रोपवाटिकेत नर्सरीमध्ये कलम करणे

डिजिटल बळीराजा-2    16-Mar-2020
|grapting _1  H
 
ही पद्धत सोपी आणि कमी खर्चाची आहे. आपल्या परिस्थितीत ही पद्धत सोईची आहे. ही पद्धत अशी-
 
1)खुंटावरील पक्व काड्या छाटून व पाने काढून तयार करणे.
 
2)प्रत्येक छाट कलम 4-5 डोळ्यांचा असावा.
 
3)नर्सरी वाफ्याचा ओटा चांगला तयार करावा.
 
4)वर शेड नेट बांधावे.
 
5)फाटेकलमावरील शेंड्याचा एक डोळा राखून इतर डोळे काढावेत.
 
6)खालच्या पेरालगत डोळ्याच्या खाली ताजा काप घ्यावा.
 
7)फाट्यांची बुडे आयबीए द्रावणात (5000 पीपीएम) बुडवावीत.
 
8)रुंद वरंब्यावर सरी भिजवून वरंब्यावर फाटे कलमे लावावीत.
 
9)फाटे कलमांचे 1 किंवा 2 डोळे जमिनीवर ठेवून, इतर भाग जमिनीवर गाडावा.
 
10)फाटे कलमे ओळीत, (10-15 सें.मी.) अंतराने लावावीत. 
 
यानंतर 6 ते 12 महिने खुंट कलमे जागेवरच वाढू द्यावीत. या काळात खुंटावर एकच फोक-फूट वाढू द्यावा किंवा सर्व फुटी येतील तशा वाढून जमिनीवर पसरू द्याव्यात. योग्य आणि सोयीस्कर वेळ निवडून पुढीलपैकी एक पद्धत निवडून कलमे करावीत. आपल्याकडे कलमे करण्यासाठी जून ते ऑक्टोबर हा कालावधी योग्य आहे, तसेच नोव्हेंबर ते जानेवारी या काळातही विशेष काळजी घेऊन, कलमे करता येतात.
 
अ)चीप बडींग : मूळखुंट काडीवर-नोव्हेंबर-जानेवारी या काळात ही पद्धत वापरावी. 
 
ब) ग्रीन ग्राफ्टींग : मूळखुंटावर सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात ही पद्धत वापरावी. 
 
क) क्लेफ्ट ग्राफ्टींग : पक्व खुंट कांडीवर पक्व सायन डोळा बांधणे जानेवारी- मार्च या काळात ही पद्धत वापरावी. 
 
ड) टी-बडींग : मूळ खुंटावर ऑगस्ट-सप्टेंबर या काळात ही पद्धत वापरावी. 
 
इ) थीन ड्राफ्टींग : मूळ खुंटावर जून-जुलै या काळात ही पद्धत वापरावी.
 
6.3 ग्रीन ग्राफ्टींग : या पद्धतीत दोन वर्षे वयाच्या खुंटावर 2-3 डोळ्यांची सायन काडी पाचर कलम पद्धतीने जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान कलमे केली जातात. 
6.4 टी-बडींग : आपल्याकडे गुलाबात ज्या प्रमाणे ‘टी’ बडींग करतात, त्याप्रमाणे द्राक्षातही खुंटावर याच पद्धतीने डोळे भरावेत, ज्या काळात साल सुटते अशा काळातच ही पद्धत यशस्वी ठरते.
 
6.5 मायक्रोग्राफ्टींग : ज्या वेळी खुंट आणि सायन दुर्मिळ असते. अशावेळी ही पद्धत वापरतात. याबद्दल फारसे काम झालेले नाही. सद्य:स्थितीत ही पद्धत महाराष्ट्रात वापरण्याची गरज वायत नाही. 
 
6.6 स्वयंभू पद्धत : स्वयंभू तथा इनसीटू पद्धत म्हणजे काय? या पद्धतीत ज्या जागी द्राक्ष बाग लावायची आहे त्या जागी, नेहमीप्रमाणे फाटे कलमे न लावता, खुंटाची फाटे कलमे (मुळ्या फुटलेली) लावावीत. ती तेथे वाढवून, त्यावर इच्छित जातीची कलमे योग्य त्या पद्धतीने करावीत. तयार कलमे बाहेरून आणून लागवड करण्यापेक्षा ही पद्धत वापरणे पुढील प्रमाणे फायद्याचे व सोयीचे ठरते.
 
1. आपल्या जमिनीत योग्य ठरणारी खुंट जात लावता येते.
 
2. खुंट व कलमी जात, याबद्दल खात्री बाळगता येते.
 
3. तयार कलमासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागत नाही. त्यामुळे योग्य वेळी लागवड करता येते.
 
4. आपणच कलमे करीत असल्याने, कमी खर्चात कलमे करता येतात. आपल्याला सोईची अशी कलम करण्याची पद्धत निवडता येते.
 
5. खुंट लावल्यापासून कलमे करेपर्यंत पुरेसा अवधी मिळतो, त्या काळात खुंट कलमांची मुळे चांगली बळावतात, त्यामुळे कलमे केल्यानंतर त्यांची वाढ जोमाने व एकसारखी होते. 
 
स्वयंभू कामे करण्याचे वेळापत्रक
 
 अ.क्र  करावयाचे काम कालावधी
 1   माती परीक्षण ऑक्टोबर
2  खुंटाची निवड ऑक्टोबर
 3  खुंटाची रुटेड कलमे नोव्हेंबर
 4  खुंट कलमाचीं लागवड तयारी डिसेंबर
 5  . खुंटे कलमे लागवड जानेवारी
 6  खुंटे कलमे वाढवणे फेब्रुवारी ते मे
 7  कलमे करणे जून-जुलै
 8  कलमांची जोपासना ऑगस्ट
 9  खुंटाच्या फुटी काढणे सप्टेंबर
 10  कलमे फुटी वाढविणे/बांधणे ऑक्टोबर
 
अशारीतीने एकूण 12 महिन्यांत स्वयंभू रीतीने कलमे करून द्राक्षबाग खात्रीने उभी करता येते.
 
खुंट वापरताना घ्यावयाची इतर काळजी
 
1.माती-पाणी परीक्षण आवश्यक आहे. सामू, क्षारता, चुनखडी, पाणी धारण शक्ती या 4 बाबी माती परीक्षणात महत्त्वाच्या आहेत
पाण्यासंबंधी एस. एल./ आर. नायट्रेस, क्लोराईड आणि क्षारता, हे घटक महत्त्वाचे आहेत.
 
2.खुंटांची लागवड जेवढी खोलवर करता येईल तेवढी करावी. उथळ लागवड करू नये.
 
3.खुंट निवडताना काळजी घ्यावी. बंगलोर डॉगरीज, डिग्रासेट हे वेगळे खुंट नसून अपभ्रंशीत नावे आहेत.
 
4.कलम जोड सांधण्यासाठी पी.व्ही.ए. म्हणजे पॉलीव्हिनल अल्कोहोल या रसायनाचे 7 ते 10 टक्के तीव्रतेचे द्रावण वापरावे, म्हणजे जोड चांगला साधतो.
 
5.खुंट वापरून लागवड करताना दोन ओळीत 10 किंवा 12 फूट एवढं अंतर राखावं. 
 
6.लागवडीसाठी खड्डे न करता चरच खणावेत. 
 
7.ओळीमध्ये दोन वेलीत 6 फूट एवढे अंतर राखावे.
 
8.कलम जमिनीलगत अथवा फार उंचीवर सरासरीने 2 फूट उंचीवर तर कमाल 3 फूट उंचीवर कलमे करावीत. एका पट्ट्यात सारखेच अंतर राखणे चांगले ठरते. 
 
9.खुंट वापरतेवेली एखादी खुंट वापरून वाढवलेली बाग वारंवार भेट देऊन पाहावी, चर्चा करावी.
 
10.स्वयंभू पद्धतीने कलमे केल्यानंतर मूळ खुंट लावल्यापासून पहिले पीक 2॥ वर्षात मिळते हे ध्यानात घ्यावे. रुट स्टॉकची बाग अधिक दिवस चांगले उत्पादन देते.
 
11.खुंट वापरल्याने मुळांची आणि काडी विस्ताराची क्षमता वाढते, अनायासेच वेल वाढण्यास, अधिक मूलद्रव्ये उपयोगी पडतात.
 
12.खुंट बागातील वेलीवर गर्डलिंगच्या मर्यादा पडतात. तेव्हा संजीवके वापरताना सायटोकायनीन गटातील संजीवकाचा अधिक वापर करणे लाभदायक ठरते. 
 
स्वयंभू पद्धतीचे इतर फायदे
 
ओन रुटेड वेली वाढवताना काही वेळा जातींची भेसळ होण्याची शक्यता असते. अशा वेळी भेसळ वेलीवर कलम करण्यासाठी ही पद्धत उपयोगी पडते. दुसरे असे, की एकाच खोडावर अधिक जातींची कलमे करण्यासाठी ही पद्धत वापरता येते. अनाबेशाही जातीवर -थॉम्पसन सीडलेस आणि किशमिश चोनी या जाती उत्तम रीतीने कलमे करून वाढविता येतात. डॉगरीज या खुंटावर अशाच प्रकारे, गुलाबी, मस्कत, चारडोणी आणि सोनाका या जाती वाढवता येतात. विशेेषकरून परस बागेत, गच्चीवर, वरच्या मजल्यापर्यंत खुंट वाढवून त्यावर चार-पाच ओलांडे वाढवून प्रत्येक ओलांड्यावर वेगळी जात अशा चार-पाच जाती वाढविता येऊन विविधता आणता येईल.
 
संकरित जाती निर्माण करण्यासाठीही या पद्धतीने मातृजाती वाढवून घेऊन त्यांचा संकर करणे सोपे जाते. उदा. एकाच खुंटावर चार ओलांडे राखून त्यावर दोन बियांच्या आणि दोन बिनबियांच्या जाती वाढवून घ्यायच्या म्हणजे त्यामध्ये सरळ आणि रेसीप्रोक संकर-क्रॉसेस करून, पुढील पिढी सहजपणे कमी वेळात तयार करता येते.
 
7.महत्त्वाचे खुंट व त्यांचे निवडक गुणधर्म 
 
1. रामसे - चुकीचे नाव सॉल्ट क्रिक. हा खुंट व्हिटीस चँपीनी प्रकारातील आहे. जोमदार वाढ, सूत्रकृमी व फायलेक्झोरास दाद न देणारा, चुनखडीत मध्यम तग धरणारा. मुळे येण्यास उशीर करणार हा खुंट आहे. जस्त कमतरता वाढणे हे याचे वैशिष्ट्य, हलक्या, वाळूच्या, मुरमाड जमिनीत थॉम्पसन सीडलेससाठी चांगला.
2. डॉगरीज : व्हिटीस चँपीनी या प्रकारातील अति जोमदार वाढ, सूत्रकृमी व फायलोक्झोरास मध्यम प्रतिकारक, चुनखडीयुक्त जमिनीत मध्यम साद, मुळे फुटण्याची कुवत कमी. हलक्या निकस जमिनीत उपयुक्त. सकस व भारी जमिनीत जोमदार वाढीमुळे कमी उत्पादकता. या खुंटामुळे जस्ताची उणीव अधिक दिसते. हलक्या जमिनीसाठी डॉगरीज तर मध्यम-सकस जमिनीसाठी रामसे -अशी निवड करावी.
 
3. फ्रीडम : व्हिटीस चँपेनी आणि 1613 यांचा संकरित वाण मध्यमवाढीचा, सूत्रकृमी आणि फायलोक्झेरा प्रतिकारक, चुनखडीस शंकास्पद आणि मुळे फुटण्यास उत्तम असा या खुंटाचा लौकिक आहे.
 
4. 1616 काऊडेर्क किंवा 1616 सी किंवा 1616 -व्हीटीस-लाँगी आणि व्हिटीस रायपेरीया यांचा संकरित वाण. मध्यमवाढ, सूत्रकृमी आणि फायलोक्झोरास उत्तम प्रतिकारक, चुनखडीत मध्यम प्रतिसाद आणि मुळे उत्तम फुटणारा असा हा खुंट आहे.
5. 1613 सी किंवा 1613 काऊडेर्क किंवा 1613 : हा व्हिटीस लाँगी आणि व्हिटीस व्हिनीफेरा आणि व्हिटीस रायेरिया आणि व्हिटीस लॅब्रुस्का यांच्यातील संकर आहे. मध्यम वाढीचा, सूत्रकृमी आणि फायलोक्झोरा यांना मध्यम प्रतिकारक, चुनखडीत, फारसा न टिकणारा, उत्तम मुळे फुटणारा असा खुंट आहे. 
 
6. हार्मनी : व्हिटीस र्चंपेनी आणि 1613 यातील हा संकरित वाण आहे. मध्यम वाढीचा सूत्रकृमीस चांगला व फायलोक्झेरास कमी प्रतिबंध करणारा भरपूर मुळे फुटणारा आणि चुन्यास मध्यमरीत्या प्रतिसाद देणारा हा खुंट आहे. 
 
7. रूपेस्ट्रीस डूलॉट किंवा रुपेस्ट्रीस सेंट जॉर्ज : व्हिटीस रुपेस्ट्रीसचा हा प्रकार आहे, मध्यम वाढ, सूत्रकृमीस कमी प्रतिसाद, फायलोक्झेरास उत्तम प्रतिसाद, चुनखडीस मध्यम आणि मुळे फुटण्यास उत्तम असा हा खुंट आहे. 
 
8. ए. आर. जी. -वन अ‍ॅरामोना आणि रुपेस्ट्रीस गॅन्झीन नं.1 यांचा हा संकरित वाण आहे. मध्यम वाढीचा, सूत्रकृमी, फायलेक्झोरा आणि चुनखडीस मध्यम प्रतिकारक पण मुळे वाढण्यास उत्तम असा हा खुंट आहे. 
 
9. 99 रिस्टर : 99 आर-व्हिटीस बरलेडिंरी आणि व्हिटीस रुपेस्ट्रीस यातील हा संकरित वाण आहे. मध्यमवाढीचा, सूत्रकृमी आणि फायलोक्झोरास मध्यम प्रतिकार करणारा, चुनखडीस मध्यम तसेच मुळे वाढण्यास मध्यम असा हा खुंट आहे. अवर्षण प्रतिकारक असा हा खुंट असून-वाढत्या वयाबरोबर उत्पादन वाढ करणारा हा खुंट आहे.
 
10. 110 रिस्टर : 110 आर. व्हिटीस बरलेंडिरी आणि व्हिटीस रुपेस्ट्रीस यांच्यातील हा संकरित वाण आहे. मध्यमवाढीचा, साधारण मूळ वाढीचा, सूत्रकृमीस आणि फायलोक्झोरास साधारण प्रतिकारक आणि चुनखडीस बर्‍यापैकी प्रतिबंधक ठरणारा हा खुंट आहे. 99 रिश्टर पेक्षाही हा वाण अवर्षणास सक्षमपणे निभावणारा हा खुंट आहे.
 
11. 149 रुगेरी : 140 रु. व्हिटीस बरलेंडिरी आणि व्हिटीस रूपेस्ट्रीस यातील हा संकर आहे. जोरकस वाढणारा आणि मध्यम मुळे फुटणारा हा खुंट सूत्रकृमीस कमी तर फायलोक्झोरास चांगलाच प्रतिकारक आहे. चुनखडीत तग धरणारा आणि अवर्षणास प्रतिकारक असा हा खुंट आपल्याकडे उपयुक्त ठरणारा आहे.
 
12. 1103 : पाऊलसेन : 1103 पी, व्हिटीस बरलेंडिरी आणि व्हिटीस रूपेस्ट्रीस यांचा हा संकरित वाण आहे. मध्यम जोरकस, मध्यम मुळे असणारा तसेच सूत्रकृमी आणि फायलोक्झोरा यांना मध्यम प्रतिबंधक आहे. चुनखडीच्या जमिनीतही बर्‍यापैकी परिणामकारक आहे. क्षारता विरोधक आणि अवर्षणास तोंड देण्यास बर्‍यापैकी समर्थ असा हा खुंट आहे.
13. एसओफोर (सिलेक्शन ओपनहिम नं.4) -व्हिटीस बरलेंडिरी आणि व्हिटीस रायपेरी यांचा हा संकरित वाण असून, सूत्रकृमी, फायलोक्झेरा चुनखडी प्रतिबंधक आणि जोमदारपणा यात मध्यमरित्या परिणामकारक आहे.
 
14. 5 ए तेलेकी (5ए) व्हिटीस बरलेंडिरी आणि व्हिटीस रायपेरीस यातील हा संकर असून, सूत्रकृमी, फायलोक्झोरा, चुनखडी यास मध्यम प्रतिबंधक असून मध्यम जोरकस वाढीचा आहे.
 
या व्यतिरिक्त पुढील खुंटही कमी अधिक प्रमाणात उपयुक्त ठरण्यासारखे आहेत.
 
 1.  420-ए
  2)   5 बी बी
 3).  34 ईएम
  4)   106-8,
 5)   3306,
  6)   3309,
 7)   101-14
 8)   1202,
  9)   रूपेरिया ग्लोरी,
 10)   शावरझमन,
 11)   के-51-40, 1
  2)   के-51-32.
याशिवाय व्हिटीस प्रकारातील 1. सिलेक्शन -94 2) भोकरी 3) रावसाहेबी, 4) अंगूर कलान, 5) तास, 6) पी.एस.सी/ 9. याजातीही खुंट म्हणून ठराविक परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात.