भाजीपाला पिकावरील राेग व्यवस्थापन

डिजिटल बळीराजा-2    28-Oct-2020
|
 
bali_1  H x W:
 
शाकाहारी लाेकांच्या आहारात अन्नधान्याच्या खालाेखाल भाजीपाल्याचे महत्त्व आहे. भाजीपाल्यात कॅल्शियम, फाॅस्फरस आणि लाेह ही खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात असतात व शरीराचे याेग्य वाढ हाेण्यासाठी सदर द्रव्यांची गरज असते. भाजीपाल्यातून अ आणि क जीवनसत्त्वे माेठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे आहारात भाजीपाल्यास महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी तत्त्वावर भाजीपाला लागवडीकडे वळला आहे. भाजीपाल्याची राेपे लागवडीपूर्वी तयार करावी लागतात आणि तेव्हा राेपे काेलमडणे (Damping off) या राेगाचा प्रादुर्भाव राेपवाटिकेत हमखास जाणवताे. यामुळे भाजीपाल्याचे पीक उत्तम येण्यासाठी बियाणे, राेपवाटिका यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
 
निराेगी बियाण्यांची निवड
भाजीपाला पिकात बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि काही थाेड्या विषाणूजन्य राेगांचा प्रसार बियाण्यांमार्फत हाेत असताे. राेगविरहित बियाणे ओळखणे किंवा निवडणे कठीण आहे. म्हणून प्रमाणित केलेले बियाणे वापरावे किंवा भाजीपाला पिकातील बियाणे धरताना सुरुवातीच्या काढणीतील राेगमुक्त झाडांचे/फळांचे बी धरावे. ज्या शेतात राेगाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणचे बी शक्यताे निवडावे.
  
राेपवाटिका
भाजीपाल्याची राेपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाफ्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत कंपाेस्ट खत 2 पाट्या व 40 ते 50 ग्रॅम ब्लायटाॅक्स/ ब्ल्युकाॅपर चांगले मातीत मिसळावे. त्यानंतर औषधे लावलेले बी ओळीमध्ये पातळ पेरावे. प्रत्येक 2 1 मीटरच्या वाफ्यास 25 ग्रॅम फाेरेट हे दाणेदार औषध बियांच्या दाेन ओळींमध्ये घालावे. मात्र फाेरेट औषधाचा आणि बियांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीनंतर पाणी वेळेवर व याेग्य द्यावे. बी दाट पेरल्यास व पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास राेपे काेलमडणे या राेगाचा प्रादुर्भाव हमखास हाेताे. बियाण्यांची उगवण हाेईपर्यंत झारीने पाणी द्यावे. हवा खेळती राहण्यासाठी वरचेवर खुरपणी करून वाफे स्वच्छ व भुसभुशीत ठेवावेत. गरज भासल्यास बी उगवणीनंतर 15 ते 18 दिवसांनी 25 ग्रॅम काॅपर ऑक्झीक्लाेराइड प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी द्यावी.
 
टाेमॅटाे
टाेमॅटाेवर प्रामुख्याने करपा, मर, अणुजीव मर किंवा पर्णगुच्छ (लिपकर्ल) आणि करपा मर किंवा शेंडे मर (Tomato spotted Wilt) हे विषाणूजन्य राेग आढळतात.
 
करपा
या राेगाची सुरुवात खालच्या पानांपासून हाेते. पाने प्रथम पिवळी पडतात व नंतर पानांवर तांबूस काळपट ठिपके पडतात.
ठिपक्यांमध्ये स्पष्ट अशी गाेलाकार वर्तुळे दिसतात व भाेवती पिवळे वलय असते. राेगाचे प्रमाण वाढले की पाने करपतात व गळून पडतात. तसेच काहीवेळा फांदीवर व फळांवरही ठिपके दिसतात.
 
उपाय
जमिनीपासून साधारण 6 इंचापर्यंतची पाने काढावीत. त्यामुळे हवा खेळती राहील व आर्द्रता कमी हाेऊन राेगाचे प्रमाण कमी हाेईल. राेग दिसताच किंवा लागवडीनंतर 46 दिवसांनी डायथेन एम-45 किंवा ब्लायटाॅक्स औषध 1500 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी दर पंधरा दिवसांनी करावी.
 
मर 
या राेगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडे पिवळी पडून सुकतात आणि शेवटी मरतात. अशी झाडे उपटून फांदी चिरून पाहिली असता मधला भाग तांबूस काळपट झालेला दिसेल. बुंधाकुज असल्यास बुरशीमुळे जमिनीलगतचा झाडाचा बुंधा कुजताे आणि त्यामुळे झाडाची पाने पिवळी पडतात आणि नंतर झाड मरते.
 
उपाय
मर हा राेग जमिनीत असणाऱ्या पऱ्युॅजरियम व व्हर्टिशिलियम या बुरशीपासून आणि सुडाेमाेनस नावाच्या जीवाणूमुळे तसेच बुंधाकुज या बुरशीमुळे हा राेग हाेताे. त्यामुळे पिकांची फेरपालट करावी. राेगांची लागण दिसताच राेगग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत. बाकीच्या झाडांना ब्लायटाॅक्स 60 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात औषध तयार करून आळवणी द्यावे.
 
पर्णगुच्छ (लिपकर्ल)
या राेगाचा प्रादुर्भाव घातक विषाणूमुळे हाेताे आणि विशेषतः उन्हाळी टाेमॅटाे पिकांवर जास्त असताे. या राेगामुळे पानांवर सुरकुत्या पडतात. तसेच पाने वाकडी तिकडी हाेऊन आकार लहान हाेताे. तसेच ती गर्द हिरवी न राहता पांढरट पिवळसर हाेतात. फांद्यांची लांबी कमी हाेते. त्यामुळे झाड खुजे राहून पर्णगुच्छासारखे किंवा बाेकड्यासारखे दिसते. या राेगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला झाल्यास फळधारणा हाेतच नाही.
 
उपाय
राेगट झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत. राेगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे हाेत असल्यामुळे तिच्या बंदाेबस्तासाठी डायमेथाेएट किंवा मिथिल डिमेटाॅन 10 मिली. प्रति 10 लि. पाण्यात मिसळून राेपांवर फवारावे. इमिडक्लाेप्रिड 10 मिली. किंवा कार्बाेसल्फान 20 मिली.+ ट्रायकाेडर्मा पावडर 50ग्रॅम प्रति 10 लि. पाणी या प्रमाणात मिश्रण फवारावे.
 
करपा मर (Spotted Wilt)
हा राेगसुद्धा घातक लसीमुळे/विषाणूमुळे हाेताे. तसेच राेगाचा प्रादुर्भाव विशेषतः हिवाळी व उन्हाळी हंगामात जास्त जाणवताे. या राेगाची लक्षणे बुरशीपासून हाेणाऱ्या करपा राेगासारखी दिसतात. त्यामुळे बऱ्याचवेळा हा राेग ओळखण्यात चूक हाेते. गेल्या दाेन तीन वर्षांपासून या राेगाची तीव्रता वाढत आहे. विशेषकरून संकरित टाेमॅटाेवर या राेगाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणावर हाेताे. या राेगाची सुरुवात वरून शेंड्यापासून हाेते. सर्वप्रथम शेंड्याच्या अतिकाेवळ्या पानांवर बारीक गाेल तांबूस काळपट चट्टे पडतात. ते खाली वाढत जाऊन शेवटी सर्व झाड करपते व मरते. या राेगाचा प्रादुर्भाव लागणीनंतर एक महिन्याच्या आत झाल्यास फळधारणा न हाेता झाड लक्षणे दिसल्यापासून 10 ते 15 दिवसांत करपते व मरते.
 
उपाय
राेगट झाडे दिसताच उपटून नाश करावीत. या राेगाचा प्रसार फुलकिड्यांमुळे हाेत असल्यामुळे त्यांचा बंदाेबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. या राेगाचा प्रादुर्भाव हाेऊनये म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
 
• राेपवाटिकेत बी पेरणीवेळी फाेरेट द्यावे.
• इमिडक्लाेप्रिड 10 मिली. किंवा कार्बाेसल्फान 20 मिली.+ट्रायकाेडर्मा पावडर 50 ग्रॅम प्रति 10 लि. पाणी या प्रमाणात मिसळून त्यात राेपांची मुळे 10 मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
• लागवडीनंतर 10 दिवसांनी हेक्टरी 10 किलाे या प्रमाणात फाेरेट द्यावे. फाेरेट देतेवेळी झाडाभाेवती चंद्राकार काेली घेऊन चिमूटभर फेारेट घालून झाकावे आणि मगच पाणी द्यावे.
• लागवडीनंतर 45 दिवसांनी 625 मिली नुवाकाॅन 500 लिटर पाण्यात मिसळून दर 10 दिवसांनी साधारणपणे 4 ते 5 फवारण्या कराव्यात.
 
वांगी
वांग्यावर अनेक राेग येतात. त्यामध्ये पानांवरील ठिपके, मर व पर्णगुच्छ हे अत्यंत नुकसानकारक राेग हाेत.
 
बाेकड्या किंवा पर्णगुच्छ
हा फायटाेप्लाझमा हाेणारा राेग आहे. याचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच आहे. प्रत्येक वाफ्यामध्ये काही झाडे या राेगाने गेलेली दिसतात. या विषाणूमुळे पानांची वाढ खुंटते. नंतर येणारी पाने लहानलहान हाेतात. प्रथम झाडाच्या एक दुसऱ्या फांदीवर राेग दिसताे आणि नंतर सर्व फांद्यांवर येताे आणि झाडे खुजी बाेकडल्यासारखी दिसतात. अशा झाडांवर फळे फुले येत नाहीत. फुले आल्यास ती हिरवी राहतात आणि त्याला फळधारणा हाेत नाही.
 
उपाय
राेपे लावण्यापूर्वी ती नुवाकाॅन 15 मिली अधिक बावीस्टीन 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून त्यामध्ये राेपे 5 मिनिटे बुडवून मगच लावावीत. राेगट झाडे दिसताच उपटून त्याचा नाश करावा. नंतर पिकावर अकाेमायसीन 10 गाेळ्या/10 लिटर पाण्यातून पिकावर 1 ते 2 वेळ 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. लागवड करताना राेपे 1000 पीपीएम 1 ग्रॅम/1 लि. पाणी टेट्रासायक्लीनच्या द्रावणात बुडवून लावावीत. त्याचप्रमाणे पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांपासून दर 15-20 दिवसांच्या अंतराने टेट्रासायक्लीन 1-1.5 ग्रॅम प्रति 10.लि. पाण्याची फवारणी करावी. लागवडीनंतर दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने निंबाेळी अर्क 5% फवारावा.
 
मर
हा राेग जमिनीत असणाऱ्या बुरशीमुळे (Fusarium spVerti§illium sp; Sclerotium sp.) हाेताे किंवा साेडाेमाेनस (Pseudomonas sp.) या जीवाणूमुळे हाेताे. या राेगामुळे झाडे झटपट मरतात आणि अताेनात नुकसान हाेते. या राेगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.
 
उपाय
राेगट झाडे काढून नष्ट करावीत. पिकाची फेरपालट करावी. वाफ्यात राेगाची लागण असल्यास ब्लायटाॅक्स 60 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात औषध तयार करून झाडांना अळवणी द्यावी. गरज भासल्यास दुसरी अळवणी 20 दिवसांनी द्यावी.
 
वेलवर्गीय भाजीपाला
यामध्ये दाेडका, कारली, काकडी, भाेपळे, घाेसाळे, कलिंगड, खरबूज इत्यादी भाजीपाल्यांचा समावेश हाेताे. या पिकांवर मर, भुरी, केवडा आणि करपा राेगाची लागण हाेत असल्याने माेठ्या प्रमाणात नुकसानही हाेते.
 
केवडा
या राेगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या पृष्ठभागावर पिवळे चकचकीत ठिपके दिसतात आणि या ठिपक्याच्या खालील बाजूस काही वेळा कापसासारखे पिवळे धागे दिसतात. राेगाची सुरुवात खालील पानांपासून हाेते आणि वरील पानांकडे पसरते.
राेगाची तीव्रता जास्त असल्यास पाने पूर्णतः करपतात.
 
उपाय
पेरणी/लागवड करण्यापूर्वी बियाण्यांस मेटॅलॅक्झिल 35% बुरशीनाशकाची 6-7 ग्रॅम प्रतिकिलाे बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. प्रतिबंधक उपाय म्हणून उगवण झाल्यानंतर 20 दिवसांपासून दर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने बाेर्डाे मिश्रण 1% किंवा क्लाेराेथॅलाेनील किंवा मॅन्काेझेब/काॅपर ऑक्झीक्लाेराइड/झायरम 25 ग्रॅम/मिली प्रति 10 लि. पाणी या प्रमाणात फवारावे.
 
 
 
पी. पी. खंडागळे, ए. एम. जगताप,
डाॅ. बी. एम. इल्हे  
कृषी संशाेधन केंद्र, निफाड,
जि. नाशिक