द्राक्षांमधील गंभीर विकृती व त्यावरील उपाय

डिजिटल बळीराजा-2    24-Feb-2020
|

grape_1  H x W:
 
द्राक्षबागांमध्ये तापमान कमी जास्त झाल्याने बर्‍याच प्रकारच्या विकृती दिसून येतात. त्याचा द्राक्ष उत्पादनांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सुमारे 5 टक्क्यांपासून ते 50 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. यामध्ये थॉमसन सीडलेस व शरद सीडलेस व या जातींचे विविध क्लोन यांमध्ये विविध प्रकारच्या विकृती व त्यावरील उपायासंबंधी माहिती या लेखात दिली आहे.
 
1) उकड्या
 
2) सनबर्ग 
 
3) द्राक्ष मण्यांना चिरा पडणे (बेरी क्रॅकिंग) 
 
4) शॉर्ट बेरीज 
 
5) क्वायलिंग (घडाचे वेटोळे) 
 
6) पिंक बेरीज 
 
1) उकड्या विकृती : उकड्या ही विकृती अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात दिसून येत आहे. 
 
अ) या विकृतीमध्ये द्राक्षमणी उकडल्यासारखे दिसतात.
 
ब) मण्यांचा देठ लवकर वाळून जातो.
 
क) हात लावल्यानंतर किंवा स्पर्श केल्यानंतर मण्यांची गळ होताना दिसते. ही विकृती साधारणत: 70-90 दिवसांपर्यंत आढळून येते. म्हणजेच मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेपर्यंत ही विकृती दिसून येते. जसजसे मण्यांत पाणी उतरायला सुरुवात होते          तसतसे या विकृतीचे लक्षणे बागेत दिसून येत नाहीत.
 
उकड्या विकृतीसाठी कारणीभूत असणारे घटक :
 
1) रात्रीचे 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान.
 
2) द्राक्षबागेमध्ये जास्त आर्द्रता व ती अधिक काळ म्हणजेच सकाळपासून दुपारपर्यंत असणे.
 
3) दिवसाचे तापमान 30 अंश से.पेक्षा जास्त असणे. रात्रीच्या कमी तापमानामुळे सकाळच्यावेळी जास्त दव पानांवर व मण्यांवर पडत असते. बागेत जर आर्द्रता जास्त असेल आणि अशावेळी द्राक्षवेलींवर ओलेपणा विशेषत: पानांवर व मण्यांवर जास्त काळ म्हणजेच दुपारपर्यंत टिकून राहतो व जास्त तापमान असल्यास तापमानाचा चटका मण्यांना बसल्यामुळे घडातील मणी उकडल्यासारखे होतात.
 
4) उच्च सापेक्ष आर्द्रता ही दाट कॅनॉपीमुळे अधिक काळ राहतो.
 
5) प्रवाही पद्धतीने पाणी देणे साधारणत: 70-80 दिवसांच्या दरम्यान पाटाने पाणी दिल्यास आर्द्रता वाढते. 
 
उकड्या विकृती टाळण्यासाठी उपाययोजना :
 
1) 70-80 दिवसांच्या दरम्यान पाटाने पाणी देऊ नये.
 
2) दाट कॅनॉपी असणार नाही, याची काळजी घ्यावी. हवा खेळती राहील एवढी कॅनॉपी ठेवावी. असे पाहण्यात आले आहे की बरेचसे द्राक्षबागायतदार तीन-चार दिवसांतून एकदा व अधिक प्रमाणात पाणी देतात. त्यामुळे आर्द्रता वाढण्यास मदत होते. असे न करता दररोज दोन वेळ ठिबकद्वारे वीस मिनिटांसाठी पाणी द्यावे. अधिक उंचीवरील ड्रीप लाइन कमी उंचीवर आणावी.
 
3) जास्त जाडीचे अच्छादन करून उघडे ठेवले जाते. त्यावेळी कमी जाडीचे आच्छादन घालून त्यावर माती टाकावी. मण्यांच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेमध्ये कोणताही ताण वेलींवर येणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्नद्रव्यांच्या मात्रा वेळेत व प्रमाणात द्याव्यात. संजीवकांचा वापर करताना ते जास्त प्रमाणात व एकाच वेळी जास्त संजीवके वापरू नयेत, तसेच बुरशीनाशकांचा अधिक कार्यक्षमपणे वापर करावा. 
2) सनबर्न विकृती
 
प्रखर सूर्यकिरणांमुळे द्राक्षांवर उष्णतेचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे मणी सुकू लागतात किंवा तांबूस (तपकिरी) रंगाचे मणी तयार होऊन ते सुकण्यास सुरुवात होते किंवा गळायला सुरुवात होते. अशाप्रकारे हळूहळू ही विकृती संपूर्ण घडांत दिसून येते, निकृष्ट दर्जाची घडांची निर्मिती होते. व त्यामुळे खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. ही विकृती थेट सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आलेल्या द्राक्षघडांवर दिसून येते. उन्हाळ्याच्या छाटणीमुळे आणि फांद्यांच्या व्यवस्थापनामुळे किंवा इतर विस्ताराच्या पद्धतीमुळे जी फळे संपूर्ण वाढीच्या काळात सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येतात. त्यामध्ये उष्णतेचे परिणाम दिसून येतात. अशावेळी पाण्याची कमतरतादेखील यास कारणीभूत ठरू शकते. कधी कधी विरळणीमुळे ही विकृती दिसून येते. 
 
 

grape_1  H x W:
 
 
सनबर्ग टाळण्यासाठी उपाययोजना :
 
1) प्रतिबंधात्मक उपाययोजना : अशी द्राक्षे तीव्र उष्णतेपासून वाचवण्यासाठी व्यवस्थित द्राक्षबाग विस्तार पद्धत, सरावात्मक परंतु प्रभावी वळण पद्धत, विस्तार पद्धतीचे नीटनीटके व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. तसेच कोणती द्राक्ष जात उष्णतेला संवेदनशील आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच घडापुढे 10-12 पाने असावीत जेणेकरून घडांचे सूर्यप्रकाशांपासून संरक्षण होते. 
 
2) शेडनेट आणि पेपर बॅगचा वापर वाटाण्याच्या आकाराचे मणी ते पाणी उतरण्याच्या काळापर्यंतची रंग येण्याची अवस्था ही द्राक्षामध्ये सर्वांत संवेदनशील असते. या काळामध्ये द्राक्षाचे योग्य संरक्षण करावे. कमी विस्तार असताना घडांचे संरक्षण करण्यासाठी सावनीचे अच्छादन किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. किंवा घडाभोवती कागदी पेपर गुंडाळावा. या काळांमध्ये संवेदनशील द्राक्ष जातींना कमीत कमी हाताळावे.
सूर्यप्रकाश आणि रोगांपासून संरक्षण होण्यासाठी नैसर्गिकरीत्या एक आवरण असते. परंतु मण्यांनासारखे हाताळल्याने असे मनी सनबर्ग विकृतीला संवेदनशील बनतात. अशाप्रकारे नियोजन केल्यास नुकसान टाळता येईल व द्राक्षांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. 
 
3) बेरी क्रॅकिंग
 
बेरी क्रॅकिंग (द्राक्ष मण्यांना चिरा पडणे) ही विकृती प्रामुख्याने रंगीत जातीच्या द्राक्षांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. त्याचबरोबर ही विकृती थॉमसन सीडलेस व या जातींचे विविध क्लोन यामध्ये अलीकडच्या काळात दिसून येते. ही विकृती पाणी उतरण्याच्या अवस्थेमध्ये मण्यांना भेगा पडल्याचे दिसून येते. यालाच बेरी क्रॅकिंग संबोधतात; मुळांद्वारे पाणी शोषले जाते. परंतु पानांद्वारे ते बाहेर पडत नाही. कारण वातारणातील कमी तापमान व जास्त असणारी आर्द्रता यामुळे हे पाणी ज्यामध्ये 12-14 टक्क्यांपेक्षा जास्त साखर आली आहे. अशा मण्यांमध्ये शोषले जाते. त्यामुळे मण्यांतील दाब वाढतो. हा दाब थांबवून ठेवण्यासाठी मण्यांचा आकार वाढत नाही. परिणामी मण्यांना भेगा पडतात. अशा मण्यांमधून साखर बाहेर पडते. यावर एसपरजीनस म्युकर, टायझोपर्स किंवा पेनिसिलियमसारख्या परोपजीवी बुरशी वाढतात. यामुळे मणी सडण्याची प्रक्रिया सुरू होते व त्यामुळे अतोनात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. 
 

grape_1  H x W: 
उपाययोजना :
 
1) प्रमाणापेक्षा जास्त पाणी देणे टाळावे.
 
2) ठिबकलाइनच्या लॅटरलस वर न लावता जमिनीपासून एक फूट उंचीवर बांधाव्यात. ज्यामुळे जास्त आर्द्रता तयार होणार नाही
.
3) मण्यांची विरळणी योग्यप्रकारे करावी जेणेकरून घड सुटसुटीत राहतील.
 
4) वेलीचा विस्तार मर्यादित ठेवावा. जास्तीची कॅनॉपी ठेवू नये व झिरो हिलेज पद्धतीचा वापर करावा. जेणेकरून पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होईल. अशाप्रकारे नियोजन केल्यास नुकसान बर्‍याचअंशी टाळता येईल. 
 
4) क्वायलिंग विकृती :
 
क्वायलिंग म्हणजे घडाचे वेटोळे किंवा कॉइलसारखा घड गुंडाळणे यालाच कार्यलिंग विकृती असे संबोधतात. या विकृती मागचे प्रमुख कारण म्हणजे जीएचा बेसुमार वापर व वारंवार वापर करणे यामुळे घड गुंडाळणे किंवा घडाचा कडकपणा वाढणे किंवा एनएए/जीए या संजीवकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर फुलोरा अवस्थेमध्ये केल्यास घड गुंडाळला जातो. त्यामुळे याचा परिणाम येणार्‍या उत्पादनावर झाल्याचा दिसून येतो.
 
ही विकृती टाळण्यासाठीच्या उपाययोजना :
 
जीएचा आवश्यकतेनुसार मर्यादित स्वरूपाचा वापर करावा किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार किंवा शिफारशीनुसार करावा. त्यामुळे पुढील समस्या उद्भवणार नाहीत. जी-एचा स्प्रे करताना पाण्याचा झक नियंत्रिम करून व जीएची फवारणी घ्यावी. 
 
5) शॉर्ट बेरीज (मणी लहान राहणे)
 
घडांच्या किंवा पाकळ्यांची लांबी वाढवण्यासाठी संजीवकांचा बेसुमार वापर केला जातो. परंतु हा संजीवकांचा (जीएचा) वापर योग्य अवस्थेत होणे फार महत्त्वाचे असते. नाहीतर त्याच्या वापराने फायदा होण्याऐवजी बर्‍याचदा द्राक्षांमध्ये शॉर्ट बेरीज निर्माण झाल्याचे दिसून येते. हे मणी सामान्य मण्यांपेक्षा लहान व गोलाकार, तसेच बिया असणार्‍या जातीतील मण्यांमध्ये बियाविरहित मणी आढळून येतात.
 
उपाययोजना :
 
1) शॉर्ट बेरीज येऊ नये म्हणून गर्डलिंग किंवा जीएचा वापर शॉर्टर अवस्थेमध्ये करू नये. कमीत कमी बाजरीच्या आकाराचे मणी झाल्याशिवाय दोन्ही कामे करू नयेत.
 
2) फुलोरा अवस्थेमध्ये सायटोकायनीन किंवा ऑक्झिन गटातील संजीवके तसेच जैविक वाढ वर्धकांचा वापर करू नये.
 
3) ड्रीपद्वारे अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करावा.
 
4) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर ब्लूम अवस्थेत करावा.
 
5) वेलींच्या क्षमतेनुसार घडांची संख्या ठेवावी, जेणेकरून प्रत्येक मण्याचे योग्य पोषण होईल. 
 
6) पिंक बेरीज (विकृती)
 
ही विकृती प्रामुख्याने थॉमसन सीडलेस व त्याचे क्लोन जसे की तास-ए-गणेश, माणिक चमन, सोनाका इ. मध्ये आढळते. मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेमध्ये जर कमान तापमान हे 30 सें. पेक्षा जास्त व किमान तापमान हे 10 अंश से.पेक्षा कमी असेल तर द्राक्षमणी गुलाबी रंगाचे होतात. यालाच आपण पिंक बेरी विकृती म्हणून संबोधतो. या विकृतीमुळे असे घड निर्यातीस अयोग्य ठरतात. ही विकृती येऊ नये यासाठी परिणामकारक संशोधन सध्यातरी पूर्ण झालेले नाही. तरी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करून काहीअंशी ही विकृती येण्याचे टाळता येऊ शकते. 
 
grape_1  H x W:
 
प्रतिबंधात्मक उपाययोजना पुढीलप्रमाणे :
 
1) ही विकृती साधारणपणे पाणी उतरण्याची अवस्था असलेल्या बागांमध्ये दिसून येते. ती टाळण्यासाठी द्राक्षवेलींची फळछाटणी ही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घ्यावी.
 
2) वेलींना पोटॅश व अन्नद्रव्याचे पोषण योग्य प्रमाणात घ्यावे.
 
3) सायटोकायनीन या संजीवकांची मात्रा पाणी उतरण्याच्यावेळी द्यावी. ज्यामुळे मण्यांतील हरितद्रव्य टिकून राहील. पाण्याचा जास्त ताण देऊ नये. मण्यांत पाणी उतरण्यास सुरुवात झाल्यानंतर वेलीवर शेडनेटचे आच्छादन करावे किंवा घड पेपरने झाकून घ्यावेत.
 
4) सेंद्रिय, गांडूळ, कंपोस्ट व हिरवळीच्या खतांचा वापर करावा. सेंद्रिय पदार्थांची स्लरी द्यावी.
 
5) मण्यांची विरळणी एकदा किंवा दोनदाच करावी. मण्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
6) अशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास पिंक बेरीज विकृती टाळता येऊ शकते. 
   
                                                                                                                                      डॉ. एस. डी. रामटेके,                                                                                                                                                            शरद भागवत,  पंकज बनकर