दुधाळ गायी- म्हशीचे उत्तम व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    29-Dec-2020
|

vgj_1  H x W: 0

भारत देशाला शेतीप्रधान देश संबोधल्या जाते परंतु, दिवसेंदिवस शेतीची परिस्थिती बदलत असून निव्वळ शेतीवर अवलंबून राहिल्याने शेतकरी उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नाहीत. आजची प्रतिकूल व भौगोलिक परिस्थिती विचारात घेता शेतीतून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन मिळत नाही व शेतकरी तोट्यात जातो आणि अश्या परिस्थिती मध्ये मुलामुलींचे शिक्षण, आरोग्य इत्यादी बाबींसाठी शेतकरी वर्ग हतबल होत आहे. अश्या या सर्व अडचणीवर मात करायची असेल तर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायच फायदेशीर ठरू शकतो. शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा अतिशय चांगला व पूर्वीपासून परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गायी, देशी गायी आणि म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या तंत्रज्ञानाने व्यवसाय केल्यास आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो आणि तसेच या व्यवसायामुळे भूमिहीन,अल्पभूधारक शेतकरी आपला उदरनिर्वाह व्यवस्थितपणे करू शकतात. जागतिक आरोग्य संघटना व भारतीय स्वास्थ्य अनुसंधान परिषद नवी दिल्ली, यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनामध्ये प्रत्येकाला प्रतिदिन २५०-३०० मि.ली. दुधाची गरज असते. आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर त्या दृष्टीने दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्या देश्यामध्ये गायी पासून ४%, म्हशीकडून ५% तर शेळ्यापासून १-२% दुध आणि उर्वरित दुध मेंढी व उंटापासून मिळते. दुधामध्ये पाणी, कर्बोदके, मेह, स्निग्धांश, क्षार व जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने दुध हे पूर्णान्न आहे. गायीच्या १ लिटर दुधातून अंदाजे ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेक चविष्ट दुग्धजन्य पदार्थ जसे कि दही, खवा, लोणी, तूप, बर्फी,रबडी, इत्यादी तयार करता येतात. दुभत्या गायी-म्हशीच्या उत्तम व्यवस्थापनासाठी सर्व सोयी जसे कि पिण्याचे स्वच्छ पाणी, लाइट, वाहतुकीचा रस्ता, गोठा, चारा लागवडीसाठी शेतजमीन तसेच नजीक पशुवैद्यकीय दवाखाना, या किमान बाबी दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असतात.

दुधाळ गायी आणि म्हशींची निवड करण्याच्या पद्धती:

जास्त दुधाळ जनावरे सांभाळण्या पेक्षा कमीत कमी पण चांगल्या जातींची सांभाळली तर दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो. दुग्धव्यवसायासाठी चांगल्या प्रतीच्या संकरित किवां देशी दुधाळ गायी-म्हशींची निवड करावी. दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने एका वितात गायीने साधारणपणे ३६०० लिटर दुध दिलं पाहिजे व म्हशीने २५०० लिटर दुध दिलं तर दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो. दुग्धव्यवसायासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच्या गायी किंवा म्हशी निवडाव्यात आणि त्यांचं वय ३ ते ४ वर्षाचे असावे. वर्षाला एक वेत देणाऱ्या व निरोगी असाव्यात.दुग्धव्यव्सायासाठी जर्सी, होल्स्स्टेन फ्रिजीयन, सहिवाल, गिर, सिंधी, थारपारकर जातीच्या पाळाव्यात आणि तसेच मुऱ्हा, पंढरपुरी, जाफराबादी, सुरती या म्हशी पाळाव्यात.दुधाळ गायी-म्हशिंची निवड करताना त्याचं बाह्यस्वरूप, दुग्धत्पादन आणि प्रजननक्षमता विचारात घेणे गरजेचे आहे.गाय किवा म्हैस विकत घेताना शक्यतो ज्या व्यक्तीला दुधाळ जानावाराबद्दल योग्य माहिती व ज्ञान आहे अश्या व्यक्तीला बाजारामध्ये सोबत घेऊन जावे आणि यामुळे जनावराची योग्य निवड करण्यास मदत होईल. दुधाळ जनावरांची निवड करताना १-२ वेळा धारा काढून बघावे व उत्पादनाची खात्री करून घ्यावी. बाजारामध्ये व्यापारी जनावरे सजवून आणत असतात, अश्या जनावराकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि मोठया आकाराची कास असेल व ते जनावर ज्यास्त दुध देत असेल याबाबत पशुपालकांनी गाफील राहू नये. तसेच आणखी गृहीत धरण्यासारखे म्हणजे त्या जनावराला पान्हावयास किती वेळ लागतो ते बघावे काही जनावरे आंबोणशिवाय धार देतात का किवा जनावरांना ठराविक दुध काढणाऱ्या व्यक्तीची सवय आहे का यांचीही खरेदीच्या वेळेस खात्री करून घ्यावी. तापट स्वभावाच्या गायी उत्तेजित झाल्या कि दुध देत नाहीत व काढूही देत नाहीत, म्हणूनच शांत स्वभावाची दुधाळ जनावरे निवडावीत जेणेकरून आपल्या परिवारातील कोणीही व्यक्ती सहजपणे दुध काढू शकेल.

तसेच धार काढण्याच्या वेळी लाथा मारणारी, चीर्गुत, दगड आणि विटा चघळण्याची सवय असणारी गाय- म्हैस घेणं कटाक्षाने टाळावे. पातळ त्वचा असणारी, धारेला हलकी असणारी गाय/म्हैस निवडावीत. जड धारेची दुधाळ जनावरे पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळे दूधही कमी निघते. धार काढून पाहताना चारही सडातील दुध काढून पाहावे, एकाद्या सडातून दुध येत नसेल तर त्यामुळे दुध उत्पादन कमी होऊन मोठ आर्थिक नुकसान होऊ शकते.

जातिवंत दुधाळ जनावरांचे गुणधर्म:

जातिवंत दुधाळ गाय/म्हैस तरतरीत आणि निरोगी दिसतात, त्यांचे डोळे पाणीदार असतात, अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असते.शरीराच्या वरून, पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केलं असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसते. गायी/म्हैशी कडे पुढून पाहिले असता दोन पायातलं अंतर अधिक असले तर जनावर जास्त दुध देतात. छाती भरदार असावी,वरून बघितले असता कमरेची हाडे दूरवर असायला हवीत, गाय/म्हैस लठ्ठ नसावी, लांब आणि सडपातळ असावीत,पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा.वाढलेल्या खुरसडा याबाबतीत बारकाईने बघावे,गाय/म्हैस विकत घेताना त्यांना चालवून- फिरवून पहावीत. कास हा दुभत्या जनावरांचा महत्वाचा अवयव आहे आणि कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी. धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठी दिसते, सड फुगलेले दिसतात. दुध काढल्यानंतर कासेचा आकार पूर्ववत लहान होणारा असावा. त्वचा मऊ असावी व कासेवर अनेक फाटे असणारं शिरांचे जाळ असावे. शिरा जड असाव्यात तसेच चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत. गायी/म्हैशीची दुध उत्पादनाची, प्रजननक्षमतेची आणि वंशावळीची माहिती घेतल्यास दुधाळ जनावरे चांगली व निरोगी असल्याची खात्री पटू शकते आणि अशी जनावरे निसंकोच खरेदी करता येऊ शकतात.

दुधाळ जनावरांचा आदर्श गोठा:

गायी-म्हशीसाठीचा गोठा आदर्श असावा, गोठ्यामध्ये हवा खेळती राहाने आवश्यक आहे . गायी-म्हशींची संख्या कमी असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा करावा आणि जनावरांची संख्या जास्त असेल तर दुहेरी गोठा असावा. तोंडाकडे तोंड किंवा शेपटीकडे शेपटी आणि मध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता अशी रचना हि आदर्श गोठ्याची नियमावली आहे. शेपटीकडे शेपटी हि रचना उत्तम असते आणि तोंड खिडकी कडे असल्याने शुद्ध हवा मिळते तसेच अश्या प्रकारच्या गोठ्यामध्ये संसर्गजण्य रोग होण्याचा धोका नसतो आणि दुध काढणं सोयीचं होतं. गोठ्याचा पृष्ठभाग सिमेंटणी पक्का बांधणीचा असावा व मुत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने नाळी असावी. गोठ्याची उंची १३ ते १४ फुट असावी, ७-८ फुट भिंत आणि ४-५ फुट खिडकी ठेवावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गाई-म्हशींना दररोज त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ३% वाळलेला आणि हिरवा चार द्यावा. प्रत्येक १ लिटर दुधापाठीमागे ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्य, तर ५० ते १०० ग्राम क्षारमिश्रण देणे आवश्यक आहे. गोठा नेहमी स्वच्छ, कोरडा व उबदार ठेवावा. गोठ्यात ओलावा वाढल्यास जंतूची वाढ होते. गोठ्यात पुरेसा प्रकाश असावा व शेण-मूत्र साठू देऊ नये. आजारी जनावराची विष्ठा, मूत्र व उरलेला चारा जाळून टाकावा. आजारी जनावरांची वेगळी व्यवस्था ठेवावी. गोठ्यात वैरण / उरलेली वैरण साचू देऊ नये. शक्‍य असल्यास जनावरांना रोज पाण्याने धुऊन खरारा करावा, त्यामुळे परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि रक्ताभिसरणाला चालना मिळून जनावरांना ताजेपणा वाटेल. रोगी जनावरे निरोगी जनावारापासून वेगळे ठेवावे आणि त्यांच्यावर त्वरित पशुवैधकांमार्फत उपचार करावे. उन्हाळ्यात गोठा थंड राहील असे व्यवस्थापन करावे आणि पाण्याचा हौद धुऊन चुन्याने रंगवून घ्यावा आणि पाणी निर्जंतुकसाठी क्लोरीनचा वापर योग्य प्रमाणात करावा.

जनावरांचे लसीकरण:

गायी-म्हशींना पावसाळ्यापूर्वी लसीकरण करणे बंधनकारक आहे, दरवर्षी नियमाप्रमाणे जनावरांचे लसीकरण करावे. लसीकरण न केलेल्या जनावरांना बरेच सामान्य व सांसर्गिक आजार होऊ शकतात. घटसर्प, फऱ्या, फाशी, ब्रुसेलोसीस हे जीवाणूजन्य आजार तर बुळकांडी, लाळयाखुरकूत, रेबीज हे विषानुजन्य रोग, गोचीड आणि जंत हे परोपजीवी रोग जनावरात आढळतात. पशुवैद्यकांकडून लसीकरण करावे किंवा शक्य असल्यास जनावरे नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात न्यावीत किवा पशुसंवर्धन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये जनावरांना लसीकरण करून घ्यावे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात जनावरांना घेऊन जावे व नेहमी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसारच जनावरांची आरोग्य विषयक देखभाल करावी, पशुसंवर्धन विभागामार्फत आपल्या जनावरांचा विमा काढून घ्यावा जेणेकरून जनावरांना दुर्दयवाने काही होऊन त्यांचा मृत्यू झाल्यास आपल्याला नुकसानभरपाई मिळेल.

दुध काढण्यापूर्वी व काढतांना दुधाळ जनावरांची घ्यावयाची काळजी:

दुधाची धार काढण्यापूर्वी जनावरांस पाण्याने स्वच्छ धुवावे. त्यानंतर सोडीअम हायपोक्लोराईट जंतुनाशकाच्या द्रावणाने कास व कासेजवळील भाग, सड स्वच्छ धुवावेत आणि कोरड्या फडक्‍याने कास पुसून घ्यावी जेणेकरून कास व कासेच्या भागातील बारीक केस व धूळ दुधात पडणार नाहीत. रोगी व अस्वच्छ दुधाळ जनावरांपासून स्वच्छ दूध मिळणार नाही व अश्या परिस्थितीत दुध काढल्यास व दुध पिल गेल्यास मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूध स्वच्छ नसल्यास दुधाची टिकवणक्षमता कमी होऊन दूध नासते, म्हणूनच जनावरे निरोगी व सशक्त असावीत. दूध काढताना प्रथमतः प्रत्येक सडातील चार ते पाच धारा वेगळ्या भांड्यात काढाव्यात व हे दूध इतर दुधात मिसळू देऊ नये. दुध काढते वेळेस जनावराशेजारी शांतता असणे आवश्यक असून गोंगाट व जनावरांना त्रास होणार नाही अश्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. दूध काढतांनी जनावराला कोरडा आणि उग्र वास असलेला चारा देऊ नये. दूध काढण्याची जागा स्वच्छ व धूळमुक्त असावी व त्या ठिकाणी माश्‍या व डासांचा प्रादुर्भाव नसावा. दुधाची भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेली असावीत, दुधाची भांडी दररोज धुण्याच्या सोड्याने गरम पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावीत आणि कोरडी करावीत. दूध काढून झाल्यानंतर दुध गोठ्यातून त्वरित विक्रीसाठी असेल तर बाजारामध्ये न्यावे किंवा संकलन केंद्रात पोहचवावे आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करायचे असेल तर दूध गाळून थंड ठिकाणी ठेवावे. दूध काढल्यानंतर सड निर्जंतुक द्रावणात बुडवून घ्यावेत.दुध काढते वेळेस जनावरे उभी असताना त्यांना त्यांच्या पसंदीची खुराक किंवा खाद्य द्यावे.

दुध काढणाऱ्या व्यक्तीने घ्यावयाची काळजी:

दूध काढणारी व्यक्ती हि स्वच्छ व निरोगी असणे आवश्‍यक आहे. दुध काढते वेळेस डोक्यावरील केसांना हात लाऊ नये, उष्णतेच्या वेळेस सोबत रुमाल ठेवावा, जेणेकरून घाम पुसता येईल. दुध काढणाऱ्या व्यक्तीची नखे वाढलेली नसावीत, त्यांचे कपडे स्वच्छ असावेत. दूध काढण्यापूर्वी त्या व्यक्तीने साबण किंवा सोड्याने हात स्वच्छ धुवावेत. धार काढताना शिंकणे, थुंकणे, खोकणे, तंबाखू खाणे, बिडी सिगारेट ओढणे इत्यादी गोष्टी नेहमी वर्ज्य कराव्यात. शक्य असल्यास दुध काढते वेळेस दुध काढणार्यांनी नाकाला मास्क लावावे. आजारी किंवा जखमा असलेल्या जनावरांचे दूध वेगळ्या भांड्यात किवां शेवटी काढावे.

दुधाळ जनावरांच्या आहाराचे व्यवस्थापन:

१.वाळलेल्या चाऱ्यात पूरक पोषकद्रव्ये मिसळणे: आपल्या देशात वाळलेला चारा हेच जनावरांसाठी प्रमुख खाद्य आहे. वाळलेल्या चाऱ्यात सेल्युलोज व हेमीसेल्युलोजचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यात खनिज द्रव्ये, ऊर्जा, नायट्रोजनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वाळलेल्या चाऱ्यात पोषक द्रव्ये पूरक म्हणून टाकल्यास खाद्याच्या पाचकतेमध्ये वाढ होऊन मिथेनचे उत्पादन कमी होते. ज्यामुळे जनावरांची वाढ चांगली होऊन दूध उत्पादनातही वाढ होऊ शकते. आपल्या शेतावर असलेल्या निकृस्ट चारा जसे, उसाची मळी, कडबा भाताची तनस, कुटार इत्यादी पासून आपण सकस चारा बनवू शकतो. खनिज द्रव्ये यांचा वापर, गुळ व युरिया इत्यादींचे मिश्रण केले कि जनावरे आवडीने खातात व जनावरांच्या पोषक द्रव्यांच्या उपयोगीतेत वाढ होते.

२.युरिया, खनिज द्रव्ये व प्रथिने यांचा वापर- चारा हे मुख्य अन्नघटक असलेल्या जनावरांत मिथेनचे उत्पादन हे दोन किलो प्रति किलो मांस एवढे असते. जर युरिया, खनिज द्रव्ये, प्रथिने यांचा चाऱ्यात पूरक म्हणून वापर केल्यास मिथेनचे उत्पादन कमी होते आणि वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण कमी होऊन वातावरणाचा समतोल राखता येतो.

३. वैरण जमिनीवर न टाकता गव्हाणीत टाकावी व शक्य असल्यास कडबा कुट्टी मशीन खरेदी करावी, वैरणीची कुट्टी करून द्यावी, फार बारीक तुकडे करू नयेत आणि जनावरांना फक्त ओला किंवा फक्त वाळला चारा देऊ नये. एकाच प्रकारचा चारा दिल्यास जनावराचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे चाऱ्यात पुरेशी लाळ मिसळली न गेल्याने पोटाचे विकार संभवतात. जनावरांना एकाच वेळी जास्त वैरण न देता दिवसातून चार ते पाच वेळा थोडी थोडी वैरण द्यावी.

वरील सर्व बाबीकडे पशुपालकांनी बारकाईने लक्ष दिल्यास दुधाळ जनावरांचे आरोग्य सुव्यवस्थित राहिल्याने ऐकून नफ्यात वाढ होऊन खेड्यातील पशुपालकांचे जीवनमान नक्कीच उंचावेल, म्हणूनच सध्याच्या महंगाईच्या काळात दुग्धव्यवसाय हाच आपल्याला तारू शकतो. गायी म्हैशिंचे जो उत्तम व्यवस्थापन करी, सुख समृद्धी नांदे त्यांच्या दारी, अर्थातच व्यवसायात यशस्वी.

डॉ.मंगेश म.वैद्य

सहाय्यक प्राध्यापक,

पशुशरीरक्रिया शास्त्र विभाग, प.वै.म. उदगीर