हरितगृहातील ढाेबळी मिरचीची लागवड

डिजिटल बळीराजा-2    22-Oct-2020
|
mirchi_1  H x W
 
ढाेबळी मिरचीचा उगम ब्राझील या देशामध्ये झाला असून साेलानेसी कुळातील आहे. या निर्यातक्षम भाजीला ‘सिमला मिरची’ किंवा ‘भाेपळी मिरची’ या नावानेदेखील ओळखले जाते. इंग्रजीमध्ये कॅप्सीकम किंवा स्वीटपेपर असेही संबाेधतात. यामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे. अलीकडच्या काळात फास्टफूडचे प्रमाण वाढल्यामुळे ढाेबळी मिरचीला वर्षभर चांगला बाजारभाव मिळत आहे. ढाेबळी मिरचीचा वापर सॅलड, स्टड किंवा डिशमध्ये सुबक मांडणीसाठी हाेताे. सॅलडच्या डिशेसमध्ये लाल ढाेबळी मिरचीला माेठी मागणी असते. हिरव्या ढाेबळी मिरचीपेक्षा दुप्पट ते तिप्पट भाव लाल ढाेबळ्या मिरचीला मिळताे.
 
महत्त्वाचे म्हणजे हे पीक समशीताेष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असून, बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, धुके, हळुवार व मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास अनुकूल नाही. म्हणूनच हरितगृहात ढाेबळी मिरचीची लागवड केल्यास पिकास संरक्षण मिळून जास्तीत जास्त उत्पादन व आर्थिक फायदा, तसेच उत्तम प्रतीची ढाेबळी मिरची मिळविता येते. हरितगृहामुळे आपल्याला निरनिराळ्या रंगाची ढाेबळी मिरची शक्य झाले आहे. फळांच्या रंगाबराेबरच उत्पादन क्षमता, फळांचा आकार, प्रतवारी, झाडाच्या वाढीचा प्रकार आणि मार्केटमधील मागणी आदी घटकांवरसुद्धा ढाेबळीच्या जातींची निवड अवलंबून असते.
 
सुधारित जाती
 
हिरव्या, लाल, पिवळा, जांभळा व पांढरा असे माेहक रंग असलेल्या माेठ्या फळांच्या अनेक जाती ढाेबळी मिरचीत आढळतात. हरितगृहात ढाेबळी मिरचीची लागवड करण्यासाठी इनडिटर मिनेट जातीची निवड करावी. जेणेकरून झाडाची वाढ, फुले व फळधारणा नियमित हाेईल. इंद्रा, कॅलिफाेर्नियावंडर, बाॅम्बी, ऑराेबेल यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती निवडाव्यात. हरितगृहातील लागवडीसाठी ढाेबळी मिरचीचे 20 ते 30 ग्रॅम बियाणे 10 गुंठे क्षेत्रासाठी पुरेसे आहे. 
 
राेपे तयार करणे
 
राेपे तयार करण्यासाठी रूट ट्रेनर्सचा वापर करावा. हे शक्य नसल्यास प्लॅस्टिक कप किंवा गादीवाफ्यावर राेपे तयार करावीत. शेणखत, वाळू, लाल माती व काेकाेपीट इत्यादीचे मिश्रण, निर्जंतुकीकरण करून घ्यावे. हे मिश्रण रूट ट्रेनरमध्ये भरून प्रत्येकी एका सेलमध्ये एक बी टाकावे. हरितगृहामध्ये साधारणत: 30 ते 40 दिवसांत राेपे तयार हाेतात. राेपांची वाढ जाेमदार हाेण्यासाठी विद्राव्य, नत्र, स्फुरद व पलाश यासारखी खते द्यावीत.
 
लागवड
 
ढाेबळी मिरचीची लागवड करण्यासाठी 1 मी. रुंद व जमिनीपासून 30 ते 40 सें.मी. उंच गादीवाफे बनवावेत. यासाठी चांगली सुपीक पाेयट्याची अथवा लाल माती व शेणखत वापरावे. दाेन गादीवाफ्यातले अंतर 50 सें.मी. ठेवावे. लागवडीच्या पंधरा ते वीस दिवस अगाेदर तयार केलेले गादीवाफे फाॅर्मल डिहाईडच्या द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावे. 30 ते 40 दिवसांचे राेपे लागवडीसाठी याेग्य असतात. राेपांची लागवड करताना राेपांना माेनाेक्राेटाेफाॅस, काॅपरऑक्सिक्लाेराइड व रीडाेमीलच्या द्रावणात बुडवून लागवड करावी. गादीवाफ्यावर 45 ग 60 सें.मी. आकाराच्या खाचा बनवून सकाळी किंवा दुपारनंतर कमी तापमानात लागवड करावी. लागवडीनंतर ताबडताेब पाणी द्यावे. हरितगृहामध्ये शक्यताे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. झाडांना आठवड्यातून एकदा बाॅविस्टीन किंवा कॅपटाॅपचे ड्रेन्चिंग करावे.
 
खते
 
100 किलाे, नत्र 50 कि. स्फुरद आणि 50 कि. पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. याव्यतिरिक्त ठिबक सिंचनाद्वारे आठवड्यातून दाेन वेळा विद्राव्य खतातून झाडांना पाेषण द्यावे. या पिकाला माती, पाणी तपासणीनुसार आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांनुसार खतांच्या मात्रा ठिबक संचातून द्याव्यात. उदा. नत्र 330 पीपीएम, फाॅस्फरस 15 पीपीएम, पाेटॅश 170 पीपीएम, कॅल्शियम 75, मॅग्नेशियम 30 आणि सल्फेट 40 पीपीएम या प्रमाणात द्यावे.
  
झाडांना वळण देणे
 
लागवडीच्या 3 आठवड्यांनंतर झाडांना दाेन किंवा चार फांद्यांमध्ये वाढवावे. अनावश्यक फांद्यांची छाटणी करावी. हे दर पंधरा दिवसांनी करावे. झाडांना आधार देण्यासाठी फांद्यांना नायलाॅन किंवा प्लॅस्टिक दाेरीने बांधून जमिनीस समांतर व जमिनीपासून 3 मी. उंचीवर लावलेल्या लाेखंडी तारांना या दाेऱ्या बांधाव्या. राेपे लागवडीतील अंतर हे झाडांना वळण देण्याच्या पद्धतीवर, आधार देण्याच्या पद्धतीवर तसेच छाटणीच्या/आकार देण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. तरीसुद्धा 1 चाै.मी. क्षेत्रावर 6 ते 7 खाेडे हिशाेबाने यायला पाहिजेत. बहुतेक ठिकाणी छाटणी करताना एका झाडावर दाेन खाेडे ठेवण्याची पद्धत आहे. म्हणजे प्रति चाै.मी.मध्ये तीन मध्ये ठेवता येतात.
 
फळांची विरळणी
 
दाेन मुख्य फांद्या पद्धतीत सर्वसाधारणपणे खाेडावरील दुसऱ्या किंवा तिसऱ्या बेचक्यात बाजूच्या फुटव्यापर्यंत फळधारणा लांबवावी. फळांची चांगली वाढ हाेण्याकरिता लहान, वाढ न झालेली फळे काढून टाकावी. 4 ते 6 फळे पहिल्या बहारामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात. पहिल्या बहारानंतर विरळणी ही फक्त लहान, राेगट फळांकरिताच करावी. खूप वेळा विरळणी करू नये.
 
कीड व राेग नियंत्रण
 
हरितगृहातील ढाेबळी मिरचीवर प्रामुख्याने फुलकिडे, मावा, तुडतुडे, फळे पाेखरणारी अळी या किडी तसेच भुरी राेगाचा प्रादुर्भाव हाेताे. त्यांच्या नियंत्रणासाठी व्हर्टीमेक 5 मि.ली./लि., अ‍ॅसिडयामिपरीड 1 ग्रॅम/लि., मॅलाॅथियाॅन 17 मि.लि./10 लि., सल्फर 10 मि.लि./10लि., क्लाेराेपायरीफाॅस 17 मि.लि./10लि. याची फवारणी करावी.
 
फळांची काढणी
 
लागवडीनंतर 50 ते 60 दिवसांत ढाेबळी मिरचीचे उत्पादन सुरू हाेते. फळांची काढणी आठवड्यातून एकदा करावी. फळे ताेडणीसाठी तीक्ष्ण चाकूचा वापर करावा. साधारणत: 8 ते 10 वेळा फळांची काढणी केली जाते. हरितगृहामध्ये 90 ते 120 टन/हे. ढाेबळी मिरचीचे उत्पादन मिळते.