द्राक्षातील रोग किडीच्या व्यवस्थापनात विचारात घ्यावयाच्या प्राथमिक बाबी :

डिजिटल बळीराजा-2    27-Feb-2020
|


रोग_1  H x W: 0
 
 
द्राक्षातील कीड व रोगाच्या व्यवस्थापनात रोगांची ओळख, बुरशीनाशकाची ओळख, बुरशीनाशकाची निवड, फवारणीची वेळ आणि उपाययोजनेची निश्चित वेळ इ. महत्वाचे असून त्या संबंधीची माहितीचा समावेश या लेखात केला आहे. 
 
महाराष्ट्रीय द्राक्ष उत्पादकांचा विचार केल्यास फळांची गुणवत्ता जागतिक मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे राखणे खूपच अवघड आणि गुंतागुंतीचे काम झालेले आहे. कारण बाग रोग आणि किडीपासून मुक्त राहिली पाहिजे. शिवाय कोणत्याही बुरशीनाशकाचा तसेच कीटकनाशकाचा शेषांश फळामध्ये राहता कामा नये. विशिष्ट अशा म्हणजेच त्यांनी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा व कीटकनाशकांचा उपयोग करून हे साध्य करावयाचे आहे. याशिवाय ती बुरशीनाशके व किटकनाशके कटिंगनंतर ठराविक कालावधीपर्यंत वापरून हे सर्व ईस्पित साध्य करावयाचे आहे. याशिवाय वातावरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून हे सर्व करावयाचे आहे. त्यामुळे रोग आणि किडींचा पूर्ण अभ्यास करूनच बागायतदाराला अचूक अशा पद्धतीनेच फवारणी नियोजन करावे लागणार आहे. असे केले तरच रोग किडींचे नियंत्रण होईल. फळात औषधांचा शेषांश राहणार नाही. त्यासाठी बागायतदारांनी आता फार जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यामुळे रोग किडींचे नियंत्रण चांगले होऊन शेतकर्‍यांच्या खर्चात बचत होणार आहे. वातावरण सुरक्षित राहणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता आता शेतकर्‍यात वैज्ञानिक साक्षरता आणणे आवश्यक आहे. 
 
द्राक्षामधील प्रमुख रोग किडीमध्ये डाऊनी मील्ड्यू, भुरी, करपा, जीवाणू करपा, मिलीबग, थ्रीप्स, उडद्या, माईट्स इ. प्रमुख रोगकिडींचा अंतर्भाव होतो. सद्य परिस्थितीचा विचार करता डाऊनी, करपा, भुरी, मिलीबग, थ्रीप्स या रोग किडी द्राक्षाच्या दृष्टीने नुकसानकारक ठरत असल्याने त्यांचा फारच गांभीर्याने विचार करावयाची वेळ आलेली आहे. मिलीबाग या किडीने गेल्या वर्षी असंख्य बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान केलेले आहे. या वर्षीचा विचार करता जून शेवट व जुलै सुरुवातीचा काळ या कालावधीत सततच्या झालेल्या पावसाने डाऊनी, भुरी या रोगाने उग्र रूप धारण केलेले आहे. अनेक बागामधून या रोगाच्या प्रादुर्भावामुळे खूप मोठ्या प्रमाणात पानगळ झालेली आहे. दरवर्षीच कोणत्या ना कोणत्या कारणाने द्राक्ष बागायतदारांना प्रचंड नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी रोगकिडीच्या नियंत्रणासाठी अचूक अशा व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. 
 
सध्या द्राक्ष बागायतदार रोग किडीच्या नियंत्रणासाठी ज्या पद्धतीचा अवलंब करतात त्याचा आपण आता विचार करू. बहुतांशी बागायतदार सप्टेंबर / ऑक्टोबर कटिंगनंतर दररोज 1 किंवा 2 बुरशीनाशके व एखादे किटकनाशक यांचे दररोज किंवा कधी तरी दिवसातून दोन वेळा स्प्रे घेतात ते शक्यतो कोणत्याच गोष्टींचा विचार करीत नाहीत. द्राक्ष वाढीची अवस्था कोणती, रोगकीड द्राक्षवाढीच्या कोणत्या अवस्थेत येते, वातावरणातील घटकांचा काय परिणाम होईल, या कशाचाच ते फारशा बारकाईने विचार करत नाहीत. दररोज रोगकिडीसाठी स्प्रे घेणे याचा ते अवलंब करतात. 
 
काही बागायतदार आपल्या विभागातील थोडासा तज्ज्ञ शेतकरी किंवा सल्लागार यांच्या मदतीने सप्टेंबर / ऑक्टोबर कटिंगनंतर त्यांनी दिलेल्या तारखाप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने रोगकिडीनाशकाचे स्प्रे घेतात. स्वत: बागायतदार त्याचा कधीच फारसा गांभीर्याने विचार करत नाहीत. ते सर्व त्या सल्लागारावर सोडून देतात. सल्लागार जर खरोखर तज्ज्ञ असेल तर चांगला अनुभव किंवा परिणाम मिळतो परंतु सल्लागार तज्ज्ञ नसेल तर द्राक्ष बागायतदाराला बर्‍याचशा वेळेला मोठे नुकसान सोसावे लागते. म्हणून बागायतदाराने सल्लागाराचा अनुभव त्याचे त्याविषयीचे ज्ञान याची अगोदर माहिती करून घ्यावी. 
 
द्राक्षाची जात, द्राक्षवाढीची अवस्था, वातावरणीय घटक संभाव्य रोग, कीड, द्राक्ष बागेचे बारकाईने निरीक्षण करणे व रोग किडीचा अंदाज घेणे, काही वेळेस दररोज बागांचे बारकाईने निरीक्षण काही वेळेला आठवड्याच्या अंतराने बागांचे निरीक्षण करून घड, फुटी पाने यांच्या परिणामांचा बारकाईने अभ्यास करून त्यानुसार कोणत्या रोगकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याविषयी निश्चित असे मत तयार करणे यामध्ये परिसरातील वातावरणीय घटकांचा (तापमान, आर्द्रता, पाऊस, धुके) विचार करून गरज पडेल तिथे संगणकाची मदत, शास्त्रज्ञांशी चर्चा करून, स्वत:चे परिपूर्ण वैज्ञानिक ज्ञान, कौशल्य यांचा उपयोग करून, रोग नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनासंबंधी निर्णय घेतला जातो. यामध्ये रोगकिडीच्या जीवनचक्राचाही विचार केलेला असतो. सध्या तरी अगदी कमी बागायतदार या पद्धतीचा अवलंब निर्णय घेण्यासाठी करतात. 
 
रोग व्यवस्थापनाच्या नियोजनामध्ये बुरशीनाशकांचा उपयोग करणे गरजेचे झाले आहे. द्राक्षामध्ये रोग प्रतिकारक जातींचा अभाव असल्याने रोग नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा उपयोग करणे गरजेचे झाले आहे. याशिवाय आपल्या परिसराचे हवामान अनेक रोगास अनुकूल असल्याने रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात द्राक्ष पिकात झालेला आपणांस दिसून येतो. त्यामुळे आपल्या परिसरात द्राक्ष पिकाचे चांगले उत्पादन घ्यावयाचे असेल तर बुरशीनाशकाच्या उपयोगाशिवाय द्राक्ष पिक घेणे अशक्य आहे. रोग व्यवस्थापनाच्या कार्यक्रमामध्ये बुरशीनाशकांचा उपयोग हा एक घटक आहे. याचा अर्थ असा, की बुरशीनाशकांचा उपयोग केला म्हणजे रोग नियंत्रण पूर्ण होईल असे जर आपल्याला वाटत असेल तर ते तितकेसे योग्य नाही. कारण रोग नियंत्रणासाठी इतर काही घटकसुद्धा कारणीभूत असतात. त्यांचाही आपण जाणीवपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. त्या घटकांचा आपण आपल्या रोग व्यवस्थापनाच्या कार्यक्रमामध्ये अंतर्भाव केला तरच आपण रोगांवर चांगले नियंत्रण आणू शकतो. उदाहरण, द्यावयाचे झाल्यास केवडा रोगास बळी पडणारी द्राक्षाची जात तर आपण जिथे हवा खेळती नाही, द्राक्षाचे विस्तार व्यवस्थापन दाट आहे, बागेत तण वाढलेले आहे अशा परिस्थितीत फक्त बुरशीनाशकांच्या उपयोगाने रोग नियंत्रण अशक्यच आहे. म्हणून रोगनियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या उपयोगाबरोबरच इतर घटकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. 
 
द्राक्ष बागेमध्ये कोणत्याही रोगाची लागण व्हावयाची असेल तर त्या रोगाचे बीजाणू आपल्या बागेत असावे लागतात. यालाच आपण अनाकुलम असे म्हणतो. बागेत विशिष्ट रोगास अनुकूल वातावरण असेल आणि त्या रोगाचे -- जर बागेत असतील तर आपल्या बागेत त्या रोगाची लागण लवकर होते. आपल्या बागेमध्ये विशिष्ट रोगांचे -- जास्त असेल तर बुरशीनाशकांच्या फवारणीने रोग नियंत्रण करणे कठीण जाते. म्हणून छाटणी अगोदर किंवा छाटणी नंतर रोगाचे --- कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी बाग स्वच्छ ठेवावी, बागेची हलकी मशागत करावी, कटिंगच्या वेळचा पालापाचोळा, काड्या गोळा करून जाळून टाकाव्यात. कटींगनंतर लगेच एक टक्का बोर्डो मिश्रणाचा फवारा द्राक्षवेलीच्या संपूर्ण भागावर घ्यावा
-नारायण बाबूराव म्हेत्रे, तासगाव 

रोग_1  H x W: 0
 
 
कवकनाशकांचा कार्यक्षमतेने 
 
उपयोग करून घ्यावयाचा असेल तर पुढील काही मुद्दे ध्यानात घेणे आवश्यक आहे. 
 
1) रोगाची अचूक ओळख 
 
आपल्याला आपल्या बागेतील रोग जर अचूकपणे ओळखता आला तरच आपण त्यांच्या नियंत्रणासाठी कार्यक्षम अशा बुरशीनाशकांची निवड करून चांगल्या पद्धतीने रोग नियंत्रण करू शकतो. उदाहरण, द्यावयाचे झाल्यास करपा आणि झॅन्थोमोनास (जीवाणू करपा) या रोगातील फरक ध्यानात आल्याने बरेचसे द्राक्ष बागायतदार करपा रोगासच झॅन्थोमोनास असे समजतात. त्यामुळे औषध फवारणीच्या नियोजनात झॅन्थोमोनाससाठी आवश्यक असणारी फवारणी केली जाते. परिणामत: करपा रोगाचे नियंत्रण न होऊन रोगाची वाढ मोठ्या स्वरूपात झालेली दिसून येते. 
 
2) योग्य बुरशीनाशकांची निवड 
 
प्रत्येक बुरशीनाशकांची विशिष्ट बुरशी नियंत्रणाची कार्यक्षमता भिन्न असते. म्हणून आपल्या बागेत दिसत असलेल्या बुरशी रोगास कोणती बुरशी कारणीभूत आहे, बुरशी रोग कोणत्या अवस्थेत आहे, बागेची अवस्था काय आहे, या गोष्टींचा विचार करून मग त्याच्या नियंत्रणासाठी कोणते बुरशीनाशक निवडायचे आहे यांचा विचार करावा लागेल. त्यानंतर त्या बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी म्हणजे आपण रोग नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकू. 
 
3) उपाययोजनेची निश्चित वेळ 
 
कोणत्याही रोगाची लक्षणे दिसल्यास त्या रोगाचे बिजाणू पानात शिरल्यानंतर कमीत कमी एक आठवडा लागतो. उदा. करपा किंवा डाऊनी (केवडा) रोगाच्या बाबतीत या रोगांचे बीजाणू अनुक्रमे एक पान अवस्था आणि तीन पान अवस्था यावेळी पानात शिरलेले असतात. परंतु त्या रोगाची लक्षणे मात्र आठ ते दहा दिवसांनी पानांवर किंवा काडीवर आढळतात. म्हणून करपा किंवा डाऊनी रोगांच्या योग्य नियंत्रणासाठी त्यांचा पहिला स्प्रे पाच पान अवस्था यावेळी घेणे आवश्यक आहे. यासाठी शक्यतो आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा यावेळी उपयोग करावा. तसेच फोमोप्सीस फळकुज किंवा बोट्रायटीसचे बीजाणू फळात, फुलोर्‍यात शिरतात. मात्र त्या रोगाची लक्षणे फळ पिकण्याच्या अवस्थेत दिसून येतात, म्हणून द्राक्ष वाढीची अवस्था आणि वातावरण (तापमान, आर्द्रता, पाऊस, धुके) यांचा विचार करून कोणता रोग येण्याची शक्यता आहे हे ध्यानात घेऊन योग्य बुरशीनाशकांची निवड करून योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात त्यांची फवारणी घ्यावी, म्हणजे रोग नियंत्रण चांगल्या पद्धतीने होऊ शकते. रोग नियंत्रण हे त्यांचे बीजाणू पानात शिरण्यापूर्वी किंवा पानात शिरल्यानंतर एकदोन दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. 
 
4) रोगाला बळी पडणार्‍या द्राक्ष वेलीच्या सर्व भागावर फवारणी घेणे 
 
द्राक्षवेलीच्या ज्या भागावर रोग येतो त्या भागावर सर्वत्र सारख्या प्रमाणात बुरशीनाशक बसेल अशा पद्धतीने बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. यासाठी द्राक्ष वेलीचे विस्तार व्यवस्थापन चांगले असावे, ते घनदाट असू नये, त्यामध्ये हवा खेळती असावी, ज्यामुळे रोग नियंत्रण सोपे होईल. 
 
5) बुरशीनाशकाच्या अचूक तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी घेणे 
 
प्रत्येक बुरशीनाशकाचे वापरायचे शेकडा प्रमाण निश्चित असते. यापेक्षा कमी तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी केल्यास रोग नियंत्रण होत नाही. याउलट त्या बुरशीनाशक विरोधात प्रतिकार शक्ती त्या बुरशीत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. पाऊस पडून गेल्यानंतर किंवा पानावर दव असताना आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा स्प्रे घेऊ नये. कारण त्या बुरशीनाशकांचा बराचसा भाग पाण्याने वाहनू गेल्याने त्या बुरशीनाशकांचा आवश्यक तेवढा क्रियाशील घटक पानावर न राहिल्याने त्या बुरशीचे योग्य नियंत्रण मिळत नाही. म्हणून अशावेळी शक्यतो स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा उपयोग करावा. फुलोरा अवस्थेत कॉपर ऑक्सीक्लोराईडचा उपयोग करू नये. सकाळी धुके असेल किंवा पानावर दव असेल तर 5% कॉपर ऑक्सीक्लोराईडचे डस्टींग करावे. सोनाका किंवा शरद सीडलेस जातीत मणी तयार होण्याच्या अवस्थेत व नंतर वेटेबल सल्फरचा उपयोग शक्यतो टाळावा. वांझ फुटी काढल्यानंतर, खुडा, बाळी केल्यानंतर शक्यतो बुरशीनाशकांचा स्प्रे घ्यावा. आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या उपयोगाचे नियोजन करताना पहिला स्प्रे कधी घ्यावा तर तो रोग येणार नाही याचा विचार करून त्या विशिष्ट रोगासाठी स्प्रे नियोजन करावे. आंतरप्रवाही बुरशीनाशकांची निवड करताना स्वस्त व परिणामकारक अशा बुरशीनाशकाची निवड करावी. विशिष्ट रोगासाठी जेवढे स्प्रे प्रमाणित केलेले आहेत तेवढे स्प्रे घ्यावेत. गरज भासल्यास एखादा स्प्रे जास्त घेण्यास हरकत नाही. फवारणीच्या योग्य पद्धतीचा उपयोग करावा. काही बुरशीनाशकांची परिणामकारकता पाण्याच्या सामूशी निगडीत असते. म्हणून पाण्याचा सामू कमी करण्यास 100 लिटर पाण्यात सर्वसाधारणपणे 25 ग्रॅम मॉक्झीसॉल मिसळावे, आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा उपयोग करताना ते एकाच गटातील आहे का ते पाहावे. ती एकाच गटातील असतील तर त्यांचा वापर करताना त्यांचा कालावधी पाहावा. त्या कालावधीच्या अंतराने त्यांचा उपयोग करावा. उदा. कार्बेन्डाझिम, थायोफिनेट मिथील व बेनलेट (बेनोमील) ही तिन्ही आंतरप्रवाही बुरशीनाशके बेन्झीमीडॅझोल या एकाच गटातील आहेत, म्हणून यांच्या वापरातील अंतर 7 ते 8 दिवसांचे ठेवावे लागेल.
             सागर म्हेत्रे