द्राक्षबागेतील प्रमुख समस्या व उपाययोजना

डिजिटल बळीराजा-2    18-Feb-2020

drakshya_1  H x

द्राक्षाच्या फळछाटणीनंतर बर्‍याच समस्या द्राक्षबागेत दिसून येतात. त्याचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम होत असतो. म्हणून या समस्यांची माहिती व त्यांचे नियोजन महत्त्वाचे ठरते. या काही महत्त्वाच्या समस्यांविषयी माहिती पुढीलप्रमाणे :
सद्यस्थितीत बर्‍याच बागा टोपणाच्या अवस्थेत आहेत. यावेळी दोन समस्या द्राक्षबागेत दिसून येतात.
 
1) मणीगळ (फुलोर्‍या आधीची), दुसरी समस्या म्हणजे मनी फुलोरा अवस्थेआधी किंवा फुलोर्‍याच्यादरम्यान होणारी मण्यांची गळ. म्हणजे सर्व घड एका रात्रीत जळून गळून जातो. ते कशामुळे होते हे अजून स्पष्ट नसले तरी ही गळ थांबवणे फारच आवश्यक आहे.
 
लक्षणे : ही समस्या जेव्हा बागेत जास्त आर्दता निर्माण होते तेव्हा दिसून येते. वर सांगितल्याप्रमाणे घड जळण्यास सुरुवात होते.
उपाययोजना : अशा प्रकारची घडाची जळ दिसून आल्यास बागेत हवा कशी खेळती राहील याची काळजी घ्यावी; त्यासाठी कॅनोपी कमी करावी. काडीवरील सुरुवातीची जुनी पाने काढून टाकावीत, तसेच वांझ फुटीसुद्धा काढून टाकाव्यात. यादरम्यान संजीवकांची फवारणी टाळावी. तसेच इतर फवारण्यासुद्धा बंद कराव्यात. डाउनी मिल्ड्यूसाठीचे प्रभावी औषध प्रमाणित मात्रेनुसार फवारावे. कॅनोपी त्वरित कमी करावी. त्यामुळे घडांची होणारी जळ थांबेल व निर्धारित घडांची संख्या वेलीवर ठेवता येईल.
 
ही समस्या वातावरणातील तापमान वेलींवरील ताण, पाण्याचा ताण, फॉस्फरस या अन्नद्रव्याचा जमिनीतील अतिजास्त प्रमाण, जास्त क्षारता व पोटॅशियमसारख्या मूलद्रव्यांचे कमी प्रमाण इत्यादी बाबींमुळे असू शकते. 
 
2) घड जिरण्याची समस्या व उपाययोजना
 
घड जिरणे म्हणजे येणार्‍या फुटीतून घड बाहेर न येता त्याचे रूपांतर बाळीमध्ये होणे. फळछाटणीनंतर डोळे फुगण्याच्या अवस्थेनंतर पोंगा अवस्थेत जर ढगाळ वातावरण व सतत पाऊस राहिल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. पोंगा अवस्थेपासून वेलींमधील शरीरशास्त्रीय हालचाली होत असताना जर संजीवकाचा समतोल बिघडला तर ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेलीत जिब्रेलिनचे प्रमाण वाढते, सायटोकायनिनचे प्रमाण कमी होते, परंतु वेलीत सायटोकायनिनची पातळी व्यवस्थित राखावी.
 

fal_1  H x W: 0 
 
आकारमान वाढवताना घ्यावयाची दक्षता :
 
1)प्रतिदीड फुटांवर एकच घड असावा. त्यासाठी फुटींची विरळणी करावी व शक्यतोवर एकाच आकाराच्या फुटी वेलीवर ठेवाव्यात.
2)शॉर्ट बेरीज येऊ नये म्हणून गर्डलिंग किंवा जीए देण्याचे वॉटर अवस्थी आधी टाकावे. कमीत कमी बाजरीच्या आकाराचे मनी होऊ द्यावेत.
3)जीएचे स्प्रे घेताना सर्वच घड एकाच अवस्थेत असतील असे बघावे.
 
3) द्राक्ष घडाच्या देठावरील गाठीची समस्या व उपाययोजना
 
साधारणपणे द्राक्ष देठावरील गाठीची समस्या ही घड दिसायला लागल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर वातावरणात घडणार्‍या बदलांनुसार दिसू लागते. देठावरील गाठी आतून पोकळ असून त्यामुळे पाकळ्यांचे देठ सुकण्यास कारणीभूत ठरतात. उष्ण तापमान, प्रकाशाची तीव्रता, पाऊस इत्यादी घटकसुद्धा कारणीभूत ठरतात. प्रिब्लूम अवस्थेमध्ये जास्त जीएचा वापर यामुळेसुद्धा गाठीची समस्या निर्माण होते. देठावरील गाठीमुळे तसेच वेल देठ सुकण्यामुळे द्राक्ष घडावर वॉल्टबेरीज, ममीफिकेशन अशाप्रकारची लक्षणे दिसून येतात.
सर्वप्रथम गाठ दिसून येते व त्यानंतर गाठीवर क्रॅकिंग होताना आढळून येते. घडाच्या काडीवरील जोडाजवळ निर्माण झालेल्या गाठीमुळे घडाकडील होणार्‍या अन्नपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो व पुरेशा प्रमाणात अन्नपुरवठा होत नाही.
 
उपाययोजना
 
1)गाठीच्या समस्या असणार्‍या बागांची फळछाटणी शक्यतो ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यानंतर घ्यावी.
2)घडाच्या वाढीसाठी वापरण्यात येणार्‍या संजीवकांचा वापर करावा. अशा पद्धतीने उपाययोजना केल्यास गाठ येण्याची शक्यता कमी राहील.
3)द्राक्षबागेत संजीवकांचा शिफारशीनुसार वापर करावा.
4)सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नियोजन शिफारशीनुसार करावे.
5)द्राक्षबागेमध्ये पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
6)सतत आर्द्रता राहणार्‍या बागेत दोन ओळींमध्ये रिपिंग केल्यास ही समस्या कमी होऊ शकते.
7)नकळत फुलोरा अवस्थेआधी एनएए (नॅप्थलिक अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड) या संजीवकांची फवारणी द्राक्षबागेत टाळावी. खरेतर एनएचा वापर मणीगळ थांबवण्यासाठी होतो. परंतु फुलोर्‍याआधी या संजीवकाचा वापर कटाक्षाने टाळावा.
 
4) द्राक्षबागेतील वॉटर बेरीज समस्या व उपाययोजना
 
थंडीच्या काळात मण्यांची वाढ खूपच कमी होत असते. त्यातच काही घडांतील मण्यांंमध्ये वॉटर बेरीज असल्याचे दिसून येते. हे मणी दिसायला सामान्य मण्यांसारखेच हिरव्या रंगाचे दिसतात. परंतु मण्यांना दुधाळ रंग प्राप्त होत नाही. यामध्ये साखरेचे प्रमाण हिरवा रंग व कमी टिकल्यांची क्षमता असणार्‍या मण्यांना ‘वॉटर बेरीज’ असे म्हणतात.
 
लक्षणे/कारणे
 
1) वेलीच्या उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त घड किंवा घडात मण्यांची संख्या ठेवल्यास वॉटर बेरीज तयार होतात.
2) मणीवाढीच्या अवस्थेमध्ये अतिरिक्त पाणी व नत्रयुक्त खतांचे प्रमाण जास्त झाल्याने ही समस्या उद्भवते.
3) पाणी उतरण्याच्या अवस्थेत जास्त थंडी व वेलीच्या कमी विस्तारामुळे सुद्धा वॉटर बेरीज तयार होऊ शकतात.
4) मण्यांच्या वाढीच्या अवस्थेत शेंडावाढ करणारे रसायन किंवा अन्नद्रव्य वापरले असल्यास वॉटर बेरीज घडात तयार होतात.
 
उपाययोजना
 
1)वेलींवर मण्यांची संख्या व पानांची संख्या यांचे गुणोत्तर योग्य ठेवावे. साधारणत: एक पान हे सात मण्यांसाठी पुरेसे असते. याचा विचार करून मण्यांची संख्या व वेलींवरील घड ठरवावे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात हे निश्चितपणे पाळावे.
2)मण्यांच्या वाढीच्या काळात शेंड्याची वाढ थांबवण्यासाठी वाढरोधकाचा वापर करू नये. परंतु वाढ होत असल्यास ती पिंचिंग किंवा टॉपिंग करून थांबवावी.
3)नत्राचा वॉटर बेरीजशी संबंध असल्यामुळे मणीवाढ अवस्थेत नत्राचा जास्त वापर टाळावा.
4)मण्यांत पाणी उतरण्याच्या सुरुवातीच्या काळात युरिया किंवा अमोनियमसारख्या खतांचा वापर टाळावा.
5)काढणीच्यावेळी वॉटर बेरीज असलेले मणी काढून टाकावेत.
 
5) द्राक्षबागेतील मणी कोमेजणे समस्या उपाययोजना
 
रेड ग्लोब बिया असणार्‍या द्राक्षाच्या जातीमध्ये ही विकृती अतिप्रमाणात दिसून येते. याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु संशोधकांच्या मनामध्ये या समस्येविषयी भिन्नता आहे. परंतु सर्वसाधारण परिस्थितीमध्ये, जलवाहिन्या पाणी उतरण्याच्या कालावधीमध्ये काम करीत नाहीत आणि अन्नवाहिन्यांद्वारे पाणी मण्यांच्या आत येत राहते. यामुळे पाणी कदाचित देठांतून मण्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. इतर महत्त्वाचे घटक ते मण्याच्या कोमेजण्याशी निगडित असू शकतात. ते म्हणजे पाण्याबरोबरच पोटॅशियमचा अपुरा पुरवठा आणि पर्यावरणातील ताण जसे की पाण्याची कमतरता, उष्णता, तापमान इत्यादी. 
 
प्रतिबंधात्मक उपाययोजना
 
मणी का कोमेजतात याचे कारण अद्याप समजलेले नाही. जर जीए जेव्हा मणी 
10-15 मिलिमीटर आकाराचे असताना फवारले असता मणी कोमेजण्याचे प्रमाण 50-70% पेक्षा कमी होते. घडांना कागदी पिशव्यांनी झाकल्यास मणी कोमेजण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल. छाटणीनंतर 70-80 दिवसांनी घड कागदी पिशव्यांनी झाकावेत, जेणेकरून मणी सुकणार नाहीत.
डॉ. एम. डी. रामटेके, शरद भागवत,
पंकज बनकर