  1  0
  9 सप्टेबर   4.37  1.15  4.61   1  9
  10 ऑक्टोबर      4.49 1   4.12  1   2
  11  नोव्हेंबर    4.1  0.85   3.20   0   48
 12  डिसेंबर    3.63  0.65  2.17   0   33
 
 
ठिबक सिंचन पध्दतीचे फायदे
 
1)ऊस पिकाच्या कार्यक्षेत्राच्या फक्त 70 टक्के भागातच पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत 40 ते 50 टक्क्यांपर्यंत होते.
 
2) जमिन सतत वाफसा अवस्थेत राहुन जमिनीत पाण्याचे व प्राणवायुचे प्रमाण योग्य साधले जाते. त्यामुळे पिकाला गरजेनुसार पाण्याची व अन्नद्रव्याची उपलब्धता होवून उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते.
 
3)ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारे घनरुप विद्राव्य खते देता येतात. त्यामुळे खतांच्या मात्रेत 25 टक्क्यापर्यंत बचत करता येते.
 
4)पाण्याच्या मर्यादित वापरामुळे उसातील साखर उतारा वाढतो.
 
5) पाण्याच्या कमी वापरामुळे जमीनी क्षारयुक्त होण्याचा धोका कमी होतो.
 
6)पृष्ठभागावरील जमीनीचा बराच भाग कोरडा राहत असल्याने तणांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो.
 
7)ठिबक सिंचनामुळे विजेची बचत होते.
 
ठिबक सिंचन संचातून रासायनिक खतांचा वापर
 
विद्राव्य खते देण्याची उपकरणे  
 
व्हेंचुरी नलिका,खताची टाकी,कमी अश्वशक्तिचा विद्युत पंप ठिबक सिंचनातून रासायनिक खते वापरताना फक्त विद्राव्य खताचाच वापर करावा. अन्यथा तोटया बद पडण्याचा धोका वाढतो. 
 
ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते 
 
ठिबक सिंचनातून देण्यासाठी युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे. लागणीपासून मोठया बांधणीपर्यंत दर आठवडयाच्या अंतराने समान 20 हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान 10 हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होतेे. पारंपारिक स्फुरदयुक्त व पालाशयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यात ऊस लागणीचे वेळी व मोठया बाधणीचे वेळी जमिनीतून द्यावीत.
ठिबक सिंचनातून विद्राव्य खते
 
 अ.नं   आठवडे   नत्र (कि. /हे)  स्फुरद (कि./हे.)    पालाश (कि./हे.) 
 1  1 ते 4   30   9   9 
 2  5 ते 9   70   32   14
 3  10 ते 12   100   51   32
 4  21 ते 26   --   --  37
 एकुण  200   92   92  
 
 
सुरु ऊसासाठी विद्राव्य खताची शिफारस
 
मध्यम खोल, काळ्या जमिनीत सुरु ऊसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व ख्ताचा कार्यक्षम वापर आणि आर्थिक फायद्यासाठी 80 % विद्राव्य खते वरिल तक्त्यानुसार दर आठवड्यास एक या प्रमाणे 26 हप्त्यात ठिबक सिंचनातुन देण्याची शिफारस देण्यात येत आहे. तसेच ठिबक सिंचनाद्वारे 100 % बाष्पपर्णात्सना एवढे पाणी एक दिवसाआड देण्यात यावे.
 
सबसरफेस (भुपृष्ठाखालील) ठिबक सिंचन पध्दत
 
सबसरफेस ठिबक सिंचनाचे फायदे 
 
1.बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा र्‍हास कमी होतो.
 
2.तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
 
3.जमिनीवरच्या ठिबक सिंचनापेक्षा या पद्धतीत फार मोठ्या प्रमाणात बचत होते.
 
4.ऊसाची वाढ एकसारखी होते.
 
5.किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
 
6.पाण्याच्या बचतीमुळे लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
 
सबसरफेस (भुपृष्ठाखालील) ठिबक सिंचन का वापरावे ?
 
1.ऊसाची तोडणी यत्राच्या सहाय्याने करण्यासाठी
 
2.पाण्याची उपयोगिता वाढविण्यासाठी 
 
3.मजुराकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी
 
4.एकापेक्षा अनेक खोडवे घेण्यासाठी
 
5.उदीर, कोल्हे आणि कुत्र्यापासून लटरलचे सरक्षण करण्यासाठी
 
सबसरफेस (भुपृष्ठाखालील) ठिबक सिंचन पध्दत अडचणी 
 
1.ऊसाच्या मुळ्यामुळे ड्रीपर चोक होतात. चोक अप काढण्यासाठी ट्रेपलॅान या हरबीसाइडचा वापर करावा लागतो.
 
2.यांत्रिक तोडणीमुळे लॅटरल दाबल्या जातात आणि त्यामुळे
 
3.मातीची कठिणता वाढते (डेळश्र उेारिलींळेप)
 
4.प्राथमिक खर्च जास्त असून ती बसविण्यासाठी अवघड आहे. 
 
5.तसेच या पद्धतीचा पुर्नवापर करता येत नाही.
 
 
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे घेतलेल्या सूक्ष्म सिंचन प्रयोगांचे निष्कर्ष आणि प्रयोगाबाबतची सविस्तर माहिती 
 
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे सन 2003 ते 2006 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या लागवड पद्धती आणि ठिबक व मोकाट सिंचन पध्द्त यांचा अभ्यास करण्यासाठी सलग 3 वर्ष प्रयोग घेण्यात आला त्याचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
 
प्रयोगाचे नाव: पूर्वहंगामी ऊसामध्ये वेगवेगळ्या लागवड पध्द्तींमध्ये ठिबक आणि मोकाट पाणी पध्द्तींचा ऊस उत्पादनावर आणि पाणी बर्चीींवर होणारा परिणाम अभ्यासणे.
 
शिफारस:
 
पश्चिम महाराष्ट्रात पूर्वहंगामी ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी आणि पाण्याच्या बचतीसाठी ऊसाची लागवड 75-150 सें.मी. या जोडओळ पध्द्तीने किंवा 90-180 सें.मी. या चार ओळ पध्द्तीने ठिबक सिंचनाखाली करावी. 
 
ऊसासाठी एकरी ठिबक सिंचनाचा अंदाजे खर्च
 
 अ.न   लागण पद्धत   लॅटरलची एकुण लांबी(फुट)   सर्व साधरण एकरी अंदाजे खर्च(रू)
 1   4 फुट सरी   10,000   45,000 - 50,000
 2  5 फुट सरी   8,000   37,000 - 40,000
 3  6 फुट सरी   6,666   33,000 - 35,000
 4  7 फुट सरी   5,714   30,000 - 32,000
 5  7.5 फुट सरी (75-150 सेमी)   5,333   28,000 - 30,000
 6  8 फुट सरी   5,000   27,000 - 28,000
 7  9 फुट सरी (90-180 सेमी)   4,444   25,000 - 27,000
 
डॉ. प्रमोद चौधरी,डॉ.भरत रासकर आणि श्री. संतोष शिंदे
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव- 415 521
ता. फलटण, जि. सातारा