द्राक्षबागेतील खोड कीड-मिलिबग एकात्मिक नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर

डिजिटल बळीराजा-2    17-Feb-2020
|

draksh_1  H x W
 
 
द्राक्षबागेतील खोड कीड व मिलिबगसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना जैविक घटकांचा आधार घेणे कसे आवश्यक आहे या संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. 
 
मागील काही वर्षांपासून द्राक्षबागेत वर्षभर अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव सातत्याने होत असतो. यामध्ये हंगामानुसार, तसेच हवामानातील बदलांनुसार कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी जास्त होतो. याशिवाय कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे कीडनाशकांचे रेसिड्यू, कीडनाशकांच्या प्रतिकारकशक्ती तयार होणे यांसारख्या मागील हंगामात द्राक्ष बागायतदारांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागले. अशातच कीडनाशकांचे रेसिड्यू, पेपरमध्ये आलेली मिलिबगच्या प्रादुर्भावाची समस्या, काढणीदरम्यान आलेला लाल कोळी अशा समस्यांचा सामना बागायतदारांना करावा लागला आहे. सध्याच्या द्राक्षबागेत खोडकिडींची समस्यादेखील प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे या हंगामात खोड कीड व मिलिबगसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना जैविक घटकांचा आधार घेणे फायद्याचे ठरेल. येत्या काळात द्राक्षबागेत मिलिबग आणी खोड कीड नियंत्रणाविषयी सविस्तर माहिती आपण घेऊयात. 
 
खोड किडीचा जीवनक्रम : 
साधारणपणे द्राक्षबागेमधील खोड किडीच्या जीवनक्रमाची सुरुवात जून महिन्यातील पहिल्या पावसापासून होत असते. जून महिन्यापासून अंडी अवस्थेपासून सुरू झालेले खोड किडीचे जीवनचक्र जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत अळीअवस्थेत असते. याचअळी अवस्थेकडून खोडातील मधला भाग पोखरून नुकसान होत असते. हवामानातील बदल जसे उशिरा आलेला पाऊस किंवा थंडीचा दीर्घ कालावधी अशा गोष्टींमुळे खोड किडीचे जीवनचक्र लांबते. मार्च-एप्रिल महिन्यात खोड किडीची अळीअवस्था कोषावस्थेत जाते. ही अवस्था हालचाल न करणारी असते, तसेच या अवस्थेत खोड कीड द्राक्षाच्या खोडाचा कोणताही भाग खात नाही. मे महिन्यात कोषावस्था संपवून खोड किडीचे प्रौढ द्राक्षाच्या खोडात बाहेरील अनुकूल वातावरण तयार होण्याची वाट बघतात. मे-जून महिन्यात पडणार्‍या पूर्वमोसमी पावसाने वातावरणात आर्द्रता वाढून खोड किडीचे प्रौढ बाहेर पडतात. अशाप्रकारे खोड किडीचे एका वर्षात एकच जीवनचक्र पूर्ण होते. 
 
खोड कीड : 
मागच्या काही वर्षांपासून सर्वच द्राक्षबागेत खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात दोन प्रजाती प्रादुर्भाव करताना दिसून येत आहेत. स्ट्रोमॅशियम बार्बाटम आणि सेलोस्टर्ना स्क्रेबेटार या प्रजातींचे प्रौढ किडे जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत बागेत आढळून येतात. 
 
मान्सूनचे आगमन होताना नेहमीच हुलकावणी देत असतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक विभागासह इतर भागातदेखील पूर्वमोसमी पाऊस चांगला झाला. त्यातून झालेल्या अनुकूल वातावरणात स्ट्रोमॅशियम बार्बाटम या खोडी किडीच्या प्रजातीचे प्रौढ जून महिन्यातच बाहेर पडलेले दिसले आहेत. सेलोस्टर्ना स्क्रेबेटार या प्रजातीचे प्रौढ सध्या दिसून येत आहेत. या प्रजातीचे प्रौढ जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने दिसतात. सद्यपरिस्थितीत द्राक्षपट्ट्यात खोड किडीच्या पुढील जीवनचक्रास सुरुवात झालेली आढळत आहे. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे जवळपास सगळ्याच द्राक्षबागांमधून खोड किडीचे प्रौढ बाहेर पडून अंडीअवस्था देखील दिसून आली होती. 
 
खोड किडीचा जीवनक्रम :
साधारणपणे द्राक्षबागेमधील खोड किडीच्या जीवनक्रमाची सुरुवात जून महिन्यातील पहिल्या पावसापासून होत असते. जून महिन्यापासून अंडीअवस्थेपासून सुरू झालेले खोड किडीचे जीवनचक्र जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत अळीअवस्थेत असते. जून महिन्यामध्ये खोड किडीची मादी नरासोबत मिलन झाल्यानंतर खोडावरील मोकळ्या सालीमध्ये तसेच जुन्या जखमांच्या ठिकाणी तांदळाच्या आकाराची बारीक पांढर्‍या रंगाची अंडी घालते. अंड्यांमधून साधारणपणे 7 ते 10 दिवसांमध्ये बारीक अळ्या बाहेर पडतात. लहान अवस्थेतील अळी खोड-ओलांड्यावरील जखमांमधून झाडामध्ये प्रवेश करतात. याचअळी अवस्थेकडून खोडातील मधला भाग पोखरून नुकसान होत असते. मार्च-एप्रिल महिन्यात खोड किडीची अळीअवस्था कोषावस्थेत जाते. ही अवस्था हालचाल न करणारी असते, तसेच या अवस्थेत खोड कीड द्राक्षाच्या खोडाचा कोणताही भाग खात नाही. मे महिन्यात कोषावस्था संपवून खोड किडीचे प्रौढ द्राक्षाच्या खोडात बाहेरील अनुकूल वातावरण तयार होण्याची वाट बघतात. मे-जून महिन्यात पडणार्‍या पूर्वमोसमी पावसाने वातावरणात आर्द्रत वाढून खोड किडीचे प्रौढ बाहेर पडतात. अशाप्रकारे खोड किडीचे एका वर्षात एकच जीवनचक्र पूर्ण होते. हवामानातील बदल जसे उशिरा आलेला पाऊस किंवा थंडीचा दीर्घ कालावधी अशा गोष्टींमुळे खोड किडीचे जीवनचक्र लांबते. 
 
खोड किडीच्या नुकसानीची पद्धत : 
अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या खोड-ओलांड्यामध्ये छिद्र पाडून आतमध्ये प्रवेश करते. खोडातील भाग खाताना भुसा तयार होतो. स्ट्रोमॅशियम बार्बाटम या प्रजातीच्या प्रादुर्भावामध्ये भुसा हा खोडातील पोखरलेल्या जागेतच साठवून ठेवला जातो, तर सेलोस्टर्ना स्क्रेबेटार या प्रजातीमध्ये तयार होणारा भुसा खोडाच्या बाहेर बारीक लेंडीस्वरूपात बाहेर टाकला जातो. यावरून आपल्या बागेतील खोड किड्यांच्या प्रजातीच्या प्रादुर्भावाची ओळख होईल. डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खोड-ओलांडे पोखरण्याचे काम या किडींमार्फत होत असते. याचदरम्यान द्राक्षबागेची मणीवाढ अवस्था असते. या संवेदनशील अवस्थेमध्ये झाडाचे अन्नद्रव्ये वहन करण्याच्या कामात खंड पडतो. झाडाच्या पानांमध्ये अन्नद्रव्य कमतरतेसारखी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे घड कमी वजनाचा भरून मण्यांमध्ये साखर व्यवस्थित भरत नाही. पुढील हंगामात अशा बागेमध्ये अपेक्षित काडी संख्या, घड तयार होत नाहीत. या खोड किडीचे दीर्घकालीन परिणाम होऊन बागेचे नुकसान होते. 
 
मिलिबग (पिठ्या ढेकूण) मेकॅलिनिकॉकस हिरसुटस : 
वर्षभर कमी अधिक प्रमाणात मिलिबग ही कीड द्राक्ष बागायतदारांस डोकेदुखी ठरत आहे. द्राक्षकाढणीपर्यंत मिलिबग द्राक्षबागेत प्रादुर्भाव करतो. त्यामुळे मिलिबगचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 
 
मिलिबगचे जीवनचक्र : 
द्राक्षबागांमध्ये खोड-ओलांड्यावरील सालीमध्ये मिलिबगच्या सर्वच अवस्था आढळतात. मादी खोडावरील सालीमध्ये कापसासारख्या पुंजक्यामध्ये अंडी घालते. सालीच्या आतमध्ये नारंगी-पिवळ्या कापसाळलेल्या पुंजक्यात 300 ते 500 अंडी घातली जातात. या किडीच्या मादीवर कापसासारखा मेणचट पदार्थाचे आवरण असते. या अंड्यांमधून 5 दिवसांत पिले बाहेर पडतात. मादीअवस्था तीन अवस्थांमधून, तर नर चार अवस्थांमधून आपले जीवनचक्र पूर्ण करतो. प्रौढ नरास पंख असतात आणि त्यांचा प्रादुर्भाव द्राक्षांमध्ये होत नाही. प्रौढ मादीकडूनच जास्त नुकसान होत असते. मिलिबगचा जीवनक्रम 30 दिवसांत पूर्ण होतो. जोराचा पाऊस आणि तापमान 200 सेल्सिअसच्या खाली असल्यास मिलिबगचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो. जास्त तापमान जसे 30 ते 40 सेल्सिअस, कमी आर्द्रता 40 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास मिलिबगचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहतो. 
 
द्राक्षबागेमध्ये सध्या गोड्या बहाराची छाटणी संपत आली असून काही बागांमध्ये खोड-ओलांड्यावरील सालीमध्ये मिलिबगच्या अवस्था आढळत आहे. अर्ली द्राक्षपट्ट्यात सध्या काढणीचा हंगाम सुरू आहे. तापमानात वाढ दिसून येताच मिलिबगचा प्रादुर्भाव आढळून येतो. याच कालावधीमध्ये बागेत आढळणार्‍या मुंगळ्याच्या अस्तित्वाने मिलिबगचा बागेत प्रसार सहजपणे व्हायला मदत होते. बागेतील खोड ओलांडे बांधण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सुतळी-काथ्या यामध्ये मिलिबगचे अंडीपुंज नेहमीच आढळतात. मिलिबगसाठी घेतल्या जाणार्‍या कीटकनाशक फवारणीदरम्यान अशा जागी मिलिबगच्या सुप्तावस्था लपून राहतात. त्यामुळे गोडी छाटणीच्या नंतर मिलिबगचे व्यवस्थापन एक समस्या बनते. बागांवर विविध प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांचे मल्चिंग केले जाते. अशा अनुकूल ठिकाणीदेखील मिलिबगच्या सुप्तावस्था लपून राहण्याचा संभव असतो. दाट कॅनोपी असणार्‍या बागांमध्ये ओलांड्यावरील कोवळ्या फुटींच्या खालच्या पानांवर मिलिबग हमखास आढळतो. मुख्य खोडापासून दोन ओलांडे बाहेर निघतात त्या ठिकाणीदेखील मिलिबगच्या अवस्था लपलेल्या आढळतात. 
 
येत्या हंगामात भेडसावणार्‍या अडचणी : 
खोड किडीमागच्या हंगामात सर्वंच बागायतदारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. खोड किडीच्या अळ्या सध्या खोडाच्या आतमध्ये शिरून खोड पोखरण्यास सुरुवात केली असेल. उशिराबाहेर पडलेल्या प्रौढांकडून घातल्या गेलेल्या अंड्यांपासून बाहेर निघालेल्या अळ्या सालीच्या आतमध्ये असण्याची शक्यता आहे. सध्याचा कालावधी हा मिलिबगच्या अंडीअवस्था नियंत्रणासाठीदेखील अनुकूल आहे. मागील हंगामात उशिरा काढणी केलेल्या बागेमध्ये पेपरमध्ये मिलिबगचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. पावसाळ्यात बागांवरील तणांवर, तसेच खोडावर वाढलेला मिलिबग येत्या हंगामात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करू शकतो. सध्या बागेत दिसत असलेला मिलिबग थंडीअगोदर सुप्तावस्थेत जाऊन येत्या हंगामात डिसेंबरनंतर बागायतदारांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. तापमानात होणारे चढउतार हे मिलिबगच्या (पिठ्या ढेकणाच्या) प्रादुर्भावासाठी अनुकूल ठरताना दिसून येतात. साधारणपणे शेवटची बुडवणी (डिपिंग) झाल्यानंतर मण्याची विरघळणी आटोपल्यानंतर बागायतदार कीड-रोगाच्या नियंत्रणाच्या बाबतीत निवांत असतात. याचकाळात मिलिबगच्या प्रादुर्भावाची सुरुवात झालेली दिसते. मण्यांमध्ये साखर उतरण्याच्या अवस्थेत, निर्यातक्षम बागेमध्ये पेपरने घड झाकल्यानंतर मिलिबगचा प्रादुर्भाव दिसून येतो. मिलिबगचा प्रादुर्भाव झाल्यावर द्राक्षाच्या खोडावर, ओलांड्यावर मुंग्या फिरताना दिसतात. खोडावर ओलसर डाग दिसू लागतात तसेच ओलांड्यातून, खोडातून चिकटस्राव देखील आढळून येतो. या चिकट स्रावाकडे मुंग्या लवकर आकर्षित होतात. मुंग्या मिलिबगच्या वसाहतीत फिरून मिलिबगची अंडी, पिलावस्था बागेत इतरत्र पसरवण्यास एकप्रकारे मदतच करतात. मुंग्यांच्या अवयवास चिकटून मिलिबगच्या लहान अवस्थांचा प्रसार होताना आढळतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यात जास्त प्रादुर्भाव असताना अगदी घडातून मधासारखा द्रव स्रावताना अनेकवेळा बागेत दिसतो. असा चिकट स्राव बागेत खोड, ओलांडे, पाने, काढणीयोग्य घड यावर पसरलेला दिसून येतो. अशा चिकट स्रावावर कॅप्नोडियम नावाची काळ्या रंगाची बुरशी (काजळी) आर्द्रतायुक्त वातावरणात वाढताना दिसून येते. अशा चिकट घडांस बागायतदार चिकट्या म्हणून संबोधतात. अशा चिकट, काळ्या घडांस बाजारात मागणी नसते, चांगला दरही अशा द्राक्षांस मिळत नाही. अशा सर्व संभाव्य परिस्थितीचा अभ्यास केला तर सध्याचा कालावधी खोड कीड व मिलिबग या किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी अनुकूल आहे. 
 
कशी असावी उपाययोजना : 
सध्याच्या परिस्थितीमध्ये बागायतदारांनी द्राक्षबागेत सर्व्हेक्षण करून बागेतील किडींचे अचूक निरीक्षणे घेणे, तसेच नियंत्रणासाठीच्या इतर पर्यायांचे व्यवस्थित अवलंबन करणे फायद्याचे ठरेल. त्यामुळे गोडी छाटणीच्यादरम्यान बागेत खोड कीड व मिलिबग या किडींच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यास सध्या योग्य संधी बागायतदारांस आहे. 
 
1) उशिरा बाहेर पडणार्‍या खोड किडींच्या सर्वेक्षणासाठी प्रकाश सापळे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत लावावेत, त्यामुळे बागेती खोड किडींच्या प्रौढ किडींचे अस्तित्व बागायतदार बंधूंना समजेल. बरेचसे बागायतदार हे बागेच्या जवळच वास्तव्यास असतात. त्यांच्या घराजवळील उजेडासाठी लावलेल्या बल्बजवळ देखील खोड किडींचे प्रौढ आलेले सहजपणे दिसतात. प्रकाश सापळ्यांच्या खाली कीटकनाशकमिश्रीत पाणी ठेवावे, त्यामुळे सापळ्यामध्ये अडकून खाली पडणारे कीटक मारता येईल. यामुळे खोड किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी एकप्रकारे योग्य संधी साधता येईल. सध्या सोलरचलित प्रकाश सापळेदेखील उपलब्ध आहेत. त्याचाही फायदा कीड नियंत्रणासाठी चांगला करता येईल. 
 
2) खोड किडीचे प्रौढ बाहेर पडत असतानाच्या कालावधीत खोड ओलांड्यावर दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणीसाठी कीटकनाशकांचे शक्यतो एकरी प्रमाण वापरावे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने शिफारस केल्याप्रमाणे लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (5 सीएस) 0.5 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड (17.8 एसएल) 0.3 मिली या कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. कीडनाशकांचा वापर करताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने नुकत्याच केलेल्या शिफारशींचा आधार घ्यावा. कीडनाशकांच्या फवारणीदरम्यान खोडावर घातलेल्या अंड्यांचा, तसेच अंड्यांतून निघालेल्या पहिल्या अवस्थेतील अळ्यांचा नाश होतो. खोड किडीसोबतच इतर कीटकांचा जसे हुमणी-कॉकचाफर किडीचे प्रौढ भुंगे, पाने खाणार्‍या अळ्या तसेच मिलिबगच्या सर्व अवस्थांचादेखील या फवारणीद्वारे नाश होतो. 
 
3) या कीटकनाशक फवारणीदरम्यान व्हर्टिसिलियम लेकॅनी, बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम अ‍ॅनिसोप्ली यांसारख्या जैविक कीडनाशकांचा आर्द्रतायुक्त वातावरणात खोड कीड-मिलिबगसारख्या किडींच्या जैविक नियंत्रणासाठी वापर केल्यास फायदा होतो. कीटक परोपजीवी बुरशीयुक्त जैविक कीडनाशके आर्द्रतायुक्त वातावरणात किटकांच्या शरीरावर वाढून किडींच्या शरीरात विषकारक घटक सोडून त्यांचा नाश करतात. अशा किटकांच्या शरीरावर वाढणारी बुरशी इतर किटकांनादेखील अनुकूल वातावरणात निसर्गत: संसर्ग पोेचवते. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर आर्द्रतायुक्त वातावरणात बाजारात उपलब्ध असलेल्या विविध फॉर्म्युलेशन्सचा योग्य प्रमाणात वापर करून जैविक कीडनाशकांचे परिणाम चांगले मिळवता येईल. जमिनीतून या घटकांचा वापर केल्यास कीटकांच्या विविध सुप्तावस्थांचाही नाश करण्यासाठी याचा फायदा मिळेल. 
 
4) रासायनिक कीडनाशकांची फवारणी बंद झाल्यानंतर म्हणजे 60 ते 70 दिवसांनंतर बागायतदार जैविक कीडनाशकांचा वापर वाढवून रेसिड्यू फ्री द्राक्षनिर्मितीकडे वळू शकतात. 
 
5) मिलिबगच्या जैविक नियंत्रणासाठी क्रिप्टोलिमस मॉट्रोझायरी या परभक्षी किटकांचादेखील वापर करता येईल. 
बागायतदारांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रणाली वापरून येत्या हंगामातील कीड व्यवस्थापनाचा खर्च कमी करता येईल. 
 
प्रा. तुषार उगले, प्रा. अशोक मोची,प्रा. कांचन शेटे
सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र,
के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक