द्राक्ष प्रक्रिया उद्योग वाचकाचे मनोगत

डिजिटल बळीराजा-2    08-Feb-2020
   
grape_1  H x W:
     
द्राक्ष हे आंबट-गोड आरोग्यदायी औषधी फळ आहे. द्राक्षफळे वेलीवर घडाने येत असतात. द्राक्ष फळांचा हंगाम जानेवारी ते मार्च पर्यंत असतो. अजीर्ण झाले तर मनुकेद्राक्षे खाल्ले तर अजीर्ण थांबते. पोटाच्या विकारावर द्राक्षमनुके उपयुक्त असतात. ते शक्तिवर्धक असतात. पूर्वी लढाईच्या काळात सैनिकांना द्राक्षे खाऊ घालत त्यामुळे सैनिकांना शक्ती येत असे, असा इतिहासात उल्लेख आढळून येतो. द्राक्षापासून द्राक्षासव वगैरे उपयुक्त औषधे बनवली जातात. द्राक्ष लागवड नाशिक, सांगली, नगर, पुणे, सोलापूर या भागात जास्त केली जाते. द्राक्ष लागवडीस पाण्याची सोय, उत्तम जमीन व समशीतोष्ण हवामान लागते. द्राक्ष हे अगदी पुरातन फळ असून महाभारत व मुघल इतिहास काळात याचा उल्लेख आढळून येतो. या फळाचा हंगाम एकदम सुरू होतो. आता द्राक्षांचे बरेच संकरीत वाण उदयास आले आहेत. बिनबियांचे द्राक्ष प्रमाण 70-80 टक्के असते. काही द्राक्षांचा रंग हिरवा असतो, तर काही अगदी काळे जांभळे मोठाले असतात. द्राक्ष फळात पाण्याचे प्रमाण 70-80 टक्के असते. निसर्गाने ज्या-त्या हंगामात मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी निरनिराळी फळे निर्माण केली आहेत. फळे हे पृथ्वीतलावरील अमृत होय. काही द्राक्ष फळात बारीक बिया असतात. आता बिनबियांचे बरेच संकरित वाण निर्माण करण्यात आले आहेत. तसेच आता द्राक्षवेलीवर व फळावर बरेच रासायनिक प्रयोग केले जातात. यासाठी द्राक्ष खाताना व उपयोगात आणताना द्राक्ष स्वच्छ करावीत; चांगली धुवावीत द्राक्षांचा खाण्यासाठी जास्त उपयोग केला जातो. 
 
 द्राक्ष हंगाम सुरू झाला की भाव एकदम खाली येतात. द्राक्ष हे नाशवंत फळ असल्यामुळे ते जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही तसेच त्याच्या निर्यातीवर बरेच बंधने असतात, त्यामुळे निर्यात मोठ्या प्रमाणात होत नाही. यास्तव द्राक्षापासून काही उपयुक्त खाद्यपदार्थ बनवून साठवता येतात त्यावर योग्य प्रक्रिया केल्यास ते पदार्थ जास्त दिवस टिकतात आणि त्याला भावही चांगला मिळतो. गैर हंगामात या पदार्थांचा उपयोग करता येतो ते खाता येतात त्यांची साठवणूक करता येते. द्राक्षापासून बेदाणे मनुके, द्राक्षपाक, चटणी, सरबत, रस, सिरप, जाम, जेली, वाईन, व्हिनेगर इ.पदार्थ बनवता येतात.
 
तसेच द्राक्षे हवा बंद पेटीत साठवून ठेवता येतात. द्राक्षापासून औषधे, मद्य-वाईन मोठ्या प्रमाणात तयार केले जातात याला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते यासाठी याची निर्यातही केली जाते यास्तव द्राक्षापासून हे प्रक्रिया पदार्थ बनवण्याकडे जास्त लक्ष देणे हिताचे होय. त्याची थोडक्यात माहिती देत आहे ती शेतकर्‍यांना उपयोगी होईल-
 
1. बेदाने-मनुके : द्राक्ष सुकवून त्यातील पाण्याचा अंश काढून मनुके बनवले जातात. त्यात फक्त 13 ते 14 टक्के पाण्याचा अंश ठेवला जातो. द्राक्षमण्यात 70 ते 80 टक्के पाण्याचे प्रमाण असते. काही भागात द्राक्षे वेलीवर जास्त दिवस पीकू देतात. ते उन्हाने सुकून जमिनीवर खाली पडतात. तिथेच ठेवून त्यांना जास्त सुकू देतात, नंतर गोळा करतात. काडी-कचरा, माती धुवून स्वच्छ करतात व योग्य रीतीने साठवतात. मात्र ही द्राक्ष वारा, वादळ, पाऊस यामुळे काही प्रमाणात नाश पावू शकतात. नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र या प्रक्रियेस काहीच खर्च येत नाही. काही शेतकरी पूर्ण पिकलेली फळे वेलीवरून काढतात घडापासून द्राक्षे वेगळी करतात. पाण्यात टाकून धुवून स्वच्छ करतात. सावलीत कपड्यावर पसरवून पंख्याच्या वार्‍यावर सुकवतात. या द्राक्षमण्यात पाणी 13 ते 14 टक्के ठेवले जाते. द्राक्ष सुकविण्यास बराच काळ म्हणजे 15 ते 20 दिवस लागतात. ती सुकल्यावर स्वच्छ केली जातात. सुकल्यामुळे ती जास्त दिवस टिकतात. बेदाण्यांचा रंग द्राक्ष फळाच्या रंगावर अवलंबून असतो. काही मनुके काळे-जांभळे असतात. तर काही लालसर असतात. बेदाणे खाण्यासाठी व उपयुक्त पदार्थ बनवण्यासाठी भाजीसाठी, आरोग्यरक्षक औषध आहे बनविण्यासाठी उपयोगात आणतात. त्यात साखरेचे प्रमाण 20 टक्के असते, सुकामेवा म्हणून ती जास्त खाल्ली जातात. त्यात जीवनसत्त्व व औषधी गुणधर्म पुरेसे असल्यामुळे ते लहान बालकांना व वृद्ध व्यक्तींना जास्त खाऊ घालतात. द्राक्षापासून मनुके बनवणे सोयीचे व हिताचे असते यास फारसा खर्च येत नाही. गळालेल्या मण्यांचा बेदाण्यासाठी उपयोग करता येतो. 
 
द्राक्षातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ते गोड लागतात. बेदाणे चवदार तसेच त्यातील जीवनसत्त्वयुक्त मूलद्रव्ये यामुळे त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. काही भागात यास किशमिस म्हणतात. बेदाणे मनुके बनवताना त्यावर कोणतेच रासायनिक प्रयोग केले जात नाहीत. 
 
2. द्राक्षापासून वाइन मध्य बनवणे
द्राक्षापासून मद्य-वाईन बनवून निर्यात केल्यास शेतकर्‍यास व देशालाही चांगली आर्थिक प्राप्ती होईल. मद्य वाईन निर्मितीसाठी ठराविक चांगल्या गुणवत्तेची द्राक्षे लागतात. द्राक्षाच्या मद्याला परदेशात चांगली मागणी असते व भावही चांगला मिळतो. या मण्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. यापासून खनिजद्रव्य, जीवनसत्त्वे, साखर हे पोषण द्रव्ये चांगली मिळतात. मद्य तयार करण्यासाठी ठराविक जातीची द्राक्षे लागतात. वाइन बनवण्यासाठी प्रथम ही द्राक्षे स्वच्छ करावीत, त्याचा लगदा करावा व तो लगदा फडक्यात गाळून रस काढावा. त्याप्रमाणेच सायट्रिक ऍसिड टाकावे. तो रस चांगला आंबवावा. द्राक्ष वाईनसाठी सोनाका, शरद सीडलेस द्राक्षाचा जास्त वापर केला जातो. या द्राक्षापासून वाइन तयार केली जाते शुद्ध स्वरूपात तयार केलेली वाईन निर्जंतुक बाटलीत साठवावी. 
 
द्राक्ष जाम : द्राक्ष जाम बनवण्यासाठी चांगली पिकलेली द्राक्षे घ्यावीत,स्वच्छ करावीत. मिक्सरमध्ये घालून चांगला लगदा करावा. तो लगदा थंड झाल्यावर त्याचा रस काढावा. जाम तयार करण्यासाठी त्यात प्रमाणात साखर, अल्पप्रमाणात सायट्रिक ऍसिड टाकावे. तो रस मंद गॅसवर ठेवावा रस घट्ट झाल्यावर गोळा करावा. तो रस घट्ट गोळा झाला की जाम तयार झाला असे समजावे. तो जाम निर्जंतुक बाटलीत भरून ठेवावा. या बाटल्या थंड कोरड्या जागी ठेवाव्यात, जास्त दिवस टिकतात केव्हाही वापरता येतो.
द्राक्ष जेली : द्राक्षजेलीचा चांगला खप होत असतो. जेली साठी चांगले रसदार द्राक्षे निवडावीत. ती द्राक्ष लिची रसात अगर सायट्रिक ऍसिड घालून शिजवावीत. तो रस गाळून घ्यावा, त्यात साखर, रंग, उपयुक्त स्वादाचा मसाला इ. पदार्थ टाकावेत. तो रस चांगला आचेवर उकळावा, त्यात साखर घालावी आणि घट्ट करावा त्याचा गोळा तयार होतो त्यात थोडे सायट्रिक आसिड घालावे त्यामुळे ती जेली जास्त दिवस टिकते. गार झाल्यावर चांगल्या निर्जंतुक बाटलीत साठवावी. केव्हाही खाता येते त्यास द्राक्षाची चव असल्यामुळे मुले आवडीने खातात.
 
5. द्राक्षरस : द्राक्षरस थंड पेय म्हणून जास्त आवडीने पितात. द्राक्ष फळाचा रस आंबट-गोड व आरोग्यदायी असल्याने जास्त पितात. त्याचा खप जास्त होतो भावही चांगला मिळतो. द्राक्ष रसाचे प्रमाण 80 टक्के असते यासाठी चांगली रसदार फळे निवडावीत. स्वच्छ करावी, ते मणी पाण्यात टाकून मंद गॅसवर उकळावे त्याचा रस काढावा तो रस चांगल्या फडक्यात गाळावा, त्यात थोडे सायट्रिक ऍसिड घालावे जास्त दिवस टिकतो. बाटली चांगली धुवून स्वच्छ करून त्यात रस साठवावा या रसापासून केव्हाही सरबत, सिरप किंवा स्क्वॅश करून पिता येते. 
 
6. द्राक्ष सरबत स्क्वॅश : सरबत करण्यासाठी द्राक्ष रसात साखर, सायट्रिक ऍसिड एक टक्का घालून हे पदार्थ तयार करता येतात साठवून वापरता येतात.
 
7. विनेगर : व्हिनेगरसाठी चांगली द्राक्षे घ्यावीत. स्वच्छ करावीत ते मणी पाण्यात टाकून लगदा गरम करावा. रस काढावा त्यात गरजेनुसार साखर घालावी. तो रस भांड्यात घालून गरम करावा. आणि निर्जंतुक बाटलीत भरावा. रसाचा उपयोग करते वेळी फडक्याने गाळून घ्यावा. रसाचा चटणी, कोशिंबीर, भाजी, टोमॅटो केचप यात वापर करता येतो त्यामुळे हे पदार्थ आंबट व चवदार होतात.
 
8. द्राक्ष पाक : चांगल्या द्राक्षांचा रस काढावा त्यात प्रमाणशीर साखर, सायट्रिक ऍसिड घालावे. तो पाक जास्त दिवस टिकतो. पाक विरघळेपर्यंत गरम करावा, बाटलीत साठवावा. त्याचा वापर करतेवेळी पाच-सहा पट पाणी घालून थंड पेय म्हणून पिता येतो.
 
9. द्राक्ष साठवण : यासाठी चांगली द्राक्षे निवडावीत, स्वच्छ करावी. साखरेचा एकतारी पाकात टाकावेत. स्वच्छ भांड्यात साठवावेत. घट्ट झाकण बसवावे केव्हाही धुवून खाता येतात. पाकामुळे जास्त दिवस टिकतात.
 
10. द्राक्ष चटणी : अपक्व द्राक्षाची चटणी करतात, मात्र हे प्रमाण अल्प असते.
अशा रीतीने द्राक्षापासून निरनिराळे पदार्थ बनवून खाता येतात. विक्री करता येते, हे पदार्थ सीझन व्यतिरिक्त खाता येतात. आरोग्य चांगले राहते. शेतकर्‍यांना जास्त आर्थिक प्राप्ती होऊ शकते.
                                                                                                                                 
 
 
                                                                                                                                          माधवराव शंकरराव  पाटील
                                                                                                                                          मुक्कामपोस्टपिंपळगाव हरेश्वर,
                                                                                                                                          तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव