करा आंब्यावरील महत्त्वाच्या किडी व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    14-Mar-2020
|

mango_1  H x W:
 
 
आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस फार मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. त्याचबरोबर या पिकावर वेगवेगळया किड व रोगांचे प्रमाण देखील वाढत आहे. आंबा पिकावर येणार्‍या महत्वाच्या किडी व रोगांची ओळख, त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी विस्तृत माहितीचा समावेश या लेखात केला आहे।
 
कोकण विभागामध्ये आंबा हे महत्वाचे फळपिक आहे. आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस फार मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. त्याचबरोबर या पिकावर वेगवेगळया किडींचे प्रमाणदेखील वाढत आहे. सद्यस्थितीत कोकण विभागामध्ये आंबा पिकाचा विचार करता नोव्हेंबर महिन्याचा दुसर्‍या पंधरवडयापासून आंब्याला तुरळक प्रमाणात मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे मात्र मोठया प्रमाणात मोहोर येण्यास डिसेंबर - जानेवारी महिन्यात सुरूवात होते. भारतात आंब्याखालील क्षेत्र वाढविण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत परंतु बाजारपेठेच्या बाबतीत असलेल्या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असेल तर केवळ आंबा पिकाखालील क्षेत्र केवळ वाढवून चालणार नाही, तर आंब्याचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढवावे लागेल. परंतु येथील उष्ण व दमट हवामान आंब्यावरील किड व रोगांसाठी अतिशय अनुकुल असल्यामुळे आंब्याचे अर्थकारण हे सर्वस्वी किड व रोगांच्या व्यवस्थापनाशी निगडित आहे. आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस फार मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. त्याचबरोबर या पिकावर वेगवेगळया किड व रोगांचे प्रमाण देखील वाढत आहे. आंबा पिकावर येणार्‍या महत्वाच्या किडी व रोगांची ओळख, त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी विस्तृत माहिती खालीलप्रमाणे. 
 
 
kid_1  H x W: 0
1. तुडतुडे:-
 
1 पिल्ले व प्रौढ आंब्याच्या मोहोरावरील, कोवळया पालवीमधून तसेच कोवळया फळांमधून रस शोषून घेतात परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते.
 
2 पिल्ले तसेच तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळया रंगाच्या (कॅपनोडीयम) बुरशीची वाढ होते व झाड काळे पडते यालाच खार पडणे असे म्हणतात.
 
व्यवस्थापन:-
 
पहिली फवारणी डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 0.9 मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात मोहोर येण्यापुर्वी करावी. ही फवारणी आंबा बागेमधील हापूस तसेच रायवळ जातीच्या सर्व झाडांवर तसेच त्यांच्या खोडांवर करावी ज्यामुळे खोडांवर सुप्तावस्थेत असलेले तुडतुडयांचे नियंत्रण होईल. दुसरी फवारणी बोंगे फुटताना आणि उर्वरित तीन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात. एकाच कीटकनाशकाची पुन्हा फवारणी करू नये त्यामुळे तुडतुडयांमध्ये कीटकनाशकास प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता असते.
 
आंबा मोहोर संरक्षणाचे सुधारीत वेळापत्रक
 
 
 अ.क्र.  फवारणीचा कालावधी किटकनाशक औषधे 10 लिटर पाण्यासाठी प्रमाण शेरा
 1  पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापुर्वी डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 9 मि.ली.
 2  दुसरी फवारणी
(बोंगे फुटताना) लॅम्बडा सायहेलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 6 मि.ली. या फवारणीमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने 5 टक्के हेक्झाकोनॅझोल 5 मि.ली. किंवा पाण्यात
 3  तिसरी फवारणी (दुसर्‍या फवारणी नंतर 15 दिवसांच्या अंतराने) इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही 3 मि.ली. तिसर्‍या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस किटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5 टक्के हेक्झाकोनॅझोल 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
 4   चौथी फवारणी (तिसर्‍या फवारणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने) थायोमेथॉक्झाम 25 टक्के
क्ळद्ध 1.0ग्रॅम
 5  पाचवी फवारणी (चौथ्या फवारणी नंतर 15 दिवसांच्या अंतराने ) डायमेथोएट 30 टक्के प्रवाही किंवा
लॅम्बडा सायहेलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मि.ली.
 6.  सहावी फवारणी (पाचव्या फवारणी नंतर गरज असल्यास 15 दिवसांच्या अंतराने) पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. तुडतुड्याांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.
  
 
टिप:- 1.मोहोर अवस्थेत मधमाश्या व मित्रकीटकांना हानीकारक ठरतील अशा कीटकनाशकांचा वापर टाळावा.
 
2. पिक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीटकनाशकांचा समंजस वापर करावा.
 
2.फुलकिडे:-
 
kid_1  H x W: 0
 
 
1 ही किड 1मि.मि. आकाराची असून किडीचा व पिल्लांचा रंग पिवळसर असतो. 
 
2 मादी कोवळया पानांच्या शिरांमध्ये अंडी घालते.
 
3 पिल्ले व पूर्ण अवस्थेतील फुलकीडे पानाची साल खरवडून पानातील रस शोषतात.
 
4 पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात व पाने वेडीवाकडी होतात.
 
3 प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानगळ होते आणि फक्त शेंडेच शिल्लक राहतात.
 
4 कोवळया फळांची साल खरवडल्यामुळे फळांची साल काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते.
 
व्यवस्थापन:-
 
फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी 30 टक्के प्रवाही डायमेथोएट 1.5 मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणात कीटकनाशकाची फवारणी करावी. फळांवरील फुलकिडींसाठी स्पिनोसॅड 45 टक्के प्रवाही 0.25 मिली किंवा थायोमेथॉक्झाम 25 टक्के 0.2 ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत).
 
3.मिजमाशी:-
 
kid_1  H x W: 0
 
1 प्रादुर्भाव कोवळया पालवीवर, मोहोरावर तसेच लहान फळांवर आढळतो.
 
2 मादी माशी सालीच्या आतमध्ये अंडी घालते.
 
3 अळया बाहेर पडल्यानंतर पेशींवर आपली उपजीविका करतात परिणामी त्या ठिकाणी बारीक, फुगीर गाठ तयार होते.
 
4 पुर्ण वाढलेली अळी गाठीला छिद्र पाडून बाहेर येते व जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. शेंडे जळतात त्यामुळे मोहोर देखील गळतो किंवा वाळतो. मोहोराची दांडी वेडीवाकडी होते.
 
5 प्रादुर्भाव लहान फळांवर झाल्यावर वाटाण्याच्या आकाराच्या फळाची गळ होते.
 
व्यवस्थापन:-
 
झाडाखाली काळे प्लॅस्टिक अंथरले असता कोषावस्थेत जाणार्‍या अळया प्लॅस्टिकवर पडतात व जमिनीत जाता न आल्याने मरतात.
 
4. शेंडा पोखरणारी अळी:-
 kid_1 H x W: 0
 
1 अळी पालवीच्या तसेच मोहोराच्या दांडयाला छिद्र पाडून आत शिरते व आतील भाग पोखरून खाते
 
2 किडग्रस्त फांदी तसेच मोहोर सुकून जातो.
 
3 फांदयावर गाठी निर्माण होतात व अशा फांदया अशक्त राहतात.
 
व्यवस्थापन:-
 
 
या किडीच्या नियंत्रणासाठी सुरूवातीस प्रादुर्भाव कमी असताना किडग्रस्त पालवी किंवा मोहोर किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावी. किडीच्या नियंत्रणासाठी डायक्लोरव्हॉस 76 टक्के प्रवाही 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाही).
 
5.फळमाशी:-
 
 kid_1 H x W: 0
 
माशी किंचित पिवळसर तांबूस रंगाची असून मादी माशीचा पोटाचा शेवटचा भाग टोकदार असतो. अळी पाढंरट रंगाची असून एका बाजूस निमुळती असते. मादी माशी फळे पक्व होण्याच्या अवस्थेत आल्यावर सालीच्या आतमध्ये अंडी घालते. अळी फळांतील गरावर उपजीविका करते. फळ पूर्णपणे नासते व गळून पडते.
 
व्यवस्थापन:- 
 
फळे 12 ते 14 आणे तयार अवस्थेत काढल्यास प्रादुर्भाव टाळता येतो. पडलेली फळे आणि फळमाशी प्रादुर्भित फळे नष्ट करावीत. झाडाखालील जमीन हिवाळयात नांगरावी त्यामुळे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होतील. आंबा फळांना गरम वाफेची प्रक्रिया केली असता फळमाशीच्या अंडी तसेच अळयांचे पूर्णपणे नियंत्रण होऊ शकते.हापूस आंब्यासाठी 470 से. 50मिनिटे तसेच केशर आंब्यासाठी 470 से. 60 मिनिटे उष्णजलप्रक्रीया करावी. डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला ‘रक्षक फळमाशी सापळा’ प्रति हेक्टरी 4 लावावेत. यामध्ये मिथिल युजेनॉल हे आमीष म्हणून वापरावे. 1 महिन्याच्या अंतराने पुर्नवापर करावा. बटर पेपर पासून बनवलेल्या 6 ग 8 इंच आकाराच्या पिशव्या फळे अंडयाच्या आकाराची असताना फळांवर घातल्यास फळे पूर्णपणे फळमाशी विरहीत राहातात.
 
आंब्यावरील महत्त्वाचे रोग
 
1. बुरशीजन्य करपा
 
आंबा उत्पादनातील अनेक समस्यांपैकी बुरशीजन्य करपा रोग ही एक महत्वाची समस्या असून हया रोगाचा प्रादुर्भाव लागवडीपासून आंबा विक्रीपर्यंत कोणत्याही अवस्थेत होतो. हा रोग ‘कोलेटोट्रिकम ग्लोइओस्पोरिऑईडीस्’ या बुरशीमुळे होतो. 
या रोगाचा प्रादुर्भाव कोवळी पाने, जून पाने, मोहोर, फांद्या आणि फळे यांवर होतो. कोवळया पानांवर काळया रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले ठिपके पडल्यामुळे त्यांची वाढ खुंटते आणि ती कडक बनतात. रोग मोठया प्रमाणात असेल तर डहाळयांवरील पाने गळून त्या निष्पर्ण होतात. जून पानांवर अशाच प्रकारचे डाग पडून करपतात म्हणून या रोगाला करपा असे म्हणतात. डाग एकत्र मिसळल्यास पानांवर चट्टे पडतात. हया दोन्ही प्रकारात पानांची अन्न तयार करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे आणि डहाळया मेल्यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि त्याचा उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. 
रोगाचा प्रादुर्भाव मोहोरावर झाल्यास त्याचा मुख्य दांडा, उपफांद्या आणि फुलांची देठे यावर काळे खोलगट डाग पडून मोहोर वाळतो आणि फलधारणा होण्यापूर्वीच फुले गळतात. फळधारणा झाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास लहान फळांवर काळे खोलगट डाग पडून ती गळतात. मोठी कच्ची किंवा पक्व फळे सुध्दा रोगाला बळी पडतात. परंतू कच्च्या फळांमध्ये आम्लतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे बुरशीची वाढ दिसून येत नाही आणि ती सुप्तावस्थेतच राहते.
 
व्यवस्थापन:
 
1 बागांची स्वच्छता करावी.
 
2 एक टक्का तीव्रतेचे बोर्डोमिश्रण हे प्रभावी बुरशीनाशक वापरावे. 
 
3 व्यवस्थापनासाठी कार्बेनडॅझीम 12 टक्के + मॅन्कोझेब 63 टक्के 10 गॅ्रम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
 
4 काढलेली फळे कार्बन्डॅझीम या बुरशीनाशकाच्या 500 पी.पी.एम. तीव्रतेच्या द्रावणात 10 मिनिटे बुडवून सावलीत वाळविल्यास नंतर वाढणार्‍या बुरशीचे नियंत्रण होते. ;अधोरेखित बुरशीनाशके लेबल क्लेम नाहीत.
 
2. भुरी रोग 
 
 
हा रोग “ओयडियम मॅन्जीफेरी” नावाच्या बुरशीमुळे होतो. जानेवारीमध्ये आंब्यावर मोहोर येताच त्यावर किंवा पालवीवर तिची वाढ दिसून येते. बुरशीची वाढ तंतूमय असून त्यावर तयार होणारी असंख्य बीजे मुख्यत्वेकरुन वार्‍यामार्फत पसरतात. हया बुरशीच्या वाढीसाठी साधारणत: 20 ते 25 अंश से. तापमान आवश्यक असते. मोहोर येण्याच्या कालावधीत वातावरण ढगाळ असणे आणि रात्रीचे तापमान दिवसाच्या तुलनेत कमी असणे हया बाबी बुरशीचा प्रसार झपाटयाने होण्यास कारणीभूत आहेत. हया बुरशीच्या वाढीसाठी पोषक असणारे वरील हवामान आणि आंब्याला मोहोर येण्यासाठी लागणारे हवामान यात सर्वसाधारणपणे साधर्म्य असल्याने मोहोरापाठोपाठ त्यावर हा रोग येणे हे जणू दरवर्षीचे चक्र आहे.
 
रोगकारक बुरशीची बीजे आंब्याच्या कोवळया मोहोरावर किंवा पालवीवर रूजून येताच त्यांचा मुळांसारखा भाग पेशीमध्ये शिरुन पेशीतील अन्नरस शोषून घेतो. मोहोरावर रोगाची पहिली लागण त्याच्या शेंडयाजवळ होऊन नंतर तो सर्वत्र पसरतो. मोहोराच्या दांडयाचे टोकाजवळ निरीक्षण केल्यास तेथे पांढर्‍या रंगाच्या तंतूमय बुरशीची वाढ झालेली दिसून येते. अशा बुरशीवर असंख्य बीजे तयार होऊन कालांतराने त्यांचा वा-यामार्फतच पुढील प्रसार होतो. बुरशीच्या वाढीमुळे पेशीतील अन्नरस शोषला जाऊन मोहोराच्या वाढीवर दु:ष्परिणाम होतो. रोगाची तीव्रता अधिक असल्यास सर्वसाधारणपणे 70 ते 80 टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते. रोग कोवळया पालवीवर आल्यास पाने तांबुस रंगाची होऊन कालांतराने वाळतात आणि गळून पडतात. रोगाची लागण मोहोर येताच मोठया प्रमाणात झाली तर फलधारणा होण्यापूर्वीच फुले गळून पडतात आणि अशावेळी 100 टक्के नुकसान होण्याची शक्तता असते. फलधारणेनंतर रोग उद्भवला तर फळांची देठे सुकून त्यांची गळ होते. नियमित फळधारणा होण्यासाठी पॅक्लोब्युट्रॅाझॉल या संजीवकाचा वापर करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. तथापि शिफारस केलेली मात्रा आणि संजीवकाची मात्रा देण्याची वेळ काटेकोरपणे अवलंबणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास झाडावर टप्याटप्याने मोहोर येण्याची क्रिया चालू राहते. आणि असा फुलो-याच्या वाढीव कालावधी रोगाच्या वाढीसाठी आणि बुरशीबीजांच्या निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरुन मोहोरास नुकसान पोहोचवतो. 
 
व्यवस्थापन:-
 
1 मोहोर येताच त्यावर रोग येत असल्यामुळे त्याआधीच रोग नियंत्रणाचे उपाय योजणे संयुक्तिक ठरते.
 
2 गंधक 80 टक्के (पा.मि.) 20 ग्रॅम किंवा डिनोकॅप 10 मि.ली. किंवा कार्बन्डॅझीम 10 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 5 मि.ली. यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.संपूर्ण हंगामात 2-3 फवारण्या बुरशीनाशकाच्या कराव्या. 
 
3 आंब्याला संपूर्ण हंगामात 3 ते 4 वेळा मोहोर येत असल्याने पंधरा दिवसांच्या अंतराने 4 ते 5 फवारण्या आवश्यक असतात. फलधारणेनंतरच्या फवारण्यांपूर्वी मोहोर स्वच्छ करुन (झाडून) फवारण्या कराव्यात.
 
 
डॉ. बी.डी.शिंदे 
सहाय्यक प्राध्यापक 
द्भषि कीटकशास्त्र विभाग
मोबा. 8007823060 डॉ. आनंद नरंगलकर
विभाग प्रमुख 
द्भषि कीटकशास्त्र विभाग
मोबा. 9405360519 डॉ . जीवन ज. कदम 
सहाय्यक प्राध्यापक 
वनस्पती रोगशास्त्र विभाग
मोबा. 9423378008 डॉ. अंबरीश सणस
संशोधन सहयोगी 
द्भषि कीटकशास्त्र विभाग
मोबा. 9960332370
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण द्भषि विद्यापीठ, दापोली