शेवगा लागवड तंत्रज्ञान

डिजिटल बळीराजा-2    09-Nov-2020
|

shevga_1  H x W
 
शेवगा हे बहुवार्षिक, लवकर वाढणारा, उंची 12 सरासरी मीटर व नैसर्गिक ताण सहन करणारे पीक आहे. बहुवार्षिक पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेण्याकरिता अतिशय उत्तम पीक आहे. शिवाय या पिकाला बहुउपयाेगी बहुपर्यायी पीक म्हणून संबाेधले जाते.
दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे, शेती उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर बदलत्या हवामानात विविध निविष्ठांचा याेग्य वापर करून राेग/कीडमुक्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे, ही सर्वांत माेठी अडचण आहे. शेतकऱ्यांना 50-100 वर्षांपासून भाजीपाला उत्पादनाच्या बाजारभावातील अनिश्चिततेमुळे शेतीव्यवसाय हा संपूर्णत: आतबट्ट्याचा ठरत असल्याने पारंपरिक शेतीत काहीही तथ्य नाही, हे शेतकऱ्यांनी अनुभवलेले आहे. देशभर विविध जमिनींचे प्रकार, बदलते हवामान, पाण्याची दुर्भिक्षता असताना शेकडाे प्रयाेग केले. त्यामध्ये वरील सर्व परिस्थितीस शेवग्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. तेव्हा ‘शेवगा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवेल’.
 
देशातील 5 एकराहून कमी क्षेत्र असणारा शेतकरी 80 टक्के आहे आणि त्यातील 60 टक्के शेतकरी काेरडवाहू आहे. तेव्हा 5 एकरामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये शेवग्याची लागवड करावी. ज्यांना 2 एकर क्षेत्र आहे त्यांनी किमान अर्धा एकर व एक एकर क्षेत्र असणाऱ्यांनी 5 गुंठ्यामध्येच जरी शेवग्याची लागवड केल्यास वर्षाला 20 ते 25 हजारांपासून 60 हजार ते 1 लाख रु. उत्पन्न मिळून आर्थिक परिस्थिती सुधारते.
 
ज्यावेळेस कांदा-टाेमॅटाेला 2-3 रु. किलाेहून कमी भाव असताे, तेव्हा शेवग्याला 10 रु. हून अधिक भाव असताे. एरवी ताे 30 ते 60 रु. किलाे असताे. देशभरामध्ये छत्तीसगड, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, राज्यस्थान, गुजरात, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी शेवगा लागवड करून आपले जीवनमान उंचावले आहे.
 
उपयाेग आणि फायदे
 
शेवग्याच्या विविध भागांचा (पाने, फुले, शेंगा, मगज, बियांतील मगज, खाेडाचा डिंक आणि मुळे) विविध ठिकाणी उपयाेग हाेताे. मानवाला व जनावरांना शेवग्याच्या पानांपासून, शेंगांपासून व फुलांपासून भरपूर प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात. शेवग्याच्या झाडाच्या प्रत्येक अंगाला अनन्य असे महत्त्व आहे.
 
शेवग्याच्या हिरव्या काेवळ्या पानांचा सॅलड व भाज्यांमध्ये उपयाेग हाेताे. बियांपासून 38.40 टक्के न सुकलेले तेल मिळते. त्याला बेन तेल असे म्हणतात. या तेलाचा उपयाेग लुब्रिकेटिंग घड्याळामध्ये करतात. हे तेल शुद्ध व असुवासिक असल्यामुळे त्यापासून सुगंधित द्रव्येसुद्धा तयार करतात. खाेडाचा उपयाेग निळी शाई तयार करण्यासाठी हाेताे. शेवग्याची पाने व काेवळ्या फांद्या जनावरांना वैरण म्हणून उपयाेग करतात. शेवग्याच्या बियांचा उपयाेग आफ्रिकेमध्ये खेडेगावांतील पिण्याचे पाणी शुद्ध करण्याकरिता हाेताे.
 
शेवग्याची पाने, बीज, शेंगा, फुले आणि मुळे यांत भरपूर प्रमाणात अन्नद्रव्ये आढळतात, जसे जीवनसत्त्वे ‘अ’ ‘ब’ ‘क’ खनिजे, लाेह आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळतात. शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्यापेक्षा सातपट जीवनसत्त्व ‘क’ दुधापेक्षा चारपट कॅल्शिअम, गाजरापेक्षा चारपट जीवनसत्त्व ‘अ’, केळीपेक्षा तीनपट पाेटॅशिअम व दुधापेक्षा दुप्पट प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात. त्यामुळे शेवग्याचे सेवन केल्यास त्वचा निराेगी व मऊ बनते, हाडे मजबूत राहतात व थंडीपासून बचाव करून राेगप्रतिकारक शक्ती वाढते.
 
जमीन व हवामान
 
शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या हलक्या, माळरान, डाेंगरउताराच्या, वाळुमिश्रित पाेयटायुक्त भारी जमिनीतही करता येते. चाेपण किंवा क्षारयुक्त, चुनखडीयुक्त किंवा दीड ते दाेन फुटांवर कातळ असलेल्या जमिनी शेवगा लागवडीसाठी अयाेग्य ठरतात. महाराष्ट्रातील सर्वच प्रकारच्या जमिनींमध्ये शेवग्याची लागवड करता येते. जमिनीचा सामू सरासरी 6 ते 6.72 शेवगा पिकासाठी उत्कृष्ट मानला जाताे.
 
उष्ण व दमट हवामान शेवगा पिकाच्या वाढीस पाेषक ठरते. काेरडे हवामान पिकाच्या फलधारणेसाठी अत्यंत लाभदायक व फायदेशीर ठरते. सरासरी तापमान 25-30 डिग्री सें. फलधारणेच्या अवस्थेत अत्यंत महत्त्वाचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही.
 
लागवडीचा हंगाम
 
ज्या ठिकाणी पाण्याची साेय आहे, त्या ठिकाणी शेवग्याची लागवड काेण्त्याही हंगामात करता येते, परंतु पावसाच्या पाण्यावर लागवड करावयाची असल्यास जून-जुलै महिन्यात सुरुवातीचे एक-दाेन सरी जाेमदार पाऊस झाल्यावर करावी. अतिपाऊस असलेल्या ठिकाणी पावसाचा जाेर कमी झाल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेवग्याची लागवड करावी.
 
वाण/जातींची निवड
 
वाणाची निवड करताना दाेन्ही हंगामांत भरपूर शेंगा देणारे, शेंगांना कडूपणा नसणारे व गराचे प्रमाण जास्त असणारे झाड निवडावे. शेवगा लागवड करताना सारख्या आकाराच्या, जाडीच्या, रंगाच्या आणि चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. अंगठ्याऐवढी जाडी, पाेपटी रंग आणि आकर्षक चकाकी असणाऱ्या शेगा ग्राहकांना पसंत पडतात. लागवडीसाठी काेईमतूर-1, काेईमतूर-2, पीकेएम-1, पीकेएम-2, काेंकण रुचिरा, भाग्या, धतराज, राेहील-1 या सुधारित जातीच्या वाणांची निवड करावी.
 
वाणांची ठराविक वैशिष्टे
 
· काेकण रुचिरा : गर्द हिरव्या शेंगा, मध्यम लांबीच्या शेगा, उत्कृष्ट दर्जाच्या 30-35 किलाे शेंगा प्रतिझाड उत्पन्न.
· धनराज : 7-9 महिन्यांत, शेंगाची लांबी 35-40 सें.मी. 150-200 शेगा प्रतिझाड.
· भाग्या (केडीएम-1)- ही बारमाही जात कर्नाटकातील बागलकाेट कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. झाडाची उंची 2.4 मीटर, 110 दिवसांत लागवडीनंतर फुलधारणेला येताे. 160-180 दिवसांत शेंगाची काढणी, शेंगाची लांबी 60-70 सें.मी, 1 किला मध्ये 10-12 शेंगा, पहिल्या वर्षी उत्पन्न-350-400 शेगा प्रतिझाड, दुसऱ्या वर्षापासून 800 ते 1000 शेगा प्रतिझाड.
· पीकेएम-1 : ही जास्त उत्पादन देणारी जात असून लागवड 90-100 दिवसांत फुलावर येतात. झाडाच्या शेंगा 65-70
सेंमी लांब असून 6.3 सेंमी गराच्या असतात. शेंगेचे सरासरी वजन 150 ग्रॅम असते व शेंगा हिरव्या रंगाच्या व गुळगुळीत असतात.
· पीकेएम-2 या जातीच्या शेंगा 1.5 मीटर लांब असतात. गुळगुळीत आणि खाण्यासाठी रुचकर व स्वादिष्ट असतात.
· ओडिसी : ही जात वर्षातून दाेनदा बहार येणारी, लागवडीनंतर 4-5 महिन्यांत गुच्छामध्ये फुले येणारी, 1.5 ते 2 फूट लांबीच्या उत्तम प्रतीच्या शेंगा घाेसाने देणारी जात आहे. शेंगात गराचे प्रमाण जास्त असून चवीला रुचकर व स्वादिष्ट असल्याने अंतर्गत ग्राहकांकडून चांगली मागणी व निर्यातीसाठी उत्तम जात आहे.
 
अभिवृद्धी
 
शेवग्याची अभिवृद्धी फाटे कलम अथवा बियांपासून राेपे तयार करून केली जाते. फाटे कलम न मिळाल्यास पाॅलिथीनच्या पिशवीत बियांपासून रापे तयार करून लागवड करावी. एक ते दाेन महिन्यांची रापे लागवडीकरिता वापरावीत. किंवा प्रत्येकी दाेन बिया प्रतिखड्डा याप्रमाणे पेरून लागवड करावी. हेक्टरी लागवडीकरिता 500 ग्रॅम बियाणे लागतात.
 
पाॅलिथीन पिशवीत राेपे तयार करताना प्रत्येक पाॅलिथीनला चार छिंद्र करावित (बॅगच्या एक इंच खालून व एक इंच वरच्या बाजूने) त्यामुळे पाण्याचा निचरा उत्तम हाेताे. त्यात प्रत्येकी 5-10 गॅ्रम कुजलेले शेणखत व मातीचे मिश्रण तयार करून पिशव्या भराव्यात. लागवडीपूर्वी बियाणे चाेवीस तास पाण्यात भिजत घालावीत व नंतर अर्धा सें.मी. खाेलीवर पाॅलिथीनमध्ये बियाणे पेरून माती झाकून पाणी द्यावे. अभिवृद्धीसाठी फाटे कलम किंवा बियांपासून पाच ते सहा सें.मी जाडीच्या सुमारे एक ते सव्वा मीटर लांबीच्या फांद्या वापराव्यात.
 
लागवड
 
हलकी ते मध्यम प्रकारच्या जमिनीचा विचार करून लागवडीसाठी 60X60X60 सें.मी. आकराचा खड्डा खणून त्यामध्ये माती, शेणखत, सुपर फाॅस्फेट, निंबाेळी पेंड आणि ट्रायकाेडर्मा यांचे मिश्रण भरावे. लागवडीसाठी भारी जमिनीत 1.5X1.5.X1.5 फूट आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये खड्डा भरताना तळाशी 1.5 सें.मी. कुजलेला काडीकचरा, गवत, पाचट यांचा थर द्यावा.
 
लागवडीचे अंतर
 
दाेन झाडांतील अंतर 4 X 4 मीटर किंवा 5 X 5 मीटर ठेवावे. जर दाेन झाडांतील अंतर 3 X 3 मीटर असल्यास एक एकरमध्ये 445 झाडे लागवड करता येते. भारी व बागायती क्षेत्रासाठी शेवग्याची लागवड 12 X 12 फूट किंवा 12 X 10 फूट अंतरावर करावी. हलक्या, मुरमाड व काेरडवाहू क्षेत्रासाठी शेवग्याची लागवड 10 X 10 फूट किंवा 10 X 8 फूट अंतरावर करावी.
 
शेणखत व उर्वरके : (मातीपरीक्षणानुसार खते द्यावीत)
 
शेवग्याच्या झाडापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असल्यास प्रत्येक झाडास दरवर्षी 10 किलाे शेणखत, 170 ग्रॅम युरिया, 470 गॅ्रम सुपर फाॅस्फेट व 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पाेटॅश ही खते द्यावीत. काेरडवाहू क्षेत्रासाठी 200 ग्रॅम खते प्रतिझाड सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येकी समान विभागून द्यावीत. याउलट बागायती क्षेत्रास 26 किलाे शेणखत आणि 250 ग्रॅम रासायनिक खतांची मात्रा ही एप्रिल महिन्यात व त्यानंतर सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात द्यावीत. झाडाच्या गरजेनुसार हे प्रमाण वाढवून प्रतिवर्ष 500 ग्रॅम/झाड असे द्यावे.
 
छाटणी
 
शेवग्याची लागवड केल्यानंतर 3 ते 4 महिन्यांनंतर पहिली व 7 ते 8 महिन्यांनंतर दुसरी छाटणी करावी. पहिल्या छाटणीच्या वेळी झाडाचे मुख्य खाेड जमिनीपासून एक मीटर अंतरावर छाटावे आणि दुसऱ्या छाटणीच्या वेळी फांद्या छाटाव्यात.
 
जुलै-ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या झाडाचा पहिला बहार मार्च-एप्रिल या महिन्यात संपताे. त्यानंतर झाडाची छाटणी केली पाहिजे. छाटणी करताना प्रत्येक फांदीवर तीन ते चार डाेळे ठेवून छाटणी करावी. दरवर्षी छाटणी सर्वसाधारणपणे एप्रिल-मे महिन्यात करावी. तसेच छाटणी लवकर किंवा उशिरा करून बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन घेता येते. वर्षातून एकदाच छाटणी करावी.
 
चांगले व्यवस्थापन असल्यास राेप तीन महिन्यांत चार फुटांपर्यंत वाढते. राेप चार फूट वाढल्यानंतर त्याचा तीन फुटांवर शेंडा छाटावा. शेंडा छाटल्यानंतर खाेडावर तसेच शेंड्याजवळून त्याला फांद्या फुटतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक खाेडावर 4 ते 5 फांद्या ठेवाव्यात.
 
 
पाणी व्यवस्थापन
 
शेवगा हे पीक पाण्याचा ताण सहज सहन करू शकते. हे कमी पाण्यात येणारे पीक आहे. परंतु जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने वेळच्या वेळी पाणी देणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीत पीक घेतले असता 10-12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. परंतु भारी जमिनीवर लागवड केल्यास 15- 20 दिवसांनी झाडाला पाणी द्यावे. फेब्रुवारी महिन्यात झाडाला पाणी देणे थांबवावे. कारण या कालावधीत झाडाची पाने खाली गळून मे महिन्यापर्यंत सुप्तावस्थेत जाते. या काळात पिकाला पाणी दिल्यास उत्पन्नात घट हाेते.
 
बागायती क्षेत्रात पीक घेतले असता 1 ऑक्टाेबर ते 20 ऑक्टाेबर या कालावधीत पिकाला पाण्याचा ताण द्याावा. कारण या काळात पिकाला ताण मिळाल्यास नाेव्हेंबर ते डिसेंबर महिन्याच्या फुलधारणेत जास्तीत जास्त वाढ हाेते. फुलधारणेनंतर ते शेंगा लागेपर्यंत झाडाला निरंतर 10-12 दिवसांनी पाणी द्यावे. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन करावे.
 
आंतरपिके
 
शेवगा लागवडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आंतरपिके घेता येतात. उदा. शेवगा, पपई, शेवगा-अदरक, शेवगा- हळद, शेवगा-कांदा-चवळी, शेवगा-भाजीपाला पिके. दीर्घ मुदतीच्या फळबागेमध्ये आंतरपीक म्हणून किंवा स्वतंत्र क्षेत्रावरही शेवगा लागवड करता येते. उदा : आवळा-शेवगा, बाेर-शेवगा, सीताफळ-शेवगा, आंबा-शेवगा
 
काढणी
 
शेवग्याची लागवड केल्यानंतर पाच महिन्यांपासून फुले येण्यास सुरुवात हाेते. झाड लहान असल्यामुळे तसेच त्याची शाखीय वाढ जास्त हाेत असल्यामुळे सुरुवातीला फुले गळतात. क्वचित एखाद्या फुलाचे रूपांतर शेंगात हाेते. अर्थात नंतरच्या फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये हाेते. फुलधारणा हाेत असताना फांदीवर प्रत्येक पानाच्या देठाजवळ फुलांचा गुच्छा येताे आणि त्यापासून फळधारणा हाेते. शेवग्याच्या लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा काढणीस तयार हाेतात.
 
उत्पन्न
 
शेवग्याचे उत्पन्न हे जातीनुसार व जमिनीप्रमाणे भिन्न असते. परंतु शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून सुमारे 30 ते 35 किलाे हिरव्या शेंगा मिळतात.
 
निर्यात
 
शेवग्याच्या शेंगा परदेशात निर्यात केल्या जातात. उदा. चीन व बांग्लादेशामध्ये साधारण 50 ते 80 प्रतिकिलाे भाव मिळू शकताे. 
 
कीड व राेग व्यवस्थापन
कीड/राेग लक्षणे : नुकसानीचा प्रकार उपाय
 
खाेड व फांद्या पाेखरणारी अळी खाेड पाेखरून आत शिरते. त्यामुळे झाड कमकुवत हाेते व प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या बुंध्यावर अळीने बाहेर पडलेला भुसा दिसून येताे. छिद्रामध्ये डायमेथाेएटमध्ये भिजलेला कापसाचा बाेळा टाकून छिद्राचे ताेंड बंद करावे.
 
पाने गुंडाळणारी अळी पाने गुंडाळून त्यावर उपजीविका करते. थायाेमेथाॅक्झाम 1 ग्रॅम प्रति 10 ली. पाण्यात मिसळून फवारावे. शेवगा कॅन्कर या राेगाच्या प्रादुर्भावामुळे राेपांची जून ते ऑगस्ट या महिन्यात माेठ्या प्रकारावर मर हाेते. शेवग्याचे बी पेरणीपूर्वी 0.1% कार्बेन्डेन्झिम 0.1% किंवा 1% बाेर्डाेमिश्रण द्रावण राेपांच्या बुंध्याशी ओतावे तसेच कार्बे न्डेन्झिम (0.1%) राेपांवर फवारावे. शेवग्यातील मर या राेगाच्या प्रादुर्भावामुळे राेपांची माेठ्या प्रमाणावर मर हाेते. पेरणीपूर्वी बियाणे कार्बेन्डेन्झिम (1 ग्रॅम) बुरशीनाशकाच्या द्रावणात 24 तास बुडवून नंतर पेरावे. उगवणीनंतरच्या बुरशीनाशकाच्या एकूण तीन फवारण्या दर 10 दिवसांच्या अंतराने द्याव्यात.
 
शेवगा लागवड करताना महत्त्वाच्या बाबी : जर शेवग्याची लागवड 10 एकर स्वतंत्र क्षेत्रावर केलेली असल्यास शेतात मधमाश्यांचे पालन करून त्यापासून मध गाेळा करता येते. एका एकरमधून सुमारे 60-100 किलाे मध प्रतिहंगामात सहज मिळते. याशिवाय मधमाशांमुळे परागकण स्थलांतरणाचा वेग वाढून 25-30 टक्के शेवग्याच्या उत्पादनात वाढ हाेते.
 
डाॅ. अरुण नाफडे,
उद्यान विशेषज्ज्ञ, पुणे 9822261132