अविरत धडपडीमुळे द्राक्षाच्या 1100 कंटेनरची निर्यात शक्य

डिजिटल बळीराजा-2    12-Feb-2020

max_1  H x W: 0
 
 
स्वतःच्या अनुभवातून जे शहाणपण येते तेच पुढची आयुष्याची वाट दाखविते हे आता मी स्वानुभवातून ठामपणे सांगू शकतो. शेतीमाल निर्यातीच्या जीवघेण्या स्पर्धेत वैक्तिक, एकेकटा शेतकरी टिकू शकत नाही. त्यासाठी शेतकर्‍यांचे संघटन करून पीक पद्धती निश्चित केली पाहिजे व लागवड करतानाच त्या पिकाचे मला नेमके काय करावयाचे आहे तेही ठरविले पाहिजे तरच काही प्रमाणात यश निश्चित मिळू शकेल. सगळे शंभर टक्के यश मिळणे आपल्या हातात नाही कारण निसर्ग आणि बाजारपेठ यांचा कुणीही मालक नाही. ते केव्हा सावत्र आईच्या भूमिकेत जातील हे आपण कोणीही सांगू शकत नाही.
 
1995 साली राहुरी कृषि विद्यापीठातून मी बी. टेक झालो. 1996 साली एम. टेक ला प्रवेश घेतला. घरातले सगळी लोक शेती करायचे. वडील आणि त्यांचे 5 भाऊ मिळून 30 एकर शेती होती. 2002 मध्ये सगळे भाऊ वेगळे झाले. शेतीची वाटणी झाली. माझ्या वडिलांच्या वाट्याला 5 एकर शेती आली. त्यात 2 एकर द्राक्ष बाग होती. घरी जाऊन शेती करायची हा निश्चय पक्का होता. तत्पूर्वी 1993-94 मध्ये म्हणजे शिकत असतानाच श्री. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गावांमध्ये पाणलोट विकास, जलसंधारण या विषयात काम करत होतो. त्यासाठी स्वयंसेवी संस्थाही काढली होती. रांजणगाव, करंजवणे, पाचर्णे यासारख्या 10 गावांमध्ये पाणलोटाची कामे चालू असतांनाच 1996 मध्ये बारागाव नांदूर येथे 2 एकर जमीन भाड्याने घेतली. ती कसण्यासाठी 4 टक्के व्याजदराने 50 हजार रुपयांचे कर्ज काढले. नवीन पद्धतीने शेती करून भाजीपाला, बेबीकॉर्न लावले. पाण्याची अडचण होती म्हणून जांभळी गावात विहीर घेतली. पण तिला पाणी लागले नाही. त्यामुळे पीक आले नाही. पहिला प्रयोग अपयशी ठरला. सप्टेंबरमध्ये टरबुजाचे पीक घेतले. 4 रु. किलो चा दर मिळाला आणि एक ते दीड रु. पट्टी आली. घरचे लोक संतापले. घरी येऊच नको म्हणाले. अर्धवट ज्ञानी, अति शहाणा अशी दूषणे दिली. तरीही धडपड चालूच होती. 
 
बुडालेले भांडवल काढण्यासाठी 1997-98 च्या सुमारास स्ट्राबेरी लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी 2 लाख रु बाहेरून व्याजाने आणले. पडीक जमीन विकसित करण्याचा प्रयत्न केला. दीडएकर स्ट्राबेरी लावली ती चांगली आली. घरच्यांना थोडा विश्वास आला. 1998-99 मध्ये बँकेचा कर्जाचा विषय चालू होता. शेतीला जोडधंदा म्हणून आडगावातच डेअरी फार्म सुरु करायचे ठरविले. पण बँकेने पैसे दिले नाहीत. फ्लोरिकल्चर करा असे म्हणाले. दरम्यान गावात बंद पडलेले पोल्ट्री शेड होते, ते विकत घेतले आणि खाटी म्हशी सांभाळण्याचा उद्योग सुरु झाला. त्यांच्या शेणापासून गांडूळ खत बनवू लागलो. पण तो हि धंदा अर्धवट राहिला. 2000 साली पहिल्यांदा बँकेने डेअरी फार्मसाठी 25 लाख रु. मंजूर केले. शंभर म्हशींचा गोठा बनविला, बाजारात स्पर्धा खूपच होती, अर्धवट भांडवल मिळाले होते. 2004 पर्यंत कर्ज व्याजासह 70-75 लाखांवर जाऊन पोहचले. 
 
कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरी आपण कुठे ना कुठे कमी पडतोय, कदाचित व्यवसाय छोट्या प्रमाणावर असल्यामुळे असेल असा विचार वारंवार मनात यायचा. शेवटी बंद पडलेला गोठा छोट्या पॅक हाऊसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. बँकेचा कर्ज मिटविण्याचा प्रश्न तसाच पडून राहिला. आठ- दहा शेतकरी एकत्र आलो. द्राक्षे निर्यातीसाठी छोटे पॅकहाऊस चालू केले. चार कंटेनर 2004 साली हॉलंडला पाठविले. 3 कंटेनरचे पैसे बुडाले. 30 लाखाचा माल होता. 24 लाख रु. बुडाले. मालाची विमा पॉलिसी केली होती. 10 लाख रु. नुकसान भरपाई म्हणून मिळाले. या अडचणींवर मात करून परत 2005 साली द्राक्षे निर्यातीची तयारी केली व 13 कंटेनर पाठविले. परत 3 कंटेनरचे पैसे बुडाले. 20 लाख रु. बुडाले. परंतु विमा कंपनीने साडे एकोणवीस लाख दिले. धंद्यात तर चढ- उतार चालूच राहणार. मग सगळी यंत्रणा बारकाईने तपासून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. धंद्यात योग्य माणसाबरोबर जाणे आवश्यक आहे हे प्रथम लक्षात आले. 2006 मध्ये त्यावर लक्ष केंद्रित केले. इंग्लंडमध्ये नवीन माणसाबरोबर काम सुरु केले. तेव्हापासून द्राक्ष निर्यातीत जम बसायला सुरुवात झाली. स्वतःची ताकद तयार करण्याच्या मागे लागलो. धंद्यातली कमतरता समजून घेऊन भरून काढली. 2007 मध्ये 13 कंटेनर द्राक्ष पाठविली. दरवर्षी दुप्पट निर्यात करायची या दृष्टीने पाऊल टाकायला सुरुवात केली. वैयक्तिक विलास विष्णू शिंदे या नावाने द्राक्ष पाठवीत होतो. 2010 मध्ये 163 कंटेनर पाठविले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण गेले पाहिजे व त्यांच्या मालाची एकाच ब्रँडनेम खाली निर्यात झाली पाहिजे या उद्देशाने कंपनी स्थापने संबंधी चर्चा सुरु केली.
 
2010 मध्ये द्राक्षात लिओसीन नावाचा घटक आढळला म्हणून युरोपात आपली द्राक्ष नाकारण्यात आली. आमचे 163 कंटेनर होते. एका रात्रीत साडेसहा कोटींचा फटका बसला. 18 एकरवरचा माल होता. 200-250 शेतकर्‍यांची द्राक्षे होती. त्यांची काहीही चूक नव्हती. शेवटी आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. आपली आता परीक्षा आहे. कोणताही डाग आपल्याला लागता काम नये असा निर्धार करून 2011-12 मध्ये घेतलेल्या जमिनी विकून टाकल्या. लोकांना मालाचे सर्व पैसे दिले व कितीही संकट आली तरीही त्यावर आपल्याला मात करता यायला पाहिजे म्हणून धंद्याचे मॉडेल बदलण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये सह्याद्री ऍग्रो या नावाने शेतकरी उत्पादकांची कंपनी रजिस्टर केली. सुरुवातीला 200 ते 250 लोक होते. 3 वर्षे गाजावाजा न करता काम करीत राहिलो. कारण सुरुवातीला कुणी कुणावर विश्वास ठेवायला तयार होत नव्हते. प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक होते. म्हणून 2-3 वर्षे यंत्रणा उभी करण्यावर भर दिला. सर्व उत्पादकांचे भले व्हावे म्हणून नफा शेअर्सच्या रूपाने दिला. 450 लोकांना शेअर्स दिले.मूळ सभासदांव्यतिरिक्त बाकीच्यांना उपकंपन्यांचे सभासद्द केले. 12-13 उपकंपन्या काढल्या. सह्याद्री प्रमाणे केळी, आंबा, डाळिंब, ग्रेप्स, लिफी व्हेजिटेबल यासारखा माल थेट ग्राहकापर्यंत ताज्या प्रक्रियेच्या स्वरूपात पोहचविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा उभी करण्यात आली. प्रक्रियेसाठी इटली व अनेक देशातून यंत्रसामुग्री आणली. अर्थात इनपुट, किंमत नियंत्रण, कर्ज पुरवठा, मालाची गुणवत्ता, प्रत, दर्जा, हाताळणी, वितरण, बांधणी, प्रिकुलींग, वातानुकूलित चेन, ब्रॅण्डिंग प्रक्रिया या सर्व उपचारांकरिता यंत्रणा उभ्या करून व तज्ञांशी बोलून तसे मार्ग योजले. त्यामुळे 2017 मध्ये 1100 कंटेनर द्राक्ष निर्यातीचे उद्धिष्ट ठेवून ते पूर्ण करू शकलो. सर्व द्राक्ष युरोप आणि अरब अमिरातीत गेली. केळी गल्फला पाठविली. 2015 मध्ये 120 कोटींचा, 2016 मध्ये 160 कोटींचा आणि 2017 मध्ये जवळपास 250 कोटींचा शेतमाल निर्यात केला. जिथून माल निर्यात करायचा ती शेती म्हणजे प्रत्येक रान, वावर हे बिझनेस युनिट समजून त्याप्रमाणे कार्यवाही करीत गेलो. त्यामुळे मागील 3-4 वर्षात हे यश मिळवू शकलो. आमचे सहा लोकांचे संचालक मंडळ आहे. अमूलच्या धर्तीवरती प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. मोठा शेतकरी त्याचे कसेही मॅनेज करतो, पण खरी अडचण छोट्या शेतकर्‍याला आहे. तो आज खूप अडचणीत आहे. या छोट्या शेतकर्‍याला मदतीचा भक्कम हात देण्यासाठी सह्याद्री ऍग्रो उभी केली आहे. 1041 द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि 5 हजार एकरातील द्राक्ष शेती आमच्या कंपनीशी जोडली आहे. 2016 साली 13 हजार 200 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात केली होती. 
 
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावी 65 एकर माळरान जमीन घेऊन तिथे आम्ही कंपनीचे सर्व प्रकल्प व मध्यवर्ती केंद्र उभे केले. 600 मे. टन मालाची रोज हाताळणी होऊ शकेल या दृष्टीने येथे यंत्रणा उभी केली असून 250 मे. टन मालावर प्रक्रिया व 350 मे. टन ताज्या मालाची बांधणी व विक्री व्यवस्था सध्या कार्यरत आहे. आणखीन 200 टन मालावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचे काम चालू आहे. हे सर्व काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल. म्हणजे प्रकल्प संपूर्णपने उभा राहायला 5 वर्षे लागली असे होईल. 4 हजार टनाचे कोल्ड स्टोरेज केले असून दोन हजार टन फ्रोजन केलेली फळे, भाजीपाला यासारख्या माल ठेवण्याची व्यवस्था आहे. 2500 लोक सध्या काम करीत असून प्रकल्प पूर्ण क्षमतेने उभा राहिल्यानंतर आम्ही रोज 5 हजार लोकांना काम देऊ शकू. द्राक्षाचे उत्पादन झाल्यानंतर त्याच्या हाताळणीच्या कामात सुमारे 2200 ते 2300 लोक गुंतले आहेत. विविध पिकांच्या माध्यमातून यावर्षी 26 हजार शेतकर्‍यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. 98 टक्के माल निर्यात होत असून 2 टक्के माल देशांतर्गत बाजारपेठेत विकतो. मुंबईतील खारघर येथे माल विक्रीसाठी स्वतःचे दुकान उघडले असून त्याला ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम आहे. 
 
परदेशी नवीन जाती :
 
जगातल्या ग्राहकांना कोणत्या प्रकारचा माल हवा आहे ते लक्षात घेऊन तशा जाती येथे वाढविणे आवश्यक होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली स्पर्धा मुख्यत्वे चिली आणि दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षांशी असते. ती लक्षात घेऊन चिलीहून दुनिया -1 हि बिनबियांची काळ्या द्राक्षांची नवीन जात आयात करून ती वाढवित आहोत. हि जात हार्मोन्स न वापरताही 22 ते 24 एमएमची होऊ शकते आणि तिच्यात काढणीच्या वेळी 22 ब्रिक्स येते. विशेष म्हणजे यावेळी पाऊस झाला तरी हि द्राक्षे क्रॅक होत नाहीत. या द्राक्षांना चांगली चव व गंध (टेस्ट अँड फ्लेवर) आहे. याशिवाय अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधून ग्राफा आणि आरा या दोन नवीन जाती आणल्या आहेत. कॅलिफोर्नियात 18 ते 20 जाती नव्याने विकसित करण्यात आलेल्या असून आणखीन 7 ते 8 जाती आपण भारतात आणणार आहोत. त्याबाबत संबंधित संस्थांशी करार केलेला आहे. थॉमसनला पर्याय म्हणून आरा ही पांढरी व्हरायटी वाढविणार आहोत. हार्मोन्सचा प्रचंड वापर होत असल्यामूळे द्राक्षाची साल निव्वळ जाड बनत असून चव मात्र गेली आहे व रसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मालेगावला 125 एकर जमिनीवर या नवीन जातींची आम्ही लागवड करतोय.
 
रूट स्टॅकवर अधीक संशोधन हवे 
 
द्राक्षाच्या पिकामध्ये रूटस्टॅाक वर खूप काम व संशोधन करण्याची आवश्यकता आहे. जगात जवळपास पाच हजार प्रकारचे रूटस्टॅाक उपलब्ध व वापरात आहेत. परंतु भारतात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष पिकामध्ये आपण फक्त 2 ते 3 रूटस्टॅाक वापरीत आहोत. त्याच्या पलीकडे आपण गेलेलो नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बंगलोर येथे डॉ. प्रकाश या शास्त्रज्ञाने डॉगरीजची रूट स्टॅक म्हणून एक लाईन विकसित केली आहे. त्याच्याच आधारावर काम चालू आहे. वास्तविक कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था यांना या विषयावर काम करण्यास खूप मोठी संधी आहे. आम्ही नव्याने चिलीमधून फ्रिडम आणि हार्मोनी हे दोन रूटस्टॅाक आणले असून ते शेतामध्ये चाचणीसाठी पाठविले आहेत. कॅलिफोर्निया आणि चिलीमध्ये 90 टक्के रूटस्टॅाक म्हणून फ्रिडम व हार्मोनीचा वापर होतो. सेंट पॉलीन हा रूटस्टॅाक नवीन असून त्याचा वापर वाढतो आहे. परदेशातल्या बिल्डरच्या संस्था, तिची व्यावसायिक क्षमता, रॉयल्टी याबाबत थोडी शंका असल्यामुळे नवीन जाती आणण्यात अडचण येते. परंतु आता ही अडचण दूर होऊ लागली आहे. त्यामुळे नवीन जाती व रूटस्टॅाक येथे मोठ्या प्रमाणावर आयात होऊ शकेल. त्यामुळे द्राक्ष धंदा अधिक विकसीतही होऊ शकेल. त्यादृष्टीने नवीन बाजारपेठही आपल्याला शोधाव्या लागतील.
 
श्री. विलास शिंदे मु.पो. आडगाव,
दिंडोरी जि. नाशिक, मो. 9850507937