ग्रॅपनेटद्वारे युरोपियन युनियन आणि इतर देशांमध्ये द्राक्षे निर्यात

डिजिटल बळीराजा-2    28-Feb-2020
|
 
grape_1  H x W:
 
 
द्राक्ष निर्यातीकरिता द्राक्ष बागाईतदारांनी विविध बाबींची पूर्तता व योग्य नियोजन कसे करावे या संबंधीची सखोल माहिती या लेखात सादर केली आहे. 
 
कृषिमालाची एका देशातून दुसर्‍या देशात निर्यात होत असताना कीड व रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून तसेच त्यावर नियंत्रण राहण्याकरिता जागतिक अन्नसंघटनेच्या मार्गदर्शनाखाली सन 1951मध्ये ‘आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार 1951’ (इंटरनॅशनल प्लान्ट प्रोटेक्शन कन्व्हेन्शन 1951) करण्यात आलेला आहे. हा करार आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार म्हणून ओळखला जातो. सदर कराराचा मुख्य उद्देश असा आहे की, कृषिमाल निर्यातीद्वारे मानव, प्राणी व पिकांना हानी होऊ नये, तसेच त्याच्या संरक्षणासाठी व ग्राहकांच्या आरोग्याच्या हितासाठी योग्य त्या कार्याप्रमाणाची अवलंब करण्याचा अधिकार सदस्य देशास आहे. सध्या 165 देश सदर कराराचे सदस्य असून भारतही सदर कराराचा सदस्य आहे. सदर सदस्य देशांमध्ये प्रगत, प्रगतशील व अप्रगतशील देशांचा समावेश आहे. सदर करारानुसार कृषिमालाची एका देशातून दुसर्‍या देशात निर्यात करण्याकरिता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
 
जागतिक व्यापार संघटनेमध्ये सन 1995 मध्ये कृषी या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध करार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये अ‍ॅग्रीमेंट ऑन अ‍ॅग्रीकल्चर, अ‍ॅग्रीमेंट ऑन सॅनेटरी अँड फायटो सॅनेटरी मेझर्स, अ‍ॅग्रीमेंट ऑन टेक्निकल बॅरिअर ऑन ट्रेड, ट्रीप्स इ. अ‍ॅग्रीमेंटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पीकसंरक्षण करार ही जागतिक व्यापारी संघटनेअंतर्गत कृषिविषयक नियमावली तयार करणारी व मार्गदर्शन करणारी संस्था आहे. सदर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सॅनेटरी व फायटो सॅनेटरीची नियमावली तयार करण्यात आलेली आहे.
 
सॅनेटरी व फायटो सॅनेटरी करारामध्ये एकूण 14 बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मानव, प्राणी, वनस्पती व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सदस्य देशांना शास्त्रीय कारणाच्या दृष्टिकोनातून कृषिमालाच्या आयात व निर्यातीकरता स्वत:ची नियमावली तयार करून बंधन घालण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. प्रगत व प्रगतशील देशांद्वारे सॅनेटरी व फायटो सॅनेटरी मेझर्सची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
सॅनेटरी व फायटो सॅनेटरी कराराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सन 1997 मध्ये फायटो सॅनेटरी कमिशन स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कृषिमाल निर्यातीकरता फायटो सॅनेटरी प्रमाणीकरणाची पद्धत, कीड व रोगाचे सर्वेक्षण करणे, कीड व रोगमुक्त एरिया घोषित करणे, पेस्ट रिस्क, अ‍ॅनालिसिस करणे, लाकडी वेष्टनाकरिता धुरीकरणाची पद्धत व इतर बाबींसंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी ही प्रगत व प्रगतिशील देशांमार्फत प्रभावीपणे करण्यात येते.
 
कृषिमालाच्या निर्यातीकरिता आंतरराष्ट्रीय पीकसंरक्षण करारानुसार फायटो सॅनेटरी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. राज्यातील कृषिमालाच्या निर्यातीस असलेला वाव लक्षात घेऊन व त्यास प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र शासनाने अधिकसूचना क्रमांक पीपीआय/98, दिनांक 29.10.1993 अन्वये राज्यातील 12 जिल्ह्यांतील अधिकार्‍यांना ‘फायटोसॅनेटरी अ‍ॅथॉरिटी’ म्हणून अधिसूचित केलेले आहे. त्यामध्ये पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, लातूर, अहमदनगर, सातारा आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. सदर अधिकार्‍यांमार्फत कृषिमालाच्या निर्यातीकरता फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येते. द्राक्षाची निर्यात करण्याकरिता निर्यातदारांना ज्या देशांना द्राक्षाची निर्यात करावयचाी आहे त्या देशाच्या नावाने संबंधित फायटो सॅनिटरी अ‍ॅथोरिटीकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. 
 
भारतातून द्राक्षाची निर्यात ही प्रामुख्याने युरापियन युनियन, संयुक्त अरब अमिराती, बहारीन, सौदी अरेबिया, श्रीलंका व बांगला देश इ. देशांना केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने द्राक्षाची निर्यात नेदरलँड, युनायटेड किंग्डम, बेल्जियम व इतर युरोपीय देशांना तसेच इतर देशांनाही केली जाते.
 
महाराष्ट्र राज्य हे प्रमुख द्राक्ष उत्पादक राज्य असून, दिवसेंदिवस द्राक्ष पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात द्राक्षाची लागवड प्रामुख्याने सांगली, सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमारात केली जाते. तसेच बुलडाणा, जळगाव, बीड, जालना या जिल्ह्यांतही द्राक्षाखालील क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे.
देशातून निर्यात झालेल्या द्राक्षांपैकी प्रामुख्याने द्राक्षाची निर्यात युरोपीयन देश तसेच अरब देश व शेजारील राष्ट्र देशांना झालेली आहे. सन 2004-05 पासून युरोपियन देशांना द्राक्षाच्या निर्यातीत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये नेदरलँड, यूके, जर्मनी व बेल्जियम या देशांचा समावेश आहे. तसेच युरोपियन देशांबरोबरच बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका या देशांनाही द्राक्षाच्या निर्यातीत वाढ होते.
 
युरोपियन देशांनी कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबतचे निकष अत्यंत कडक केले असल्याने त्या बाबींची पूर्तता करण्याकरिता तसेच युरोपियन देशांमधील अटी व शर्तीची पूर्ततेची हमी देण्याकरिता सन 2003-04 पासून राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरता ‘कीडनाशक उर्वरित अंशी नियंत्रण योजनेची’ (आरएमपी) ग्रेपनेटद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
राज्यातून द्राक्ष पिकाची मोठ्या प्रमाणात युरोपियन देशांना निर्यात केली जाते. युरोपियन देशांनी द्राक्षाच्या आयातीकरता कीडनाशक उर्वरित अंश तपासणीचे कडक निकष तयार केलेले आहेत. युरोपियन देशांच्या कीडनाशक उर्वरित अंश निकषांची पूर्तता करून फायटो सॅनेटरी प्रमाणात देण्याकरिता अपेडा, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, द्राक्ष बागायतदार संघ व कृषी विभागाच्या समन्वयाने राज्यात ‘कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रित योजनेची’ (पेस्टिसाइड रिसिड्यू मॉनिटरिंग प्लॅन) सन 2003 पासून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
‘आरएमपी’चा (कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रण) मुख्य उद्देश
 
1)निर्यातक्षम द्राक्षबागेतील कीडनाशकाचे उर्वरित अंश नियंत्रण करणे.
 
2)निर्यातक्षम द्राक्षबागेतील किडी व रोगाच्या नियंत्रणाकरिता एनआरसीने शिफारस केलेल्या औषधांचा वापर 
करणे. 
 
3)कीडनाशक उर्वरित अंशाचे प्रमाण क्षम्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्यास इंटर्नल अ‍ॅलर्टद्वारे उपाययोजना व अंमलबजावणी करण्याची पद्धत विहित करणे व त्यानुसार शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे.
 
कीडनाशक उर्वरित अंश योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये करण्यात येते. युरोपियन देशांना निर्यात होणार्‍या द्राक्षांमध्ये महाराष्ट्राचा 98 टक्के वाटा आहे. युरोपियन देशांमध्ये 26 देशांचा समावेश असून द्राक्षाची निर्यात प्रामुख्याने नेदरलँड, युनायटेड किंग्डम, जर्मनी, बेल्जियम या देशांना केली जाते.
 
युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याचे काम पुणे, नाशिक, सांगली व सोलापूर येथून ग्रेपनेटच्या माध्यमातून अपेडाच्या वेबसाइटवरून ऑनलाइनद्वारे करण्यात येते.
 
युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रण योजनेअंतर्गत अपेडाच्या वेबसाइटवरून (ुुु.रशिवर.लेा) ग्रेपनेटद्वारे खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते.
 
1)निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी/नूतनीकरण.
 
2)निर्यातक्षम द्राक्षबागांची 4 (ब)मध्ये तपासणी व निर्यातीस शिफारस.
 
3)उर्वरित अंशतपासणी करण्याकरिता नमुने घेणे व त्यांची उर्वरित अंश तपासणी करणे.
 
4)निर्यातक्षम द्राक्षाची निर्यातीकरता ऑनलाइन अर्ज करणे.
 
5)एगमार्क प्रमाणीकरण करणे.
 
6)फायटो सॅनेटरी प्रमाणीकरण.
 
युरोपियन देशांना द्राक्ष निर्यात करण्याकरता नोंदणीकृत बागेतील बागांची नोंदणी करणे आवश्यक आहे. दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षबागांचे नूतनीकरण व नवीन नोंदणीचे काम सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये करण्यात येते.
 
कीडनाशक उर्वरित अंश तपासणी
 
युरोपीयन देशांना द्राक्ष निर्यातीकरता नोंदणीकृत बागेतील नमुन्याची तपासणी करण्याकरिता नमुने घेण्याचे अधिकार अपेडाने प्राधिकृत केलेल्या कीडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळांना देण्यात आले आहेत. निर्यातक्षम बागेतील द्राक्षाचे नमुने घेऊन त्याची तपासणी अपेडा प्राधिकृत प्रयोगशाळेत केली जाते.
 
 
सन 2018-19 या वर्षापासून युरोपियन युनियनची एकच एमआरएस निर्धारित केलेले आहे. युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरता नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांनी किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता 51 औषधांची शिफारस केलेली आहे. 207 औषधांची उर्वरित अंशाची तपासणी करण्यात येते. उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता राज्य शासनाचा कीडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा, कृषिभवन, पुणे तसेच खाजगी 12 असे एकूण 13 प्रयोगशाळांना अपेडाने प्राधिकृत केलेले आहे. उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेत तपासणी केली असता 1273 बागांतील नमुन्यांमध्ये क्षम्य मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळून आल्यामुळे एआरएल पुणे मार्फत अलर्ट नोटीस निर्गमीत करण्यात आली होती. त्यापैकी 303 बागांतील द्राक्षाचे नमुने फेरतपासणीत विहित मर्यादेपेक्षा कमी आढळून आल्यामुळे अ‍ॅलर्ट नोटीस मागे घेण्यात आली. अंतिमत: 970 बागांकरिता अंतिम अ‍ॅलर्ट नोटिसा निगर्मित केलेल्या आहेत. नापास आढळून प्रमुख औषधांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
 
 
 क्र.  औषधाचे नाव  नापास नमुन्यांची संख्या टक्केवारी
 1   Nereistoxin  295 23.23
 2  4bromo-2chlorophenol  259 20.39
 3 CPPU
 231 18.19
 4   Abamectin  162 11.81
 5  Fluconazole   150 23.23
 6  Fipronil   144 23.23
 7  Other   29 2.28
 -  total  1270
 
युरोपियन देशांप्रमाणेच स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने फूड सेफ्टी स्टँडर्ड अ‍ॅक्ट-2011 अन्वये द्राक्ष पिकातील कीडनाशके उर्वरित अंश कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) निर्धारित करण्यात आली असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे.
 
 क्र.  कीडनाशकाचे नाव  कमाल अवशेष मर्यादा (MRL)
 1   Chlormeqatchloride   1.00
 2  Tridemorph   0.5
 3  . Penconazole   02
 4   Myclobutanil  1.0
 5   Cymoxanil   0.1
 6   Tridimefon  2.0
 7   Fosetyl-al  10
 8   Dimethomorph  0.05
  Propineb  0.5
 
देशातून युरोपियन देशांना निर्यात होणार्‍या द्राक्षांपैकी महाराष्ट्रातून 98 टक्के द्राक्षाची निर्यात केली जाते. सन 2017-18 या वर्षामध्ये द्राक्षाची एकूण 214440 मे. टन निर्यात झाली असून, त्यामध्ये युरोपियन देशांना ग्रेपनेटद्वारे 92365 मे. टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. त्यात 7071 कंटेनरचा समावेश आहे.
युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरता द्राक्ष बागायतदारांनी खालील बाबींची पूर्तता व नियोजन करणे आवश्यक आहे.
 
सन 2017-2018 मध्ये एकूण 34967 द्राक्ष बागायतदारांनी युरोपियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरता ग्रेपनेटअंतर्गत नोंदणी केली आहे. सदर नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांनी सन 2018-19 करिता ग्रेपनेटअंतर्गत द्राक्षबागांचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या द्राक्ष बागायतदारांना नव्याने द्राक्षबागांची नोंदणी अधिकारी यांच्याकडे करावी.
 
नोंदणीकृत बागायतदारांची जबाबदारी व कर्तव्ये : 
 
1)बागेतील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता आरएमपी व शिफारस केलेल्या औषधांचा वापर करणे व त्यांचा 
सविस्तर तपशील विहित केलेल्या प्रपत्रात ठेवणे.
 
2)मुदतबाह्य व बंदी घातलेल्या औषधांचा वापर न करणे.
 
3)एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.
 
4)उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुने घेतल्यानंतर औषधाची फवारणी न करणे.
 
5)औषधांच्या पीएचआर अनुसार औषधांची फवारणी करणे.
 
6)खरेदी केलेल्या सर्व औषधे व खताचे रेकॉर्ड ठेवणे.
 
7)उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुने घेण्यापूर्वी तपासणी अधिकार्‍यांकडून निर्यातक्षम डाळिंब बागेची 
(4 अ) मध्ये तपासणी करून घेणे.
 
8)युरोपियन देशांना निर्यातकरिता ऑनलाइनद्वारे (अनारनेट) फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याकरिता पुणे, 
नाशिक, सांगली व सोलापूर येथे कृषी विभागामार्फत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. निर्यात 
करू इच्छिणार्‍या उत्पादक शेतकरी निर्यातदारांनी त्यांची माहिती कृषी विभागाकडे देणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत बागायतदारांनी ठेवावयाचे रेकॉर्ड
 
1.बागेवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता वापरण्यात आलेल्या कीडनाशकांचा सविस्तर तपशील विहित 
प्रपत्रात ठेवणे.
 
2.औषधे व खते खरेदीचा तपशील ठेवणे.
 
3.उर्वरित अंश तपासणीकरिता डाळिंबाचे नमुने घेतल्यानंतर बागेत औषध फवारणी केली नसल्याचे हमीपत्र 
देणे.
 
नोंदणीकृत शेतकर्‍यांना लेबल क्लेम औषधाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे नोंदणीकृत बागेतील माल निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारातील ग्राहकांनाही कीडनाशक उर्वरित अंशमुक्त माल मिळण्यास मदतच होत आहे.
 
निर्यातक्षम व कीडनाशक उर्वरित अंशमुक्त उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी खालील बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
 
1)पिकावरील किडी व रोगाच्या नियंत्रण करण्याकरिता शिफारस केलेल्या औषधांचाच 
(कीटकनाशके/बुरशीनाशके) वापर करण्यात यावा.
 
2) शिफारस न केलेल्या व वापरास बंदी घातलेल्या औषधांचा वापर करू नये.
 
3)औषधांची फवारणी शिफारस केलेल्या मात्रेत व योग्यवेळी व योग्य प्रमाणात करणे.
 
4)युरोपियन कमिशन/कोडेक्स अलोयेनटीसीस कमिशन यांनी निर्धारित केलेल्या मर्यादेच्या आत उर्वरित 
अंशाचे प्रमाण असणे आवश्यक आहे.
 
5)औषधांची फवारणी प्रशिक्षित व्यक्तीद्वारे व योग्य त्या मात्रेत योग्य पद्धतीने करावी.
 
6)वापर करण्यात आलेल्या औषधांचा तपशील ठेवणे.
 
7)फळाची काढणी व अंतिम फवारणीमध्ये किती अंतर ठेवले होते याचा तपशील ठेवणे.
 
8)फवारणीकरिता वापरण्यात आलेली फवारणी यंत्रे व औषधे, कंटेनरची स्वच्छता काळजीपूर्वक करणे 
आवश्यक आहे.
 
9)कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता शिफारस केलेल्या औषधांची खरेदी ही अधिकृत कीटकनाशक 
विक्रेत्याकडून रीतशीर पावती घेऊन करावी.
 
10)निर्यातक्षम बागेतील रँडम पद्धतीने नमुना काढणीच्या एक महिना अगोदर घेऊन त्यामधील उर्वरित अंश 
तपासणीकरिता उर्वरित अंश प्रयोगशाळेत पाठवताना नमुन्यासोबत फवारणी शेड्यूलची माहिती देण्यात यावी.
 
11) पिकावरील किडी व रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्याकरता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा 
अवलंब करावा.
 
12) उर्वरित अंश प्रयोगशाळेतील उर्वरित अंशाचे प्रमाण विहित मर्यादेच्या आत असेल तरच निर्यातीकरता 
शिफारस करावी.
 
युरोपियन देशांना निर्यातक्षम ताजी फळे व भाजीपाला निर्यात करताना त्यांना फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र आवश्यक असते, यासाठी केंद्र शासनाने फायटो सॅनेटरीअ‍ॅथोरिटी प्राधिकृत केले आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे 
 
 क्र.   जिल्हा फायटोसॅनेटरी अ‍ॅथॉरिटी   कोड नंबर
 1  
पुणे कृषी उपसंचालक (फलो-3), कृषी आयुक्तालय, पुणे 
कृषी अधिकारी (वि. प्र.) कृषी आयुक्तालय, पुणे
 S-MAH-5
 2  
नाशिक कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, नाशिक 
कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, नाशिक 
 
S-MAH-1
 3  
सांगली कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, सांगली.
कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, सांगली 
 S-MAH-6
     
 4  
सोलापूर कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, सोलापूर.
कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, सोलापूर
 S-MAH-7
सन 2018-19 करिता ग्रेपनेटअंतर्गत द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षबागांची नोंदणी करण्याकरिता खालील बाबींची पूर्तता करावी. 
 
1)नोंदणीकृत निर्यातक्षम द्राक्षबागेचे नूतनीकरण 31 डिसेंबर 2018 पूर्वी करून घेणे.
 
2)नव्याने द्राक्षबागेची नोंदणी करण्याकरिता विहित प्रपत्रात (प्रपत्र-2) मध्ये अर्ज व सोबत 7/12 व फी 
भरून संबंधित नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे 15 ऑक्टोबर 2018 पासून अर्ज करणे.
 
3)निर्यातक्षम द्राक्षबागेचे नोंदणी प्रमाणपत्र संबंधित नोंदणी अधिकार्‍याकडून प्राप्त करून प्रमाणपत्रात नमूद 
करण्यात आलेल्या सूचनांचे अनुपालन करणे व योग्य ते रेेकॉर्ड ठेवणे आवश्यक.
 
4)निर्यातक्षम द्राक्षबागांची संबंधित तपासणी अधिकार्‍याकडून तपासणी करून घेणे व तपासणी अहवाल 
प्राप्त करून घेणे. 
 
5)द्राक्षावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता वापरण्यात आलेल्या कीडनाशकांची नोंद प्रपत्र -3 मध्ये 
ठेवून सदरचे रेकॉर्ड तपासणी अधिकार्‍याकडून साक्षांकित करून घेणे.
 
6)निर्यातक्षम द्राक्षबागेचा नकाशा व बागेची ओळख दर्शवणारा फलक लावणे आवश्यक आहे.
युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांना कीडनाशक उर्वरित अंश 
नियंत्रणाबाबत शेतकर्‍यांनी खालील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
1)राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी यांनी द्राक्षावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता कीटकनाशक उर्वरित अंश योजनेअंतर्गत प्रपत्र 5 मध्ये निर्धारित केलेल्या औषधांचीच फवारणी करणे. 
 
2)एकाच औषधाचा सलग वापर न करणे. 
 
3)द्राक्षकाढणीपूर्वी 30 दिवस अगोदर औषधांची फवारणी न करणे, गरज पडल्यास जैविक औषधे किंवा कमी विषारी औषधाचा वापर करणे व वापरण्यात आलेल्या औषधांची नोंद रेकॉर्ड वहीमध्ये ठेवणे.
 
4)प्रत्येक कीडनाशकाचे पीएचआय केंद्रीय कीडनाशक मंडळाकडे नोंदणीच्या वेळी मंजूर केलेला असतो त्याची माहिती पत्रकात दिलेली असते. त्याप्रमाणे औषधाची निवड करून फवारणी करणे.
 
5)रासायनिक औषधांचा तसेच शिफारस न केलेल्या औषधाचा वापर न करणे.
 
6)बंदी घातलेल्या औषधाचा तसेच शिफारस न केलेल्या औषधाचा वापर न करणे. 
 
7)प्रभावीपणे कीड व रोगाचे नियंत्रण करण्यासाठी व द्राक्षाची गुणवत्ता राखण्यासाठी किडी व रोगांचे प्राथमिक अवस्थेत असतानाच नियंत्रण करणे.
 
8)फवारणी करण्यात आलेल्या सर्व औषधांची माहिती प्रपत्र 2 मध्ये विहित केल्यानुसार अद्ययावत ठेवणे जेणेकरून उर्वरित अंशसंदर्भात काही अडचणी आल्यास त्याचा उपयोग होतो.
 
द्राक्ष निर्यातीकरिता शेतांच्या थेट नोंदणीसाठी ‘अपेडा फार्मर कनेक्ट’ मोबाइल
 
सन 2017-18 मध्ये निर्यातक्षम द्राक्ष निर्यातीकरिता उत्पादन घेणार्‍यांना या शेतकर्‍यांच्या मोबाइलवरून नोंदणीसाठी थेट अर्ज करता यावा यासाठी अपेडाने ‘अपेडा फार्मर कनेक्ट’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित केलेले आहे. सदर अ‍ॅपवर आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक व ई-मेल पत्त्याच्या साहाय्याने शेतकर्‍यांनी एकवेळ या अ‍ॅपवर नोंदणी केल्यास हॉर्टीनेट ट्रेसेबिलीटी सिस्टममधील द्राक्ष, डाळिंब, आंबा या फळे व तसेच भेंडी, कारली, मिरची, वांगी, दुधीभोपळा, शेवगा, गवार, भाजीपाला पिकांच्या निर्यातक्षम शेतांची त्यासाठी सदर मोबाइल येथे नोंदणीकरिता http://apeda.gov.in या अपेडाच्या वेबसाइटवरून किंवा Google play store  मधून हे अ‍ॅप उत्पादकांनी आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून घ्यावे. यांना सदर मोबाइल अ‍ॅपवरून नोंदणीसाठी अर्ज केल्यास संबंधित शेतकर्‍यांनी राज्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांची सद्यस्थिती कळू शकेल. अर्जदारांना त्यांच्या अर्जाची/यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत. या सेवेचा लाभ घ्यावा. त्यामुळे कार्यालयीन स्तरावर अर्ज ऑनलाइन करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल व त्याद्वारे वेळेत नोंदणीची कार्यवाही करता येईल.
 
आपले सरकार या ऑनलाइन कार्यप्रणालीद्वारेसुद्धा निर्यातक्षम डाळिंब बागांची नोंदणी करण्याकरिता ऑनलाइन करण्याकरिता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सुविधेचा वापर करण्यापूर्वी संबंधित शेतकर्‍याने आपले सरकार या वेबसाइटवर आधार कार्डची माहिती देऊन लॉग इन करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल. तेव्हा सर्व संबंधित शेतकर्‍यांनी आपले सरकार या पोर्टलचा (htttp://aaplesarkar.mahaonline.gov.in वापर करावा.
 
शेतकर्‍यांच्या गटाने एकत्रित येऊन शेतकर्‍यांची निर्यातदार कंपनी स्थापन करून जागतिक बाजारपेठांबरोबरच स्थानिक बाजारपेठांतील ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट दर्जाच्या मालाचे उत्पादन करून त्यास आवश्यक असणार्‍या प्रमाणीकरण करून निर्यात करण्यास मोठा वाव राहणार आहे. त्याचा शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमार्फत फळे, फुले व भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना मदत करण्यात येत आहे याचाही शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.
 
वरील सर्व मुद्द्यांबाबतची माहिती सादर केल्यानंतर फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट अ‍ॅथॉरिटीद्वारे निर्यातीकरिता तयार करण्यात आलेल्या द्राक्षांची तपासणी करून त्यातून नमुना घेऊन सदरची द्राक्षे कीड व रोगमुक्त तसेच उर्वरित अंशांमध्ये प्रमाणित असल्याची खात्री केल्यानंतर सदर द्राक्षाच्या निर्यातीकरिता संबंधित देशाच्या प्लँट प्रोटेक्शन अ‍ॅथॉरिटीच्या नावाने युरोपियन देशांकरिता ऑनलाइनद्वारे व इतर देशांना ऑफ लाइनद्वारे फायटोसॅनेटरी प्रमाणपत्र दिले जाते. सदरच्या प्रमाणपत्राशिवाय द्राक्षाची निर्यात करता येत नाही. द्राक्ष बागायतदार निर्यातदारांनी वरील बाबींची पूर्तता करण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संचालक, फलोत्पादन विभाग, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 411005 कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. 
श्री. गोविंद गं. हांडे (एम.एससी अ‍ॅग्री.) निवृत्त तांत्रिक अधिकारी
मोबाइल : 9423575956
                                                                                                                                  mail : [email protected]