द्राक्ष मोठी गुणाची

डिजिटल बळीराजा-2    11-Feb-2020

grape_1  H x W:

मानवी शरीराची भौतिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक गरज भागवणारे द्राक्ष हे त्रिगुणी औषध आहे. अशा या बहुगुणी द्राक्षाचे इतर फळांच्या तुलनेत फायदे या लेखात वाचावयास मिळणार आहे.
 
द्राक्ष हे एक अन्न आणि औषध आहे.द्राक्ष हे एक त्रिगुणी अन्न आहे. द्राक्ष फळातील खनिज द्रव्यामुळे आपल्या शरीराची भौतिक गरज भागते. द्राक्षरसातील जीवनसत्वामुळे आपली बौद्धिक भूक भागते. द्राक्षातील आंबलेल्या रसातील संजीवकामुळे आपली अध्यात्मिक गरज भागते.
 
द्राक्षे तीन स्वरूपात अन्न म्हणून वापरता येते. 1) ताजी द्राक्षे 2) बेदाणे (रेझिन्स) 3) मद्य (वाईन) अन्नाप्रमाणेच द्राक्षे एक उत्तम औषधीही आहे. यासंबंधी पुरेसे अनुभव उपलब्ध आहेत.
ताजी द्राक्षे, द्राक्षरस, सुकी द्राक्षे तसेच मदिरा औषधी आहेत. द्राक्षाची मदिरा, ताजी द्राक्षे, द्राक्ष पानांचा रस, द्राक्ष वेलीच्या खोडातून आणि मुळातून वेळोवेळी वाहणारा, पाझरणारा द्रव औषधी आहेत. शारीरिक थकवा, तसेच बौद्धिक मरगळ घालविण्याचे काम द्राक्ष करतात. तसेच मनोधैर्य वाढविणे, प्रचिती येणे, चक्रांची जाणीव येणे, इडा पिंगळा, सुषुम्ना नाड्यांची कार्यगती संतुलन तसेच कुंडलिनी जागृत होणे. मेंदूचा 1/5 भाग सहजपणे वापरला जातो, त्याचा 3/5 भाग वापरण्याची क्षमता आणता येते.
 
द्राक्षाचा अन्नपाणी म्हणून वापर करताना तोंडाचा जिभेचा वापर अटळ आहे. पण औषध म्हणून वापर करताना, कल्पना, बुद्धी, नाड्या यांचाही मेळ बसवावा लागतो. द्राक्षाचा अन्न म्हणून वापर करणे सोपे जाते पण औषधी म्हणून वापर करणे अवघड जाते. अन्न आणि औषध म्हणून संयुक्तरित्या वापर केल्यास ते अधिक फलदायी ठरते. मात्र एक लक्षात घ्यायला हवे, की द्राक्ष की खाल्ली की रोग बरे होतील आणि शरीराचे पोषणही होईल. द्राक्षे तीच पण खाण्याचे प्रमाण आणि रित वेगळी असते. अगोदर रोग बरा करायचा आणि मग पोषण सुधारावयाचे. हाच क्रम बरोबर आहे. या उलट केले तर ना रोग बरा होणार ना आरोग्य सुधारणार. आपणास नेमके काय हवंय हे आपणच ठरवायला हवं. डॉक्टर मदत करतील, मार्गदर्शन करतील पण हेतू आणि निर्णय आपला आपणच घ्यायला हवा.
 
द्राक्ष खाताना ती अंगी लागली पाहिजेत. याचा अर्थ असा की ती पचली पाहिजेत. द्राक्ष खायला सोपी असली तरी पचायला इतकी सहज नाहीत. आता तर सीडलेस द्राक्ष विपुलतेने मिळतात. बियावाली द्राक्षे तर गायबच जाली आहेत. पण एक बरे आहे. वाईनची द्राक्षे बियावाली आहेत. तरी वाईनची आहेत. खाण्यासाठी नाहीत, हा एक गैरसमज पसरला आहे. तो काढून टाकायला हवा. द्राक्ष अधाशासारखी पटापट गिळण्याची वस्तू नाही. द्राक्षं एकेक, सुटीसुटी सावकाशपणे, तोंडात टाकून, चावून चावून खायला हवीत. एक द्राक्ष पोटात गेल्यानंतर दुसरे तोंडात टाकले पाहिजे. आणि तिसरे हातात घ्यायला हवे. द्राक्ष आनंदाने, प्रेमाने, खायला हवीत आणि खाऊ घालायला हवीत. कुटुंब मग दोघांचे असो, चौघांचे असो व अधिक जणांचे असो. शेअरिंग करायला द्राक्षासारखे दुसरे फळ नाही. आपण याची प्रचिती घेऊन पाहा.
 
द्राक्ष विकत घेताना घाई करू नका. ताजी आणि स्वच्छ द्राक्षे घ्या. घडाचा देठ धरून निरीक्षण करा. सुटे मणी (बेरी किंवा फळे), घेण्याचे टाळा, घडाच्या शेंड्याकडील एखादा मणी चोखून पाहा, आवडला तर खरेदी करा. विक्रेत्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नका. विक्रेता मग तो कोणताही असो. गोड बोलण्यात, पटवून देण्यात ते फार तरबेज असतात. द्राक्षघड खरेदी केल्यानंतर तिथेच खाऊ नका. घरी आणल्यानंतर घडातील खराब मणी निवडून टाका, घड मिठाचे अगर लिंबू रसाचे पाण्यात विसळून घ्या. नंतर स्वच्छ पाण्यातून खळखळून घ्या आणि मग खा.
 
अलिकडे दूरदर्शनवर एक जाहिरात दाखवली जाते. त्यात एक तरूणी कुठल्यातरी रसायनात एक सफरचंद टाकून त्यातील विषारी द्रव्य काढल्याचे दृश्य आहे. ते अगदी खोटारडे आणि दिशाभूल करणारे आहे, असे माझे ठाम मत आहे. सफरचंदापेक्षाही द्राक्षावर अनेक कीडनाशकांचा मारा केला जातो. हा विषारी अंश ठराविक प्रमाणात असल्यास वाईट परिणाम होत नाहीत हे जरी खरे असले तरी दरसाल हे प्रमाण वाढत जाते आणि ते खाणार्‍याच्या शरीरात साठते. म्हणजे द्राक्षात जरी ते लिथल डोस ठरत नसले तरी ते अक्युम्युलेटेड होत जाते. ही बाब महत्त्वाची आणि गंभीर असल्याने ती सविस्तरपणे सांगणे जरूर आहे. द्राक्षावर जी कीडनाशके वापरतात. त्यातील काही संजीवकाबरोबर वापरली जातात. त्याचा एकत्रित परिणाम द्राक्षात तयार होत नाही तर ती द्राक्षे खाल्ल्यानंतर वापर झाल्यामुळे तिसरेच कंपाऊंड बनते. हे कंपाऊंड आपल्या पोटातील काही द्रव्ये त्यात मिसळली जातात आणि मग त्याचा परिणाम वाढतो. म्हणून द्राक्षे पोटात जाण्यापूर्वी ती आतून बाहेरून स्वच्छ करणे आवश्यक आहे, नुसत्या वरवरया धुण्याने फार तर फळावरील घाण धुता येते पण आत भिनलेले विष काढता येत नाही. त्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी.
 
हायड्रोक्लेरिक अ‍ॅसिड, एक चमचा एक लिटर पाण्यात मिसळून (अंदाजे 1 टक्क्यापेक्षा कमी) द्रावण तयार करावे. द्राक्ष घड प्रथम स्वच्छ पाण्यात खळबळून निथळून या अ‍ॅसिड द्रावणात 5 मिनिटे बुडवून ठेवावीत. नंतर ती खळबळून निथळून स्वच्छ पाण्याने परत खळबळून घ्यावीत. यामुळे द्राक्षफळातील घातक द्रव्ये बाहेर काढता येतात. हायड्रोलिक अ‍ॅसिडचा थोडा फार अंश जरी शिल्लक राहिला तरी तो अपायकारक नाही, कारण आपल्या पचनसंस्थेत हे अ‍ॅसिड असतेच. त्यात थोडीशी, किंचितशी वाढ झाली तरी शंका घेण्याचे, घाबरण्याचे कारण नाही. 
 
विशेषकरून कोल्डस्टोरेजमध्ये साठवलेली द्राक्षे खाण्यापूर्वी या रीतीने स्वच्छ करावीत. अलिकडे बाजारात निर्यातीतून बाद झालेली द्राक्षे, एक्स्पोर्ट क्वालिटीचा माल म्हणून ग्राहकांच्या पदरी बांधला जातो. ग्राहकही एक्स्पोर्ट द्राक्षे, स्वस्तात मिळाली म्हणून मिटक्या मारीत खातो. याप्रमाणेच ऑफ सिझनमधली द्राक्षे खातानाही अशी खबरदारी घ्यावी. आपल्याकडे फेब्रुवारी ते एप्रिल हाच द्राक्षाचा हंगाम आहे. त्यापूर्वी किंवा नंतर पिकवलेल्या द्राक्षावर अधिक प्रमाणात विषारी औषधांचा वापर केला जातो. तिसरी अजून एक बाब लक्षात ठेवावी. ती म्हणजे सिडलेस द्राक्षासंबंधीची होय. थॉम्पसन सिडलेस, सोनाक्का, माणिक चमन, तासेगणेश या जाती सीडलेस व आकाराने लहान व चवीस गोड असतात. अधिक उत्पादन घेण्याचे आमिषाने जीए. बीए., सीसीसी या संजीवकाबरोबरच बोरॉन, सिलीर्कान इ. द्रव्ये वापरून त्यांचा आकार, वजन वाढवला जातो. रंग, आकर्षकपणाही वाढवला जातो. त्याचबरोबर त्यातील घातकपणाही वाढलेला असतो, हे लक्षात ठेवणे व खाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक बनले आहे. 
 
याशिवाय अजून एक छुपा धोका अलीकडे वाढत आहे. अनेक ठिकाणी, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली द्राक्षे, गार्डन फ्रेश ग्रेप्स, बागेतून थेट ग्राहकाच्या घरात अशा जाहिराती जागोजागी दिसून येतात. सगळेच खोटे आहेत असे नाही, पण असल्याचे मार्केटिंग वाढत आहे एवढे मात्र खरे. शहराशहरातूनच नव्हे तर अगदी आठवडे बाजारातही अशी कृत्रिमरित्या पिकवलेल्या फळांची आरास पाहायला मिळतात. आंबे, केळी, मोसंबी, द्राक्षे, पपई आदी कोणताही अपवाद दिसत नाही. द्राक्षे वगळता इतर फळांची साल काढून ती खाल्ली जातात, तेवढा धोर कमी होतो. द्राक्षे तर अख्खीच खाल्ली जातात. त्यामुळे कृत्रिमतेने विष काढता येत नाही. काही बाबी समजत नाहीत काही बाबी, समजल्या तरी टाळता येत नाहीत, हे खरे पण त्यातही तारतम्य ठेवायला हवे.
 
द्राक्ष खाणारा सुधारला, वाढला म्हणजे, द्राक्षाची मागणी वाढेल, आणि द्राक्ष पिकवणारा तसेच द्राक्ष विकणारा यांचाही फायदाच होईल. उत्पादक-विक्रेता-ग्राहक ही खरी त्रि-सूत्री आहे आणि म्हणूनच म्हणतो, द्राक्षं मोठी गुणाची द्राक्षाच्या काही गमतीदार म्हणी.
 
1)फळांचा राजा आंबा तर फळांची राणी द्राक्षे.
2)जमली तर द्राक्षे अन् फसली तर रुद्राक्षे.
3)तहान लागली तर पेलाभर पाणी प्या, भूक लागली तर ओंजळभर द्राक्ष खा.
4)ऊस लावाल तर आळशी व्हाल, द्राक्ष लावला तर मालामाल व्हाल.
5)कोल्ह्याला द्राक्षे आंबट, लावून तिखट मीठ. 
6)ज्यानं केला द्राक्षाचा मळा त्यानं भरवला संतांचा मेळा. 
7)आषाढी-कार्तिकी पंढरपूरची वारी एप्रिल-ऑक्टोबर-वेलींची छाटणी करी.
8)ऊस आला दारी तर मधुमेह घुसे घरी द्राक्षाचा पिकला मळा-रोग म्हणती पळा पळा. 
 
द्राक्षांच्या बाबत काही गमती 
 
अ)वादळात द्राक्षाची एक फांदी मोडली, त्या भागावर नवीन धुमारे आले आणि त्यावर खूप घड लागले. या मोडक्या फांदीमुळे छाटणीची कल्पना आली. सुमारे 200 वर्षांपूर्वीची फ्रान्स देशातील ही हकीगत आहे. आपल्याकडे तर छाटणी केल्याशिवाय वेलीवर घडच लागत नाही.
 
ब) दुसरी घटनासुद्धा फ्रान्समधील बोर्डो गावाजवळची गावाला खेटूनच एक द्राक्षबाग होती. जाता येता, मुले हुळहुळून द्राक्षात शिरायची. घड तोडायची. मालकाने मग एक कल्पना लढवली. रस्त्याच्या बाजूच्या वेलीवर त्याने मोरचूदाचे पाणी शिंपडले व तेथे एक सूचना लिहिली वेलीवर मोरचूद-विषारी रसायन फवारले आहे. ‘सावधान’. त्यामुळे घडास कोणीही हात लावला नाही. त्यावर्षी पाऊस लांबला. डावनी मिल्ड्यू रोग सगळीकडे पसरला द्राक्ष गेली, पण ज्या ओळीवर मोरचूद फवारले होते त्यावर काही रोग आला नाही, पाने आणि घड शाबूत राहिले. मोरचूदाचे पाणी वापरले तर डाऊनी येत नाही. याचा शोध लागला. यात सुधारणा होऊन आजचे बोर्डो मिश्रण हे रामबाण औषध ठरले आहे. ही घटना बोर्डो येथे घडली म्हणून बोर्डोमिश्रण नाव पडले. सन 1870 सालातील ही घटना. आज अनेक बुरशीनाशके आली आहेत. तरीही, करपा-केवडा-भुरी-कूज हे चारही रोग बरे करण्याची कुवत फक्त बोर्डोमिश्रणातच आहे.
 
काय सांगता-द्राक्षथेरपीने कॅन्सर जातो.
 
आज कॅन्सर या रोगाची ख्याती आणि व्याप्ती जगभर आहे. कॅन्सरला मराठी भाषेत कर्करोग म्हणतात. हा रोग टाळता येतो. बरा होतो. कॅन्सरची हॉस्पिटल्स आहेत. आधुनिक यंत्रसामुग्री आहे. उपकरणे आहेत. निष्णात डॉक्टरांची टीम आहे. मोठा खर्चही आहे. उपचारांची खात्री, बरे होण्याची हमी मात्र कोणी देत नाही. असा हा रोग द्राक्ष थेरपीने /ग्रेप क्युअर उपचाराने बरा होतो. यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, पण हे नवल घडले आहे. ज्यांनी हे नवल घडवले त्यांसही आता 100 वर्षे पूर्ण होत आली आहेत. या काळात निदान आपल्याकडे तरी द्राक्षांची पैदास खूपच वाढली. योगायोग म्हणा की, गंमत म्हणा, ‘जोहाना ब्रँड’ या डॉक्टरबाईने अमेरिकेत, द्राक्ष थेरपी, प्रथम मांडली तरी 1927 साली आणि त्याच सुमारास महाराष्ट्रात गणेश खिंड, पुणे 7 येथे डॉ. चिमा यांनी द्राक्षाची यशस्वी लागवड केली. 
 
ठराविक पथ्यपाणी पाळून कॅन्सरचा रोगी बरा होऊ शकतो. मग हॉस्पिटलची गरज काय? असा मोठा प्रश्न पडतो. याची सर्वसामान्य कारणे अनेक आहेत. त्यातील काही अशी...
 
1)आपल्याकडे द्राक्षाचा हंगाम थोडा असतो. सुमारे 80-90 दिवस.
2)द्राक्षावर अनेक घातक औषधे फवारलेली असतात.
3)द्राक्ष सामान्य माणसास परवडत नाहीत. 
4)द्राक्षामुळे रोग बरा होतो, व होऊ शकतो यावर विश्वास नसतो.
5)द्राक्ष उपचार कसा करायचा. याबद्दल विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.
6)उपचाराची इतर साधने खर्चिक असली तरी तीच वापरणे आवश्यक असल्याची धारणा मोठी आहे.
7)द्राक्ष उपचार बराच काळ घ्यावे लागतात. 
8)द्राक्ष उपचार करणारे व करवून घेणारे फारसे नाहीत. 
9)द्राक्ष उपचारातील पथ्ये सांभाळणे नको वाटते. 
10)द्राक्ष-सोडून इतर साधना कृती तसेच धरसोड वृत्ती अशी आणखीही काही कारणे असू शकतात. 
कॅन्सरसारखा दुर्धर रोग घालवता येतो. मग इतर किरकोळ आजारावर इलाज करणे अवघड वाटत असले तरी, किरकोळ आजारांवर तसेच घरगुती उपचारात द्राक्षोपचार करणे, फारसे अवघड नाही. 
 
यातील काही अनुभव पुढे दिले आहेत.
 
1)दातांचे आरोग्यावर स्वतंत्रपणे लेख लिहिले आहे.
2)प्रवासात तहान भागविणे.
3)मुलांना, अजारी माणसांना, प्रेमाने द्राक्ष देणे. 
4)पांढरे केस रंगवून काळे करताना मेहंदीबरोबर काळी द्राक्षे, चोथा मिसळणे.
5)जखमेवर द्राक्ष चोथ्याचे पोटीस बांधणे.
6)मुंगी, गांधील माशी, मधमाशी चावलेल्या भागावर, फळाचा रस चोळून विष उतरवता येते.
7)अजीर्ण झाल्यावर ताजी फळे खाणे
8)वंधत्वावर मात करण्यासाठी द्राक्षांचा सहयोग करणे.
9)निरंकार उपवासांत थकवा आल्यास थोडीशी द्राक्षे खाणे. 
10)झोप न येणे तसेच अधिक झोप लागणे यावर द्राक्ष खाल्ल्याने चांगला परिणाम होतो.
 
मनुक्याचा शोध 
 
युरोपच्या काही भागात, सुलतानाचे राज्य होते. सुलतानाचे मोठे द्राक्षाचे मळे होते, नदीकाठापासून तर अगदी डोंगरापर्यंत. द्राक्षाचा हंगाम संपायचा पण सगळी द्राक्ष तोडण्याचे राहून जायचे. दूरच्या बागेत तर काढणीअभावी घड तसेच सुकून जायचे. ही सुकलेली द्राक्षे म्हणजेच मनुका होत. ज्या जातीची ही द्राक्षे होती ती जात होती मोनिका. मोनिका हे नाव होते सुलतानाच्या एका प्रेयसीचे त्यावरून मोनिकाचे मनुक्यात रूपांतर झाले. मनुके हे नुसतेच ड्रायफू्रट अथवा सुका मेवा नव्हे, तर ते एक मौलीक असे खाद्य औषधी आणि टॉनिकही आहे. मनुके मोनिका प्रमाणे व सर्वांचे आवडते आहेत हे सांगायला नकोच.
 
रक्ताभिसरणासाठी वाईन उपयुक्त
 
माणसाच्या चांगल्या निरोगी अवस्थेत रक्ताभिसरण ही एक महत्त्वाची क्रिया आहे. हृदय रक्त आणि रक्तवाहिन्या यांचे कार्य सुरळीत आणि अखंडीत चालू राहते, हे निरोगीपणाचे लक्षण होय. हल्लीच्या धावपळीच्या स्पर्धेच्या तसेच चंगळवादी दुनियेत, या महत्त्वाच्या क्रियेत खूपच अडथळे आणि विकृत्या वाढत आहेत. हृदयविकारांचे आजार सर्वच ठिकाणी वाढत आहेत. यासंबंधी काही आरोग्य संघटनांनी सर्वेक्षण केेले असता असे आढळून आले की, ज्या देशात वाईन उत्पादन होते व वाईन पिण्याचे प्रमाण अधिक आहे. तेथे हृदयविकाराचे प्रमाण बियर पिणार्‍या देशांपेक्षा कमी आहे, आणि चहा कॉफी पिणार्‍यापेक्षा फारच कमी आहे.
ही काही वाईनची जाहिरात नाही किंवा वाईन पिणार्‍यांची पाठ थोपटण्यासाठी तर मुळीच नाही. याचा अर्थ असा नाही की, जी माणसे वाईन, बियर, चहा कॉफी पीत नाहीत त्यांना हृदयविकार होत नाहीत. खरं सांगायचं म्हणजे कोला, थम्सअप यासारखे कोल्डड्रिंक्स याविकारासाठी फारच पोषक आहेत. आज भारतासारख्या विकसनशील देशात, कृत्रिम थंड पेये आणि हृदयविकार याची बरोबरीने शर्यत लागली आहे. 
 
वाईनमध्ये असे नेमके काय आहे की ज्यामुळे हृदय विकाराला आळा बसतो. हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाईन हे द्राक्षरस आंबवून नैसर्गिकरित्या बनलेले पेय आहे. वाईनमध्ये असलेले इथाईल अल्कोहोल, प्रोसाईनीडाईन्स आणि बियातील टॅनीनमधील काही द्रव्ये ही महत्त्वाची आहेत. हृदयविकारामध्ये रक्तवाहिन्यांना काही अपाय झाला, जखम झाली तर ती भरून काढण्यासाठी रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि अपाय, दुखापत दुरुस्त झाली. किंवा जखम भरून आली तरी कोलेस्ट्रॉल निर्मिती चालूच राहते.
 
बैठे काम करणार्‍या व्यक्तीत असे अपाय हटकून होतात आणि कोलेस्ट्रॉल वाढत जाऊन ते तेथेच जवळपास रक्तवाहिन्या आत चिकटून बसते. हिस्टामाईन द्रव्याची निर्मिती होते आणि ते रक्तप्रवाह सुरळीत चालू ठेवते. थंडपेये पिणार्‍यात हे हिस्टाप्राईन रक्तातून जणू हाकलूनच दिल्यासारखे आहे. रक्त प्रसारण क्रियेत कॅल्शियम आणि काही तंतूमय पदार्थ वाढून ते तेथील आतल्या बाजूने रुतून बसतात ज्यामध्ये रक्तप्रवाहात अडथळा येतो व रक्त पुढे न सरकल्याने त्याच्या गुठळ्या तयार होतात. त्याचाच पुढील परिणाम म्हणजे हृदयविकाराचा झटका होय. हे टाळण्यासाठी काय करता येईल? यासाठी अनेक औषधे अनेक उपचार आहेत.
काहीचे दुष्परिणाम होतात काहींची अ‍ॅलर्जी तर काहींची व्यसनात, परिणती होते. उपचारात जी द्रव्ये अथवा औषधे वापरली जातात, त्यांचे प्रमाण डॉक्टर ठरवीत नसतात तर प्रत्येकाच्या रक्ताभिसरण क्रियेच्या ताकदीवर ते अवलंबून असते, काही वेळा डोस खूपच मोठा ठरतो आणि दुष्परिणामास निमंत्रण देतो. वाईनमुळे हा धोका टळतो आणि कामापुरतेच आवश्यक असेल तेवढेच हिस्टामाईनची निर्मिती केली जाते. हे सर्व नैसर्गिकरित्या घडते. मात्र वारंवार वाईन घेण्याचे प्रमाण वाढले तर फायदे मागेच गळून पडतात. आणि तोटे, त्रास, व्याधी पुढे अचानक येऊन आडवे पडतात आणि पिणार्‍यासही आडवे पाडतात.
 
अलिकडच्या काळात, हृदयविकारावर अनेक उपचार पद्धती व औषधे उपलब्ध झाली आहेत. रक्तातील गुठळ्या होऊ नयेत, आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत. त्यावर उपाय म्हणून इकोस्पीन -75 या नावाची एक गोळी, सर्रासपणे वापरण्यास सांगितले जाते पण एखादे ऑपरेशन असेल किंवा शरीरावर एखादी जखम झाली असेल, तर या गोळीमुळे, रक्तस्राव थांबत नाही, जखम चिघळते. विशेषकरून मधुमेहाच्या विकारात अशा प्रकारच्या गोळ्यांवर प्रतिबंध असतो. या प्रसंगी निदान काही दिवसांसाठी तरी इकोस्पीन बंद ठेवावी लागते. या काळात कोणतेही दुष्परिणाम टाळून रेड वाईनचा उपचार हिताचा ठरतो, अर्थात, डॉक्टरचा सल्लाही पूरक आहे. मैदानी खेळ, तसेच धावण्याच्या, पोहोण्याच्या सायकलिंगच्या शर्यतीमध्ये घाम येणे, चक्कर येणे या सारख्या काही व्यत्ययकारक घटना हमेशा घडत असतात. अशा वेळी, साखरपाणी, लिंबूपाणी, लेमन गोळ्या, कोको कोला, सोडावॉटर बिअर यासारख्या पेयाचा सर्रास वापर केला जातो. यातील बहुतेक थंडपेये ही धोकादायक आहेत. पण याचे भान कोणासही नसते. क्रिकेट मॅचेसमध्ये चिअर गर्ल्स आणि थंडपेये, जाहिरातीच्या स्वरूपात मुक्तपणे वावरत असतात. खेळाडूच्या दृष्टीने ते खूपच घातक आहे. त्याऐवजी रेड वाईन अथवा शँपेन वापरणे अधिक आणि निश्चितपणे हिताचे आहे. यावर तज्ज्ञांनी तपशीलवार विचार करून रणनीती सुचवायला हरकत नाही.
 
पेन किलर म्हणूनही आज अनेक औषधे उपलब्ध आहेत. निद्रानाश आणि पेन यात बरेच साम्य आहे. एक आहे शरीराचे दुखणे तर दुसरे आहे मनाचे दुखणे. झोपेच्या गोळ्या किती घातक असतात हे येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. पण पेन किलर म्हणून काही गोळ्या प्रतिबंधक असतानाही, खोटे नाटे ऐकून अनेकजण ते घेतात आणि मोठे नुकसान करून घेतात. अशा काही मोजक्या प्रसंगी रेड वाईन शारीरिक आणि मानसिक वेदना शमवण्यास सक्षम आहे. महागड्या गोळ्यांपेक्षा रेड वाईनचा पेग (डोस) निश्चितपणे स्वस्त पण गुणकारी ठरतो. आपल्याकडची नशाबंदी, सामाजिक रूढी आणि धर्ममार्तंडांच्या अहंकारी वृत्तीमुळे काही चांगल्या गोष्टीही कशा बाजूला टाकल्या जातात, याचे हे एक उदाहरण आहे. 
 
आजकाल अनेक फळे, सगळीकडे आणि जवळजवळ वर्षभर मिळतात. प्रत्येक फळाचे काहीतरी वेगळेपण असते वैशिष्ट्येही असते. आंबा, पपई, केळी, पेरू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, सीताफळ, अंजीर, तसेच सफरचंद, अननस, यांचे तुलनेने द्राक्षं कुठं आहेत यांची कल्पना पुढील तक्त्यावरून येईल.
 
आंबा            -460 ग्रॅम
संत्रा              -590 ग्रॅम
मोसंबी         -610 ग्रॅम
अंजीर          -910 ग्रॅम
द्राक्षे             -990 ग्रॅम
डाळिंब         -430 ग्रॅम
पेरू             -920 ग्रॅम
पपई            -450 ग्रॅम
अननस        -320 ग्रॅम
केळी           -600 ग्रॅम
सीताफळ    -480 ग्रॅम
सफरचंद     -900 ग्रॅम
 
(टीप : एक किलो वजनाच्या फळात खाण्यायोग्य घटकांचे प्रमाण-) 
 
 
                                                                                                                              डॉ. भीमराज गोपाळ भुजबळ