कोबीवर्गीय भाजीपाला पिकावरील किडी व व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    12-Mar-2020
|
 
kobi_1  H x W:
 
कोबीवर्गीय भाजीपाला पिकावरील किडीची ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे व एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या विषयी माहिती या लेखात दिली आहे. 
 
कोबीवर्गीय पिकावर अनेक किडींचा आढळून येतो. परिणामी अशा किडीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही किडींचा बंदोबस्तासाठी पिकाचे सुरूवातीपासून नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
 
1) मावा : ही कोबीवर्गीय पिकावरील महत्त्वाची कीड असून रंगाने फिक्कट हिरवी असते. ह्या किडीमध्ये पंख असलेले व पंख नसलेले दोन्ही प्रकार असतात. या किडीचा प्रादुर्भाव पीक लागवडीपासून पीक निघेपर्यंत असतो. ही कीड पानातून तसेच इतर कोवळ्या भागातून रस शोषण करते व प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने पिवळी होवून सुअतात व रोपांची वाढ खुंटते. तसेच ही कीड शरीरातून गोड चिकट पातळ पदार्थ बाहेर टाकतात व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होवून तीचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. 
 
नियंत्रण : डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.ली किंवा असिटामीपीड 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास ही कीड आटोक्यात येते. दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
 
2 ) मोहरीवरील काळी माशी : ही माशी काळ्या नारंगी रंगाची असून तिचे पंख फिक्कट असतात. अळीचा रंग गर्द काळसर असून शरीर मऊ असते. ह्या किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून रोपवाटीकेत होतो. अळ्या पानांना छिद्र पडून हरितद्रव्य खातात व प्रादुर्भाव जास्त झाल्यास सर्व पाने फस्त करतात. 
 
3) चौकोनी टिपक्याचा पतंग : ह्या किडीचा पतंग आकाराने लहान असून धुरकट तपकिरी रंगाचा असतो. पंख जेव्हा पाठीवर धरलेले असतात तेव्हा पंखावर चौकोनी आकाराचे ठिपके दिसतात. अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानांना छिद्र पाडून त्यातील हरितद्रव्य खातात व ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानं पाने फस्त करून त्यांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. ही कीड सप्टेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मीक नियंत्रण व्यवस्थापन करावे लागते. 
 
kobi_1  H x W:
 
4) पानाची जाळी करणारी अळी: ह्या किडीच्या अळीचा रंग फिक्कट जांभळा असतो व त्यावर रेषा असतात. पतंग फिक्कट भुरकट रंगाचे असतात व त्यांच्या समोरील पंखावर वेड्यावाकड्या रेषा व पांढरट ठिपके असतात व मागील पंख पांढरट रंगाचे असून त्याच्या कडा तपकिरी रंगाच्या असतात. ही कीड अतिशय नुकसानकारक असून ह्या किडीच्या अळ्या. इ. झाडाची पाने अधाशीपणे खातात. ही अळी पाने गुंडाळून आतील हरितद्रव्य खातात व जाळे करतात. ह्या जाळीमध्ये किडीची विष्ठा साचल्यामुळे पाने खराब होतात. 
 
5) गड्डे पोखरणारी अळी : ह्या किडीच्या अळ्या पांढरट भुरक्या रंगाच्या असून शरीरावर तपकिरी रंगाचे लांब पट्टे असतात. तर पतंग करड्या तपकिरी रंगाचे असतात. ह्या किडीच्या अळ्या शिराच्या बाजूने पाने खातात. तसेच पानातील हरितद्रव्य, पानाचे देठ आणि पत्ताकोबी व फुलकोबीचे फुल व गड्डे पोखरतात त्यामुळे फुलांना व गड्ड्यांना विकृत आकार येतो व प्रादुर्भावग्रस्त झाडाची
वाढ होत नाही. 
kobi_1  H x W:
 
 
कोबीवर्गीय भाजीपाला पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन : 
 
1 ) उन्हाळ्यामध्ये नांगरट खोल केल्यामुळे किडींच्या सुप्तावस्थाचा नाश होईल. 
 
2) पिकाची फेरपालट करावी. 
 
3) किडींची अंडी व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. 
 
4) प्रादुर्भावग्रस्त भाग काढून त्याचा बंदोबस्त करावा.
 
5) शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पक्षी थांबे लावावेत व थोडा भात शेतामध्ये ठेवल्यास पक्षी आकर्षित होतील. हे पक्षी पिकावरील किडी देखील खाता.
 
6) एकरी पाच फेरोमोन सापळे लावावेत.
 
7 ) चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी कोटेशिया प्लुटेली हे परोपजीवी कीटक 5,000 प्रति हेक्टर लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी सोडावीत. 
 
8 ) चौकोनी ठिपक्याचा पतंग व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी बॉसिलस थुरिन जीनेनसीस (बीटी) या जैविक कीटकनाशकाची 500 ग्रॅ./हेक्टर फवारणी लागवडीनंतर 15 दिवसांनी करावी. 
 
9) गड्डे लागण्याच्या सुरुवातीला 5 टक्के निंबोळी अर्काची 15 दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. 
 
10) 20 ते 25 ओळीनंतर 2 ओळी मोहरी पेरावी. 
 
11) रोपवाटिकेत बी लागण्यापूर्वी बियाण्यास इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यू एस 5 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 30 ग्रॅम प्रति किलो लावावे. 
 
12 ) दर पंधरा दिवसाच्या अंतराने मॅलॅथिऑन (50 ईसी) 20 मिली किंवा स्पिनोसॅड (2.5 एससी) 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातमिसळून फवारणी करावी. किडीच्या तीव्रतेनुसार फवारणीचे अंतर कमी जास्त होऊ शकते
योगेश माञे , डॉ. पी.आर.झंवर आणि विलास खराङे
कृषी कीटकशास्त्र विभाग - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी