द्राक्षावरील प्रमुख किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    27-Feb-2020
|

grape_1  H x W:
 
 
द्राक्षवेलीवरील एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन येणार्‍या फुटीवर निरनिराळ्या किडींचा उपद्रव होतो. या किडींचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर द्राक्षाच्या पिकाचे फार मोठे नुकसान होते. कीड नियंत्रण प्रभावी होण्यासाठी कीड व्यवस्थापन योग्यवेळी करणे गरजेचे आहे. 
द्राक्षवेलीवरील एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन येणार्‍या फुटीवर निरनिराळ्या किडींचा उपद्रव होतो. या किडींचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर द्राक्षाच्या पिकाचे फार मोठे नुकसान होते. हे कळण्याकरिता योग्यवेळी कीटकनाशकांची बागेच्या अवस्थेनुसार फवारणी करणे आवश्यक असते. द्राक्षवेलीवर फुलकिडे, कोळी, मिलीबग, तुडतुडे, खोडकिडा, उडद्या, भुंगेरा, पाने खाणारी अळी इ. किडी मोठ्या प्रमाणावर उपद्रव करतात. तसेच द्राक्ष उत्पन्नामध्ये अपेक्षित उत्पादन घटीमध्ये काही बाबी प्रकर्षाने दिसून येतात. त्यात किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. तेव्हा कीड नियंत्रण प्रभावी होण्यासाठी कीड व्यवस्थापन योग्यवेळी करणे गरजेचे आहे. 
 
1)फुलकिडे (थ्रिप्स
 
 
ओळख : द्राक्ष पिकावरील रस शोषणारी ही एक महत्त्वाची कीड आहे. फुलकीड ही द्राक्ष वेलींच्या शेंड्यावरील नव्या पालवीच्या भागावर आढळून येतात व ते ऑक्टोबर व एप्रिल छाटणीनंतर नवीन वाढलेल्या पालवीवर आपली उपजीविका करतात. या कीटकांसाठी असणारे पोषक वातावरण म्हणजे किंचित जास्त तापमान, कमी सापेक्ष आर्द्रता. भरपूर सूर्यप्रकाश आणि उबदार हवामान होय. ही कीड अतिशय सक्रिय असते. म्हणूनच द्राक्षबागेमध्ये अतिशय सहजपणे त्यांचा प्रसार होतो. फुलकिडीच्या बाल्यावस्था आणि प्रौढ कीड या दोन्ही वेलींतील रस शोषून होतात. इजा झालेला भाग चंदेरी ठिपक्यांसारखा दिसतो. त्यामुळे कोवळी पाने आखडतात. तसेच त्यांचा कपासारखा आकार तयार होतो. फुलकिडे फळधारणेच्या काळामध्ये फुलांच्या अंडाशयातून रस शोषून घेतात ज्यामुळे फुलगळ होते व उत्पन्नामध्ये घट येते. नवीन द्राक्षमण्यांमधील रस या किडीने ओरखडून व शोषून घेतल्यामुळे त्यावर बदामी रंगाचे ओरखडे तयार होतात. त्यामुळे मण्यांवर खपल्यांची निर्मिती होऊन फळ नासाडी होते. त्यालाच आपण खर्डा असे म्हणतो. म्हणूनच कोवळी पालवी फुटण्याची अवस्था, फुलोर्‍याची अवस्था आणि फळधारण अवस्था या किडीच्या प्रादुर्भावाच्या प्रभावी अवस्था आहेत.
 
जीवनक्रम 
 
फुलकिडे हे रंगाने पिवळसर तपकिरी असतात. फुलकिड्यांची मादी 4 ते 5 अंडी दररोज पानांमध्ये खालच्या बाजूस घालते. अंडी 6 ते 8 दिवसांत उबतात. बाल्यावस्था 12 दिवस व कोषावस्था 3 ते 5 दिवस असते. एक पिढी होण्यासाठी 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र आयुष्य 20 दिवस असते. वर्षभरात या किडीच्या 6 ते 8 पिढ्या पूर्ण होतात. 
 
नियंत्रण
 
मशागत पद्धत 
 
जमिनीची उन्हाळ्यात खोल नांगरट केल्यास किडीचे कोष नष्ट होतात व प्रादुर्भाव कमी होतो. बागेत स्वच्छता, बागेस समतोल व मर्यादित नत्रखताचा वापर, तणांवर ही कीड आढळत असल्यामुळे बाग तणविरिहित ठेवावी.
 
यांत्रिकी/जैविक पद्धत
 
पिवळ्या व निळ्या रंगाच्या चिकट पट्ट्यांच्या सापळ्यांचा वापर केल्यास फुलकीड आकर्षित होऊन त्यावर चिकटतात व चांगले नियंत्रण मिळते. याप्रकारचे सापळे उंच भागावर 8-10 सापळे प्रतिएकर लावावेत. 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा निमयुक्त औषध 5 टक्के द्रावण 5 मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारावे. बागेमध्ये प्रादुर्भाव दिसून आल्यास व्हर्टिसिलीयम लेकॅनी 5 ग्रॅम+5 मिली कच्चे दूध प्रतिलिटर फवारणीवेळी टाकावे व फवारणी करावी.
 
रासायनिक 
 
फुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस 2.5 ते 5.0 मिली किंवा सॅन्ट्रॅनिलीप्रोल 10 ओडी 7 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा फिप्रोनिल 80 डब्ल्यूजी 0.05-0.0625 ग्रॅम प्रतिलिटर किंवा इमामेक्टीन बेनझोएट 05 एसजी 0.22 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात घेऊन आलटून पालटून पीएचआय विचारात घेऊन फवारणी करावी. फिप्रोनिल 80 डब्ल्यूजी याची फवारणी फुलोरा येण्याच्या आधी एकदाच करावी. परत याचा वापर करू नये.
 
2. पिठ्या ढेकूण (मिलीबग)
 
ओळख
 
भारतात द्राक्षावर आढळणार्‍या पिठ्या ढेकणांच्या जातींपैकी गुलाबी पिठ्या ढेकून ही प्रजाती भारतातील द्राक्षबागेस सर्वाधिक नुकसान करताना आढळून येते. पिठ्या ढेकूण हा रसशोषक किडीमधील एक प्रमुख गट आहे. या किडीच्या वाढीसाठी उच्च तापमान व तुलनेने कमी सापेक्ष आर्द्रता पोषक असते. या किडीचा प्रादुर्भाव डिसेंबरपासून वाढलेला दिसतो, तर मार्च ते मे या कालावधीत सर्वात जास्त प्रमाण असते. बाल्यावस्था व प्रौढ मादी या दोन्ही अवस्था द्राक्षवेलीच्या नवीन फुटलेल्या पालवीवर विशेेषत: फळछाटणीनंतर रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पालवी आखडली जातात. वेटोळा आकार निर्माण होऊन फळांची वाढ खुंटते. मण्यांमध्ये पाणी भरण्याच्या स्थितीमध्ये ही कीड खोडापासून ओलांडे फांद्या व द्राक्षांच्या मण्यांवरती स्थलांतरित होऊन त्यावर भरपूर प्रमाणात चिकट द्रव्य तयार करतात. त्यामुळे द्राक्षाचे घड चिकट बनतात. पिठ्या ढेकूण या किडीच्याभोवती पांढरे मेणाचे आवरण असते. त्यामुळे ते लांबून बघितल्यास ते कापसाच्या लहान लहान गोळ्यासारखे दिसतात. नंतर त्यावर काळसर बुरशीची वाढ होते. यामुळे घडाच्या गुणवत्तेमध्ये घट होऊन त्यास चांगला बाजारभाव मिळत नाही. मुंग्यांशी असणारी संलग्नता हीदेखील किडीचा फैलाव करण्यास कारणीभूत ठरते. मुंग्या या किडीचा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रसार करतात. तसेच त्यांना इतर नैसर्गिक शत्रूंपासून बचाव करतात. सर्वसाधारणत: 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आणि 50% पेक्षा कमी सापेक्ष आर्द्रता असताना या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.

जीवनक्रम 
 
पिठ्या ढेूकण किडीच्या अंडी, बाल्यावस्था व प्रौढ या तीन जीवनावस्था आढळून येतात. त्यापैकी बाल्यावस्था व प्रौढ मादी कीटक हे द्राक्षबागेत नुकसान करतात. प्रौढ मादी ही खोडावरील सैल सालीखाली कापसासारख्या अंडी कोषामध्ये 350 ते 500 अंडी घालते. सदर अंडी ही गुलाबी ते नारंगी असून त्यांच्या उबवण्यासाठी सुमारे 5 दिवसांचा कालावधी लागतो. प्रथम बाल्यावस्थेच्या कीटकांमध्ये पावडरचे आवरण आढळत नाही व ही अवस्था खूप हालचाल करते. ही अवस्था नारंगी रंगाची असून हीच किडीची कमजोर अवस्था आहे. बाल्यावस्थेमध्ये नर व मादी हे एकसमान असतात. परंतु प्रौढ अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांचे बाह्यरूप बदलते, जसे मादी आकाराने मोठी होते तर नर कीटकास पंख फुटतात. बाल्यावस्थेत मादी किटकास सुमारे 21 दिवसांचा कालावधी लागतो. निसर्गामध्ये प्रौढ नर कीटकांचे प्रमाण खूप कमी आढळते. या किडीमध्ये एक विशिष्ट गुण असून, मादी नराशी मिलनाशिवाय अंडी देऊ शकते. या किडीच्या एका जीवनक्रमास सुमारे 30 दिवसांचा कालावधी लागतो. 
 
नियंत्रण
एप्रिल छाटणीनंतर 
 
1)द्राक्षकाढणीच्या वेळेस मिलीबग प्रादुर्भावग्रस्त घड नष्ट करावेत. नंतर छाटणी झाल्यावर काड्या व पालापाचोळा तसेच मुख्य बुंध्यावरील सैल साली जाळून नष्ट कराव्यात. 
 
2)द्राक्षबागेतील व सर्व आजूबाजूचे गवत आणि मुंग्यांची वसाहत नष्ट करावी.
 
3)पावसाळ्यात बिव्हेरिया बॅसियाना अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी (2×108 लर्षी प्रतिमिली अथवा प्रतिग्रॅम) 5 ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी.
 
ऑक्टोबर छाटणीनंतर 
 
4)नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत खोडावरील व ओलांड्यावरील मिलीबगच्या वसाहती शोधून वरील उपाययोजनांप्रमाणे त्यांचा नाश करावा.
 
5)मिलीबगचा प्रादुर्भाव बघून बुप्रोफेझीन 25 एससी 1.25 मिली अथवा मिथोमिल 40 एसपी 1.25 ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे हे कीडनाशके प्राथमिक अवस्थेत फवारावे.
 
सूचना
 
बुप्रोफेझीन 25 एससी याचा काढणीपूर्वी कालावधी 40 दिवस, तर मिथोमिल 40 एसपी याचा काढणीपूर्व कालावधी 61 दिवस असा आहे.
 
3. खोडकिडा
 
खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे हे वळीव पावसादरम्यान बाहेर पडतात व द्राक्षवेलीच्या खोडावर, खाचांमध्ये अंडी घालतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर बाल्यावस्थेतील अळी खोडाला अथवा ओलांड्याला छिद्र पाडून आत प्रवेश करते व खोड पोखरत आत जाते. खोडकिडीच्या अळीचे दात खूप टणक असतात व कठीण लाकूड पोखरण्याची क्षमता त्यात असते. खोड पोखरत असताना पोखरून झालेला भुसा ही अळी मागे ढकलत असते व भुसा खोडात प्रवेश केलेल्या छिद्रांतून बाहेर पडलेला दिसून येतो. त्यावरून खोडकिड्याचे अस्तित्व निदर्शनास येते. प्रादुर्भाव झालेले खोड आणि ओलांडे सुरुवातीला कोमेजण्यास सुरुवात होते. नंतर पूर्णपणे द्राक्षवेल जळून जाते. खोडकिडीमुळे प्रादुर्भाव झालेल्या द्राक्षवेलीवर उत्पादन कमी मिळते किंवा मिळत नाही. त्यामुळे द्राक्षबागेचे आर्थिक नुकसान होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. 
 
जीवनक्रम
 
खोडकिडीचे प्रौढ कीटक हे द्राक्षवेलीच्या ओलांड्यावर सालीमध्ये तसेच खाचांमध्ये अंडी घालतात. या अंड्यातून अळी बाहेर पडते आणि खोडाला छिद्र पाडून घर करून राहते. मादी कीटक 12-15 अंडी खोलावर अथवा खाचांमध्ये घालते. सदर अंडी ही पांढर्‍या रंगाची व तांदळाच्या आकाराची असतात. बाल्यावस्था ही या किडीची सर्वाधिक नुकसान करणारी अवस्था आहे. या अवस्थेचा जीवनकालदेखील सर्वांत जास्त आढळतो. कोषावस्थेमध्ये ही कीड काहीही न खाता 2-3 आठवडे राहते व प्रौढ कीटक सुमारे 45 दिवसांपर्यंत जगतात. कोषातून बाहेर पडल्यानंतर मादी 5-15 दिवस अंडी देऊ शकते. म्हणून 10 दिवसांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करणे फायदेशीर ठरू शकते. 10 ते 12 दिवसांत त्यातून पांढर्‍या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात व पुढे 6 ते 8 महिने अळी अवस्था राहते. या कालावधीत त्या पिकाचे नुकसान करतात. नंतर ही अळी थंडीच्या दिवसांत काही काळ सुप्तावस्थेत जाते. सुप्तावस्थेत ती काहीच नुकसान करत नाही. खोडकिडीचा एका वर्षात एकच पिढी तयार होते. तसेच एक जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी सुमारे दहा ते अकरा महिन्यांचा कालावधी लागतो. 
 
नियंत्रणाचे उपाय
 
1)खोड पोखरणार्‍या अळीच्या व्यवस्थापनासाठी खोडावरील छिद्रामध्ये बिव्हेरिया बॅसीयाना किंवा मेटारायझियम अ‍ॅनिसोपली यांचे 100 मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणात छिद्र भरेपर्यंत टाकून ते छिद्र ओल्या मातीने बंद करावे किंवा मेटारायझियम 2 लिटर प्रतिएकर या प्रमाणात वापर फायदेशीर ठरतो.
 
2)जैविक कीड नियंत्रणासाठी मेटारायझियम अ‍ॅनिसोपली किंवा बिव्हेरिया, बॅसीयाना या बुरशीजन्य कीडनाशकांचा वापर पावसाळी दिवसांमध्ये दोन लिटर प्रतिएकर या प्रमाणात केल्यास फायदेशीर ठरतो.
 
3)रासायनिक पद्धतीने प्रौढ कीटकांच्या नियंत्रणासाठी द्राक्ष पिकात नोंदणीकृत कीटकनाशकांपैकी कोणतेही एक औषध वापरावे.
 
4)एप्रिल-मेमध्ये लागण झालेल्या फांद्या, खोड, ओलांडे काढून गोळा करून नष्ट करावे.
 
5)प्रौढ भुंगेरे हाताने गोळा करून तेसुद्धा नष्ट करावेत.
 
4. उडद्या भुंगेरे
 
ओळख  
 
ही द्राक्षावरील गंभीर स्वरूपात उपद्रव करणारी कीड आहे. प्रौढ भुंगेरे हे तपकिरी रंगाचे असून त्यांच्या पंखावर काळे ठिपके असतात. प्रोैढ भुंगेरे हे विशेषत: छाटणीनंतर नवीन डोळे फुटण्याच्या स्थितीमध्ये सक्रिय होतात. प्रौढ भुंगेरे वेलीच्या नवीन फुटी, तसेच पानांचा उपजीविकेसाठी वापर करतात. वेलीच्या खोडावरील सालीत उडद्या अंडी घालतो. अंडी कोष आठवड्यात उबवतात. उडद्या ही कीड नवीन येणारी कोवळी फूट, सुरुवातीचे फुटलेले कोंब पूर्णपणे पोखरून टाकतो. छाटणीनंतर द्राक्षबाग चांगली फूट होताना दिसतात. पण थोड्याच दिवसांनंतर ओलांडे रिकामे दिसतात. त्यावरून उडद्या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे समजावे. एप्रिल छाटणीनंतर फुगणारे डोळे ही कीड खाऊन टाकतात. त्यामुळे घडनिर्मिती होत नाही. उष्ण व कोरड्या हवामानात या किडीचा उद्रेक होतो. ही कीड एप्रिल व ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला बागेची छाटणी झाल्यानंतर फुगलेल्या डोळ्यांना छिद्र पाडून रात्रीच्यावेळी पूर्णपणे खाऊन फक्त करतात. घडनिर्मिती होत नाही म्हणून बाग वांझ फुटते.
 
जीवनक्रम
 
उडद्या भुंगेरे या किडीची मादी 20 ते 40 अंडी पुंजक्यात वेलीच्या साली खाली किंवा जमिनीवर पालापाचोळ्यात घालते. ही अंडी पांढरट पिवळ्या रंगाची आणि लांब निमुळती असतात. अंडी 4 ते 7 दिवसांत उबतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या रंगाने पांढर्‍या, निमपारदर्शक, सुरकुत्या असलेल्या व तीक्ष्ण/टणक दात असलेल्या असतात. या भुंगेर्‍याचा किडा 4 ते 5 मिमी लांब आणि 3 मिमी रुंद असतो. त्याच्या पंखावर सहा ठिपके असतात. त्यापैकी मधले दोन ठिपके त्रिकोणाकृती असतात. जमिनीमध्ये मुळांची साल खाऊन उपजीविका करतात. अळीची पूर्ण वाढ होण्यास 30 ते 35 दिवस लागतात. अळीची पूर्णपणे वाढ झाल्यावर ही अळी मातीचा कोष करून त्यात राखाडी रंगाच्या अवस्थेत रूपांतरित होते. ही अवस्था 9 ते 10 दिवसांची असते. उडद्या भुंगेरा आठ ते बारा महिने जगतो. भुंगेरे डिसेंबर ते मार्चपर्यंत सालीखाली सुप्तावस्थेत राहतात. 
 
नियंत्रण 
 
मशागत पद्धत 
 
छाटणीनंतर छाटलेल्या काड्या, निघालेली साल व पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा. तसेच जमीन चाळून घ्यावी, जेणेकरून अळ्या व कोषण सूर्यप्रकाशात येतील. छाटणीनंतर खोडावरील व आलांड्यावरील सेल झालेली साल काढून नष्ट करावी.
जैविक पद्धत
 
निमअर्क 5 मिली/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
रासायनिक
 
 औषधाचे नाव   प्रमाण औषधाचे ना
काढणीपूर्वीचा काळ दिवस
 इमिडाक्लोप्रीड  17.8 एसएल 0.3 मिली प्रतिलिटर  60
 लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन  4.9 सीएस 0.25 ते 0.50 मिली प्रतिलिटर   45
 
सूचना : इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल या कीटकनाशकाचा वापर फुलोर्‍यापूर्वी तसेच फुलोरा 
अवस्थेमध्ये करू नये.
 
5. कोळी (माईट्स)
 

grape_1  H x W:
 
 
ही कीड रसशोषक वर्गामध्ये असून उच्च तापमान व कमी आर्द्रता या किडीस पोषक ठरते. या किडीची द्राक्षबागेतील संख्या डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यानंतर वाढते व फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान उच्चतम स्तर गाठते. कोळीची पसंती जुनी पाने असून जर संख्येमध्ये वाढ झाल्यास त्यांचे घडांवरदेखील स्थलांतर होते. बाल्यावस्था व प्रौढ कोळी या दोन्ही अवस्था वेलीतील रस शोषतात व त्यांना कमकुवत बनवतात. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानगळ होते. त्यामुळे द्राक्षमण्यांतील साखरेचे प्रमाण कमी होऊन त्यांचा दर्जा खालावतो.
 
ओळख
 
कोळी कीड आकाराने लांबट गोल आणि फिकट पिवळे पांढरट रंगाचे असतात किंवा तांबूस रंगाचे दिसतात. त्यांच्या शरीराचे प्रमुख दोन भाग पडतात. पुढील भाग म्हणजे संयुक्त छाती व डोके आणि मागील भाग म्हणजे पोट, कोळी किडीच्या तोंडाची रचना विशिष्ट प्रकारची असते. ते सुईसारख्या मुखभाग वनस्पतीच्या पेशीमध्ये खुपसून त्यातील हरितद्रव्याचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर, फळांवर पिवळट पांढरट चट्टे दिसतात. कोवळी पाने चुरगळल्यासारखी दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने पूर्ण वाळून जातात. कोळीच्या जास्त प्रादुर्भावामध्ये पानातील 70 टक्के पर्यंत हरितद्रव्य नष्ट होते. त्यामुळे पानांवर तपकिरी जळाल्यासारखे चट्टे दिसतात आणि पाने शेवटी वाळून जातात.
 
नियंत्रणाचे उपाय
मशागत पद्धत 
 
ज्या बागेत धूळ जास्त असते व पाण्याचा ताण पडलेला असतो अशा बागांमध्ये किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. त्याकरिता पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे, तसेच बागेची स्वच्छता, बाग तणविरहित ठेवावी.
 
जैविक 
 
1)बिव्हेरिया बॅसीयाना, व्हर्टिसिलीयम लेकॅनी, हिरसुटेला थॉम्पसनी व पॅसिलोमायसस यासारख्या जैविक घटकांचा वापर करावा.
2)अझॅडिरॅक्टीन 1 टक्के 2 मिली अथवा 5 टक्के 0.5 मिली प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी.
 
 
रासायनिक 
 
द्राक्षबागेवर कोळी या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करणे कठीण जाते. त्यामुळे कोळी कीड दिसू लागताच गंधक 80 डब्ल्यूडीजी 1.5 ते 2 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. सदर फवारणीपूर्वी सकाळच्या वेळेत पाण्याची फवारणी 1000 लिटर प्रतिएकर या प्रमाणात घ्यावी. ज्याद्वारे पानांद्वारे कोळी तसेच त्यांच्या जाळ्या निघून जातील. 
सूचना : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी बागेच्या अवस्थेनुसार कीटकनाशके लेबल क्लेम असलेली तपासून घ्यावीत व त्यांचे शिफारशीत प्रमाण व काढणीपूर्व काळ विचारात घेऊन कीड नियंत्रणासाठी फवारणीचे नियोजन करावे. 
                                                                                                                  
डॉ. मंगेश बडगुजर, डॉ. राकेश सोनवणे, डॉ. जितेंद्र ढेमरे व श्री. शिवाजी गायकवाड
कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि.नशिक.